सध्या कोविड लसीकरण (की लशीकरण? काही जण लशीकरण असं लिहितात…जे वशीकरण सारखं वाटतं) जोरात चालू आहे. म्हणजे चर्चा…लस पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरु आहे.
अपॉइंटमेंट मिळवणे हा एक मोठा खेळ झाला आहे. रात्री ८ वाजता किंवा अशा विशिष्ट वेळेस अपॉइंटमेंट स्लॉट ओपन होतात आणि अवघ्या काही सेकंदात संपतात देखील! म्हणजे सगळा देश सध्या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट खेळत आहे.
चार्टर्ड अकाउंटंट किंवा अरेंजड मॅरेज पेक्षा अवघड आहे लस मिळवणं (ज्याला ज्या प्रकारचा अनुभव असेल त्याने त्या प्रकारे अंदाज बांधावा.) प्राचीन काळी लोकं किंवा राजे पुत्रकामेष्टी किंवा अश्वमेध असे goal oriented यज्ञ करायचे. तसा लस-कामेष्टी यज्ञ त्यांनी त्याकाळी शोधून ठेवला असता (आणि वेदांमध्ये किंवा कुठेतरी लिहून ठेवले असते) तर बरं झालं असतं.
तरी नशीब लस असे सोपे सुटसुटीत नाव मराठी भाषेत रूढ आहे. त्याबद्दल जुने साथीचे आजार आणि त्यावेळचे पत्रकार यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणजे तेव्हा पण असे साथीचे आजार होते आणि त्यावर औषध निघाले होते म्हणून “लस” असा शब्द प्रचलित झाला. तो शब्द नसता तर आत्ता शोधावा लागला असता आणि मग लोकसत्ता सारख्या वृत्तपत्राने अजून छळ केला असता. म्हणजे “विषाणूनाशक कुपी” सारखा काहीतरी क्लिष्ट शब्द त्यांनी शोधला असता. कुपी हा शब्द पणगंमतशीर आहे. कुपी, काढा, गोळ्या हे आयुर्वेदात आहे. पण इंजेक्शन हा प्रकार नाही. त्यामुळे त्याला प्रतिशब्द नाही. “सुई” वगैरे आपण वाढवलेला शब्द झाला. पण आयुर्वेदात मुळात टोचणे हा प्रकार नसल्यामुळे इंजेक्शन ला शब्द नाही. असो. पण लोकसत्ताच्या हातून हे शब्द सुटले हे फार बरं झालं. नाही तर त्यांचा “सुलभ मराठीकरणाचा” अट्टाहास फार त्रासदायक असतो. उदाहरणार्थ demonetisation ला “निश्चलीकरण” किंवा mask ला “मुखपट्टी”. त्याहून कळस म्हणजे परवा “एका बहुराष्ट्रीय कचेरीतून विदा चोरीला गेली” अशी बातमी वाचली. बातमी वाचल्यावर थोडा फार संदर्भ लावून “विदा” म्हणजे “data” असा अर्थ लावला. एका multinational bank मधून data चोरी झाली, अशी सोपी आणि साधी बातमी होती. पण विदा? एक तर मला ते विष्ठा सारखे वाटले. ज्यांना “विष्ठा” पण माहिती नसेल त्यांनी थोडे कष्ट घेऊन त्याचा अर्थ शोधावा. पूर्वीच्या काळी एक प्रसिद्ध वगनाट्य होते “विच्छा माझी पुरी करा”. त्याचा आणि विष्ठा याचा काही संबंध नाही. उगाच त्या दोन्हीमध्ये घोळ घालू नये. थोडक्यात काय उगाच ओढून ताणून शब्द बनवण्याचा फार त्रास होतो. “data is new oil” असं सरळ मराठीकरण न करता लिहिणं कधीही चांगलं…उगाच “विदा हेच नवीन तेल” असा अट्टहास कशाला?
तर आपण परत “लस” कडे वळू. लस असा सोप्पा शब्द मराठीत रुळलेला आहे. हे फार चांगलं झालं. पण लस या प्रकाराबद्दल पण लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. म्हणजे लस घेतली की जणू काही माणूस सुपरमॅन होतो. निष्काळजीपणे वागायला लागतो. अगदी सा”लस” माणूसही लस घेतली की थोडा आगाऊ होतोच. परवा एका हॉस्पिटलमध्ये कोविड वॉर्ड मध्ये एक माणूस थेट पेशंटच्या जवळच जाऊन बसला. आणि त्याला हटकल्यावर “माझे लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत” असे उद्धट उत्तर दिले. जणू काही लस घेतली म्हणजे सुरक्षाकवच घातले.
मला खरं तर अजून लस घ्यायची इच्छा नव्हती. त्या दाढीवाल्या भोंदू विदूषकाचा फोटो लसीच्या सर्टिफिकेट वर येतो म्हणून. डोक्यात तिडीक जाते, त्याची दाढी (थोबाड दिसतच नाही आता) दिसली की. पण तरी नाही हो करता करता आज मी शेवटी पहिला डोस घेतला. बरेच दिवस अपॉइंटमेंट च मिळत नव्हती. शेवटी आज लसस्वी…म्हणजे यशस्वी झालो.
त्यामुळे आज लस घेतल्यावर एका मित्राने विचारले “लस कुठे घेतली?”
मी म्हणालो: “दंडावर!”
त्याला हे उत्तर का पटले नाही माहिती नाही. कदाचित त्याला काहीतरी वेगळे अपेक्षित असावे.
तो म्हणाला: “कुजकट पण जाण्यासाठी काही लस आहे का विचार डॉक्टरना”
मी म्हणालो: “विचारतो, पण असली तर तू घेणार आहेस का?”
गुंतवळ
परवा असेच गुंतवळ या विषयावर घरी विचारमंथन आणि बौद्धिक झाले.
म्हणजे पुन्हा कशी शब्दांची गंमत आहे बघा. केस गळून पडला की त्याचा गुंतवळ होतो. शेंबूड काय किंवा (कानातला) मळ काय, आत किंवा बाहेर कुठेही असले तरी त्यांचे नाव तेच राहते. पण केस मात्र गळून पडल्यावर गुंतवळ होतो.
बऱ्याच वर्षांपूर्वी मी काही दशके अरेंजड मॅरेज ह्या विरंगुळ्यात घालवली. तेव्हा मला कुणीतरी प्रश्न विचारला होता: “तुला केस (अर्थात भावी पत्नीचे) कसे आवडतील?”
मी म्हणालो: “भाजीत येणार असतील तर लांब सडक”(तुम्हाला मी कितपत रसिक आहे याचा साधारण अंदाज आलाच असेल)
विचारणारा बुचकळ्यात पडला हे मी ओळखलं. म्हणून मीच खुलासा केला. “केस लांब सडक असले तर मग बटाट्याच्या भाजीचं तोरण पटकन दिसतं. घास घ्यायच्या आधी. छोटे केस असतील तर तोंडात गेल्यावरच समजतं”
भावी जोडीदाराचे “लांबसडक केस” यावर इतके तटस्थ आणि स्थितप्रज्ञ विचार ऐकून त्या माणसाला गहिवरून आले!
पण गुंतवळ, शेंबूड, मळ यांचा जो तुलनात्मक सूक्ष्म अभ्यास मी वर मांडलाय तो ऐकून घरी “त्यात काय? इतकं खोलात जायची गरज नसते. गुंतवळ म्हणा किंवा केस म्हणा. अर्थ तोच” अशी प्रतिक्रिया आली.
मग मात्र मी चिडलो. असं कसं? काहीही म्हणा, अर्थ तोच कसा? असं नसतं. माणूस गेला की काही वेळानी लोकं “बॉडी” असं म्हणायला लागतात. पण त्याआधी कोणी असं म्हणतं का? कसं वाटेल? तसंच आहे.
केसांच्या ऐवजी गुंतवळ म्हटलं तर कसं वाटेल? “किती लांब सडक गुंतवळ आहेत ह्या मुलीचे”… कसं वाटेल असं ऐकायला?
“ही केस हाताबाहेर जात आहे…” असा विचार मनातल्या मनात करत घरच्यांनी तो विषय वाढवला नाही. असो.
लस काय किंवा केस काय. दिसेल तिथे थोडा विरंगुळा शोधायचा. व्हायरस असे पर्यंत जीवनात दुसरा रस नाही. (डोन्ट आस्क व्हाय!)
Leave a Reply