“प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे?”

नुकताच मला व्हॉट्स ऍप वर एक कविता आणि त्यासंबंधी एक मेसेज आला.
समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही वीस कडवी म्हणजे २० रत्न आहेत.

आणि त्याखाली “Be Balanced” असा उपदेश होता.

कविता खरोखरच चांगली होती, पण भाषा त्यामानाने नवीन(१९ व्या शतकातली) वाटली. १७ व्या शतकातली नाही. आणि रामदास स्वामींच्या शैलीशी मिळतीजुळती तर अजिबात नाही.

म्हणून मला शंका आली की खरंच ही रामदास स्वामींची रचना आहे का?

आलेला मेसेज तसाच फॉरवर्ड करण्याचा माझा स्वभाव नाही.उलट अशी शंका आली की मला काही तरी नवीन संशोधन करायची संधी मिळाल्याचा आनंद होतो.

म्हणून मी इंटरनेटवर थोडंसं शोधलं आणि मला असं कळलं की त्या कवितेचं शीर्षक “प्रमाण” असून ती “कृष्णाजी नारायण आठल्ये” यांनी लिहिली.

कृष्णाजी नारायण आठल्ये (३ जानेवारी, इ.स. १८५३:टेंभू, सातारा जिल्हा, महाराष्ट्र – २९ नोव्हेंबर, इ.स. १९२६:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी कवी, टीकाकार, भाषांतरकार, चरित्रकारव संपादक होते.

त्यांच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण इथे किंवा इथे वाचू शकता.

हल्ली सोशल मीडिया मुळे अनेक जुन्या, स्मृतिआड गेलेल्या गोष्टी परत लोकांसमोर येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण एक वाईट, किंबहुना फारच वाईट गोष्ट अशी घडते आहे की लोकांना “Intellectual Property Rights ” म्हणजे”स्वामित्व हक्क” ह्याबद्दल काही सोयरसुतक उरलेले नाही.

कोणाचेही मेसेज,काव्य, उदगार कोणाच्याही नावाखाली खपवा. फक्त बोटांच्या दोनचार हालचालींमधून मेसेज१०० जणांना पाठवायचा… आणि इतरांच्या आधी पाठवायचा ह्यातच धन्यता आणि ह्याचीच चढाओढ.कधीच ना घडलेले प्रसंग, गोष्टी, उदगार हे लोकं जेव्हा सावरकर, स्वामी विवेकानंद, भगतसिंग,महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेल, ह्यांच्या नावाने खपवतात तेव्हा आपण त्या लोकांचाआणि ज्यांना खरोखरी त्याचे श्रेय मिळायला पाहिजे त्या लोकांचाही अपमान करतो हे समजतच नाही.

शिवाय त्याचा बाल आणि तरुण पिढीवर चुकीचा परिणामहोत असतो आणि त्यातून जन्मभरासाठी चुकीच्या समजुतीत ढकलत असतो याची खंत, किंवा कमीतकमी जाणीव ही ह्या लोकांना नसते.

असो.

शेवटी पं. दीनदयाळ उपाध्याय म्हणाले होते ना – “नावात काय आहे?”

काय? ते विल्यम शेक्सपिअर म्हणाला? काय फरक पडतो? व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटी साठी ते वाक्य पं. दीनदयाळ उपाध्याय, सरदार पटेल किंवा अगदीच नाही तर नरेंद्र मोदी… कोणीही म्हणू शकतं. शेवटी “नावात काय आहे?”

परत एकदा (आणि शेवटचं) असो.

तर आता ही कविता “प्रमाण” वाचा. कवी: कृष्णाजी नारायण आठल्ये

“प्रमाण”

अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतरूप, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।
अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो’ बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दुःखवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

———————————————————————————————-

आणि हो…

ह्यापुढे असे मेसेज फॉरवर्ड करण्याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे हे दोन सुविचार आठवा…




6 thoughts on ““प्रमाण” कविता आणि “नावात काय आहे?”

Add yours

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