सध्या लोकसत्ताच्या वस्तुरंग या पुरवणीत संजय पाटील यांची एक लेखमाला प्रसिद्ध होते. त्याचा विषय ’वास्तुशास्त्र’ हा आहे. मला मुळातच ह्या विषयचा तिटकारा आहे – तो त्यातल्या “शास्त्र” ह्या शब्दामुळे.

माझ्या आठवणीप्रमाणे गेल्या १५-२० वर्षातच हे ’वास्तुशात्र’ चे प्रस्थ माजले आहे, नाही, पद्धतशीरपणे ते माजवले आहे…आणि आपल्याकडची बिनडोक, पापभीरु आणि झटपट सुख मिळवण्याच्या मागे लागलेली आणि कायम लायकीपेक्षा जास्त (पैस, प्रसिद्धी, मान सन्मान इ.) हव्यास असलेली जनता त्याला खतपाणी घालते आहे.

काही दिवसांपूर्वी  “देव्हारा कुठे, कसा”  हा संजय पाटील यांचा (विनोदी) लेख मी वाचला तेव्हाच त्याबद्दल लिहायचे होते – ते काही कारणानी राहून गेले.  नंतर त्यांनी “टॊयलेटचा प्रश्न (भाग १ आणि २)” ह्या शीर्षकाचे अजून २ (विनोदी) लेख लिहीले (नशीब, देव्हाऱ्याच्या लेखासारखे ह्याचे नाव “संडास: कुठे, कसा” असे नाव नाही दिले!

अजून एक निरीक्षण म्हणजे अशा विषयात टॊयलेट हा शब्द जास्त बरा वाटतो, सतत ’संडास’ (हा शब्द) पचायला जास्त जड जाते आणि शौचकूप वगैरे वाचायला जड जाते. इंग्रजी ’टॊयलेट’ बरा!)

ह्याशिवाय पुण्यात जागोजागी ह्या वास्तुतज्ज्ञांचे होर्डिंग्स दिसू लागली अहेत. ’आबा, अप्पा, नाना’ इ. आदरणीय नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे ’पक्या, पप्पु, बबडू, छोटू’ इ. तरूण आणि धडाडीचे कार्यकर्ते यांचे जे अंगावर येणारे प्रचंड फलक असतात – त्याच्या जोडीलाच हे फलक. ह्या फ्लेक्स बोर्ड ची खिल्ली उडवणारा एक फलक पहा:

अजून एक बदल म्हणजे पूर्वी नुसते वास्तु तज्ज्ञ असायचे आणि ते त्यांच्या ’अभ्यासाप्रमाणे’ घराची यथेच्छ तोडफोड करायला लावायचे. म्हणजे घराचे प्रवेशद्वार बरोबर नाही म्हणून असलेला मोठ्ठा दरवाजा बंद करुन ठेवायचा आणि उगाचच खिडकीच्या जागी एक बारीक भोक पाडून त्यातून ये-जा करायची (म्हणजे म्हणे वास्तुदेवता प्रसन्न होते आणि घरात आनंद, सुबत्ता येते!)

हल्लीचे ’व्यावसायिक’ जास्त चतुर आहेत – एक तर ते नुसते वास्तुतज्ज्ञ नसतात – वास्तुविशारद, वास्तु-शिरोमणि, वास्तुमहर्षि, वास्तुमार्तंड अशा पदव्या लावतात (नशीब अजून कोणी स्वतःला ’वास्तुपुरूष’ म्हणवत नाहीत, नाही तर लोक त्यांनाच घरात जिवंत पुरायचे!) आणि हे थोर लोक हल्ली घराची तोडफोड करायला सांगत नाहीत, त्याऐवजी काही (खर्चिक) ’उपाय’/ ’उपचार’ करून ते तीच सुबत्ता, तीच भरभराट मिळवून देऊ शकतात (अर्थातच खर्च तोडफोडी इतकाच होतो, पण मालकाला समाधान हे की आपण भिंती आणि खिडक्या पाडल्या नाहीत)

पुण्यात शास्त्री रोडवर एका वास्तुतज्ज्ञाचे एक होर्डिंग आहे त्याचा USP च मुळी ’विना तोडफोड तुमचे घर, ऒफीस, कारखाना वास्तुशास्त्रानुसार करा आणि सुख, संपत्ती आणि समाधान मिळवा’ असे आहे! त्यांनी ह्यापूर्वीच अशा ३००० हून अधीक संतुष्ट घरांना सुख, संपत्ती आणि समाधान दिले आहे म्हणे. शिवाय त्यांना स्व. राजीव गांधी यांच्या नावाने काही पुरस्कारही मिळाले आहेत. राजीव गांधी, ज्यांनी संगणक युग आणले (किंवा आणण्याचा प्रयत्न केला – ज्याप्रमाणे तुमचे राजकीय विचार असतील त्याप्रमाणे!) त्यांच्या नावाचा ”वास्तुशास्त्रा’साठीचा पुरस्कार हाच एक विनोद आहे.

असो. आता मी परत एकदा संजय पाटील यांच्या (विनोदी) लेखाकडे वळतो:

एक बेसिक न समजणारी गोष्ट म्हणजे, आपली संस्क्रुती ही इतकी थोर आहे की त्यात सगळ्या विषयांवर सगळे संशोधन आधीच झालेले आहे आणि सगळे संस्क्रुत श्लोकांमध्ये लिहूनही ठेवलेले आहे! त्यामुळे कुठल्याही चर्चेला, मुद्द्याला, आरोपाला आधार म्हणजे एखादा संस्क्रुत श्लोक!

मला सांगा – समजा पूर्वी संस्क्रुत हीच व्यवहारातील भाषा असेल तर त्या काळी होणारे कुठलेही लेखन (मग कितीही सामान्य लेखक असेल, किंवा कितीही बेजबाबदार विचार, लिखाण असेल) ते संस्क्रुतमध्येच होत असणार – पण ह्याचा अर्थ असा नाही की ते सगळेच अभ्यासपूर्ण आणि अनुकरणीय असेल. कदाचित त्या काळचे ’वास्तुतज्ज्ञ’ छाप लेखक/कवी असतील – जे तितकेच सुमार आणि अर्थहीन (परंतु संस्क्रुत मध्ये) लिहायचे…

पण संजय पाटील आणि तत्सम स्वघोषित तज्ज्ञ (फक्त ह्याच क्षेत्रातले नाही, तर इतर अनेक विषयातले ज्यात संस्कुत श्लोक आणि ग्रंथ हा त्यांचा आधार असतो) अशा फुटकळ संस्क्रुत श्लोकांचा आधार घेतात आणि त्यांना सोयिस्कर अर्थ काढून ’विकतात’.

आता त्यांच्या लेखातील ही वाक्ये पहा – लेखातली वाक्ये ठळक अक्षरात दिली आहेत, पाहिजे तर तुम्ही मूळ लेख वाचु शकता – माझे विचार साध्या अक्षरात दिले आहेत.

…देव्हारा आयताक्रुती असावा, असं माझं मत आहे. (नीट लक्षात घ्या – हे त्यांचे वैयक्तीक मत आहे!) त्यासाठी एका श्लोकाचा संदर्भ देतो (म्हणजे मी मघाशी म्हटल्याप्रमाणे संस्क्रुत श्लोकाची ’कुबडी’ वापरली)

“समश्रं समव्रुत्तं यत्पुरुष चेति कथ्यते

आयाताकारधिष्ण्यं वा वनितेति प्रकीर्तितम”

(मानसारम – म्हणजे कुठले काय ते नाही लिहीले)

अर्थात: इमारत जर चौरसाक्रुती अथवा गोलाकार असेल तर ती पुल्लिंगी समजावी आणि आयताक्रुती स्त्रीलिंगी समजावी. पुल्लिंगी इमारतीत स्त्रीलिंगी मूर्ती ठेवू नये मात्र स्त्रीलिंगी इमारतीत स्त्री अथवा पुल्लिंगी मूर्ती ठेवता येते.

इमारतीसाठी असलेला हा नियम घटबिंब प्रतिबिंब द्रुष्टांतानुसार देव्हाऱ्यालाही लागू होतो. (कशावरून? हा सोयिस्कर अर्थ कसा काढला? ह्यात कसले ’शास्त्र’? पण पुढचा विनोदी भाग वाचा, त्यात लगेचच ह्या शंकेचं उत्तर मिळेल)

“…या आयताचं लांबी रूंदीचं प्रमाण १:१:६ असं असावं. आता तुमच्या मनात प्रश्न तयार होईल की हे प्रपोर्शन कसे काय काढलं? हे माझं संशोधन (?) आहे. याला काही गणिती सिद्धांताचा आधार अहे. मी त्याला सच्रेद गेओमेत्र्य (?) असं म्हणतो. आर्किटेक्टस आणि सिव्हिल ईंजिनीअर्सना ते चटकन समजेल. पण बाकीच्यांना ते समजणं कदाचित थोडसं अवघड असल्यानं सध्या त्याबद्दल लिहीत नाही. भविष्यात केव्हातरी लिहीन. “

(मला समजत नाही, हे सोयिस्कर पणे पाहिजे तेव्हा संस्क्रुत श्लोक आणि पाहिजे तेव्हा सायन्स/ ईंजिनिअरिंग याचा आधार कसा घेतात?)

“…देव्हारा मुख्य दरवाज्यासमोर असेल तर द्वारवेध (??) होतो (म्हणजे काय बुवा?) देवाची नजर थेट दरवाज्यावर येणं चांगलं नाही. शिवाय दरवाजात उभं राहिल्यानंतर – वाकून बघितल्यावर नव्हे – देव्हारा दिसणं हा प्रकार वास्तुशास्त्रानं निषिद्ध सांगितलाय”

(कोणते वास्तुशास्त्र??? कोणी लिहीले, आणि अचानक कसे प्रचलित झाले???)”

अशी अनेक उदाहरणे ह्या लेखात आहेत.लोकमान्य टिळकांनी गीतेचा अभ्यास करून ’गीता-रहस्य’ हा ग्रंथ लिहीला. इतरही अनेकांनी प्राचीन भारतीय संस्क्रुतीबद्दल खूप अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. पण त्या अनेक थोर आणि विद्वान व्यक्तींनी कधी ’वास्तुशास्त्र’ किंवा तत्सम विषयावर लिहिल्याचे ऐकीवात नाही. कदाचित ते ग्रंथ त्याकाळी उपलब्ध नसतील आणि अचानकच हल्लीच्या वास्तु-पुरुषांना (लॊटरी लागल्यासारखे!) ते मिळाले असतील.

मला राग ह्याचा आहे की चांगले सुशिक्षेत लोक ही ह्या वाटेला लागतात.

माझा एक मित्र वास्तुशास्त्रानी झपाटला आहे. घरातल्या खोल्या पंचकोनी करण्यापासून ते अनेक लोलक, लंबक, यंत्र टांगून घराचे जंतर-मंतर करण्यापर्यंत सगळे उपाय (विना-तोडफोड किंवा तोडफोडीसहीत!) केल्यावरही त्याला ’अपेक्षित’ सुख मिळेना (म्हणजे महिना ’फक्त’ ८०,००० पगाराच्य ऐवजी त्याला १,२०,००० रु. पगार पाहिजे होता.)

एका नवीन वास्तु-पुरुषाकडे तो गेला. त्यांनी त्याचा हात नीट पाहिला, आणि घरही पाहिले. त्याच्या बोटात नवीन रत्न, अंगठी घालायला एकही जागा रिकामी नाही, तसेच भिंतीवरचा कोणताही कोपरा काहिही टांगायला शिल्लक नाही हे त्या चतुर वास्तु-पुरुषानी ओळखले. त्यामुळे ह्याला काय ’उपाय’ सुचवावा हे त्याला कळले नसेल कदाचित. त्यामुळे त्याने नुसतेच ’निदान’ केले, ’उपाय’ नंतर सांगतो म्हणाला – त्याचे निदान होते, तुमचे शौचालय चुकीच्या ठिकाणी आहे. वास्तुशास्त्रानुसार ते घराच्या मुख्य दरवाज्यापाशी असायला हवे!

आता माझा मित्र घाबरला होता. मला भेटला तेव्हा त्यानी हे सगळे सांगितले. मी गंमतीनी त्याला म्हणालो, “अरे काही तरी सोप्पा उपाय असेलच ना. नाही तर तू असं कर, एक बेडपॆन घे आणि ते तुझ्या मुख्य दरवाज्याच्यावर टांगून ठेव, किंवा फरशी खाली पुरून ठेव – म्हणजे झाले!”

“अरे खरच! हे जमू शकेल, थांब लगेच य़ ना फोन करुन विचारतो!” ही कमाल झाली, म्हणजे मी त्याची टिंगल करायच्या हेतूने बोललो ते पण त्यानी सिरिअसली घेतले!

परत काही दिवसांनी त्याचा फोन आला, की मी सुचवलेला उपाय त्यानी त्या वास्तु-पुरुषाला सांगितला आणि त्याला म्हणे तो ’in-principle’ आवडला.

त्यात थोडे बदल करुन (आणि काही संस्क्रुत श्लोकांचा आधार घेऊन!) तो बाबा आता उपाय सुचवणार आहे!

मी कपाळावर हात मारून घेतला. तेव्हापासून मी अजून त्या मित्राच्या घरी जायचे धाडस केले नाहीये! न जाणो दार उघडताच संडास किंवा संडासाच्या आकाराची खूर्ची समोर ठेवलेली असायची!

~ कौस्तुभ
Advertisements