मनात म्हणजे कुठं हे ३ वर्षाच्या मुलीला कसं सांगायचं?

सध्या माझा “Anger Management” चा प्रॅक्टिकल कोर्स चालला आहे…

माझी मुलगी (उद्या ३ वर्षांची होईल!) आता खूपच जास्त बडबड करते. मोठ्या माणसांच्या बोलण्यातले “जड” शब्द आणि त्यांची स्टाईल याची नक्कल करत ती अखंडपणे लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि कामाच्या मध्ये व्यत्यय आणते. आणि कधी कधी आपण चुकून एखादा शब्द किंवा वाक्य बोलून गेलो की तेवढाच पकडून त्यावर १०० प्रश्न विचारते. त्यांची न रागावता उत्तरे देणे, पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांना तितक्याच संयमाने उत्तर देणे हे माझ्यासाठी “Anger Management” कोर्स पेक्षा काही वेगळे नाही.

“Kids are like farts. You can only  tolerate  your own!” असं ऐकलं होतं. पणआपलं आपल्याला सहन करणं (fart नाही, आपलं kid) हे पण अवघड असू शकतं हे आता अनुभवतोय! 

आपण पहिली भाषा कशी शिकतो याचं मला खूप कुतूहल होतं. नंतर ज्या भाषा आपण शिकू त्या पहिल्या भाषेच्या माध्यमातून शिकत असल्यामुळे त्याला एक विशिष्ट पद्धत असते. पण पहिली भाषा शिकण्याची पद्धत वेगळी असते. आपण लिहायला आणि वाचायला नंतर शिकतो, शाळेत गेल्यावर… पण त्याआधीच थोड्याफार प्रमाणात बोलायला शिकतो…शब्द, काही प्रमाणात वाक्य… आणि त्याच्या भावना हे समजायला लागलेलं असतं. 

माझ्या मुलीला अजून लिहिता वाचता येत नाही. इंग्लिश अक्षर ओळख झाली आहे, काही प्रमाणात आकडे पण. त्यापलीकडे काही नाही. पण तरीही मराठी वाक्य बोलण्यापासून ते काही श्लोक, स्तोत्र, मंत्र, कविता पाठ होण्यापर्यंत तिची प्रगती झाली आहे. हे बघत असताना जाणवलेली गोष्ट म्हणजे, भाषा ही मुळात संपर्क आणि देवाणघेवाण यांसाठी आहे (communication)… त्यापलीकडे जाऊन ती व्यक्त होण्याचे माध्यम पण आहे (medium of expression), आणि त्याकरता फक्त शब्दसाठा पुरेसा नसतो तर तसे अनुभव किंवा तशी आकलनशक्ती महत्वाची असते… तरच तुम्ही भाषेच्या माध्यमातून समजावून सांगू शकता. म्हणजेच भाषा ही संस्कृतीमुळे समृद्ध होते आणि संस्कृती भाषेमुळे. अशा सततच्या देवाणघेवाणीमुळेच भाषा टिकते आणि फोफावते. 

मराठीत (किंवा अन्य भारतीय भाषांमध्ये) जावई, सून, सासू, सासरे, दीर, भावजय असे शब्द आहेत. इंग्लिश मध्ये “___-in-laws” च्या कुबड्या वापरून ही नाती सांगितली जातात (father-in -law, brother-in-law इत्यादी), कारण कदाचित ती नाती आणि ती कुटुंबपद्धती त्यांच्याकडे इतकी जास्त महत्वाची नसतील, त्यामुळे वेग वेगळे शब्द नसतील. तसेच इंग्लिश मध्ये “opinion” आणि “vote” असे वेगळे शब्द आहेत , मराठीत आपण दोन्हीला “मत” च म्हणतो. अगदी हिंदी मध्ये पण दादा-दादी आणि नाना-नानी हे आजोबांच्या २ जोड्यांना वेगवेगळे शब्द आहेत. आपण दोन्हीसाठी “आजी-आजोबा” असेच म्हणतो.

हे थोडे विषयांतर झाले. तर माझ्या मुलीच्या “शंकासुर” वृत्तीचा सामना करता करता सध्या मला नाकीनऊ येतात. तिला “मिस डाउटफायर” च म्हणले पाहिजे!
परवा मी तिच्या अखंड बडबडीला वैतागून तिला म्हणालो, “ताई, आता तू मोठी झाली आहेस…आता गप्प बस आणि मनात गाणी, कविता वगैरे म्हण…मला त्रास देऊ नकोस.”

