१० वी ची पंचविशी 

आज ३० जून रोजी आमच्या १०वी चा निकाल लागला त्याला २५ वर्षे पूर्ण झाली…३० जून १९९५! (सुदैवाने मार्क्स चांगले मिळाल्यामुळे त्या अर्थानी “निकाल लागला” नाही).

माझ्या शाळेतल्या आणि अजूनही संपर्कात असलेल्या काही मित्रमैत्रिणींना मी WhatsApp वर त्याबद्दल सांगितले, तर त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यापुढची चर्चा रंजक होती…म्हणूनच हा ब्लॉग लिहायचे ठरवले. 
त्या सर्वांची एक कॉमन प्रतिक्रिया ही “वा! काय मेमरी आहे तुझी… कसं काय आठवलं तुला?” अशी होती. पण अशा अनावश्यक, निरुपयोगी गोष्टी माझ्या  नेहेमीच लक्षात राहतात.  विशेषतः तारखा, वर्ष, इत्यादी. आजच करीना कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या पहिल्या चित्रपटाला २० वर्षे झाली (रेफ्युजी – ३० जून २०००) ही अनावश्यक माहिती पण माझ्या लक्षात राहिली. 

पण त्याचबरोबर मी माणसांची नावे आणि चेहरे आणि ओळख लक्षात ठेवण्याच्या बाबतीत अगदीच कुचकामी आहे…म्हणजे इतका की त्यामुळे अनेकदा माझी अत्यंत केविलवाणी अवस्था झाली आहे आणि होते.
माझा एक मित्र म्हणाला, की स्लमडॉग मिलेनिअर सारखे आपण जे प्रसंग, ज्या घटना जगलेलो असतो त्या आपल्या अगदी नीट लक्षात राहतात…१० वी चा निकाल माझ्यासाठी संस्मरणीय होता म्हणून माझ्या लक्षात राहिला. पण मग फक्त तारखा, वर्षच का? माणसं, नावे, चेहरे का नाही? आणि मला ऐतिहासिक  सनावळी, जन्मदिवस, जुने चित्रपट कधी प्रदर्शित झाले ते वर्ष इ. पण लक्षात राहतात. ते तर मी जगलेलो नाही. मग असे कसे? थोडक्यात…मी तारखा, वर्षे (एकूणच numbers) ह्या बाबतीत जरा तल्लख आहे आणि माणसे, चेहरे, नावं या बाबतीत मठ्ठ…बाकी त्यात विशेष लॉजिक काही नाही. हा कदाचित हेच पुढे नेऊन असे म्हणता येईल कि मी analytical जास्त आहे पण human relations, interactions या बाबतीत जरा ढ आहे. मलाही ते मान्य आहे.

ह्याच विषयावर चॅट करताना एक मैत्रीण म्हणाली की त्यावेळचं तिच्याबद्दलचं मत काय होतं, आणि तेव्हा इतर मुले (मुलगे) तिच्याबद्दल किंवा इतर मुलींबद्दल काय बोलायचे? ही मैत्रीण १ ली ते ४ थी माझ्याबरोबर शाळेत होती. नंतर ५ वी ते १० वी  तिची आणि माझी शाळा वेगळी होती. माझी फक्त मुलांची, तिची फक्त मुलींची…दोन्ही शाळा एकाच संस्थेच्या होत्या. पण आमचा क्लास एकच होता. तो पण वेगवेगळ्या वेळेस. मी (पहाटे!) ६:१५ च्या बॅचला होतो, तर ती ८:१५ च्या. आणि शाळेत मी अगदीच शामळू होतो…लाजाळू आणि भित्रा आणि मुलींशी बोलायला घाबरणारा. तर ती एकदम बिनधास्त. मी तर तिला म्हणालो की माझ्या मते ती “धटिंगण” च होती. ती एकदम हसायला लागली. तिला तो शब्द आवडला आणि पटलासुद्धा. 
पण तिला अशी पण उत्सुकता होती की कोण मुलगे तिच्याबद्दल काय बोलायचे किंवा आम्ही मुलं एकूणच कोणत्या मुलीबद्दल काय बोलायचो!

मला एकदम गंमत वाटली. दुसरी एक मुलगी पण त्याच प्रकारची माहिती विचारत होती. आणि त्या दोघी, ज्या खरं तर वर्गमैत्रिणी होत्या, त्या एकमेकींच्या चहाड्या आणि थोडे फार टोमणे एकमेकींबद्दल सांगत होत्या… आणि मी दोघीना (स्वतंत्रपणे!) पेटवण्याचं काम करत होतो 🙂

ह्या सगळ्यावरून मला एका गोष्टीचं खूप नवल वाटलं… माझं १० वी, किंवा अगदी इंजिनीरिंग पर्यंतच विश्व किती छोटं होतं आणि किती अनभिज्ञ होतं. एक तर १९९५ मध्ये इंटरनेट वगैरे नव्हते (general purpose इंटरनेट ची सुरुवातच १९९५ मध्ये झाली, आणि भारतात १९९८ पर्यंत फारसा प्रसार/प्रचार नव्हता)/ त्यामुळेच माझे विश्व म्हणजे शाळा, कॉलेज इ. होते. पण माझे विचार त्यावेळेसही “वैश्विक” (broad /global ) होते असं म्हणायला हरकत नाही. कारण तेव्हा इतर मुलांबरोबरची ईर्षा, असूया, चढाओढ वगैरेचा मला गंधही नव्हता. किंबहुना त्याचा राग यायचा.

ज्याला बॉक्सिंग किंवा टेनिस किंवा बुद्धिबळ इ. मध्ये जगज्जेता व्हायचं आहे तो काय आधी त्याच्या वर्गातल्या किंवा शेजारपाजारच्या मुलांना हरवत मग टप्प्याटप्प्याने देश आणि विश्व पातळीवर जात नाही. तर तो स्वतःचे कौशल्य प्रचंड विकसित करतो, आणि मग मोठ्या मंचावर, स्पर्धेत उतरून नाव कमावतो. तशीच काही तरी माझी भावना होती. ती बरोबर दिशेने होती हे नंतर उच्चशिक्षण घेताना जाणवलं.

तुम्ही जर तुमच्या नेहमीच्या सर्कल मध्ये चढाओढ करत राहिलात तर तुम्ही फारच कोत्या स्वरूपाचे विचार करता… incremental आणि just enough to beat the narrow and immediate competition इटपतच प्रयत्न करता. आणि खऱ्या अर्थाने pursuit of excellence करत नाही. हे मला मी शाळेत असताना फार जाणवायचे…कदाचित त्याप्रकारे ते व्यक्त करता येत नव्हते, पण समज होती. 
मला काय म्हणायचे आहे ते ह्या diagram वरून समजेल. 

शाळेतली चढाओढ Local Maximum सारखी होती. त्याच्या बाजूलाच एक Global Maximum आहे, असते ह्याचा गंधही शाळेत असताना नसतो…आणि आपण आपले त्या Local Maximum च्या शर्यतीत अनेक प्रकारच्या चुका, वाईट गुण आत्मसात करून बसतो. 

१० वी मध्ये घोकंपट्टी करून चांगले मार्क्स मिळवणारे अनेक जण नंतर मागे पडले, काही तर अगदी फेकले गेले…फक्त अभ्यास आणि मार्क्स या बाबतीत नव्हे तर करिअर, एकूणच जीवनाचे टप्पे या बाबतीत. कारण Local  Maximum जिंकण्याच्या नादात त्यांचे व्यक्तिमत्व इतकं विचित्र होऊन बसले की ते फार पुढे जाऊ शकले नाहीत. 

त्या वेळचा अजून एक गैर समज, जो सुदैवाने मला दूर ठेवता आला तो म्हणजे शाळेतली (विशेषतः अभ्यासातली) pecking order ही जन्मभर तशीच राहते, किंवा राहायला हवी. १० वी ही तशी पहिली महत्वाची परीक्षा…अनेकांना असे वाटते कि जे १० वी मध्ये चमकतात ते पुढे सुद्धा कायम चमकणार किंवा चमकले पाहिजे, आणि जे मागे असतात ते तसेच राहिले पाहिजेत. म्हणजे एका अर्थाने ही “pecking order”, किंवा hierarchy ही fixed असते. आणि तो समज थोड्याफार प्रमाणात graduation पर्यंत तसाच राहतो, किंवा जास्त घट्ट होतो – कारण आपली शिक्षण पद्धती अशी आहे कि साधारण जे १० वीला चांगले मार्क्स मिळवतात ते त्याच (अव)गुणांवर graduation पर्यंत चांगले करतात. 

खरी कसोटी ही शिक्षण संपल्यावर सुरु होते. तिथे चांगले करण्याचे, पुढे जाण्याचे, मागे पाडण्याचे निकष एकदम बदलतात. आपल्या शिक्षण पद्धतीप्रमाणे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात किंवा एका विशिष्ट अभ्यासक्रमावर आधारित concrete उत्तरे देण्यात आपण मुलांना तयार करतो. पण जिथे प्रश्नच सारखे नसतील तिथे? तिथे आपण कोलमडतो. कारण graduation नंतर माझी “प्रश्नपत्रिका” वेगळी आणि माझ्या वर्गमित्राची “प्रश्नपत्रिका” वेगळी. आणि ते तपासणारे पण वेगळे…किंवा कदाचित कुणीच नाहीत. आणि passing मार्क्स पण वेगळे. 

आज १० वी बद्दल चर्चा करताना, पुन्हा त्या आठवणी जाग्या करताना मला जाणवले की ती शिक्षण पद्धती किती निरुपयोगी होती. मित्रांच्या आठवणी आणि कडू-गोड़ प्रसंग ह्या सगळ्या १० वी च्या शर्यतींशीनिगडीत  होत्या…शिक्षणाशी निगडीत नाही. 


माझा एक चांगला मित्र (म्हणजे त्यावेळेस तो चांगला मित्र वाटायचा) मला ५ मार्क्स जास्त मिळाले म्हणून जरा डूख धरून वागला आणि १२ वी ला त्याला माझ्यापेक्षा ३ मार्क्स जास्त मिळाल्यावरच त्याचा आत्मा शांत झाला. आता तरी त्याला ते सगळे मूर्खपणाचे वाटत असेल का? कदाचित नसेलही…कारण तो त्या “Local Maximum” नावाच्या डबक्यातून कधी बाहेर आलाच नाही. आता सुद्धा तो अमेरिकेतल्या त्याच्या डबक्यात त्याच प्रकारची चढाओढ आणि हेवेदावे करत असेल. अजूनही त्याच्या तिथल्या “मित्राला” increment जास्त मिळाले की दुःखी होत असेल आणि स्वतःला जास्त मिळाले की विजयी उन्माद करत असेल. 

सुदैवाने, मी अशा सर्व “मित्रांशी” संपर्क कधीच तोडला आहे. आणि मी काही miss करतोय असं पण मला वाटत नाही. मला ज्यांच्याकडून शिकायला मिळतं, ज्यांची company मी enjoy करतो… जे एकमेकांना mutual respect देऊन काही तरी चांगलं, नवीन देऊ शकतात अशाच लोकांमध्ये मी रमतो. त्यात काही अगदी शाळेपासूनचे लोक आहेत, तर बाकी बरेचसे गेल्या २५ वर्षात विविध टप्प्यांवर भेटलेले लोक. 

१० वी किंवा शाळेतल्या असंख्य आठवणी, प्रसंग, व्यक्ती मला अजूनही आठवतात आणि आवडतात. पण म्हणून उगाच गहिवरून येत नाही, किंवा काय सोनेरी दिवस होते ते…वगैरेही वाटत नाही. 

You know you are getting old when you find more solace in nostalgia than in your dreams (future aspirations).

१० वी ची पंचविशी, म्हणजे आपली चाळीशी झाल्यावर बरेच जण nostalgia मध्ये रमायला लागतात. सुदैवाने मी अजूनही Dreams आणि Future plans मध्येच जास्त रमतो…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: