नुकतेच आमच्या Gym मध्ये काही महत्वपूर्ण बदल झाले  (मी मराठी माध्यमाचा असल्यामुळे मी आधी ’व्यायाम शाळा’ असे म्हणायचो. ते ऐकून लोक नाकं मुरडायचे. ’Gym’ कसं त्यांना ’sophisticated’ वाटते. म्हणजे जागा तीच. फक्त नाव बदललं की एकदम त्याचा ’क्लास’ बदलतो. असो.)


आधी लेडीज Gym च्या वेळा (Gym च्या वेळा …काय रचना आहे… ’गाड्यांना खूप गर्द्या होत्या’ सारखे) वेगळ्या होत्या (दुपारी १२ ते ५), पण आता असे काही वेगळे टायमिंग  नाहि. लेडीज आणि जेंट्स – सगळ्यांचे टायमिंग एकच!


आता असे झाल्यामुळे एकदम बरेच बदल घडून आले. काही जणं यायचेच बंद झाले, तर काही जणं एकदम ’रेग्युलर’ यायला लागले (तेही १ च्या ऐवजी २ तास!)


माझी मात्र पंचाईत झाली. सध्याची वेळ बदलणे मला शक्य नाही, आणि आहे त्याच वेळेस जायचे म्हणजे … आता बघा…Gym ला  जाऊन २.५ किलो. आणि ३ किलो. वजन उचलणं बरं दिसतं का? ते ही अशा ’लेडीज बायकांच्या’ समोर – ज्या ३०-४० किलो वजन सहज उचलतात!


म्हणून मी पण ठरवलं – आपण ५० किलो वजन उचलायचं!


पण माझा आगाऊपणा नडला आणि शेवटी व्ह्यायचे तेच झाले. माझ्या पाठीत उसण भरली…


१-२ दिवस तसेच काढले. पण शेवटी नाईलाजाने मी आमच्या फ्यामिली डॊक्टर कडे जायचे ठरवले (नाईलाजाने का ते कळेलच लवकरच)…


आमचे डॊक्टर थोडे ’वेगळे’ आहेत, आमच्या सारखेच. (’विचित्र’ म्हणणे बरं दिसत नाही)


“आनंद” मधला अमिताभ अजून थोडा किडकिडीत असता आणि त्याला जाड चश्मा आणि टक्कल असते तर जसा दिसला असता ना तसे दिसतात आमचे डॊक्टर….(म्हणजे नक्की कसे…असा फार ताण देऊ नका डोक्याला)


ते एकदम हळू आवाजात बोलतात आणि प्रचंड भरभर बोलतात.  इतके की ते ऐकुन त्याचा डोक्यात अर्थ लावून त्यावर प्रतिक्रिया देइ पर्यन्त त्यांची २-३ वाक्ये झालेली असतात.


माझा तर नेहेमी ते तपासत असताना गोंधळ होतो…’श्वास घ्या. सोडा, घ्या. सोडा, घ्या.सोडा’ असे इतक्या भरभर करायला लावतात की एकदा मी वैतागून त्यांना म्हटले: “अहो आताच तर सोडला श्वास, पुन्ह सोडा काय. आधी घेऊ तर दे, मग सोडतो”


पण तसे ते चांगले आहेत (म्हणजे स्वस्त आणि मस्त!). कुणालाही कसलाही आजार झाला असेल तरी ते ’हे अपचनामुळे होत आहे’ असे निदान करतात…कारण त्यावरचे औषध त्यांना खात्रीने देता येते.


एकद माझ्या डोक्याला टेंगूळ आले होते,  त्याचे निदान पण त्यांनी, ’हे अपचनामुळे झाले आहे’ असे केले…आता बोला…


पण एक मात्र खरे…त्यांच्या नेहेमीच्याच हिरव्या, लाल, पिवळ्या गोळ्यांना गूण मात्र चांगला आहे…


le
=”font-size:medium;”>

असो. थोडक्यात सांगायचे तर, डॊक्टरांच्या एका ’डोस’ नी माझी पाठ एकदम बरी झाली. त्यामुळे आता मी नव्या जोमाने Gym पुन्हा सुरु करायला सज्ज झालो आहे!!!


Advertisements