१० वी, १२ वी च्या वर्षांमध्ये विद्यार्थी, पालक आणि आजूबाजूचे सगळेच अचानक “मार्क्सवादी” होतात. हल्ली “बेस्ट ऑफ ५” वगैरे प्रकार सुरु झाल्यावर १००% मार्क्स ही मिळायला लागले आहेत. आणि एखाद दुसरा नाही, तर ५०-१००-२०० च्या संख्येने!

 

नुकतेच १०-१२ वी चे निकाल लागले. निकाल लागल्यावर लगेच कोचिंग क्लासेस मध्ये चढाओढ सुरु होते – जास्तीत जास्त “हुशार” विद्यार्थी त्यांच्या क्लासचे मेंबर होते (शिकले असं नाही. फी भरून मेंबर होते इतकच). मग एकाच विद्यार्थी ४-५ क्लास चा मेंबर (एकाच विषयासाठी) आहे असं पण दिसतं.

 

त्यावरच आधारित एक धक्कथा अर्थात धक्का देणारी कथा –

 

 

धक्कथा : कन्सेशन

 

`अकरावी-बारावीच्या ऍडमिशनसंदर्भात खरंतर माझ्याशी बोलण्याची गरज नाही. आपली स्टँडर्ड प्रोसीजर आहे, बाहेर काउंटरवर तुम्हाला…’

 

क्लासचालक सरांनी अभ्यागतांना झटकून लावण्याचा प्रयत्न केला, पण, भेदरल्यासारख्या दिसणार्या बापाने एकदम मार्कशीट काढून पुढे केली… क्लासचालकाने अनिच्छेनेच ती हातात घेतली… `अरे वा! 98.77 टक्के मार्क. व्हेरी गुड!’

 

त्यांनी भेदरलेल्या मुलाचा हात हातात घेऊन अभिनंदन केलं आणि म्हणाले, `90 टक्क्यांच्या वर मार्क असलेल्यांना 30 टक्के सवलत आहे आपल्या क्लासच्या फीमध्ये. ओके?’

 

बापलेकांची जोडी तरीही ढिम्म हलत नाही म्हटल्यावर क्लासचालक सरांनी एक कागद ओढला आणि त्याच्यावर काहीतरी लिहून खाली फर्राटेदार सही करून तो त्यांच्यापुढे सरकवला आणि म्हणाले, `ही चिठ्ठी दाखवा काउंटरवर, 40 टक्के कन्सेशन, फक्त तुमच्यासाठी.’

`पण, सर…’ भेदरलेल्या बापाने काही बोलण्याचा प्रयत्न केला, तो अर्ध्यात तोडून क्लासचालक म्हणाले, `आता पण नाही अन् बिण नाही, यापेक्षा जास्त कन्सेशन आम्ही कोणालाच देत नाही. तुमच्यासाठी म्हणून मी हा अपवाद केला. मुलगा हुशार दिसतोय, पैशासाठी त्याचं शिक्षण…’

 

हातानेच त्यांना थांबवत भेदरलेल्या कोकरासारखा दिसणारा मुलगा नम्र पण ठाम सुरात म्हणाला, `सर, मी बोलू का? मी हे मार्क कोणताही क्लास न लावता, चाळीच्या खोलीत अभ्यास करून मिळवलेले आहेत. एवढेच मार्क मी दरवर्षी मिळवत आलेलो आहे. ते समोरचे क्लासवाले माझा फोटो त्यांचा विदय़ार्थी म्हणून छापायचे दोन लाख रुपये देतायत. तुम्ही किती देऊ शकता, ते सांगा. आकडा तीन लाखाच्या पुढे असेल, तर पुढची चर्चा करू. आत्ताच चार लाख रुपये दिलेत, तर बारावीच्या परीक्षेनंतरही माझा फोटो छापता येईल तुम्हाला. त्यात मी घसघशीत कन्सेशन देईन तुम्हाला! थिंक ओव्हर इट!’

 

 

 

Advertisements