गणित, भाषा आणि शिक्षणपद्धती

नुकतंच बालभारतीने इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकात संख्या वाचायच्या किंवा उच्चारायच्या पद्धतीत मोठा बदल केला. त्यावरून बरीच चर्चा, वाद, विनोद सुरु झाले आहेत. 

म्हणजे आता २५, ६७, ७९, ८७ हे आकडे “पन्नास पाच” , “साठ सात”, “सत्तर नऊ” ऐशी सात” असे म्हणायचे. कारण काय? तर म्हणे “पंचवीस” मुले मुलांचा गोंधळ होतो… “दोन” “पाच” असे आकडे लिहायचे आणि म्हणायचे उलटे – पंच, आणि वीस. तसेच सदुसष्ट, एकोणऐशी, सत्त्याऐशीं असे जड जड शब्द मुलांना उच्चारता येत नाहीत.  त्यामुळे मुलांना गणिताबद्दल भीती निर्माण होते, आणि शाळा सोडायचे प्रमाण वाढते. आणि म्हणून ही नवीन पद्धत सोपी आणि त्यामुळे सहज आत्मसात केली जाईल अशी आशा आहे. 

मला मुळातच ह्या बदलातला तर्क समजलेला नाही. हे म्हणजे स्पेलिंग किंवा ग्रामर मुले इंग्लिश ची भीती बसते आणि म्हणून त्यांना पाहिजे त्या पद्धतीने लिहू दे, म्हणजे त्यांना इंग्लिश भाषेचा तिटकारा येणार नाही, असे म्हणण्यासारखे आहे. पुढची मागणी अशी पण असू शकते कि कॅपिटल आणि स्मॉल केस लेटर्स ची काय गरज आहे? सगळंच स्मॉल केस मध्ये लिहिता येऊ शकतं. 

शिक्षणपद्धतीमधल्या बदलांना माझा विरोध नाही. तसेच फक्त एकाच पद्धत बरोबर आणि बाकीच्या चुकीच्या असाही माझा दावा नाही. पण सुलभ करण्याच्या नादात ते सुमार करू नये . 

आधीच आपण मराठी भाषेची अवस्था दयनीय करून ठेवली आहे. मराठी टीव्ही आणि वर्तमानपत्रे यातली भाषा दयनीय आणि शोचनीय आहे. अत्यंत अशुद्ध आणि अगम्य! 

“मराठी असल्याचा मला गर्व आहे” हे “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” ह्या गटार चित्रपटातील वाक्य ऐकून माझ्या अंगाचा तिळपापड झाला होता. हिंदी मध्ये “गर्व” म्हणतात, मराठीत त्याला “अभिमान” म्हणतात. मराठीमध्ये “गर्व” हा शब्द पण आहे, पण त्याचा अर्थ एकदम वेगळा – म्हणजे “माज” असा आहे. पण ह्याचं कोणाला सोयरसुतक नसते. किंवा कदाचित त्यांना “मराठी असल्याचा मला माज आहे” असच म्हणायचं असेल. हल्ली प्रत्येकाचा आवेश आणि देहबोली तशीच असते… माज असल्याची. असो. 

तीच तऱ्हा “XXX  हा क्रमांक व्यस्त आहे” ची. हिंदी मध्ये “व्यस्त” म्हणजे बिझी. त्याला मराठीत “व्यग्र” हा शब्द आहे. मराठीत “व्यस्त” हा शब्द आहे, पण त्याचा अर्थ “उलटा किंवा विरुद्ध” असा आहे. उदाहरण व्यस्तप्रमाण म्हणजे inverse ratio. पण हिंदी च्या प्रभावामुळे “गर्व” आणि “व्यस्त” हे बेमालूमपणे मराठीमध्ये घुसले आहेत. इतके की आता ते आपल्याला (माझ्यासारख्या काही लोकांना सोडून) खुपत नाहीत. 

परवाच “मला १० वी ला ६०% मार्क्स भेटले” हे ऐकल्यावर माझ्या अंगाची लाही लाही झाली. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, “अरे बाबा, माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात. ६०% मार्क्स मिळाले असं म्हण”. पण तो ऐकण्याच्या पलीकडे होता. जर त्याला ते समजलं असतं तर ६०% इतके कमी मिळाले नसते!

ह्यावर ही दोन मतप्रवाह आहेत. So-called “शुद्ध भाषा” हा उच्चभ्रू, ब्राह्मण वर्गाचा कावा आहे असं मानणारे असंख्य लोक आहेत. आणि जर मूठभर लोकच (ब्राह्मण, उच्चभ्रू) शुद्ध बोलत असले आणि बहुसंख्य “अशुद्ध”, तर मग टीव्ही, वृत्तपत्रे यात त्या बहुसंख्य वर्गाचे प्रतिबिंब उमटले तर काय हरकत आहे? असाही एक युक्तिवाद असतो. दुसरा मतप्रवाह म्हणजे, बोली भाषा आणि व्यावहारीक भाषा (किंवा राजभाषा / न्यायभाषा) ह्या वेगळ्या पाहिजेत. बोलीभाषेत वेगवेगळ्या बोली, शब्द, वाक्यरचना, ठसका, slang असू शकतात (किंबहुना, ते असणारच…कोणीच थोपवू शकणार नाही), पण व्यावहारिक भाषा, राजभाषा, न्यायभाषा ह्या एका विशिष्ट प्रकाराच्याच असल्या पाहिजेत – ज्याला प्रमाणभाषा म्हणता येईल. 

