लेथ जोशी…

लॉक डाऊन च्या काळात अनेक नवीन चित्रपट, वेब सिरीज वगैरे पाहण्याचा योग जुळून आला. त्यात एक अनेक दिवस शोधत असलेला चित्रपट काल अचानक दिसला. त्याचं नाव “लेथ जोशी”.


२०१८ सालचा हा मराठी चित्रपट खरं तर चित्रपटगृहात कधी रिलीज झाला हेही आठवत नाही. कदाचित झालाच नसेल. पण ह्याचं ट्रेलर पाहून खूप उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर अनेक प्लॅटफॉर्म वर मी हा चित्रपट शोधत होतो पण कुठेही सापडत नव्हता. काल अचानक अनावधानं परत शोधायचा प्रयत्न केला आणि युट्युब वर सापडला! 


लगेचच रात्री १२ वाजता पाहायला घेतला…आणि मला तरी खूप आवडला! पण सगळ्यांना आवडेलच असं नाही…


हा चित्रपट खूप संथ आहे… आणि त्याला कारण आहे त्याचा विषय. यांत्रिकीकरणाचे आपल्या आयुष्यावर होत असलेले परिणाम, त्याच्याशी झुंजणारा एक जुन्या पिढीतला व्यक्ती,यांत्रिकीकरणाशी जुळवून घेणारी त्याची बायको, आणि ह्या नव्या युगातला असल्यामुळे त्याचा फायदा करून घेणारा त्याचा मुलगा.. असे वेग वेगळे पैलू आपल्याला बघायला मिळतात.

 There is a quote by Alvin Toffler, the famous American writer and futurist: “The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn, and relearn.”

नेमका हाच ह्या चित्रपटाचा गाभा आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जोशी नावाच्या माणसाची नोकरी जाते. तो लेथ मशीनवर काम करणारा निष्णात कामगार असतो. इतका की त्याचा जुना मालक त्याला लेथवरचा कारागीर किंवा शिल्पकार अशा उपमा देतो. तो त्याला लेथ जोशी म्हणूनच ओळखत असतो. पण मालकाचा तरुण मुलगा जुनी लेथ विकून टाकतो आणि त्याजागी नवीन CNC मशीन घेतो. त्याबरोबरच लेथ जोशी आणि इतर ५-६ लेथ कारागिरांची नोकरी जाते.

लेथ जोशीला ते पचवणं खूप जड जातं. ३५ वर्षे एकाच लेथ वर काम केलेला तो… त्याला बाकी काहीच येत नसतं आणि करायचं किंवा शिकायचं ही नसतं. लेथ च्या तुलनेत CNC मशीन चा दर्जा खूप चांगला तर असतोच पण १०-२० पट अधिक उत्पादकता असते. हे वास्तव तो पचवू शकत नाही. 


घरी त्याची डबे बनवणारी, पुराणाच्या पोळ्या करून विकणारी बायको मात्र ह्या यांत्रिकीकरणाशी सहज जुळवून घेते… ती फूड प्रोसेसर घेते, त्यावर चायनीज बनवायला शिकते आणि १०० माणसांचे केटरिंग करायला लागते. लेथ जोशींचा मुलगा इलेक्ट्रॉनिक्स रिपेरिंग चे काम करत असतो. त्याच्या फॅक्टरी मधलं CNC मशीन दुरुस्त करायला त्याच्या मुलालाच बोलावलं जातं, आणि त्याच्या कामाचा पाहिजे तेवढा मोबदला त्याला मिळतो. हे बघून लेथ जोशीची मनाची घालमेल अधिकच वाढते.


अशाच अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून दिग्दर्शकाने तंत्रज्ञान आणि त्यामुळे होणारे बदल यावर भाष्य केलं आहे. लेथ वरून CNC हे केवळ प्रतीक आहे.


डग्लस ऍडम्स या लेखकाचा ह्या बदलत्या तंत्रज्ञानाबद्दल एक प्रसिद्ध विचार आहे. तो म्हणतो: “तुमच्या जन्माच्या वेळेपासून जे ह्या जगात होते किंवा असते ते आपल्याला नॉर्मल, सर्वसाधारण वाटते, जणू काही जग तसेच चालते. जे आपण १५-३५ वर्षे वयाचे असण्यादरम्यान येते ते आपण आत्मसात करतो आणि कदाचित त्याच्यात करिअर करू शकतो. पण जे साधारणपणे आपल्या वयाच्या ३५-४० वर्ष्यानंतर हे नवीन येते ते आपण “नॅचरल”/नैसर्गिक नाही, आणि ते तात्पुरते आहे असे मानतो. आपण denial मध्ये असतो”.


असेच काहीसे लेथ जोशी या व्यक्तीच्या बाबतीत घडत असते. आणि हे प्रतीकात्मक आहे. काही लोकांच्या बाबतीत ते कॉम्पुटर बाबत असेल, काहींच्या बाबतीत ते वाहन/वाहतूक/गोंगाट याबाबतीत असेल, तर काहींच्या बाबतीत राजकारण, वृत्तसंस्था, सण, उत्सव, नातेसंबंध, कुटुंबव्यवस्था याबाबतीत घडत असेल. नवीन पद्धतीशी जुळवून घेणे हाच अनेकांचा संघर्ष असतो…असू शकतो.


मी सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे सर्वांनाच हा चित्रपट आवडेल असे नाही. संथ वाटू शकेल. पण ज्यांना सकस, चांगल्या विचाराचे, मनोरंजनाच्या पलीकडचे चित्रपट आवडतात त्यांनी हा चित्रपट नक्की बघावा.


आधी चित्रपटाचे ट्रेलर बघा:


आणि मग पूर्ण चित्रपट बघा…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: