लता मंगेशकर, पुलं आणि खोगीरभरती

आज सकाळी लोकसत्ता मध्ये नुकत्याच निधन झालेल्या अनिल अवचट यांच्यावरील दोन सुंदर लेख आहेत – एक त्यांचे लहान भाऊ आणि चित्रकार सुभाष अवचट यांचा तर दुसरा डॅा. आनंद नाडकर्णी यांचा. ते वाचून होत असतानाच गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. तशा त्या गेल्या १ महिन्यापासून आजारी होत्या, वयही ९२ वर्षे होते. काल वसंतपंचमीला त्यांची स्थिती गंभीर असल्याची बातमी आली. वसंतपंचमी हा सरस्वतीपूजनाचा दिवस. देवी सरस्वतीचा जन्मदिवस. आणि सरस्वती ही संगीताची देवी मानली जाते. लता मंगेशकरांना अनेक गायक सरस्वतीचे रूपच समजायचे. त्या सरस्वतीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सकाळी त्यांचे निधन झाले.

माणूस मरतो म्हणजे रूढ अर्थानी शरीर संपते, जीवन संपते. पण कर्तृत्व, कारकीर्द किंवा योगदान या दृष्टीने ते बऱ्याचदा आधीच संपलेले असते. पण तरी व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा गहिवरून येतंच. घरच्या माणसांना आपले माणूस कायम हवेहवेसे असते. पण इतर लोकांना देखील दुःख होतेच…ते का हे सांगता येणं खूप अवघड आहे. म्हणजे लता मंगेशकर यांची गायिका म्हणून कारकीर्द जवळपास ३० वर्षांपूर्वीच संपली. त्यानंतर २००६ पर्यंत म्हणे १५-१६ वर्षांपूर्वीपर्यंत अगदी तुरळक गाणी त्या गायल्या…म्हणजे जवळचे नातेवाईक सोडले तर बाकीच्या लोकांना, चाहत्यांना देण्यासारखं काही नव्हतं…अगदी आठवणी, मुलाखती म्हटल्या तरी नवीन सागण्यासारखं फारसं काही उरलं नव्हतं इतक्या त्या लोकप्रिय होत्या. तरी त्यांचं नुसतं अस्तित्व, आपल्यात असणं ही भावनाच खूप वेगळी असते. आता तेही नाही. ही भावना त्रासदायक असते.

असं म्हणतात की दिवंगत चित्रकारांच्या चित्राला जास्त मागक्णी असते. एखाद्या थोर चित्रकाराच्या चित्राचा लिलाव त्याच्या हयातीत जेवढा होत नाही तेवढा त्याच्या मृत्यूनंतर होतो. त्याचं कारण की तो असेपर्यंत अजून चित्रे, कलाकृती निर्माण करू शकतो (अर्थात शरीर साथ देत असेल तर). पण मृत्यूनंतर supply एकदम fix होतो. त्यामुळे आहे त्या कलाकृतींची मागणी वाढते. एखादे नवीन, अप्रकाशित चित्र समोर आलं तर त्याच्यावर उड्या पडतात.

पण गायकांचं, अभिनेत्यांच, लेखकांचं तसं नसतं. त्यांची कलात्मक कारकीर्द खूप आधीच संपते. मागच्या वर्षी दिलीपकुमार यांचं ९८-९९ व्या वर्षी निधन झालं. ते अभिनेता म्हणून ४०-५० वर्षांपूर्वीच अस्तंगत झाले होते. तसेच किंवा अलिकडे अनेकदा मृत्यूच्या दारातून परतले होते. पुलंच्या भाषेत सांगायचे तर त्यांचे निधन अकाली नव्हते. तरी ते गेल्यावर अनेकांना दुःख झालेच. एखाद्याची कला किती टिकून आहे, किती relevant/कालसुसंगत आहे याचं उदाहरण म्हणजे त्या व्यक्तीच्या निधनानंतर सर्वसाधारण प्रतिक्रीया काय, किंवा त्यांच्या कोणत्या कलाकृती कशा आणि किती काळ स्मरणात राहतात हे आहे. त्याचबरोबर आपला समाज कुठे चालला आहे याचेही ते मानद असते.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे पु लं देशपांडे. ते २००० साली गेले त्याच्या ८-१० वर्ष आधीच त्यांचं लिखाण थांबलेलं होतं. दिवाळी अंकांमधले लेख आणि जुन्या, अप्रकाशित लेखांना एकत्रित केलेली काही पुस्तके सोडली तर नवीन लेखन नव्हतेच. शेवटी शेवटी त्यांची तब्येतही खूप केविलवाणी झाली होती. आयुष्यभर त्यांना ज्या टवटवीत आणि खळखळत्या रूपात लोकांनी पाहिले होते त्या मानाने त्यांचे शेवटी होणारे हाल हे क्लेशदायक होते. पण तरीही ते गेले तेव्हा सर्वांना प्रचंड दुःख झाले. कारण त्यांचे नुसते असणेच खूप आनंददायी, प्रेरणादायक होते.

पण त्यानंतरच्या २०-२२ वर्षांतली परिस्थिती बघता अजून एक गोष्ट ठळकपणे जाणवली. एखाद्या व्यक्तीचे कार्य कालसुसंगत (relevant) राहण्यात २ घटक आहेत. ज्यातला एक आपल्याला समजतो. तो म्हणजे त्या व्यक्तीचं कार्य किती दर्जेदार आहे, कालातीत आहे हा. पण दुसरा घटक आपण लक्षात घेत नाही, तो म्हणजे ज्या context मध्ये त्यांचे कार्य थोर असते ते अजून तसेच आहेत का?

आज बऱ्याच लोकांना पुलंची तितकीशी आोळख आहे असे मला वाटत नाही. माझा मित्र एकदा मला म्हणाला होता की पुलंचा विनोद समजायला आणि आवडायला एका दर्जाचे आकलन आणि सुसंकृतपणा असावा लागतो. तोच आता लोप पावला आहे का काय असं वाटतं. चला हवा येऊ द्या छाप उथळ आणि सवंग विनोदात धन्यता मानणाऱ्यांना पुलंची थोरवी कशी कळणार? म्हणजे जर आता पुलंचे लेखन कमी लोकप्रिय झाले असेल (जे झाले आहे असे माझे मत आहे) तर त्याचे कारण आपल्या सामाजिक स्तराचा ऱ्हास हे आहे, त्यांच्या लेखनाचा कमीपणा म्हणून नाही.

तसाच काहीसा प्रकार लता मंगेशकर यांच्या बाबतीत अजून ४०-५० वर्षांनी घडू शकतो. जे आत्ता १५-२० वर्षांचे किंवा त्याहून मोठे असतील त्या सर्वांना लता मंगेशकर यांचे महत्व समजेल. पण त्यानंतरच्या पिढीला त्या कशा प्रकारे समजतात ह्यावर त्यांची लोकप्रियता ठरेल. नुसते त्यांच्या नावाचे स्मारक किंवा एखादा पुरस्कार किंवा संगीत समारोह ठेऊन ते होणार नाही. (सवाई गंधर्व महोत्सवामुळे किती लोकांना प्रत्यक्ष सवाई गंधर्व यांची गायकी माहिती आहे?).

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे अभंग आजही प्रचलित आहेत त्याचं कारण त्यांच्या नावानी दिंडी, पालखी ३००-४०० वर्ष चालू आहे हे नाही, तर त्यांचे अभंग, विचार त्याप्रकारे रूजले आहेत.

त्याचप्रकारे लता मंगेशकर यांची गाणी अजून काही दशके स्मरणात राहतील कारण त्यांची कारकीर्दच इतकी मोठी होती. लहानपणी (म्हणजे १९८५-९० काळात) मला पुरूष गायक वेगवेगळे ओळखू यायचे. पण गायिका एकच असते असे वाटायचे – ती म्हणजे लता मंगेशकर. पुढे अजून एक (आशा भोसले) गायिका असते असे समजले…आणि मग इतर गायिकांची ओळख झाली.

