सध्या सर्व जग कोरोना मय झालं आहे. “न भूतो न भविष्यति” असे म्हणणे अर्थातच धाडसाचे ठरेल – कारण भूतकाळात अशा प्रकारचे किंवा याहून भयंकर संकट जगावर आलेले आहे (अर्थात त्याची व्याप्ती कदाचित संपूर्ण जगभर नव्हती). आणि भविष्यातही असे संकट परत येणार नाही असेही ठामपणे सांगता येणार नाही (जर भविष्यकाळ असेल आपल्या मानवजातीला तर)… पण असे मात्र नक्की म्हणू शकतो की आपल्या हयातीत कदाचित हा सर्वात संस्मरणीय काळ ठरेल, इतक्या मोठ्या प्रमाणावर जगाला एका विषाणूने विळखा घातला आहे.
ह्या संकटामुळे अर्थातच अत्यंत भीषण, सुन्न करणारे, संताप आणणारे आणि निराश करणारे असंख्य प्रसंग घडत आहेत, तसे अनेक अनुभव येत आहेत… पण सध्या त्याबद्दल ना बोललेलेच चांगले…उगाच डोक्याला अजून ताप नको.
त्यामुळे सध्या आपण फक्त काही हलक्या फुलक्या, किंवा कदाचित थोड्या वजनदार (म्हणजे समजायला जड विनोद) पण चविष्ट गोष्टींबद्दल बोलू (म्हणजे, मी बोलतो, तुम्ही ऐका!)
सध्या जगात दोन महान फेकू राज्य करत आहेत. एक अमेरिकेत – ट्रम्प तात्या आणि दुसरे भारतात फेकचंद उर्फ प्रधान सेवक उर्फ विदूषक.
प्रसिद्ध स्टॅन्ड-अप कॉमेडियन वरुण ग्रोव्हर याने फेकूला एक चांगले नाव दिले आहे – ज्युसर!त्याचा त्याने सांगितलेला किस्सा हा असा. पूर्वी उत्तर प्रदेशात (जिथला तो आहे) ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये ज्युसरवाला ज्युसर विकायला यायचा. अगदी साधा लाकडी ज्युसर, ज्याने लिंबाचा रस काढता येतो तसा. त्या ज्युसर वर तो माणूस एका लिंबातून २-३ ग्लास ज्यूस काढून दाखवायचा! आणि लोकं अचंबित होऊन लगेच तो ज्युसर विकत घ्यायचे. आणि घरी आणल्यावर मात्र २-३ लिंबातून अर्धा ग्लास ज्यूस पण निघायचा नाही. त्याचं कारण तो ज्युसरवाला बरोबर पिळवणूक करायचा आणि लोकांना खोटी आशा आणि स्वप्न दाखवायचा…वरुण च्या मते आपण भारतीयांनी २०१४ मध्ये तो ज्युसर खरेदी केला! 🙂
इतकंच नाही तर २०१९ मध्ये (अधिक किंमत देऊन) तो पुन्हा विकत घेतला!
तर असा आपला ज्युसर, जो जोकर पण आहे, सध्या कोरोनामुळे भलताच फॉर्मात आहे. परदेश दौरे थांबल्याचा सूड तो लोकांना ज्युसर सारखा पिळून काढून घेत आहेत.
थाळी वाजवा, दिवे लावा…इत्यादी आचरट प्रकार अफाट संख्येमध्ये करायला लावून लोकांना उल्लू बनवण्याचे प्रकार पाहिल्यावर ज्युसर/जोकरला कळकळीने म्हणावेसे वाटले – ऐसा मझाक मत “कोरोना”. पण शेवटी आपणच हा जोकर निवडला आहे. Elect a clown, expect a circus. यथा राजा तथा प्रजा…
आणि आपली प्रजा म्हणजे प्रजाच आहे…असो.
२००९-१० साली, जेव्हा स्वाइन फ्लूनी गोंधळ घातला होता तेव्हा आम्ही “उभे” होतो (त्यानंतरही अनेक वर्ष उभेच होतो…पाय दुखेपर्यंत – पण तो भाग वेगळा). तेव्हा लग्नासाठी वधूसंशोधन करताना जे चित्र-विचित्र अनुभव आले त्यातला एक कोरोना सारख्या अनुभवासारखा होता म्हणून इथे सांगतो.