झालं. लगेच तिचा प्रश्न आलाच: “मनात म्हणजे कुठे?”

आता ते कसं सांगायचं? म्हणून मी तिला नुसतं तोंड हलवल्याची action करून दाखवली. आणि म्हणालो असं पुटपुटल्यासारखं करायचं, मोठ्या आवाजात बोलायचं नाही. “पुटपुटणे” हा नवीन शब्द आणि त्याचा sound ऐकूनच ती हसायला लागली. पाच मिनिटं “पुटपुटणं म्हणजे काय आणि परत करून दाखव” यात गेल्यावर तो विषय संपला.

मग तिला म्हणालो, “मनात म्हणजे अगदी हळू आवाजात स्वतःशी बोलायचं”. त्यावर तिने अगदी हळू (तिच्या मानाने) बोलायला सुरुवात केली आणि काही वेळातच volume वाढत परत मूळच्या level ला आला. मी बरोबर बोलतोय ना? असं मधेच विचारून भंडावून सोडलं (ती अजून बोलतोय, करतोय असच बोलते…भावाचं ऐकून). 

मग मी तिला सांगितलं की मनात म्हणजे हळू आवाजात नाही…मनात म्हणजे नुसतं ओठ हलवल्याची acting पण नाही. पण मग “मनात बोलणे” म्हणजे काय? मी हरलो…

 तेवढ्यात माझ्या मदतीला टेक्नॉलॉजी धावून आली. Youtube वर कुठले तरी गाणे लावून तिला हेडफोन दिले आणि मग काही वेळ ती गप्प बसून त्यात गुंग झाली. 

पण तरीही मला ह्या प्रश्नाचे  मिळाले नाहीच. मनात बोलायचे म्हणजे काय? आणि ते ३ वर्षाच्या किंवा भाषा ना येणाऱ्या व्यक्तीला कसं समजावून सांगायचं? मन असतं ह्याची समज लहान मुलांना कधी येते? कशी येते? 

तुम्हाला उत्तर माहिती असेल तर मला पण सांगा…

मागे एकदा एक logic puzzle म्हणून एक प्रश्न वाचला होता. की जन्मांध व्यक्ती असेल, जिने कधीच रंग बघितलेले नाहीत, त्यांना तुम्ही लाल रंग कसा explain किंवा describe कराल?

कोणी म्हणालं आपल्या रक्ताचा रंग लाल असतो असं सांगायचं. पण त्याने रक्त ही बघितले नसणार. कोणी म्हणाले की विस्तवापाशी किंवा आगीच्या धगीपाशी हात नेऊन स्पर्शज्ञानानी सांगायचं की लाल रंग अशी दाहकता, भीती, धोका, warning  यांचे प्रतीक आहे. पण तेसुद्धा केवळ प्रतीकच झाले. मूळ प्रश्न “लाल रंग कसा असतो” हे समजले नाहीच. 

खरंच किती अवघड गोष्ट आहे! “मनात म्हणजे कुठे आणि काय?” हे सांगताना मला त्या “लाल रंग” कूटप्रश्नाची आठवण झाली. 

Richard Feynman (1918-1988) या नोबेलविजेत्या शास्त्रज्ञाचा एक quoteया प्रसंगामुळे आठवला. 

“There’s a big difference between knowing the name of something and knowing something”

तसं रंगाचं नाव (लाल, पिवळा, हिरवा) माहिती होणे आणि रंग “समजणे” यात प्रचंड मोठा फरक आहे. आणि “मनात बोलणे” म्हणजे “पुटपुटणे”, ओठ हलवणे, किंवा हळू आवाजात बोलणे नाही… ते समजणे कदाचित इतक्या लहान वयात शक्य नाही. 

असो. पण एकूणच लहान मुलांशी बोलणे, त्यांना मोठे होताना बघणे हा माझ्यासाठी खूप विशेष, आणि शिकण्यासारखा अनुभव आहे. चिडचिड होऊ ना देता, स्थितप्रज्ञ राहून परत परत त्याच प्रश्नांची उत्तरे देणे ही पहिली पायरी झाली… आणि “मन म्हणजे काय?” अशा मूलभूत प्रश्नांबद्दल विचार करायला लागणे ही पुढची पायरी…अजून किती पायऱ्या असतात, असणार आहे कुणास ठाऊक?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: