ज्योतीष या विषयाचे आणि माझे फारसे सख्य नाही. वार्षिक राशिभविष्य आणि त्यावर गाढ विश्वास असणारे लोक ह्यांच्यापासून मी तसा लांबच असतो…एक तर आपल्या आयुष्यात पुढे काय होणार हे जाणून घ्यायची इतकी उस्तुकता का असते कोणास ठाऊक. त्यात परत आपल्या मनासारखे (म्हणजे आपले सगळे चांगले होईल असे सांगणारे) भविष्य जोवर कानांवर पडत नाही तोवर लोकांना चैन पडत नाही.

’ते अमके अमके चांगले भविष्य सांगतात हो…’ असे ऐकले की मला हसुच येते… ’चांगले भविष्य’ सांगतात की ’खरे भविष्य’?

पण लोकांना ’चांगले भविष्य’ च ऐकायचे असते…आणि मग ते जोवर ऐकायला मिळत नाही तोवर एका ज्योतिषाकडून दुसर्याकडे, एका महाराजांकडून दुसर्या ’बाबा’ कडे असे भटकावे लागते. चतुर आणि चाणाक्ष ज्योतिषी हे बरोबर ओळखतात आणि फक्त ’चांगले भविष्य’ च सांगतात…


वर आणखी ’भविष्य’ चांगले नसेल तर उपाय पण सुचवतात…वाईट योग टाळण्यासाठी… म्हणजे छोटे-मोठे अभिषेक करुन, यद्न्य-याग करुन वाईट भविष्य बदलता येते, किंवा त्याची तीव्रता कमी करता येते!!! काय अजब प्रकार आहे… पण (अधू डोक्याच्या) लोकांना ते पटते सुद्धा.


अगदी चांगली शिकली सवरलेली लोकंही ह्याच्या मागे लागतात आणि वेग-वेगळी कारणे देतात… उदा. भविष्य चांगले आहे असे ऐकून जर मानसिक शांती मिळणार असेल आणि त्यामुळे नवी जिद्द मिळणार असेल तर त्यात वाईट काय आहे? किंवा कमकुवत लोकांच्या मनासाठी तो मानसिक आधार आहे आणि ते वाईट मार्गाल लागण्यापेक्षा, भविष्यामुळे जर आशावादी रहणार असतील तर ते चांगलेच आहे….म्हणजे शास्त्रीय आधारावर ’ज्योतीष’ कमी पडते असे दिसायला लागल्यावर ’मानसशास्त्रीय’ कारणे पुढे करायची…असो.


तसा मीही ’विरंगुळा’ आणि ’विनोद’ म्हणून राशीभविष्य वाचतो…माझे भविष्य कधीच वाईट नसते, पण तरीही त्याचा मला काही उपयोग नसतो.

म्हणजे लहानपणी शाळेत असताना माझे भविष्य असायचे ’वैवाहिक सौख्य लाभेल’ किंवा ’पुत्रसौख्य लाभेल’ आणि आता भविष्य असते: ’परिक्षेत सुयश मिळेल’ किंवा ’अभ्यासात प्रगती होईल’ …म्हणजे भविष्य चांगले असून मला उपयोगी काहीच नाही…


सध्या माझे वाईट दिवस चालु आहेत. म्हणजे तसे ते आता कायमचेच झाले आहे… ’आज रोख उद्या उधार’ किंवा ’आज पार्कींग समोर आहे’ सारखे ’सध्या माझे वाईट दिवस चालु आहेत’… लोकांना एकच राशी असते, माझी रास मात्र सारखी बदलत असते. ज्या राशीला साडेसाती चालु असेल ती माझी रास! माझे नशीब इतके वाईट आहे, की जर मी विजेच्या दिव्याला पकडून शॊक घेऊन मरायचे असे ठरवले, तर नेमके त्यावेळी ’भारनियमनामुळे’ वीज बंद असेल…असो.


एका ज्योतीषाने माझी पत्रिका पाहून मी उच्चशिक्षण घेणार असे आधीच सांगितले होते म्हणे…आता मी MBA केल्यावर त्याला जोर चढला: ’बघा…मी म्हणालो नव्हतो…बाळाचे पाय पाळण्यातच दिसले होते मला…हाहाहा…’

…मी त्याला म्हणणार होतो…की बाळाचे पाय दिसले तसे त्याच बाळाची MBA नंतर (किंवा त्यामुळेच?!) चड्डी ओली (आणि पिवळी पण) होणार आहे ते नव्हते का दिसले…

<div style="text-align: justify
;”>
>

परवा एका दिवाळी अंकातले माझे भविष्य वाचत होतो…लिहिले होते: ’उच्चशिक्षणासाठी परदेशगमनाचा योग आहे’…वाचून मला घामच फुटला… म्हणजे मागच्या वर्षभर मी  UK ला राहून MBA करून आलो ते काय होते?


म्हणजे UK हा परदेश नाही की MBA हे ’उच्चशिक्षण’ नाही?


असो…मी मात्र आता ’खूप शिकून खूप मोठ्ठा’ झालो आहे…, त्यामुळे अगदी ते भविष्य खरे होण्यासारखे असले तरी मी काही उच्चशिक्षणासाठी परदेशी जणार नाही…