मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने…

आज मराठीतील नामवंत साहित्यिक वि. वा शिरवाडकर (उर्फ कवी कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस. हा दिवस राज्य सरकारतर्फे मराठी भषा गौरव दिन अशा नावाने देखील साजरा केला जातो.

दरवर्षी या दिवशी त्याच त्या ३-४ मुद्यांचा चावून चोथा केला जातो.

पहिलाः मराठी भाषेला अजून अभिजात भाषेची दर्जा का मिळाला नाही, किंवा कधी मिळणार?

अभिजात भाषेचा दर्जा (Classical Language) हा पाचकळपणा आहे. एक तर आपलेच सरकार ते देणार. त्याचे निकष तेच ठरवणार आणि त्या निकषांची समजा मराठी पूर्तता करत नसेल तर त्यावरून राजकारण होणार. अभिजात भाषेसाठी २००० वर्षांचा इतिहास असला पाहिजे असा एक निकष आहे म्हणे. मराठीमधला पहिला शिलालेख सुमारे १०००-१२०० वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे २००० पेक्षा खूपच कमी. तरीही आटापिटा करून अजून काही पुरावे गोळा करायचा अट्टहास. हा वाद इतकी वर्ष चालला आहे की असेच चालू राहिले तर एक दिवस २००० वर्ष पूर्ण होतीलच! खरा मुद्दा हा आहे की ह्या दर्जाला काही अर्थ नाहीये. पण कायम इतिहासात रमणाऱ्या, प्रचंड न्यूनगंडातून येणारा उद्दामपणा असणाऱ्या (arrogance of inferiority) आणि अस्मितेच्या नावाखाली सतत बरोबरी आणि स्पर्धा करणाऱ्या लोकांकडून यापेक्षा काय वेगळी अपेक्षा करणार?

आत्तापर्यंत तमिक्ळ, संस्कृत, मल्याळी, कानडी, तेलगू आणि ओरिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ओरिया भाषेचे नाव वाचून जरा आश्चर्यच वाटले.

अजून एक कारण सांगितले जाते ते म्हणजे जर का काही नियम बदलून मराठीला तो दर्जा दिला तर गुजराती भाषेसाठी पण अशी मागणी येऊ शकते. आणि गुजराती तर निकषांत अजिबात बसत नाही. म्हणजे परत त्यावरून राजकारण. गुजरात मध्ये या वर्षाअखेर निवडणूका आहेत. त्यामुळे तीही अडचण आहेच.

दुसरा मुद्दाः मराठी भाषेला भविष्य आहे का? किंवा मराठी भाषेचे महत्व कमी होत आहे का?

इतिहासाचार्य राजवाडे यांनी १९२५ मध्ये “मराठी भाषा मुमूर्षू आहे का?” असा प्रश्न विचारला होता. तेव्हापासून हा वाद चालू आहे. त्या प्रश्नातला मुमूर्षू शब्द बऱ्याच वाचकांना समजला नसेल. पण इतर शब्द समजले असतील. यातच त्या प्रश्नाचे उत्तर आहे. मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे का असा तो प्रश्न होता. त्याचे उत्तर सोपे आहे. १९२५ ची किंवा १७ व्या शतकातील (संत तुकाराम, संत रामदास यांचा काळ) किंवा १३ व्या शतकातील मराठी (संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचा काळ) आणि आजची प्रचलित मराठी यांचा फारच कमी संबंध आहे. पण ते इंग्रजीबद्दल देखील खरे आहे. शेक्सपिअर सारखी इंग्रजी आता कोणी बोलत नाही. भाषा ही प्रवाही असते आणि असली पाहिजे.

तिसरा मुद्दाः मराठी भाषेची अवहेलना होत आहे. आपल्याच राज्यात मराठीचा मान राखला जात नाही.

हा मुद्दाच आचरट आहे. अशी तक्रार करणारे लोक न्यूनगंडाने पछाडलेले असतात. त्यांचे खरे दुःख वेगळे असते. त्याचा संबंध भाषेशी नसतो तर मराठी लोकांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थान खालावले आहे हा असतो. ते मान्य करून त्यावर तोडगा शोधायचे सोडून मराठी पाट्या, अमराठी लोकांना मराठी बोलायला लावायची सक्ती एवढच करायचं. मग मात्रृभाषेतूनच शिक्षण घ्या आणि मराठी उद्योगांना प्राधान्य द्या असला बिनडोकपणा सुरू होतो.

चौथा मुद्दाः मराठी मधील अंतर्गत आणि जातीय किंवा क्षेत्रिय कलह

मराठी प्रमाणभाषा म्हणजे नक्की कोणती? पुण्या-मुंबईतील मराठीचा दुःश्वास. मराठी भाषिकांना इतर भाषेबद्दल जी असूया वाटते तशीच महाराष्ट्राच्या इतर भागातील लोकांना पुणे-मुंबईच्या मराठीबद्दल वाटते. असूया आणि न्यूनगंड दोन्ही. एक तर पुणे आणि मुंबईच्या मराठीची तुलना करणे हात मूर्खपणा आहे. मुंबईतली मराठी ही pure राहीलीच नाहीये. खूप पूर्वीच मुंबईत मराठी माक्णूस आणि मराठी भाषा यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. असो. प्रांताबद्दल हे जसे खरे आहे तसे ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर लोकांच्या भाषेबद्दल देखील. ब्राम्हणेतर लोक ब्राम्हण लोकांच्या मराठीचा दुःश्वास करतात. सध्याची वृत्तपत्रे किंवा टीव्ही यांवरची मराठी वाचली/ऐकली की अंगाची लाही लाही होते. कालच सैराट चा दिग्दर्शक नागराज मंजुळे याच मुद्यावरून रडत होता. त्याच्या ग्रामीण मराठीला पुण्यात हसायचे इ. त्यात तथ्य असेलही. पण ती गोष्ट ब्राम्हण लोकांच्या भाषेबद्दलही घडते.

ह्या सगळ्या निरूपयोगी मुद्यांच्या गदारोळात खऱ्या महत्वाच्या मुद्याचा कोणीच विचार करत नाही. कारण ती बहुतांश लोकांची कुवतच नसते. तो मुद्दा म्हणजे मराठी भाषेत काळानुरूप काय बदल करायला हवेत, तंत्रज्ञानाचा जास्त वापर कसा केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मराठीत दर्जेदार साहित्य कसे निर्माण होईल हे बघणे.

भानू काळे यांनी काल त्यांच्या एका लेखात लिहीले की त्यांनी अंतर्नाद मासिकात २००५ मध्ये २०० वर्षातील सर्वोत्तम मराठी साहित्याचा आढावा घेतला (तेव्हा पहिले मराठी पुस्तक मुद्रित झाल्याला २०० वर्षे झाली म्हणे). त्या मधे सध्या (२००५ मध्ये) हयात असलेले फक्त ६-७ लोकंच होते, आणि सर्वच्या सर्व ६०-६५ वर्षे च्या पुढचे. तरूण कोणी नाही.

पण काल सकाळ मधील अक लेख वाचून मला आनंद झाला. काळानुरूप काय बदल झाले पाहिजेत किंवा झाले आहेत याचा मागोवा घेणारा हा लेख तुम्ही इथे वाचू शकता.

पण अशा चर्चेला, विचारांना जास्त market नाही. त्यामुळे आपली “अस्मिता” ह्या अशा 👇 संदेशापूरतेच मर्यादित राहणार…

शेवटी पुलंची मराठी भाषेबद्दल मार्मिक टिप्पणी…☺️

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: