ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांचे काल निधन झाल्याची बातमी आज वाचली. मी TV वरील बातम्या बघत नसल्यामुळे काल मला समजले नव्हते. ट्विटरवर पण मला काही मेसेज दिसले नाहीत. त्यामुळे आजच वृत्तपत्रात वाचले.

अनिल अवचट यांना मी बऱ्यापैकी follow केलंय. मला त्यांचं लेखन आवडायचं. बरंचसं पाल्हाळ, गप्पा मारल्यासारखं असं लेखन होतं. इतरांपेक्षा एकदम वेगळं. नंतर अनेकदा त्यांच्या काही मुलाखती प्रत्यक्ष ऐकल्या. काही Youtube /TV वर पहिल्या. त्यांच्या बद्दलचे लेख आणि त्यांनी लिहिलेले वृत्तपत्र/ दिवाळी अंक यातील लेख वाचले.
सध्या ते आजारी होते याबद्दलची कल्पना नव्हती. पण परवाच मी एका मराठी पुस्तकांच्या दुकानात १-२ तास होतो…तेव्हा त्यांची आणि अच्युत गोडबोले यांची पुस्तके शेजारी ठेवलेली होती ती चाळत होतो. ह्या दोन्ही माणसांबद्दल माझी मते संमिश्र आहेत.
अच्युत गोडबोले हे मराठी भाषेतून अनेक नवीन विषयांवर लिहितात – जी आजची गरज आहे – हा त्यांचा चांगला भाग. पण त्यांचे व्यक्तिमत्व उथळ वाटते. एक प्रकारचा न्यूनगंड आणि त्यातून आलेला अहंकार (arrogance of inferiority) सतत जाणवतो. सारखे मी/माझा आणि स्वतःचे शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकिर्दीचे गोडवे गायचे. तसेच चकल्या किंवा बुंदी पाडाव्यात तसे ते पुस्तकं पाडत असतात. हल्ली सहलेखकाला घेऊन ते factory model पद्धतीने पुस्तकं लिहितात. परवाच पुस्तके चाळून आल्यावर मी मित्राला मेसेज केला” “गोडबोल्यांचा नव्या चकल्या आल्या आहेत बाजारात”. ह्या बघा नवीन चकल्या…




त्यांच्याकडे बघितल्यावर माहिती (Information), ज्ञान (Knowledge) आणि चातुर्य (Wisdom) यातला फरक स्पष्टपणे समजतो. गोडबोल्यांची बहुतेक पुस्तके माहितीनी ओतप्रोत भरलेली असतात. खरे तर ते एक उत्तम संकलक आहेत. इकडचे तिकडचे वाचून/ढापून मराठीत सोप्या भाषेत आणि जास्त खोलात ना जाता लिहायचे ही त्यांची पद्धत भलतीच लोकप्रिय झाली आहे. त्यांचा भाचा आणि लेखक अतुल कहाते हा हेच model अजून सवंग पद्धतीने राबवतो. पण गोडबोले यांना स्वतःला ते भयंकर ज्ञानी आहेत आणि आपल्या पुस्तकातून wisdom nuggets देतात असे वाटते किंवा तसे भासावयाचे असते.
हे सगळं असूनही गोडबोल्यांची उपयुक्तता (utility) आहे. ते मराठीतून लिहितात हे खूप मोठे काम आहे हे मान्य केलंच पाहिजे. फक्त त्यांचा अंगावर येणार मी-मी पणा खुपतो. असो. हे सगळं लिहायचा आत्ता काय प्रयोजन असे तुम्हाला वाटेल. तर त्याकडे मी येईनच. त्याआधी गोडबोले यांनी अवचट यांना श्रद्धांजलीपर लेख लिहिलंय (मला एका मित्राने पाठवला, कुठे प्रकाशित झालाय माहिती नाही) तो आधी वाचा…म्हणजे गोडबोले यांचा “मीपणा” म्हणजे काय ते समजेल.
———————————–
अच्युत गोडबोले!
अनिल गेला…
अनिल गेला ! तशी त्याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडतच चालली होती. आता तर हॉस्पिटलमधूनही त्याला घरी आणल्यापासून आंनंद नाडकर्णीकडून त्याच्या प्रकृतीविषयीची बातमीपत्रं रोज मिळत असत. पण आनंदनं परवाच एक काळीज कापत जाणारी कविता लिहिली. त्यात लिहिलं होतं –
‘डोळे मिटत जातात
त्यापेक्षाही कठीण ..
त्यांना कोरडे निर्विकार
होताना पहाणे
.
.
