हल्ली मी बरेचदा माझ्या छोट्या मुलीला (वय: ३ वर्षे) लकडी पुलावर फिरायला घेऊन जातो…तिला पण थोडंसं चालायला मिळतं आणि मला तिथे मिळणारी जुनी, दुर्मिळ पुस्तके चाळता येतात. तिथे बसणारे ३-४ पुस्तक विक्रेते आता चांगलेच ओळखीचे झाले आहेत, आणि काही वेळेस मी काही चांगली पुस्तके विकत ही घेतली आहेत.
अर्थात, त्यातले कोणतेही पुस्तक विक्रेते माझ्या वैयक्तिक ओळखीचे नाहीयेत, किंवा त्यांनाही माझ्या बद्दल काही माहिती नाही.
मागच्या आठवड्यात मुलगी तिच्या आजीकडे गेली असल्यामुळे मी एकटाच लकडी पुलावर गेलो होतो. तेव्हा मला एकटाच पाहून एक पुस्तक विक्रेता मला म्हणाला: “काय आज एकटेच? मुलगी नाही आली?” मी त्यांना सांगितले की ती २ दिवस आजीकडे गेली आहे. त्यावर ते म्हणाले की तुमच्या मुलीला बघून एक पुस्तक तुम्हाला वाचायला द्यावे असे मनात आले. आज तुम्ही येणार हे माहिती नसल्यामुळे आणले नाही, पुढच्या वेळेस देतो.
मी पण त्यांना धन्यवाद म्हणालो आणि निघालो.
परवा परत मुलीला घेऊन तिथे गेलो असता त्या पुस्तक विक्रेत्यांनी आठवणीने ते पुस्तक दिले. डॉ. अरुण हातवळणे यांचे “यशवंत व्हा!”.
डॉ. हातवळणे यांची दोन्ही मुलं अतिशय हुशार…माझ्या पेक्षा थोडी मोठी. दोघेही १० वी ला शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिले आले होते. मी १० वी मध्ये असताना त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका (त्यांच्या अत्यंत सुंदर आणि वळणदार हस्ताक्षरात) “१० वी दिवाळी” या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या.
नंतर अनेक वर्षांनी त्यांच्या वडिलांनी म्हणजे डॉ. हातवळणे यांनी त्यांच्या मुलांना कसे वाढवले यावर लिहिलेले हे पुस्तक आले आहे असे मी ऐकले होते. पण अशा प्रकारची “बाळ संगोपन” वगैरे पुस्तके मला विशेष आवडत नाहीत. म्हणून कधी पाहिले नव्हते. पण त्या पुस्तक विक्रेत्यांनी मला तेच पुस्तक दिले आणि म्हणाले…नक्की वाचा. मला ३ मुली आहेत, तिघींचीही लग्ने झाली…हे पुस्तक आधी वाचले असते तर त्यांना वेगळ्या आणि अधिक चांगल्या प्रकारे वाढवले असते असे वाटले. आता तुमची छोटी मुलगी बघून तुम्हाला ते द्यावेसे वाटले!
मी त्यांना पैसे देऊ लागल्यावर त्यांनी ते नाकारले. मी “पुस्तक नक्की वाचेन आणि नंतर परत आणून देईन” असं म्हणताच त्यांनी त्याला पण नकार दिला. तुम्हीच ठेवा…ते एकदा वाचून संपवण्यासारखे नाही तर reference book आहे. मी ही त्यांच्या विनंतीचा मान ठेऊन ते पुस्तक घेतले.
अजून पुस्तक वाचले नाही…आणि मला आवडेल अशी आशा पण नाही. कदाचित असेलही चांगले. पण मला एक अनोळखी व्यक्ती, काहीही गरज नसताना असा स्नेह दाखवते याचे खूप नवल वाटले. कदाचित फक्त मला बघून त्यांनी तसे केले नसते. पण मुलीला बघून दिले असेल. खरोखरच लहान मुलं निरागस असतात आणि पटकन आपलेसे करून घेतात.
त्या प्रसंगामुळे अजून एक विचार मनात आला. अनोळखी व्यक्ती कधी ओळखीची बनते आणि कधी आणि कशी स्नेही बनते ते सांगणे अवघड आहे. माझ्या आयुष्यात असे खूप कमी स्नेही आहेत. आणि त्यांचे महत्व अशा प्रसंगातून ठळकपणे जाणवते.
Soulmate ला चांगला मराठी शब्द काय मला माहिती नाही. कदाचित “हृदय स्नेही” असा शब्द (असलाच तर किंवा बनवला तर) जवळचा असेल. माझी पण अशी एक स्न्हेही होती. कधी ओळखीची झाली, आणि कधी स्नेही आणि मग हृदय स्नेही झाली समजलंच नाही. आता ते समजावून घ्यायला भरपूर वेळ आहे, आणि जुन्या आठवणी आणि पत्रे/संदेश पण. पण आता ते समजवून काय उपयोग असं वाटतं.
कदाचित लायकीपेक्षा जास्त मिळालं की असं होत असेल…आहे त्याची किंमत समजायला आणि ते टिकवायला परत संधी मिळत नाही. असो.
Leave a Reply