माझी पहिली “बी.आर.टी” वारी: काही निरीक्षणे…

१. “परिवहन” च्या ऐवजी “परविहन” असं लिहिलं आहे…एकदा नाही दोनदा

२. बस-स्थानकात बसायच्या ठिकाणीच गळत असल्यामुळे लोकांना उभे राहावे लागत होते

३. नाम-फलकावर “डाऊन”, “हेल्पलाईन” असे इंग्रजी शब्द असताना मग Frequency साठीच “वारंवारीता” असा अवघड शब्द का?

४. “Mind the gap” चं “अंतरावर लक्ष द्या” यापेक्षा चांगलं भाषांतर होऊ शकेल का? “अंतरा माळी” च्या कुटुंबियांना अशी पाटी सगळीकडे पाहून कसं वाटेल?

५. “१५९ ळ” अश्या नावाची बस असावी असं कोणाला आणि का वाटलं असावं? म्हणायला पण किती अवघड आहे? आणि ऐकायला त्याहून विनोदी.. . माझ्या शेजारचा एक माणूस दुसऱ्याला “आत्ता गेली ती बस ‘ळ’ होती का ‘क’?” असं विचारात होता. तो म्हणाला… “नुसतीच १५९…’ळ’ नाही आणि ‘क’ पण नाही.”

६. १५९ळ च्या मागचे लॉजिक मी शोधायचा प्रयत्न करत होतो (कारण १५ मि. वारंवारीता असलेली बस ४५ मि. झाले तरी आली नव्हती!). “पाबळफाटा” वरून सुटणारी बस म्हणून त्या नावातले मधले अक्षर “ळ” जोडले असेल असा तर्क केला. पण मग वाघोलीहून सुटणारी बस “१४ घो” का नाही? बराच वेळ विचार केला पण उत्तर सापडले नाही. तेवढ्यात माझी बस आली (१५९ ळ)…त्यामागून त्याच क्रमांकाची अजून एक बस आली (५० मि. वारंवारीत झुगारून!)… आणि माझी ह्या कूटप्रश्नातून सुटका झाली

तीच बस येरवड्या पाशी “बी.आर.टी” मार्ग संपल्यावर साध्या बस मध्ये रुपांतरीत झाली. आहे त्या पेक्षा स्लो व्हायचा प्रश्नच नसल्याने ती नंतरही तितक्याच “रॅपिड”ली चालू राहिली. हा पुण्यातल्या बसेस चा एक फायदा… सदैव तितक्याच “रॅपिड”!

असो… बाकी प्रवास सुखकर झाला…

तेव्हढं “१५९ ळ” चं कोडं सोडवता आलं तर सांगा नक्की!

Advertisements