तुम्ही नीट बघितले तर प्रमाणभाषा ही जी “शुद्ध” किंवा “ब्राह्मणी वळणाची” भाषा म्हणून मानली जाते त्याला जवळ जाणारी किंबहुना तीच असते. त्या भाषेत तुम्ही “आनी, पानी, लोनी…व्हयं की…भावड्या…” हे योग्य वाटणार नाही. अगदी मुख्यमंत्री विदर्भातले झाले म्हणून शासकीय भाषा “तू काय करून राहिला बे…” अशी होत नाही. आणि हे सर्वसाधारणपणे मान्य असलेली गोष्ट आहे. 

अगदी बारकाईने पहिले तर जुने शिवाजी महाराज किंवा त्या काळावर आधारीत चित्रपट बघा. शिवाजी महाराजांचे मावळे हे “अरे लेका, व्हयं की…कशापाई असं करतुया…” वगैरे भाषा बोलणारे असतील… पण महाराज मात्र शुद्ध, पुणेरी, संस्कृतप्रचुर, पल्लेदार भाषा बोलणारे दाखवले जातात. त्याचे एक कारण हे असेल कि चित्रपट बनवणारे – भालजी पेंढारकर, विश्राम बेडेकर इत्यादी मंडळी हे “शुद्ध” बोलणारे होते. पण दुसरे कारण हे पण आहे कि महाराज असे खेडवळ, अशुद्ध बोलणारे असतील किंवा असू शकतील हे आपल्याला पटत नाही, रुचत नाही. म्हणजेच राजभाषा ही शुद्ध, उच्च, dignified असली पाहिजे असं आपल्याला कुठे तरी वाटतंच.  

मग प्रश्न येतो तो शिक्षणाचा. शिक्षण हे प्रमाणभाषेतून असावे की मुलांना जे सोपं वाटेल त्या भाषेतून? एखाद्याला “आनी पानी लोनी”च सहज जमत असेल तर म्हणून काय त्याने तसं शिकावं?

“Everything should be made as simple as possible but not simpler” – Albert Einstein

सगळ्या गोष्टी ह्या अजून सोप्या करायच्या नसतात तर आपण आपला दर्जा, आपले आकलन वाढवायचे असते.

आधीच आपला अभ्यासक्रम हा खूप उथळ झाला आहे. पूर्वी पास  व्हायचे प्रमाण कमी होते. पण शिक्षणाचा दर्जा चांगला होता. २-३ पिढ्या आधी मॅट्रिक किंवा ७ वी/८वी झालेले लोकं सुद्धा उत्तर इंग्रजी बोलू, लिहू शकायचे. पावकी, निमकी, पाढे ह्यामुळे गणित बरेच चांगले असायचे. पण त्यानंतर, आपल्या देशालाच कामगार वर्गाची गरज असल्यामुळे असेल किंवा इतर कारणामुळे असेल, पण शिक्षणाचा दर्जा घसरला. फक्त मार्कांचे अवमूल्यन झाले असे नाही तर शिक्षणाचाच दर्जा घसरला. दीर्घोत्तरी वरून, लघुत्तरी, आणि मग वैकल्पिक प्रश्न (objective questions)… ७०% वाला सामान्य… ८०%-८५% वाला जरा बरा आणि ९०% च्या पुढे असेल तर चांगला असे मानले जाऊ लागले. 

पण इतके होऊनही नोकरी करण्यायोग्य लोकं आपण निर्माण करू शकत नाही. पुन्हा ६-८ महिन्यांचे on-job-training किंवा probation.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा दर्जा (खासगी आणि सरकारी तर अजून जास्त) इतका सुमार आहे की मला वाटतं त्यांना शिकवणं सोपं जावं म्हणूनच हे लोकं अभ्यासक्रम सोप्पा करायच्या मागे असतात. 

ह्या नवीन पद्धतीमुळे मुलांना गणिताची गोडी निर्माण होईल का? तर ते अशक्यच वाटतं. पण त्यांची भाषा अजून खालावेल का? तर नक्कीच. 

पण आता शाळेतल्या अभ्यासक्रमातून मुलं शिकतील अशी अपेक्षा करणंच पालकांनी सोडून दिलं आहे. त्याकरता ते “मूल्य शिक्षण” आणि “शाळाबाह्य उपक्रम” म्हणून क्लासेस आणि शिबिरं लावतात. (नाही, पालक स्वतः ते शिकवतात असा गैरसमज करून घेऊ नका… हल्ली सगळ्याचं  “App” असतं, किंवा सगळ्याची “Home-delivery” मिळते किंवा मग “Pay and use”…असो. 

“तीस आठ” मिनिटे झाली, मी लिहायला सुरुवात करून… आता “दहा दोन” मिनिटात मला एका मिटींगला जायचे आहे…त्यामुळे थांबतो!  

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: