दरवर्षी प्रमाणे २६ जाने. ला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, आणि दरवर्षीप्रमाणे त्यावरून वाद सुरु झाले. बरेच लोकांना त्यातली नावे वाचून ’धक्का’ वगैरे बसतो…पण खरं तर त्यात धक्का वगैरे बसण्यासारखे काहीच नाहिये. तुम्ही अगदी सुरुवातीपासूनचे पद्म पुरस्कार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पुरस्कारांबद्दल/ ते मिळवणाऱ्यांबद्दल आदर वाटावा असे त्यात काही नाही.

मी खूप आधीपासून पद्म पुरस्कार ’फॊलो’ करतो… तुम्हाला सगळे विजेते पहायचे असतील तर ह्या वेबसाईटला भेट द्या.

आशा भोसले यांना पहिल्या पद्म पुरस्कारासाठी २००८ पर्यंत वाट पहावी लागली – कारकीर्द सुरू होऊन तब्बल ६० वर्षे उलटून गेल्या वर! (तेही थेट ’पद्म विभूषण’, ’पद्मश्री’ आणि ’पद्मविभूषण’ कधी मिळालेच नाही)

मागच्या वर्षी २००९ मध्ये पं ह्रुदयनाथ यांना ’पद्मश्री’ च्या रुपाने पहिला पद्म पुरस्कार मिळाला…आर्टस/ कला ह्या क्षेत्रात…त्याच वर्षी सिनेकलावंत   अक्षयकुमार आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनाही ’कला’ क्षेत्रासाठी पद्मश्री मिळाली. पं. ह्रुदयनाथ मंगेशकरांनी पहिले गाणे स्वरबद्ध केले ते १९५३-५४ च्या सुमारास, म्हणजे सुमारे ५५-५६ वर्षांपूर्वी (त्यानंतर १५-२० वर्षांनी अक्षयकुमार आणि ऐश्वर्या यांचा जन्म झाला!).

ऐश्वर्या आणि अक्षयकुमार यांनी त्यांची कारकिर्द सुरु केली ती १९९२ च्या सुमारास…पण तरिही पद्मश्री ह्या तिघांनाही एकाच वेळेस – एकाच क्षेत्रासाठी! निदान ऐश्वर्यानी विश्वसुंदरी वगरे किताब (कितीही दिखाऊ असले तरी) मिळवले, अक्षयकुमारचे ’कला’ क्षेत्रात नक्की योगदान काय? आणि ह्रुदयनाथ ह्यांना त्याच दर्जाच्या पुरस्कारासाठी ५० हून अधिक वर्षे वाट पहावी लागते ते का?

त्याचीच पुनराव्रुत्ती ह्या वर्षी झाली. सगळ्यात सुमार, टुकार, लिंबू-टिंबू आणि अशक्त खान – सैफ अली खान – याला २०१० साठीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला. चित्रपट अभिनेत्री रेखा हिला देखील पद्मश्री दिली आणि उद्योजक आणि समाजकार्यकर्ती अनू आगा यांनापण… रेखा १९६९ मध्ये चित्रपट क्षेत्रात आली, अभिनेत्री म्हणून किंवा इतर कलेच्या द्रुष्टीने तिने फारसे कधी काही केले नाही (जसे हेमामालिनी हिने न्रुत्य क्षेत्रात केले!) तरी तिला ह्या पुरस्कारासाठी ४० वर्षे वाट पहावी लागली.

अनू आगा यांना तर बिझनेस मधील उल्लेखनीय कामगिरीसाठी (थरमॆक्स चा यशस्वी कायापालट केल्याबद्दल) पुरस्कार मिळालाच नाही…पण त्यांनी स्वेच्छानिव्रुत्ती घेऊन सामाजिक क्षेत्रात जे काम केले त्याला २०१० साठीचा पद्मश्री पुरस्कार मिळाला.

त्याउलट सैफ अली खान – ज्याने कुठल्याही उल्लेखनीय चित्रपटात, जो लॆंडमार्क किंवा माईलस्टोन असा मानता येईल – अशा चित्रपटात काम केलेले नाही…तरिही त्याला इतक्या लवकर पद्मश्री पुरस्कार!!?? नाही म्हणायला तो शर्मिला टागोर (जी रवींद्रनाथ टागोरांची नात आहे) आणि पूर्व क्रिकेट कप्तान नवाब पतौडी यांचा मुलगा आहे…ह्या त्याच्या ’कामगिरी’बद्दल पुरस्कार दिला असेल तर असो!

कवी मंगेश पाडगावकर यांनी नुकतीच त्यांना एकही पद्म पुरस्कार न मिळाल्याबद्दल (त्यांच्या हलक्या फुलक्या शैलीत) ’खंत’ बोलून दाखवली. किंवा बाबासाहेब पुरंदरे यांनाही पद्म पुरस्कार न मिळाल्यची खंत ह्रुदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली. पण पद्म पुरस्कार न मिळालेले ते एकटेच नाही, किंवा विनाकारण पद्म मिळालेले ही काही मोजकेच नाहीत.

एकूणच पद्म पुरस्कारांचे विशेष कौतुक किंवा आदर वाटावा असा त्या
ंचा इतिहास नाही…ते थोडेसे आपल्या शिक्षणपद्धतीसारखे आहे…ज्यांना त्याचे तंत्र कळते ते विशेष काही न करताही पुरस्कार (किंवा मार्क्स) मिळवू शकतात आणि ते मिळाले नाही म्हणूनही कोणाचे काही अडत नाही, किंवा ते न मिळालेली माणसे थोर बनतच नाहीत असेही नाही!
—————————————————————————

जाता जाता:
सैफ ला पद्मश्री मिळाल्याचे ऐकल्यावर करिनानेही त्याच्याकडे हट्ट धरला…
’मला ही एक पद्मश्री दे… नाहीतर…’
’अगं, पण ती अशी मिळवता किंवा मागता येत नाही…’
’व्वा! मग तुला कशी मिळाली..’
सैफ चा चेहरा एकदम पडला (त्याच्या पिक्चरसारखाच!)
’बरं बरं…’ आपण एकदम त्याची खपली काढली हे करिनाच्या लक्षात आले
’मग निदान, फिल्मफेअर तरी?’
सैफचा चेहरा एकदम खुलला!
’हं…हे जमण्यासारखे आहे’
’खरंच!!?? कसे जमवणार तू?’ – करिना

’अं…अं…फिल्मफेअर…म्हणजे, शाहरूखशी बोलावे लागेल…अजून त्यानी ह्या वर्षीचे विजेते ठरवले नसले म्हणजे झाले…पण ते तू माझ्यावर सोड…!’

~ कौस्तुभ

Advertisements