एका मुलीच्या आईने मला फोन करून तुमची माहिती आणि फोटो पाठवा असे सांगितले. म्हणून मी माहिती आणि नेहेमीचे १-२ फोटो पाठवले. तशी त्या महिलेचा पुन्हा फोन आला की फोटो जरा जुने वाटतात, अगदी लेटेस्ट पाठवा. आता हे खरंकी ते फोटो १-२ वर्ष जुने होते (कारण “उभे” राहिलो त्याच्या थोडे आधीचे होते) , पण इतकेही जुने नव्हते की मी ओळखूच आलो नसतो. पण तरी मी अजून लेटेस्ट, म्हणजे साधारण ४-५ महिने आधीचा एक फोटो पाठवला. तर परत फोन आला – अगदी लेटेस्ट, म्हणजे आत्ताचा पाठवा.
आता मात्र मी चिडलो. आणि चिडल्यावर माझ्यातला खोचक आणि कुजकट “मी” जागा होतो. मग मी लगेच स्वाईन फ्लू चा मास्क घातलेला हा फोटो काढला आणि पाठवला…

ती बाई काय समजायचे ते समजली आणि आमचे “ग्रह फिरले” – म्हणजे पत्रिका जुळली नाही.
तर तो अनुभव आत्ता आठवायचे कारण म्हणजे आता सगळेच “बुरखाधारी” झाले आहेत. आणि त्यामुळे खूप विनोदी, विचित्र प्रसंग घडत आहेत.
सगळेच मास्क लावलेले असल्याने ओळखीचा माणूस समोर आला तरी समजत नाही. मग तो माणूस अर्धवट हसतो… कारण कदाचित त्याने आपल्याला ओळखलेले असते…मास्क कडे बघून नाही, पण सुटलेल्या पोटाकडे बघून असेल…मग आपण अर्धवट अंदाज घेऊन हसतो. मास्क असल्यामुळे फक्त डोळे आणि गाल ह्यांच्या हालचालीवरूनच हसलोयकी नाही हे समजते. पण आम्ही मुळातच मख्ख चेहऱ्याचे असल्यामुळे आम्ही मास्कच्या आत थोडे हसल्यावरही डोळे किंवा गाल ह्यांच्यात काहीही फरक पडत नाही…त्यामुळे समोरच्या माणसाला आपण हसल्याचे समजतच नाही. दुसऱ्या दिवशी परत तोच माणूस (अर्थात वेगळे कपडे घालून) परत दिसतो. आता कालच्या सारखं नको म्हणून आपणच आधी हसतो…तर तो माणूस मख्ख. म्हणजे आपण ओळखायला चुकलो की कालच्या “अपमानामुळे” त्यानी आपले हसू नाकारले, काही समजत नाही.
अशा वेळेस मला पु लं आठवतात. त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे – “मला सरदारजी ओळखता येतो. पण कालचा सरदारजी परत आज ओळखता येत नाही.”. अगदी तसेच काहीसे.
अर्थात अशा गोंधळामुळे मला कोणी “आगाऊ” आणि “शिष्ट” म्हणेल याची भीती नाही…कारण ते विशेषण मी कोरोनाच्या आधीच कमावले आहे! तसेही पुणेकरांना सगळे शिष्ट म्हणतातच. शिष्टवरून आठवलं.
गेले काही दिवस महाराष्ट्रातला मिनी-ज्युसर (म्हणजे आपले मामू – माजी मुख्यमंत्री – तेच ते “मी पुन्हा येईन वाले”…ते दिल्लीतल्या ज्युसर ची छोटी प्रतिकृती आहेत, किंवा तसे समजतात) सारखे राज्यपालांना जाऊन भेटायचे. आणि तेव्हा शिष्टमंडळ घेऊन जायचे (म्हणजे तेच ते… चेले. आणि ह्याचा पुणेरी “शिष्ट” शी काही संबंध नाही. किंवा असेलही…कारण चेले पण अतिशिष्ट आहेत).
नुकताच, म्हणजे काल का परवा हा “शिष्टमंडळ” नेण्याचा शिष्टपणा संपला…कारण राज्यपालांनी विधानपरिषद निवडणूक जाहीर केली. पण त्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या वातावरणाला अनुसरून एक विनोद आला होता. की राज्यपाल आपल्या दरवाज्याबाहेर दुधवाल्यासाठी पाटी लिहून ठेवतात: “उद्यापासून २ लिटर दूध कमी देणे. आता ते पुन्हा येणार नाहीत” 🙂
इंग्लिशमध्ये BC म्हणजे Before Christ अशा अर्थाने लिहितात. आता BC म्हणजे Before Corona म्हणता येईल इतके बदल कोरोनामुळे घडणार आहेत.
म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर – पूर्वी मी मास्क लावून बँकेत जाऊन कॅशिअरकडे पैसे मागितले असते तर हाहा:कार झाला असता. आता कॅशिअर स्वतःच सांगतो की मास्क लावला नसेल तर पैसे मिळणार नाहीत!
किंवा पूर्वी चेहराभर बुरखा घालून हिंडायचे “स्वातंत्र्य” फक्त मुस्लिम स्त्रियांना होतं…किंवा पुण्यातल्या दुचाकीधारी तरुणींना! आता आपल्या सर्वांना तसे हिंडायचे स्वातंत्र्य आहे! नव्हे बंधनच आहे!
पूर्वी “टोणगा नुसता दिवसभर टीव्हीपुढे पाय पसरून बसला आहे” हा दुर्गुण होता. आता “आम्ही घरीच बसणार” हा सद्गुण झाला आहे…अशी प्रतिज्ञा वगैरे घेतात भक्त लोकं…तीच ज्युसर प्रेमी भोळी लोकं…ज्यांनी आठवलेंची “करुणा गो” anthem सिरियसली घेऊन थाळी वादनाच्या दिवशी गायली.
पूर्वी “घरचे जेवण ते घरचेच” असं म्हणायचे. आता कोणी “घरच्या जेवणाच्या” इतक्या प्रेमात असेल असं वाटत नाही. सुज्ञ पुणेकरांनी म्हणे “इथे घरगुती पद्धतीचे जेवण मिळेल” ह्या पाट्या आधीच काढून टाकल्या आहेत! सॉरी…सुज्ञ पुणेकर ही द्विरुक्ती झाली.
पूर्वी प्रत्येक आजारावर, आयुर्वेदात कुठला ना कुठला तरी “काढा” असतो असे सांगणारे आमच्या परिचयाचे एक आजोबा होते (म्हणजे अजूनही आहेत…पण तेव्हा ते असं सतत म्हणायचे). आता कोरोनावर आयुर्वेदात काय लिहिलंय असं मी त्यांना खोचकपणे विचारल्यावर म्हणाले “२१ दिवस घरातच काढा”!
तात्पर्य: आयुर्वेदाकडे सगळ्यावर उत्तर असेल किंवा नसेल…पण ह्या आजोबांकडे मात्र असतेच!
पण ह्या कोरोनामुळे नाइलाजामुळे का होईना लोकं घरात एकत्र आली आहेत (त्यात काय विशेष…एकत्र ना येऊन सांगतो कुणाला – तेच ते आजोबा). मला तर वाटतं की कोणी चतुर बिल्डर कोरोनाचा वापर त्याच्या जाहिरातीसाठी पण करू शकेल – “कोरोना, घराला घरपण देणारा व्हायरस!”
पूर्वी लोकांना आपले छंद जोपासण्यासाठी (आणि त्या छंदांचे प्रदर्शन सोशल मिडीयावर करण्यासाठी) वेळ नव्हता… आता वेळच वेळ. त्यामुळे कूकिंग च्या आचरट कलाकृतीपासून गाणे, नाच, वादन इ. आचरट कारामतीपर्यंत अनेक प्रकारच्या व्हिडीओचे पेव फुटले आहे. पण माझ्या तुसड्या स्वभावामुळे मला फायदा होतो.
आमच्या मित्रांच्या एका ग्रुपवर एक जण त्याचे गिटार वादनाचे खतरनाक प्रयोग व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवत होता. मी मुद्दाम त्याने वाजवलेल्या गाण्यापेक्षा वेगळे गाणे आहे का असे विचारून त्याला नाऊमेद करत होतो. पण त्याचा उलटाच परिणाम झाला. लोकांना नुसती ट्यून ऐकवून बुचकळ्यात टाकण्यापेक्षा आपण आपल्या स्वर्गीय आवाजात ते गायले आणि एकीकडे गिटार खाजवले…तर? असा साक्षात्कार त्याला झाला. तो त्रास एकदोन दिवस सहन केल्यावर मी त्याला म्हणालो: “गिटारपेक्षा तू बासरी का नाही वाजवत?”
मित्र: “म्हणजे मी बासरी सुद्धा गिटार इतकीच चांगली वाजवेन असं म्हणायचं आहे ना तुला?”
मी: “नाही. बासरी वाजवलीस तर तुला गाता येणार नाही. तेवढाच एक त्रास कमी!”
त्यानंतर त्याचे “वाद्याचे प्रयोग” बंद झाले. ग्रुप वरच्या अनेक पापभिरू लोकांनी मला व्यक्तिशः मेसेज करून माझे आभार मानले! कोरोनामुळे घरी बसावं लागल्यामुळे अनावश्यक फोनचं प्रमाण पण खूप वाढले आहे. उगाच कोणाला तरी झोपेतून जागे करून “खुशाली विचारायची किंवा सांगायची”.
आमच्या आजूबाजूचे (घरातले आणि परिचित) तर फारच थोर आहेत. परवा शेजारच्या एका आजीबाईना (ज्यांना ऐकायला कमी येतं, आणि स्मृती पण कमी झाली आहे) त्यांना त्यांच्यासारख्याच दुसऱ्या आजीबाईचा फोन आला होता. गंमत म्हणजे त्या आजीबाईनी तिसऱ्याच कोणत्या तरी आजी समजून आमच्या शेजारच्या आजींना फोन लावला. आणि ह्यांनी त्या चौथ्याच कोणी तरी आहेत असं समजून त्यांच्याशी गप्पा मारल्या. आणि गंमत म्हणजे कुणाचंच काही अडलं नाही. कारण तसेही गप्पा मोघम आणि कुठेही लागू होतील अशाच असतात…आणि तपशिलात कोणालाच विशेष इंटरेस्ट नसतो. म्हणजे “तुझा नातू काय करतो सध्या…तुझी नातं कशी आहे. बाकी सगळं ठीक ना? पाय काय म्हणतोय?” इत्यादी. मला वाटतंय कदाचित त्या तिसऱ्या आणि चौथ्या आजीसुद्धा एकमेकींशी अशाच गैरसमजातून बोलत असतील… अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या आजीशी बोलत आहोत असे समजून. असो.
सध्या काय, बाहेर जाऊन जीव गमावण्यापेक्षा आत राहून जीव रमविणे चांगले! ह्यावरून परवाच वाचलेला एक विनोदी सल्ला आठवला: “एकवेळ घरी बसून फुगलेली ढेरी चालेल, पण बाहेर जाऊन सुजलेले ढुंगण नको”
चला आता माझी झोपायची वेळ झाली. गेले ४-५ दिवस अगदीच कमी म्हणजे १२ तासच झोप झालीये. त्यामुळे माझे विचारमंथन जरा कमी पडते आहे. (हे सगळं वाचून तुम्हाला अंदाज आला असेलच).
अजून किती दिवस, आठवडे, महिने हा कोरोना छळणार आहे काय माहिती? जर लांबलाच तर पुढे मागे अजून एक कोरोना-ग्रस्त पोस्ट नाईलाजाने लिहावी लागेल. आणि त्यावेळेस माझे कूकिंग आणि सिंगिंग चे प्रयोग दाखवीन (वेग वेगळे…एकत्र नाही)!
असो. तूर्तास झोपतो…
Leave a Reply