newspaper.jpg
२ पुणेकरांची मैत्रीपूर्ण जुगलबंदी
वेळ: शनिवार सकाळ ९ वा., म्हणजे आजच…
स्थळ: अप्पा बळवंत चौकातील एक वृत्तपत्र विक्री केंद्र
ग्राहक (ग्रा. – साधारण ७० वर्षे): नवीन साप्ताहिकं बघू…
वृत्तपत्र विक्रेता (वृ.वि. – साधारण तेवढाच, ७० वर्षे): हे घ्या…ऑलिम्पिक २०१६ विशेषांक आहे.
ग्रा: “पर्यटन विशेषांक” आहे का?
वृ. वि.: नाहीये, अहो इतरही वाचत जा, क्रीडा वगैरे…चांगलं असतं
ग्रा: कशाला? मी खेळ खेळत नाही…आणि बघतही नाही
वृ. वि.: तुम्ही पर्यटनाला तरी कुठे जाता? सगळे पर्यटन विशेषांक वाचून शेवटी जाता कुठे तर शेगाव, अक्कलकोट किंवा गोंदवले…ते ही २-३ वर्षातून एकदा…
सगळ्या लोकांच्या देखत त्यांच्या श्रद्धास्थानांना हात घातल्यामुळे आता हा मुद्दा ग्राहकाच्या प्रतिष्ठेचा झाला होता. त्या दुकानातून साप्ताहिक ना घेता जायचं म्हणजे माघार घेतल्यासारखं झालं असतं; आणि ऑलिम्पिक २०१६ विशेषांक घेणं म्हणजे तर सपशेल पराभव.
आता हे आजोबा काय करतात हे बघायला मी उगाचच रेंगाळलो (मला तरी किती हौस…)
पण ग्राहक आजोबा ही काही कमी नव्हते. वृ. वि. आजोबांकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्या दुकानातल्या नवख्या पोराला म्हणाले: “चल, तो मेंदी विशेषांक दे” (“मोडेन पण वाकणार नाही” बाणा म्हणतात तो हाच!)
मला ग्राहक आजोबांचं खूप कौतुक वाटलं; शेवटी ही जुगलबंदी तेच जिंकले असं वाटत असतानाच वृ. वि. आजोबांनी विजयी टोला मारला…
वृ. वि.: हा घ्या तुमचा “मेंदी विषेशांक”… आणि पुढच्या शनिवारी हाताला मेंदी लावलेली दाखवलीत तर सगळे पैसे परत… आणि हो, मेंदी हातालाच असली पाहिजे, केसांना नको!
आता पुढच्या शनिवारी मी तिथे नक्की जाणार…!
(दोन थेंब सत्यकथा, बाकी पाणी घालून वाढवलेली…)
Advertisements