


आज ८ नोव्हेंबर २०१९. पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी (८ नोव्हेंबर १९१९ – १२ जून २०००). माझ्या वयाच्या १२-१३ व्या वर्षापर्यंत खूप मोठा प्रभाव हा पुलंचा होता. माझी वाचनातली गोडी वाढण्यामागे पुलंच्या पुस्तकांचा खूप मोठा वाटा आहे.
जसजसे वय वाढले तसे त्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. कारण इतर अनेक प्रकारचे लेखन आणि लेखक (मराठी आणि इंग्रजी) परिचयाचे झाले. किंबहुना ते करण्यासाठी मला “पुलंमय” कोशातून प्रयत्नपूर्वक बाहेर पडावे लागले. कारण त्यापूर्वी मी त्यांची अनेक पुस्तके असंख्यवेळा वाचायचो. अनेक उतारे फक्त पाठ होते असं नाही तर कोणत्या पानावर वाक्य कुठे संपते आणि पुढच्या पानावर कुठे सुरु होते हे पण आठवायचे. अर्थात हे चांगले लक्षण नाही हे समजायला वेळ लागला…आणि समजल्यावर ती सवय मोडायला पण. कारण तेचतेच वाचून नवीन काहीच साध्य होत नाही… जेवढे जास्त वाचाल, विविधांगी वाचाल तेवढे चांगले.
त्या काळात पुस्तके असोत किंवा संगीत किंवा चित्रपट किंवा अगदी माणसे (नाती)…सर्व बाबतीत माझा तोच approach होता असे आता जाणवते. म्हणजे काही ठराविक प्रकारची गाणी, संगीतकार, किंवा चित्रपट, कलाकार यातच रमलेलो असायचो. शाळेत १ ली ते १० पर्यंत मित्र एकत्रच होतो. त्यामुळे शाळेतल्या मित्रांमध्येच रमायचो. खासगी क्लास च्या निमित्ताने इतर मित्रांशी परिचय झाला तरी खूप घट्ट मैत्री झाली नाही. घरी, आमचा स्वतंत्र वाडा असल्यामुळे, फक्त माझी सख्खी-चुलत भावंडे होती. शेजार असा नव्हताच. त्यामुळे एकूणच छोटे वर्तुळ (किंवा डबके म्हणा) होते. ते वाईट होते असे नाही. पण त्याच्या मर्यादा होत्या. आणि मला वेळीच (कदाचित थोडे उशिरा…) त्याची जाणीव झाली.
असो. हे विषयांतर झाले. तर तेव्हा म्हणजे पुलं प्रेमी असताना त्यांच्याविरुद्ध लिहिलेले ऐकायची तयारी नसायची. त्या अर्थाने मी “भक्त” होतो असे म्हणा. १९९५ साली बाळासाहेब ठाकरे यांनी पुलंना महाराष्ट्रभूषण जाहीर झाला त्यावेळेस केलेल्या वक्तव्याचा (“झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला”) इतका राग आला होता की ठाकरे तुच्छ आहेत ही भावना कायमची मनात बसली. तसेच सुधीर मोघे यांनी त्यांच्या एका पुस्तकात पुलंवर एक थोडा टीकात्मक लेख लिहिला होता…मला वाटतं “अनुबंध” नावाच्या पुस्तकात… तो पण आवडला नव्हता. पण नंतर कालांतरानी तो लेख खूपच आवडला. खरंच नेमकेपणानी त्यांनी पुलंच्या उणिवा किंवा मर्यादा दाखवून दिल्या होत्या. अर्थात मर्यादा असण्यात काही गैर नाही. आपणच कुणालाही दैवत्व बहाल करण्याच्या नादात असे गुण अंगाला चिकटवतो की तो माणूस superhuman वाटू लागतो आणि आपण त्या प्रतिमेचे गुलाम होतो.
मध्ये अनेक वर्षे पुलंचे लेखन मी खूप कमी प्रमाणात वाचले. म्हणजे वर्षातून १-२ दा कधी तरी. त्यांच्या निधनानंतर आलेली पुस्तके म्हणजे प्रकाशकांचे निव्वळ पैसे कमावण्याचे प्रयत्न. कदाचित त्यांचे ते अप्रकाशित साहित्य त्यामुळेच त्यांच्या हयातीत “अप्रकाशित” राहिले असेल – कारण ते तितकेसे चांगले नव्हते. पण त्यांच्यानंतर प्रकाशकांनी ते सर्व शोधून काढून, त्यात काही तरी भर घालून (इतर कुणाच्या आठवणी, मनोगत किंवा प्रस्तावना) काही पुस्तके छापली. त्यातले एकही वाचनीय नाही…किंवा असलेच तर एकदा. पण त्यांचे जुने लेखन, आणि एकूणच संपूर्ण कारकीर्द (एकपात्री प्रयोग, संगीत, हार्मोनियम वादन, कविता सादरीकरण,भाषणे, मुलाखती इ.) किती थोर आहे हे आता नव्याने जाणवू लागले आहे. विशेषतः सध्याचे “विनोद” पाहिल्यानंतर…
अजून एक योगायोग म्हणजे – २०१९ हे पुलं, गदिमा आणि सुधीर फडके या मराठी चित्र-नाट्य-संगीत सृष्टीतील समकालीन आणि दिग्गज कलावंतांचे जन्मशताब्दी वर्ष. तिघांचाही जन्म १९१९ चा. आता यात तसे काही विशेष नाही. पण हा, अत्यंत थोर असे समकालीन, ज्यांनी बऱ्याच प्रमाणात एकत्र कामही केले, एकाच वर्षी जन्मल्याची उदाहरणे तशी कमीच. सध्याच्या काळात तसे एक उदाहरण म्हणजे सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान या तिघांचाही जन्म १९६५ चा आहे.
पुलंच्या एकूण कलाकृतींपैकी एक तसा दुर्लक्षित किंवा कमी प्रसिद्ध प्रयोग म्हणजे “वटवट वटवट”. मुळात हा तुकड्या तुकड्यात आकाशवाणी साठी लिहिला होता. पुढे त्याचा एकसंध प्रयोग केला. त्याचेच ध्वनिमुद्रण मी खूप पूर्वी पॉडकास्ट वर अपलोड केले होते. तेच इथे देत आहे. कदाचित ह्या साहित्य-कला प्रकाराशी जुळवून घेणं जड जाईल. पण अतिशय सुंदर प्रयत्न होता हा!
Part 1:
https://www.podomatic.com/podcasts/kaua-marathi/episodes/2008-05-22T14_41_58-07_00
Part 2:
https://www.podomatic.com/podcasts/kaua-marathi/episodes/2008-05-22T14_42_45-07_00
Part 3:
https://www.podomatic.com/podcasts/kaua-marathi/episodes/2008-05-22T14_43_23-07_00
Part 4:
https://www.podomatic.com/podcasts/kaua-marathi/episodes/2008-05-22T14_44_10-07_00
Part 5:
https://www.podomatic.com/podcasts/kaua-marathi/episodes/2008-05-22T14_44_51-07_00
Part 6:
https://www.podomatic.com/podcasts/kaua-marathi/episodes/2008-05-22T14_45_37-07_00
Leave a Reply