Ganapati Idols shop.JPG

भाव” तसा देव… 

 

स्थळ: शनिवार पेठ, पुणे

वेळ: दिवेलागणीची (संध्याकाळी ७)

विषय: गणेशोत्सवानिमित्त गणपतीची मूर्ती खरेदी

 

माझ्या मित्राला गणपतीची मूर्ती घ्यायची होती म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो होतो.

एक ज्येष्ठ नागरीक दांम्पत्य एका गणपती मूर्ती विक्री केंद्रावर सुमारे २५ मिनिटे रेंगाळून गणपती मूर्ती न्याहाळत होते. म्हणजे “अहो” मूर्ती बघत होते, आणि “अगं” पूजा साहित्य घेत होत्या.

अहोंना काही केल्या एकही गणपती मूर्ती पसंत पडत नव्हती.

ह्या मूर्तीची बैठक योग्य नाही. ह्या मूर्तीचे अवयव प्रमाणबद्ध नाहीये,  हात बारीक आहेत.

हे सोवळं बरोबर नाही,  पितांबर पाहिजे… इत्यादी इत्यादी

 

गणपती दाखवणाराही वैतागला होता…

 

शेवटी एक मूर्ती अहोंना पसंत पडली…असं वाटलं…

अहो – अगं, ही मूर्ती पाहिली का? अगदी बरोब्बर आहे…मला वाटत हीच घेऊ

 

अगं नी ढुंकूनही पाहिलं नाही, नुसतं “हं” वर भागवलं.

 

अहो – कितीला आहे ही मूर्ती?

विक्रेता – ८०० रुपये

अहो – (धक्का बसल्याचे अजिबात न दाखवता) बघू जरा एकदा जवळून…

आणि मग मूर्ती परत एकदा जवळून बघितल्या सारखे करत “च्च” वगैरे नापसंती दाखवत म्हणाले “अगं, डोळे काहीतरी वेगळे वाटतात नाही का? भाव पाहिजे तसा नाहीये ह्या मूर्तीचा…म्हणजे बघितल्यावर कसं प्रसन्न वाटलं पाहिजे, तसं नाही वाटतं…चल आपण दुसरीकडे बघून येऊ”

दुकानदारानी सौम्य सात्विक शिवी घातली आणि पुटपुटला – “च्यायला, भाव पाहिजे तसा नाही ते ह्याला किंमत सांगितल्यावर समजले का… म्हणे प्रसन्न वाटत नाही. लोकांना देव प्रसन्न व्हावा असं वाटतं , आणि इथे ह्यांना प्रसन्न प्रसन्न वाटलं पाहिजे! कंजूष…आता घेईल १५०-२०० रुपयांची मूर्ती आणि म्हणेल “असाच भाव हवा होता, आता कसं प्रसन्न वाटतयं”…म्हणतात ना भाव तसा देव”

असं म्हणून त्यांनी अत्यंत रागाने आमच्याकडे पाहिले. बहुदा “हे दोघे पण तसलेच “भावि”क असणार” असा  त्याचा समज झाला असेल (खरं तर असं त्यानें ओळखले असेल!)

आता उगाच त्याचा रोष आपल्यावर नको, म्हणून मी आधीच सांगून टाकलं – “जरा चांगल्या मूर्ती दाखवा – ८०० ते १२०० रुपयांपर्यंत!”

विक्रेता खूष! मित्र… चेहऱ्यावर कोणत्याही भावाचा अभाव… त्याला काही समजायच्या आतच मी मोबाईल फोन वर बोलल्यासासारखं करून तिथून पसार झालो!

अजून तरी मित्राचा फोन आला नाही… त्यामुळे आता मला “प्रसन्न” वाटतंय! बहुतेक त्याने ८०० रुपये वाली मूर्ती घेतली असणार… थोडक्यात ह्या वर्षी त्याच्याकडे  प्रसाद म्हणून माव्याच्या मोदका ऐवजी खडीसाखर असणार!

 

Advertisements