नुकतेच मी पुणे मराठी ग्रंथालय इथून समर्थ रामदास यांच्यावरचे एक पुस्तक आणले होते…अचानकच मिळाले आणि जरा चाळल्यावर घ्यावेसे वाटले.

तसा मी ’रामदासी’ नाही…म्हणजे रामदासांचे जास्त काही वाचलेले नाही…त्या मानाने तुकारामांना बरेच follow करतो…

रामदासांचा आणि माझा शेवटचा संबंध हा प्राथमिक शाळेत ’मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा इतकाच मर्यादित होता. माझ्या आयुष्यातले दुसरेवसरे (पहिलेवहिले च्या धर्तीवर) बक्षीस हे ’मनाचे श्लोक’ स्पर्धेतले होते. ज्याबद्दल मला ’रंगीत खडूची पेटी’ बक्षीस मिळाली होती…(ज्यातले रंग ’ढ’ दर्जाचे होते…आमच्या चित्रांसारखे)

पहिले बक्षीस, विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ, ’पाकशास्त्रात’ होते! होय, पाकशास्त्र स्पर्धेत मी ’दडपे पोहे’ बनवायला मदत केली होती…म्हणजे सगळे काम आमच्या ’बाईं’नी च केले होते (हल्ली ह्यांना’टीचर’ म्हणतात म्हणे) मी फक्त त्यात ’रस’ दाखवला – बाकीच्या मुला-मुलींपेक्षा – म्हणून मला बक्षीस मिळाले. अर्थात माझा ’रस’ हा त्यानिमित्तानी पोह्यांची ’चव’ बघायला मिळेल ह्यात जास्त होता…असो. तर हे पहिले बक्षीस म्हणून मला कपडे लावायचा ’हँगर’ मिळाला होता…

म्हणजे स्पर्धा प्रकार, मुलांचे वय, ईयत्ता तुकडी, त्यामागचा ’प्रोत्साहन’ द्यायचा हेतू ह्या सगळ्या-सगळ्याशी संपूर्ण विसंगत असे बक्षीस देण्यात आमची शाळा तरबेज होती…मनाच्या श्लोकाला ’खडूची पेटी’, पाककलेला ’हँगर’, चमचा लिंबूला छोटी स्टीलची वाटी/ वाडगा, तीन पायाच्या शर्यतीला ३ ’भेट द्यायची पाकिटे’ (प्रत्येक पायाला एक ह्या हिशोबानी…पण तीन पायाच्या शर्यतीत दोनच जण भाग घेतात, हे मात्र त्यांच्या लक्षात यायचे नाही)

ही अशी काही तरी बक्षीसे द्यायचे आमची शाळा…म्हणजे त्यानी प्रोत्साहन मिळणे तर दूरच राहो, उलट हसंच जास्त व्हायचे. माझी तर ’हँगर’ ह्या बक्षीसावरून खूपच चेष्टा झाली होती…कारण माझा ’तोळा-मासा’ बांधा बघून (हल्ली असा बांधा बघायला मिळत नाही…हल्ली सगळेच ’अति-सुपोषित’ असतात…) मल ’हँगर’ असे चिडवायचे…जणू काही हँगरला शर्ट अडकवालाय असे वाटायचे म्हणून…आणि त्यात परत हँगरच बक्षीस….असो. पण अशा टीका, टक्के-टोणपे सहन करतच थोर लोकं (उदा: ’स्वतः’) मोठी होतात…मी ’मोठा’ दुसऱ्याच अर्थानी झालो…माझे आत्तचे ’बाळसेदार’ रूप बघता ’हाच का तो हँगर’ असा प्रश्न पडेल…पण कसे का असेना…मीही मोठ्ठा झालो!

असो…हे थोडे (जास्तच) विषयांतर झाले. तर सांगायचा मुद्दा हा की…लहानपणी मनाचे श्लोक किंवा ईतर श्लोक, ओवी, अभंग असे वाचनात यायचे. त्यावरुन बऱ्याच गंमतीजंमती पण व्हायच्या…

म्हणजे – जे का रंजले गांजले च्या ऐवजी ’जे कारंजे गंजले’ असे काही तरी…एकदा संत चोखा मेळा यांच्या ’चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा’ ही ओळ एकाने चुकून गडबडीत ’चोखा म्हणे माझा भाव कमी आहे’ अशी वाचली…आणि मग मास्तर असा हात सैल करायचा ’मणिकांचन योग’ कसा सोडतील…

आमच्या शाळेतले शिक्षक पण ’प्रीपेड’ शिक्षा करायचे…सगळ्यांना नाही…काही निवडक मान्यवरांना, आणि अर्थातच माझा नंबर त्यात फार वरचा होता! म्हणजे शिक्षक वर्गात आले की काही कारण नसताना आम्ही काही मुले दंगा करणारच असे ग्रुहीत धरून ५-५ छड्या मारयचे आणि मग हजेरी घ्यायचे…आमची ’हजेरी’ आधीच झालेली असायची…मग आम्हीसुद्धा मार तर आधीच खाल्ला आहे मग आता दंगा का करु नये? असा विचार करुन खाल्लेल्ल्या माराची भरपाई म्हणून दंगा करायचो. ’कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर मोबदला मिळाय

Advertisements