काळा पैसा आणि सावळा गोंधळ

रु. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्या पासून समाजमाध्यामातून (म्हणजे सोशल मीडिया बरं का) खूप विनोद माहिती, माहिती-वजा-इशारे, माहिती-वजा-धमकी इ. यायला लागले आहेत. आणि काळा पैसा ह्या विषयावरून सगळीकडे सावळा गोंधळ चालू झाला आहे.
पेट्रोल मध्यरात्री पासून २० पैशानी वाढलं की पेट्रोल भरायला रांगा लावणाऱ्यांचा आपला देश…त्यामुळे इतक्या मोठ्या घोषणे नंतर गोंधळ होणारच होता.
लोकं ठिकठिकाणी लपवून ठेवलेल्या नोटा बाहेर काढायला लागले आणि दबक्या आवाजात इतरांकडे किती नोटा दाबून ठेवलेल्या आहेत याचा अंदाज घ्यायला लागले आहेत. “आपण इथे काय घेऊन आलो होतो…आणि काय घेऊन जाणार आहोत…” छाप कीर्तन ऐकणाऱ्या आजीबाई सुद्धा बटव्यातून, स्वयंपाकघरातील डब्यांच्या खोबणीतून लगबगीने पैसे काढत आहेत. लोकांकडे दाबून ठेवलेला पैसा पाहिला की मला कमल हसन च्या “पुष्पक” चित्रपटातला तो भिकारी आठवतो. छान कपडे घातलेल्या कमल हसनकडे पैसे नसतात आणि तो भिकारी त्याला कुठून कुठून पैसे काढून दाखवतो आणि त्याला हसतो. माझी अवस्था कमल हसन सारखीच आहे. लोकं लगबगीने नोटा बदलायला जात आहेत आणि माझ्या पाकिटात १००० ची एक आणि ५०० ची एक नोट…बस्स 😦
आता अशी एकेक नोट बदलायला जायचं आणि स्वतःचं हसं करून घ्यायचं त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक वेगळा विचार आला. मी माझ्या नोटा बदलणारच नाही. सगळ्या लोकांनी नोटा बदलल्या की पुढे ५-१०-२० वर्षांनी ह्या जुन्या नोटांना दुर्मिळ म्हणून खूप महत्व येईल…त्यात रघुराम राजन ची सही असलेली शेवटची नोट वगैरे मुळे जास्तच मागणी असेल. तेव्हा मी माझ्या नोटा बाह्रे काढणार!
कशी वाटली कल्पना? त्यामुळे तुम्ही आता रांगेत उभं राहा…मी मजा बघतो! गरीब असल्याचा असा एक फायदा…
मला तर महाराष्ट बँक शाखेत वगैरे ठिकाणी काय अवस्था असेल ह्याच्या नुसत्या कल्पनेनीच त्या लोकांची कीव आली. महाराष्ट बँक हे ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांकरता सरकारी खर्चाने चालवलेले एक विरंगुळा केंद्र आहे अशी माझी समजूत आहे. तिथे काउंटरच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांच्या तडफेचे मध्यमवयीन नागरिक असतात. म्हणजे कर्मचारी पण ज्येष्ठ आणि ग्राहक पण. कुठल्याच गोष्टीची घाईगडबड नाही. निवांत कारभार…आता आधीच अशी अवस्था असेल तर नोटा बदलून द्यायचे जास्तीचे काम आल्यावर तर कर्मचारी अजून वेळ घेणार. म्हणूनच कदाचित त्यांच्या शाखांमध्ये (विरंगुळा केंद्रात) घड्याळ नसते, फक्त कॅलेंडर असते…उगाच कर्मचारी वर्गावर ताण नको! असो…
केवळ १० च दिवस आधी ह्याच ५००-१००० च्या नोटांची थप्पी लावून दिवाळीत लक्ष्मीपूजनाला त्यांची पूजा केली होती. आता अचानक त्यांची किंमत संपली. माणूस गेल्यावर कसा अनुभव येतो तसं एकदम जाणवलं. ह्या पूर्वी १९७८ साली नोटा रद्द केल्या होत्या म्हणे…पण तेव्हा मी… नव्हतोच. आणि तेव्हा १००० च्या नोटा रद्द केल्या होत्या (म्हणजे आत्ताच्या १०,०००+). त्यामुळे तेव्हा फार लोकांना फरक पडला नसेल.
ह्या वेळेस सरकारनी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही अत्यावश्यक ठिकाणी जुन्या नोटा चालतील असे सांगितले आणि लगेच त्या ठिकाणी लोकांची झुंबड उडाली. सरकारी इस्पितळे, पेट्रोल पंप, सरकारी  वीजबिल, फोनबिल इत्यादी.
त्यातच काही चतुर लोकांनी “स्मशानभूमीत जुन्या नोटा स्वीकारल्या जातील” असं वाचून तिकडे गर्दी केली. पण जुन्या नोटा चालतील म्हणजे बदलून मिळतील असं नाही तर त्या विधीची “दक्षिणा” म्हणून फक्त जुन्या नोटा स्वीकारतील हे ऐकल्यावर त्या चतुर लोकांचा चेहरा पडला…आणि त्यांच्यात “स्मशानशांतता” पसरली.
सामान्य लोकं रांगेत उभं  राहून नोटा बदलून घेत आहेत हे पाहून गहिवरून येतं. श्रीमंत उद्योजक , राजकारणी, साखरसम्राट, कृषिसम्राट  (ह्यांना पुणे परिसरात आदराने अनुक्रमे साखरमहर्षी आणि कृषीमहर्षी असं म्हणतात!) वगैरे लोकांचं बरं असतं. त्यांच्या स्वतःच्या बँक, पतपेढ्या, सहकारी पतसंस्था वगैरे असतात! म्हणजे मागच्या वाटेने ते सगळ्यात आधी ५०-१०० च्या नोटा काढून घेणार!
काही सोनार मागील तारखेच्या सोनेखरेदीच्या पावत्या देऊन जास्त दराने ५००-१००० च्या नोटा स्वीकारायला पण तयार आहेत असे मेसेज आले. म्हणजे काहीही केलं तरी लोकं त्याच्या २ पावले पुढेच! धूम चित्रपटात नाही का चोर हा पोलिसांपेक्षा अद्ययावत, चपळ आणि चलाख असतो…पण पुलंनी म्हटल्याप्रमाणे सोनार लोकांचा आम्ही फक्त नावच ऐकतो. फक्त १-१ नोट बदलायला सोनं घेणं म्हणजे प्रोसेसिंग फी रद्द केली म्हणून गृहकर्ज घेण्यासारखे आहे. पण बरेच लोकं तसं पण करतात म्हणे…
आता नक्कीच काळा पैसा निर्माण करायचे आणि साठवायचे नवीन मार्ग येतील. पण आपल्याला ते कधीच समजणार नाही. आपण आपले डब्यांच्या मध्ये, फ्रीजच्या कव्हरच्या आत, देवघरात इ. ठिकाणी आपल्या ऐपतीप्रमाणे काळा (किंवा “सावळा”, “गहू वर्णीय” इ.) पैसा साठवत राहणार…आपली धाव तेवढीच.
शेवटी एक शंका: आफ्रिकेत काळा पैसा बाहेर काढण्यासाठी काय करत असतील? तिथे सगळाच पैसा “काळा पैसा” असतो का? आता हा प्रश्न वर्णद्वेषी नाही…एक अत्यंत निरागस, निरुपद्रवी, निर्व्याज, निष्कपटी, निर्मळ, निर्विकार… नाही निर्विकार नाही…निर्मळ  पर्यंतच…तर असा हा प्रश्न आहे. चू.भू.द्या.घ्या.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: