नुकतेच आमच्या एका प्रोजेक्ट मीटिंग मध्ये मी माझ्या manager ला सांगितले: ’माझ्या टीम मधला एक जण resign करणार आहे अशी कुणकुण मला लागली आहे’ (अर्थात हे मी इंग्लिश मध्ये सांगितले – आत इंग्लिशमध्ये मी ’कुणकुण लागली आहे’ हे कसे म्हटले असले प्रश्न विचारु नका. भावना लक्षात घ्या! तर कुठे होतो मी – हा, कुणकुण लागली…)
तर माझा manager म्हणाला ’अरे खरंच जात असेल ना तर जाऊ दे त्याला’… म्हणजे एखादा मुलगा बागेत गेल्यावर ’मला झोपाळ्यावर जायचे’ असा हट्ट करु लागल्यावर जसे आपण म्हणतो ना – ’जा हो बाळा, नाही तुला कोणी अडवणार’ तसे मी त्याला रेसिग्न करणाऱ्याला म्हणणे अपेक्षित होते की काय… (आता खरं तर हे उदाहरण तितकेसे योग्य नाही. इतक्या समजूतदारपणे कोणीही आपल्या ’कार्ट्या’शी बोलत नाही. पण (परत एकदा) – भावना लक्षात घ्या!)
आता अगदी खरे सांगायचे तर असे कोणीही माझ्याजवळ बोलले नव्हते. मीच जरा चाचपणी करावी म्हणून एक खडा मारून पाहिला – म्हणजे उद्या मीच असे म्हणालो तर त्याचा कितपत फायदा होईल ह्याची चाचपणी करण्यासाठी. पण ’जातोय तर जाऊ दे’ हे ऐकून मला एकदम धक्काच बसला. (माझाच ’खडा’ मला बूमरॆंग सारखा येऊन लागला) असो. थोडक्यात काय सध्या आहे त्या जॊबशी ’एकनिष्ठ’ राहाणे चांगले!
पण सध्या काही काम पण नाहीये, आणि त्यामुळे दिवस कसा घालवावा ते कळत नाही. हल्ली तर ईमेल्स येणे ही बंद झाले आहे. म्हणून मग टाईम पास म्हणून मीच इतरांना पाठवलेले ईमेल्स ’सेन्ट आयटम्स’ फोल्डर मध्ये जाऊन वाचतो.
पण असे तरी किती दिवस करणार? म्हणून मग मी आणखी एक युक्ती शोधली. आमच्या इथे वेब ईमेल्स (याहू, जी मेल, हॊटमेल इत्यादी) ब्लॊक केले आहेत. फक्त लायब्ररी मध्ये ओपन होते. म्हणून मग मी स्वतःलाच माझ्या याहू, होटमेल, जी मेल वर ईमेल करतो. आणी मग लायब्ररी मध्ये जाऊन त्या वाचतो..आणि मग त्याला माझा ऒफीसच्या ईमेल वर रीप्लाय करतो…आणि मग माझ्या डेस्क वर येऊन ते रीप्लाय वाचतो. हे सगळे करता करता वेळ कसा जातो ते कळतच नाही!
आता तुमच्या लक्षात आले असेल कि मी किती पडीक आहे. पण हा असा टाईम पास तरी किती दिवस करणार? लवकरच काही तरी नवीन विरंगुळा शोधला पाहिजे.
जी गोष्ट ईमेल्स ची तीच फोन ची. हल्ली कुणाचे फोनच येत नाहीत. अगदी क्रेडिट कार्ड किंवा इन्व्हेस्टमेंट स्कीम विकणारे फोन ही नाहीत. पण चुकून असा फोन आलाच तर मग मात्र मग मी ती संधी सोडत नाही. अगदी अर्धा पाऊण तास तरी बोलून सगळी माहिती मिळवतो. तेवढाच वेळ जातो, आणि इतरांना मी बिझी असल्यासारखे वाटते.
असो…आता मी जातो, परत एक ’महत्वाचा’ फोन आला आहे. क्रुषी महाविद्यालयाच्या एका प्रदर्शनात एका स्टॊल मध्ये मी जाऊन एका आधुनिक कीटकनाशक फवारणी यंत्राबद्दल मी उत्सुकता दाखवली होती…आणि अधिक माहिती साठी माझा फोन नंबर दिला होता…त्याच बाबाचा फोन आहे! आता चांगला तासभर तरी मी त्याला सोडत नाही -:)
Leave a Reply