वाटते आपणच हळूवार
मिटून टाकावे त्यांना
आणि मोकळे करावं
त्यातल्या प्रकाशाला
अथांग यात्रेसाठी’
अनिल अर्धवट शुद्धीवर असताना त्याच्या शेजारी रात्रंदिवस बसून त्याची काळजी घेणाऱ्या आनंदनं या ओळी लिहिल्या होत्या. त्या वाचून मनात चर्र झालं. आता काय घडणार आहे याची चाहूल सगळ्यांना लागलीच होती. मी न राहून आनंदला फोन लावला. ‘अनिल क्वचित माणसं ओळखतोय, पण काहीच चेतना नाही; क्वचित तोंडानं अन्न घेतोय, एकदम काहीतरी बोलतोय, पण ऑक्सिजन लेव्हल खाली जातेय; तो फारसं रिस्पॉन्ड करत नाहीये ….’ आनंद बोलत होता आणि मी ऐकतच राहिलो. त्यावेळी आमच्या मैत्रीचा बोलपट माझ्या डोळ्यासमोर उलगडायला लागला.
१९७० च्या आसपासचं कुठलंतरी वर्ष असावं. त्यावेळी मी ‘मागोवा’ नावाच्या एका गटात सामील झालो होतो. एका बाजूला विवेकवाद, विज्ञानवाद आणि मानवतावाद याचबरोबर समाजवाद आणि मार्क्सवाद या सगळ्याच विचारांनी मी भारावून गेलो होतो. अनिल त्यावेळी ‘युक्रांद’ नावाच्या संस्थेत कार्यरत होता. कुमार सप्तर्षी आणि अनिल अवचट हे युक्रांदचे खंदे वीर होते. आनंद करंदीकर आणि इतरही आमचे लढवय्ये मित्र त्यात सामील झाले होते. आमच्यात वैचारिक मतभेद असूनही आमच्यामध्ये मैत्री मात्र होती. एकदा परळला कामगारवस्तीत मी अनिलचं भाषण ऐकायला गेलो होतो. त्यावेळी तो आवेषात बोलत होता हे चांगलंच आठवतंय. अगदी काल परवा घडल्यासारखं.
पण मग मध्ये बरीच वर्षं गेली. मी कॉम्प्युटरच्या जगात रमलो आणि सक्रीय चळवळीतून बाहेर पडलो. अनिलही कालांतरानं सक्रीय चळवळीतून बाहेर पडला होता. आनंदकडून अनिलविषयी बातम्या कळत होत्या. १५-१६ वर्षांपासून पुन्हा आमचं येणं जाणं वाढलं. त्यानं अनेक पुस्तकं लिहिली होती आणि मीही लिखाणात रमायला लागलो होतो.
अनिलनं आनंदबरोबर ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्तीकेंद्र चालू केलं होतं. त्याचं बांधकाम चालू असताना मला एकदा तो तिथे घेऊन गेला होता. पु. लं.ना स्कूटरवर मागे बसवून त्यानं त्यांना ते कसं दाखवलं होतं, पु.लं.नी मग त्याला मदत कशी केली होती याविषयी तो मला सांगायचा.
मुक्तांगणमुळे अनिलनं आणि आनंदनं शेकडो घरांना आधार मिळवून दिला होता. एक उत्कृष्ट लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याचं नाव गाजत होतं.
एकदा आमची मैत्रीण अभिनेत्री रीमानं अनिलकडे घेऊन जाण्याबद्दल माझ्याकडे आग्रह धरला. मी तिला अनिलकडे घेऊन गेलो होतो. मग बऱ्याच गप्पा झाल्या.
मला आठवतंय एकदा ईटीव्हीवर आनंद अवधानीनं अनिल अवचट, मी आणि इतरही काही लोकांच्या मुलाखती ठेवल्या होत्या. त्यावेळी आम्ही एकत्रच गप्पा मारत परतलो होतो. एकदा त्याला मौजेच्या श्री. पु. भागवतांना भेटायचं होतं. श्री. पु. हे माझे मामेसासरे. मग मौजेचा आणि श्री. पुंचा विषय निघाला आणि बऱ्याच गप्पा झाल्या.
यानंतर गेल्या दहा वर्षांत आमच्या वारंवार गाठीभेटी होत राहिल्या. दर काही महिन्यांनी माझी पत्रकार नगरात चक्कर व्हायचीच. तिथे दुसऱ्या मजल्यावर तो अत्यंत साधेपणानं राही. त्यावेळी त्याची आई त्याच्याबरोबर रहायची. ‘माझ्या आईला तुझी पुस्तकं आणि लेख आवडतात आणि ती तुझ्या टीव्हीवरच्या मुलाखती ऐकते’ असं तो सांगायचा. काही वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हा मात्र अनिल एकाकी पडला होता. पण मी त्याच्याकडे गेलो की गप्पांचा फड रंगायचा.
गंमत म्हणजे अनिलचे हात कागदांच्या वस्तू बनवण्यात सतत गुंग असायचे. त्याला ओरेगॅमीचं एव्हढं वेड होतं, की कुठल्याही कार्यक्रमात स्टेजवर असतानाही तो काहीतरी पक्षी, प्राणी, बोटी, घरं करतच बसायचा. तो ज्या खोलीत बसे, तिथे मागे बरीच पुस्तकं आणि पुढे त्यानंच तयार केलेली शिल्पं, लाकडावर केलेली कार्विन्ग्ज, चित्रं, बासऱ्या असं सगळं पडलेलं असायचं. मग मधूनच तो बासरी काढायचा आणि काहीसं वाजवायचा. मग कित्येकदा वेगवेगळ्या रागातल्या बंदिशी गायचा. मग मीही माझा गळा साफ करायचो. तो मलाही गायचा आग्रह करायचा. एखादी बंदिश आठवली नाही की तो माझ्या सुलभाताईला फोन करायचा. मग ताई फोनवरच त्याला कित्येक बंदिशी गाऊन दाखवत असे. सोलापूरला गेल्यावर तो नेहमी सुलभाताईला भेटायचा आणि काही वेळा तिथे उतरायचाही.
गंमत ही की तांत्रिकदृष्ट्या संगीत न शिकलेला हा माणूस बेसूर मात्र कधीच होत नसे. त्याची सुरांची जाण खूपच चांगली होती आणि माझ्याप्रमाणेच संगीतातल्या व्याकरणापेक्षा त्याच्या भावविश्वावरच प्रेम करणं हे त्याला खूप महत्त्वाचं वाटायचं. त्यालाही गाण्यातलं उच्च-नीच मान्य नव्हतं. कित्येकदा तो गुलाम अलींच्या गझलाही ऐकत आणि गुणगुणत असे.
पण गाणं हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग असला तरी तो एकच भाग होता. एका माणसाच्या अंगात किती कला असाव्यात ! चित्रकला, शिल्पकला, फोटोग्राफी, ओरेगॅमी, कविता, लिखाण हे सगळं एकच माणूस तितक्याच लीलया आणि उत्कृष्टपणे कसं करू शकतो हे मला न उलगडणारं कोडंच होतं.
मला त्याचं लिखाण खूप आवडायचं. आमच्या लिखाणाची स्टाईल आणि विषय वेगळे असायचे. माझे जास्त ज्ञानशाखांविषयी आणि तात्विक होते. मग त्यात अर्थशास्त्र, मानसशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, गणित असे अनेक विषय होते; आणि त्याचं लिखाण मात्र माणुसकीनं आणि विवेकवादानं बहरलेलं होतं. त्याचं ‘माणसं’, ‘प्रश्न आणि प्रश्न’ आणि इतर काही पुस्तकं वाचली आणि मी आतून बाहेरून हादरून गेलो. हमाल, वेश्या, सफाईकामगार, मच्छीमार यांच्यापासून तळागाळातल्या अनेक थरातल्या अनेकांना भेटून त्यांची आयुष्यं बघून ती चितारण्याची एक विलक्षण कसब त्याच्याकडे होती. एका अर्थानं रिपोर्टाजमधलं त्यानं एक वेगळाच मापदंड निर्माण केला होता. एव्हढं रसरशीत पण तरीही त्यांच्याविषयी आत्मीयतेनं असलेलं, समानतेचा आग्रह धरणारं, अन्यायविरुद्ध आणि अंधश्रद्धेविरुद्ध, अविवेक वादाविरुद्ध शांतपणे आरडाओरड करणारं लिखाण मी तरी अजून वाचलेलं नाहीये.
यात कुठेही कटुता नव्हती; कुठेही आग पाखडणं नव्हतं आणि तो स्वत: जात, धर्म यांच्या कुठलीच बंधनं न पाळणारा असला तरी त्याचे सगळ्या जातीत, धर्मात मित्र होते. याचं कारणच मुळी त्याचं लिखाण हे सर्वसमावेशक, समतोल राखणारं तरीही ठाम असणारं होतं.
त्याला माझं आत्मचरित्र ‘मुसाफिर’ खूपच आवडलं होतं. त्यानं त्या पुस्तकासाठी लिहिलेला ब्लर्बही लोकांना खूप आवडला होता. आमच्या ‘कॅनव्हास’ पुस्तकासाठीही त्यानं झकास ब्लर्ब दिला होता; आणि ‘झपूर्झा’चं पुस्तक प्रकाशन त्याच्याच हस्ते झालं होतं.
अनिलच्या डोक्यात सुंदर जगाचं एक स्वप्न होतं. या जगात स्पर्धेपेक्षा सहकार्य होतं; जात, धर्म, रंग, लिंग असे कुठलेच उच्चनीच भेदाभेद त्याच्या जगात नव्हते. सगळे एकमेकांशी प्रेमानं वागताहेत; एकमेकांना मदत करताहेत, या जगात द्वेष नाहीये, युद्धं नाहीयेत; मारामाऱ्या आणि गुन्हेगारी नाहीये असं जग त्याच्या स्वप्नात असावं. त्याच्या भाषणातून मला नेहमी हेच जाणवे. या क्रूर, युद्धखोर, असमान जगानं त्याचं स्वप्न केव्हाच पायदळी तुडवलं असलं, तरी तो स्वप्न बघतच राहिला असावा असं मला नेहमी वाटे. आता त्याच्याबरोबर ते स्वप्नही विरून गेलंय !
आज तो प्रेमाचा, वात्सल्याचा, आपुलकीचा, माणुसकीचा, विवेकवादाचा आणि विज्ञानवादाचा झरा कायमचा आटलाय. मला शब्दच सुचत नाहीयेत. श्रद्धांजली इतकंच !
अच्युत गोडबोले!
———————————–
आता अवचटांवरच्या लेखात गोडबोले-पुराण लिहायचे कारण म्हणजे, माझ्या मते अवचट हे काही प्रमाणात गोडबोले यांच्यासारखेच, परंतु विरुद्ध टोक होते. म्हणजे गोडबोले यांच्या अंगावर येणाऱ्या मीपणाच्या एकदम विरुद्ध टोक – प्रचंड विनयशील आणि साधे, सात्विक, भोळसट आणि थोडेसे चक्रम (eccentric), आत्ममग्न असल्यासारखे भासवायचे ही त्यांची तऱ्हा. एकदम बालिश/लाडीक/कृत्रिम बोलण्याची पद्धत. काही प्रमाणात ते तसेच होते असे मान्य केले तरी काही प्रमाणात ते मुद्दाम तसे करायचे, तो एक मुखवटा होता असेही मला जाणवले. विशेषतः जेव्हा प्रत्यक्ष पाहण्याचा/ऐकण्याचा योग्य आला तेव्हा. पुस्तकं वाचून ते खरंच एकदम निर्मल, सरळ विचारांचे (श्यामची आई किंवा तत्सम प्रकारचे लेखन) वाटतात. पुस्तकांना देहबोली नसते. पण तरीही पुस्तकातून जाणवणारे व्यक्तिमत्व प्रत्यक्ष तसे असेल असं आपण मानतो. बऱ्याच अंशी ते खरं असतं. साने गुरुजी हे श्यामच्या आई मधल्या लेखनासारखेच सात्विक आणि सच्चे होते. पण असं नेहेमीच असेल असं नाही. नवीन समाजमाध्यमाची मला एक आवडणारी गोष्ट म्हणजे दृक्श्राव्य माध्यमामुळे आपल्याला व्यक्तींचे जास्त अंतरंग समजू शकतात.
अनिल अवचटांचा भाऊ आणि ज्येष्ठ/थोर चित्रकार सुभाष अवचट यांचे लिखाण एकदम वेगळ्या पद्धतीचे. त्यांचे स्टुडिओ हे पुस्तक माझ्यासाठी अजून काही कारणांमुळे अविस्मरणीय आहे. मागच्या वर्षी त्यांनी लोकसत्ता मध्ये एक सदर वर्षभर लिहिले (रफ स्केचेस) ते हि खूप छान होते. त्या दोन्हीची तुलना करता असे म्हणता येते कि अनिल अवचट हे खरेच त्यांच्या लेखनाप्रमाणे साधे, सरळ, एकदम मनापासून बोलणारे, लिहिणारे, जगणारे होते. पण काही बाबतीत ते त्यांच्याच image मध्ये अडकले होते असे कधी कधी वाटले.
त्यांनी मुक्तांगण, पुलं यांच्याबरोबर केलेले समाजकार्य किंवा इतर उपक्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत. तसेच त्यांचे साधना किंवा इतर सामाजिक संस्था यांच्याशी निगडित काम असेल.
मला त्यांच्या एका मुलाखतीतील एक किस्सा अगदी आवर्जून आठवतो. ते आणि पत्नी सुविद्य होते – दोघेही डॉक्टर होते. साधन नसले तरी उच्च मध्यमवर्गीय म्हणता येतील असेल. दोघेही ठराविक मूल्य,विचार यांच्याशी बांधील होते. ते सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हणून नोकरी करायचे. तर त्यांनी एका मुलाखतीत (मला वाटते ५-६ वर्षे झाली असतील) सांगितले की त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना त्यांनी हट्टाने मराठी माध्यमाच्या आणि तेही महानगरपालिकेच्या शाळेत घातले. का तर त्यांनी पण सर्वसामान्य गरीब मुलांप्रमाणे वाढावे आणि त्यांना आजूबाजूच्या समाजाबद्दल माहिती व्हावी आणि संवेदनशील बनावे. त्यांच्या दोन्ही मुली पुढे उच्च्शिक्षित झाल्या. पण अवचट त्या मुलाखतीत बोलताना म्हणाले की कधीकधी मागे वळून बघताना असे वाटते कि त्यांनी मुलींवर अन्याय तर केला नाही ना. म्हणजेसमजा त्या मुली वाईट संगतीला लागल्या असत्या किंवा त्यांचे शिक्षण/जडणघडण चांगली झाली नसती आणि समजा त्या मुलींनी आपल्या पालकांना दोष दिला असता की “आमच्या आयुष्याशी असं खेळायचा तुम्हाला काय अधिकार होता. आपली आर्थिक स्थिती बऱ्यापैकी असूनही तुम्ही आम्हाला अशा शाळेत, अशा वातावरणात का वाढवले. तुमच्या मूल्यांसाठी आमच्यावर प्रयोग का?” तर त्यावर माझ्याकडे काही उत्तर नव्हते. काही प्रमाणात तो बालिशपणाच होता. असे अवचट यांनी निर्मळपणे सांगितले. ह्या भावनेमुळेच बहुतेक पालक हे स्पर्धेला, इतर पालकांच्या चढाओढीला बळी पडतात. Regret Aversion हा त्यातला कळीचा मुद्दा असतो.
पण त्याच कार्यक्रमात – त्यांचं बोलून झाल्यावर इतर १-२ मान्यवर बोलायला उभे असताना अवचट त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून काहीतरी ओरिगामी च्या कलाकृती करत बसले. एका वक्त्यानी त्यांचा उल्लेख करून काही तरी बोलल्यावर ते जागे झाले…काही तरी विनोदी प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या खेळात मग्न झाले. हा मला न आवडणारा भाग. ते तसेच होते का तशी प्रतिमा बनवण्याचा हा अट्टाहास होता हे सांगणं अवघड आहे. काही प्रमाणात दोन्ही असेल. पण मला स्वतःला अश्या व्यक्ती आवडत नाहीत. आत्मकेंद्री असण्यात काही गैर नाही. पण मग तुम्ही अशा कार्यक्रमांना हजरच राहू नये. सत्कार करून घ्यायचा, भाषण द्यायचं आणि स्वतःचं झालं की आपण तिथे हजरच नाही अशा निर्विकार पद्धतीने इतर मान्यवरांसकट सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचे हे वाईट.
पण मला वाटतंय ते गोडबोल्यांसारखे मुद्दाम तसे वागायचे असे नाही. तर ते तसेच होते. आणि त्यांच्या इतर चांगल्या गोष्टींच्या मानानी ही खूपच किरकोळ बाब होती.
अवचट यांच्यासारखी माणसे गेल्यावर मला मुख्य खंत ही वाटते कि दर्जेदार मराठी लिहिणारे/बोलणारे अजून एक नाव कमी झाले. हल्लीच्या वृत्तपत्र आणि TV किंवा सिनेमातली भाषा पाहिली की माझ्या अंगाची लाही लाही होते. बहुजनांची भाषा आणि ब्राह्मणी मराठी म्हणजेच प्रमाणभाषा नाही वगैरे रडून आता अक्षरशः काहीही, म्हणजे व्याकरणदृष्ट्या चुकीचे, सुमार आणि अर्थहीन मराठी सोसायला लागते. त्यामुळेच अवचट काय किंवा गोडबोले काय – त्यांच्यासारखे चांगले आणि शुद्ध मराठी लिहिणारे लोक जे प्रयत्न करतात ते महत्वाचे आहेत….मग एक व्यक्ती म्हणून तुम्हाला ते पटो किंवा ना पटो.
Leave a Reply