पण आज सकाळपासून TV वरच्या प्रतिक्रीया, हुंदके पाहून पुलंची आणि त्यांच्या “खोगीरभरती” या पुस्तकातल्या “आठवणीः साहित्यिक आणि प्रामाणिक” या लेखाची आठवण झाली. त्यात सखारामसुनू नावाच्या खडूय माणसाच्या निधनानंतर इतर लोकांच्या चांगल्या (साहित्यिक) आणि काही खऱ्या (प्रामाणिक) आठवणी अशा स्वरूपाचा हा अफलातून लेख आहे. कोणत्याही मान्यवराच्या निधनानंतर मला आवर्जून त्याची आठवण होते, आणि आज तर फारच.

स्वतः पुलं हेच यावर एकदा बोलताना म्हणाले होते की पूर्वी कोणी गेलं की लोकं उत्तरक्रियेच्या मागे लागायचे, आता प्रतिक्रिया द्यायच्या मागे लागतात.

अनेक तथाकथित थोर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की त्यांची कीव करावीशी वाटते. तसेच अशा आचरट प्रतिक्रिया मागणाऱ्या माध्यमांचीही.

प्रत्येकजण श्रद्धांजली वाहताना त्या व्यक्तीबद्दल कमी आणि स्वतःबद्दल जास्त बोलतात. म्हणजे माझा आणि त्यांचा जिव्हळ्याचा संबंध होता, माझे त्यांनी असे कोतुक केले, आमचे नाते वेगळे होते…इत्यादी इत्यादी. सुधीर गाडगीळ, शिरीश कणेकर पासून मंत्री, पुढारी सगळ्यांचा तुच्छपणा ठळकपणे जाणवतो. काय वाट्टेल ती बडबड न्यूज चॅनेलवर चालू असतो. उबग येतो ह्या असंवेदनशील coverage चा. अजून काही दिवस हा तमाशा चालू राहील. पण त्यात काही निवडक आणि दर्जेदार प्रतिक्रिया वाचता येतील अशी आशा आहे. विशेषतः गुलजार वगैरे यांच्या.

मीपणाचे अजून एक उदाहरण बघायचे असेल तर पंतप्रधानचा ट्वीट बघावा (राहुल गांधीच्या ट्वीटसहीत). फक्त I, My केलंय…

लता मंगेशकर गायिका म्हणून कितीही थोर असल्या तरी असल्या अडाणी माणसाचं, त्या संघटनेचं त्या समर्थन करायच्या यातून त्यांची इतर बाबतीतली समज दिसून येते. तो माझ्या लेखी अक्ष्यम्य गुन्हा आहे. असो.

शेवटी त्यांची २ अलिकडची आणि आशयघन गाणी (विशेषतः आयुष्याच्या शेवटाबद्दल असलेली) इथे post करतो आणि थांबतो.

आता विसाव्याचे क्षणः

संधीप्रकाशात अजून जो सोनेः

ही दोन्ही गाणी/कविता कवी बा.भ. बोरकर याची आहेत आणि संगीत सलील कुलकर्णी यांचे आहे. संधीप्रकाशात हे मुळचे सलील कुलकर्णी यांनी गायलेले आहे. पण त्यांना लता मंगेशकर यांच्या आवाजात ते हवे होते. त्यामुळे ही दोन्ही गाणी गेल्या काही वर्षांत लता मंगेशकर ह्या खूप म्हाताऱ्या झाल्यावर ध्वनीमुद्रीत केली होती. त्यांचा आवाज जरी त्यांच्या तरूणपणीच्या दर्जाचा नसला तरी गाणांचा आशय/विषय विचारात घेता ही गाणी मला खूप आवडली.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: