आज “राष्ट्रीय शिक्षण दिन” आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस हा २००८ सालापासून असा साजरा केला जातो.

५ सप्टेंबर हा “शिक्षक दिन” कारण तो डॅा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. याशिवाय थोर भारतीय परंपरेप्रमाणे “गुरू पौर्णिमा” असतेच. हे सगळे थोडे म्हणून युनेस्कोने (तेच ते ज्यांनी आपलं राष्ट्रगीत सगळ्या जगात भारी आहे असं संघी भक्तांना सांगितलंय) २४ जानेवारी हा “International Day of Education” म्हणून जाहीर केला आहे.
थोडक्यात, साजरे करायचे दिवस खूप आणि प्रत्यक्ष शिकायचे दिवस कमी अशी अवस्था आहे.
आणि शिक्षण कोणासाठी? त्याचा सर्वसामान्य जीवनात फायदा किती हे पण कोडं आहे. उदाहरणार्थ, शाळेत शिकवली जाणारी मराठी भाषा (“चंद्रू तेथे चंद्रीका । शंभू तेथे अंबिका । शिव तेथे विवेका । असणे की जे॥” — संत ज्ञानेश्वर) आणि समाजात प्रचलित भाषा यांचा काहीच संबंध उरला नाहीये. पूर्वी दूरचित्रवाणीवर तरी शुद्ध बोलायचे. आता तिथे आणि सगळीकडेच “आनी…पानी…लोनी…” असतं. शिक्षकही तसंच बोलतात. “मी करेल…”, “६०% मार्क्स भेटले” वगैरे ऐकलं की अंगाची लाहीलाही होते!
शासकीय मराठी तर अजूनच दिव्य!
आजच दोन शब्द वाचले…ओढून ताणून English ला मराठी प्रतिशब्द जुळवायचा आटापिटा.
एक होताः सौम्य संपदा…म्हणजे म्हणे “Soft Power”.
आणि दुसरा होताः राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण. म्हणजे “National Achievement Survey (NAS)”?!
Achievement ला असा पादरा शब्द आहे हे नवीनच समजलं. बोलताना जीभ अडखळवणारे हे शब्द बोलीभाषेत कोण वापरेल आणि कसे रूळतील?
आणि स्वप्नं तर इतकी दिव्य की आम्ही सगळे अद्ययावत शिक्षण (Engineering, Medicine, Technology etc) मराठीमध्ये देणार!
आपली शिक्षण व्यवस्था दुरूस्त करायची गरज नाहीये तर मोडीत काढून नव्याने उभारण्याची गरज आहे. (माझा एक कोल्हापूरचा मित्र “मी बसस्टॅापवर उभारलो होतो” असं बोलतो 🤪 त्या अर्थाने नव्हे तर पुनर्बांधणी या अर्थाने). पण शिक्षण हे एक सरकारी खातं म्हणून जोपर्यंत राबवले जाईल तोपर्यंत ते शक्य नाही.
त्यामुळे सध्या “निशाणी डावा अंगठा” मध्ये दाखवलेल्याप्रमाणे जो शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे त्यातून आपापला मार्ग काढून पुढे जायचे…असो.
Leave a Reply