अर्धा जून संपला तरी पुण्यात पावसाचा पत्ता नाही. मुसळधार तर दूरच, “कुसळधार” पाऊस ही झाला नाहीये.
विरोधी पक्षाच्या एका मा. नेत्यानी पाणी समस्येवर (त्यांच्या शब्दात: शमश्येवर) “धरणं धरावं” असं सुचवलं; त्यावर तितक्याच माननीय नेत्यानी – पण धरणातच पाणी नाही, तर धरणं काय धरणार? – असा व्यावहारीक प्रश्न करून तो विचार फेटाळला.
सध्याच्या सरकारचा यज्ञ वगैरे वर गाढ विश्वास असल्यामुळे एका नेत्यांनी पर्जन्यवृष्टी यज्ञ करावा अशी सुचना केली. पक्षप्रवक्ते नेत्यांना यज्ञ वगैरे मध्ये गती कमी असल्या मुळे त्यांनी गडबडीत “पर्जन्यवृष्टी” ऐवजी “पुत्रकामेष्टी” यज्ञ करणार… असे जाहीर केले. सरकारी खर्चानी “पुत्रकामेष्टी” का या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. असो.
दर वर्षी प्रमाणे महापालिकेची “पावसाळी कामे” पूर्ण झाली आहेत. म्हणजे ३५% च पूर्ण झाली आहेत. पण ३५% म्हणजे पास – अशी पालिका अधिकाऱ्यांची ठाम समजूत असल्यामुळे त्यांच्या मते “कामे पूर्ण” झाली आहेत.
तर आता वरुणदेवानी वरून कृपा करावी आणि पाणी-शमश्या सोडवावी ही कळकळीची विनंती…
Advertisements