परवा मला एक जुनी ई-मेल सापडली. २००३ सालची. म्हणजे माझ्या तरुणपणीची…
माझा इंजिनीअरिंग चा मित्र पुढे माझ्याच कंपनीमध्ये (इन्फोसिस) आला. तेव्हा आम्ही २३ वर्षांचेअसत असू! लग्न वगैरे विचार खूप लांब होते. पण त्या मित्राच्या घरी “यंदा कर्तव्य आहे” चं प्रेशर चालू झालं होतं. त्यावरून मी त्या मित्राला चिडवायचो. त्याचे नाव तेजस. तो अहमदनगरचा होता. (हो, असं पण गाव आहे. पुणेकरांना फारशी माहिती नसते इतर गावांची)
निंदेच्या सोयीसाठी त्याचे आडनाव आपण कुलकर्णी ठेऊ. म्हणजे ते इतकं कॉमन आडनाव आहे की कोणाचं मन दुखावलं जायचा प्रश्न नाही.
मूळ ई-मेल रोमन स्क्रिप्ट मध्ये लिहिली होती. पण नुकताच माझा भाषेचा “जाज्वल्य” अभिमान जिवंत झाल्यामुळे (श्री श्री तेजस महाराज नगरकर यांची कृपा!)…ती ई-मेल मी देवनागरीत पुनर्मुद्रीत केली आहे (म्हणजे छापली आहे).
ती ई-मेल काय होती असा प्रश्न पडला असेलच…तर ती होती “यंदा कर्तव्य आहे” छाप लग्नाची जाहिरात. म्हणजे कुमार (आणि तेजस्वी?) तेजस यांचे आम्ही लिहिलेले लग्नाचे प्रोफाईल.
नव्या २०२१ च्या आवृत्तीमध्ये वय सोडले तर बाकी बदल करायची गरज नाही. (थोर लोकं ही काळाच्या पलीकडची असतात हेच ह्यावरून सिद्ध होतं!) कारण आमचे मित्रवर अजूनही अविवाहीत आहेत. आता तर त्यांनी अविवाहीत राहायचा निश्चय केला आहे आणि प्राणिमात्रांसाठी आपले आयुष्य व्यतीत करायचे ठरवले आहे. (त्या प्राणिमात्रांच्या यादीत आमच्या सारखे मर्त्य प्राणी येतात का हे मात्र त्याने स्पष्ट सांगितलेले नाही). त्यामुळे काहीही बदल न करता त्या वेळेस लिहिले तसेच इथे छापत आहे.
हे वाचल्यावर मलाच आनंद झाला की तरुणपणी माझी विनोद बुद्धी बऱ्यापैकी सुद्रुढ आणि तल्लख होती…अर्थात माझ्या मित्राला हे तेव्हाही मान्य नव्हते आणि आत्ताही मान्य नाही. तुम्हीच ठरवा काय ते.
——————————————
यंदा कर्तव्य आहे!
यंदा आमचे लांबचे (कारण ते औंधला राहतात आम्ही शनिवार पेठ मध्ये) आणि बऱ्यापैकी घट्ट मित्र चि. तेजस यांचा विवाह करण्याचे योजले आहे. त्यांची त्रोटक (आणि सुरस आणि चमत्कारिक) माहिती खालीलप्रमाणे:
नाव: तेजस कुलकर्णी उर्फ आप्पा
वय: २३ किंवा २४ (लाईट इअर्स??)
उंची: बेताची
बौद्धीक उंची: त्याहून बेताची
वजन: माहीती नाही, पण वाढतंय
रंग: ग्गोर्रा प्पान, म्हणजे नारळाच्या करवंटी सारखा
फोटो: डेव्हलप होऊ शकला नाही. पण साधारण बिनमिश्यांचा वीरप्पन असे म्हणता येईल.
राहणार: औंध (रात्रीच्या झोपेची जागा )
नोकरी: इन्फोसिस (दिवसाच्या झोपेची जागा )
मंगळ: आहे असे वाटते (किंवा तसा वागतो )
मासिक प्राप्ती: सांगत नाही, पण खोऱ्याने ओढतोय (रोज शिकरण खातोय!!!)
अपेक्षा: मुलगी २१-२३ लाईट इअर्स ची असावी…साक्षर, मितभाषी, ग्रुहकृत्यदक्ष, मनमेळाऊ, चतुर असावी. आधुनिक असावी (म्हणजे २ वेण्यांऐवजी १ वेणी चालेल), बांधा शेलाटा असावा (म्हणजे कसा ते नक्की माहिती नाही, पण असे लिहितात असे ऐकले आहे), चश्मा नको, नातलग जास्त नकोत…पगार भरपूर हवा
कुटुंबाच्या मागची बाजू (Family Background): आई, वडील, एक भाऊ, मुलावर कोणतीही जबाबदारी नाही…(किंवा तो घेत नाही…म्हणजे दारु नाही…जबाबदारी)
गरजूंनी (किंवा त्यांच्या मुलींनी) भेटा अगर लिहा…तेजस कुलकर्णी @ इन्फोसिस
Leave a Reply