पुलं, संघ आणि “समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर…?”

मागच्या रविवारी लोकसत्तात रवींद्र पंढरीनाथ यांचा एक वाचनीय लेख आला होता. शीर्षक होते: “समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?

त्याची मध्यवर्ती कल्पना पु ल देशपांडे यांच्या “समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर…?” या एका पुस्तकातील लेखावरून घेतली आहे. मला वाटतं एका दिवाळी अंकात १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख नंतर “एक शून्य मी” या त्यांच्या शेवट शेवटच्या आणि विचारप्रधान पुस्तकात घेतला आहे.

सध्या भारतात “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा”च्या (RSS)  दडपशाहीच्या आणि झुंडशाहीच्या वातावरणात पुलंच्या लेखाचे महत्व खूपच जास्त आहे. उगाचच “हिंदू खतरे में है” वगैरे अपप्रचार करून आणि उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी तर “८० विरुद्ध २०” असे सरळसरळ धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करणारे राजकारण करून भाजप आणि संघ आपले गलिच्छ स्वरूप दाखवत आहेत. तुम्ही कुठल्याही चड्डी गॅंग मेम्बर शी बोललात (कदाचित तुमच्यापैकी बहुतेक जण त्याचेच भाग असाल. कारण माझ्या सारखे संघ विरोधक  आता भारतात तुरळकच उरले आहेत…वाघांपेक्षा संख्येने कमी असतील. असो.) तर त्यांची वाद घालायची पद्धत साधारण ह्या धर्तीवर असते. “ते (मुसलमान) आपली प्रजा वाढवत आहेत. आपण (हिंदू) वेळीच सावध झाले पाहिजे. आपण एकत्र आले पाहिजे. गांधींचे एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करा हे धोरण सोडून दिले पाहिजे. उलट त्यांनी मारायच्या आधीच आपण त्यांना वठणीवर आणले पाहिजे.”

अरे ला का रे करणे जुना विचार झाला. उलट समोरचा अरे करायच्या आधीच आपण पहिला वार केला पाहिजे. अशा आवेशात सगळे असतात. १००% संघी हे शिवप्रेमी आणि डोक्याने अधू असतात. सध्या शिवाजी महाराजांच्या चित्रपटांचे जे पेव फुटले आहे हे ह्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून. मराठी लोकांसाठी शिवाजी महाराज, सावरकर आणि अखिल भारत स्तरावर “काश्मीर” आणि “देशप्रेम” यांचा अतिप्रमाणात मारा चालू आहे. ऐतिहासिक लोकांचे उदात्तीकरण, त्यांना “दैवत” बनवणे, त्यांचा कुठलाही दोष मान्यच न करणे आणि मग हळू हळू सध्याच्या पुढाऱ्यांचे दैवतीकरण असा सगळा गलिच्छ प्रकार २०१४ नंतर पद्धतशीरपणे राबवला जात आहे. देशप्रेमाच्या आणि प्रादेशिक अस्मितेच्या पेयामध्ये सूडाची आणि द्वेषाची गोळी इतक्या बेमालूमपणे विरघळून गेली आहे की आता दोन्हींना वेगळं करणं अशक्य झालं आहे. मुस्लिमांचा द्वेष, जुन्या (म्हणजे ३०० ते १००० वर्षांपूर्वीच्या) जखमांचा सूड म्हणजेच देशप्रेम, किंवा देशसेवा…आणि तसे ना करणारे देशद्रोही – असे अधू डोक्याच्या लोकांना सहज पचेल असे समीकरण बहुतेक लोकांच्या गळी उतरवलं आहे. संघाची “Catch Them Young” ही खेळी गेल्या ३०-४० वर्षात कमालीची यशस्वी ठरली आहे. न कळत्या वयात त्यांच्यावर द्वेषाचे आणि सुडाचे असे संस्कार संघ करतो की मग पुढे जन्मभर तो तालिबान्यांच्या निष्ठेने संघाच्या भूमिकांचे समर्थन करत राहतो. म्हणूनच “हिंदू तालिबान” हे नाव ह्या RSS च्या लोकांना अगदी समर्पक आहे.

“It’s easier to raise a strong child than to fix a broken man”  असे फ्रेडरिक डग्लस याच्या नावावर खपवले जाणारे एक उद्गार आहेत (जे अर्थातच त्याचे नाहीत.). नक्की कोण म्हणाले ते सोडून द्या, पण ह्या उक्तीचा बरोब्बर वापर कुणी केला असेल तर तो संघाने. जेव्हा देशात काँग्रेसमय वातावरण होते तेव्हा संघाने आहे त्या लोकांचे मनपरिवर्तन करण्यापेक्षा (कारण ते broken men होते), नवीन पिढीला brainwash करणे जास्त योग्य समजले. म्हणूनच तुम्हाला जाणवेल की जेव्हा स्वातंत्र्याच्या अलीकडची-पलीकडची पिढी बदलली आणि एक नवी पिढी – ज्यांचा स्वातंत्र्याशी तसा थेट संबंध नव्हता – उदयाला आली तेव्हा पासून संघाची (आणि पर्यायाने भाजपाची) ताकद वाढली. ह्याची सुरुवात साधारण १९९० पासून सुरु झाली (कारण १९६५-७० नंतर जन्मलेले “strong child” तोपर्यंत संघाचे कडवे योद्धे म्हणून पूर्ण वाढ झालेले होते. मग त्यांनी बाबरी मशीद पाडली. आणि मग अजून “strong children” तयार होत गेली.

आज अशी परिस्थिती आहे की मूल जन्माला येतानाच by default संघी म्हणून येते…कारण इतका propaganda संघातर्फे सतत चालू असतो की लोकांची विचार करायची शक्तीच त्यांनी नष्ट केली आहे. अशा वातावरणात पुलंचा लेख, किंवा हा पंढरीनाथ यांचा लेख वाचला की जरा बरं वाटतं. मी यथाशक्ती संघाच्या विरोधात लढत असतो आणि लढत राहीन. त्यामुळे अशा प्रकारचे लेख अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावेत हाच माझा प्रयत्न असतो.


समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?

लेखक: रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ (लोकसत्ता, २७ मार्च २०२२) 

सध्या सभोवतालचं वातावरण द्वेष, धर्माधता, सूड यांनी पार गढुळलं आहे. तुम्ही कुणाची खोडी काढा वा काढू नका; तुमची खोडी काढली जाणारच नाही असं नाही. मग आपण काय करायचं. गप्प बसायचं? की प्रतिकार करायचा?
गोष्ट बरीच जुनी आहे. माझ्या किशोरवयातली. कुठून कुठून मिळतील ते जुनेपाने दिवाळी अंक, जीर्ण पुस्तकं जमवून त्यांची पारायण करण्याचे ते दिवस. त्यातलं बरंच काही तेव्हा समजतही नव्हतं. पण ते काळजात रुतून बसलं खोलवर. त्याचे अर्थ नंतर कळायला लागले. ते आकळणं ही तर आणखी अलीकडची बाब.
तेव्हा पुलंचा एक लेख वाचनात आला होता. त्याचं शीर्षक होतं- ‘समजा, कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?’ नंतर प्रयत्न करून, अनेकांना विचारूनही तो लेख मला सापडला नाही. मी तो अजूनही शोधतो आहे. तो सापडला तर त्याच्या हजारो प्रती काढून वाटाव्यात, त्याच्या पारायणाचे जाहीर कार्यक्रम करावे असं माझ्या मनात आहे. असं काय होतं त्या लेखात?
आता आठवतं ते असं : पहाटे उठून व्यायाम करणं, शरीर कमावणं हा पुलंना कधीच न जमलेला प्रकार. पण त्यांचे काही सन्मित्र त्यांना त्यासाठी भरीला घालतात. ते विचारतात, ‘‘समजा, रस्त्याने चालताना कोणी तुमच्या थोबाडीत मारली तर?’’ पुलं म्हणतात, ‘‘पण कोणी असं करेलच कशाला? मी जर त्याचं काही बिघडवलं नसेल तर तो माझ्या वाटेला जाईल कशाला?’’ पण सन्मित्र आपला हेका सोडत नाहीत. ‘‘पण असं घडलंच तर? मग तुम्ही काय निमूटपणे त्याचा मार खाल? चारचौघांत होणारी बेइज्जती सहन कराल?’’ ‘‘अहो, पण अशी वेळ कशाला येईल? माझ्यासारख्याला कोणी आडवा जाईल तरी कशाला? त्याला काय मिळणार त्यातून?’’ पुलं आपला बचाव करताना म्हणाले.
‘‘आपण इथेच तर मार खातो! आपण इतरांना आपल्यासारखे सज्जन समजतो. पण ते तसे नसतात. ते मुळातच खुनशी स्वभावाचे.. तुमच्याशी गोड गोड बोलतील, पण केव्हा वार करतील याचा नेम नाही. आतापर्यंत असंच घडत गेलंय. सज्जन म्हणूनच पराभूत झालेत. ते काही नाही, तुम्ही शक्तीची उपासना केलीच पाहिजे.. म्हणजे कोणी आपल्या वाटेला जाण्यापूर्वी दहादा विचार करील. त्याने तसा प्रयत्न केलाच, तर तो हात कलम करण्याची ताकद असेल तुमच्या बाहूंमध्ये.’’
पुलं आपल्या ‘बाहूं’कडे एक नजर टाकतात. कलम पकडण्याची ताकद असणाऱ्या त्या बाहूंमध्ये कोणाचा तरी हात ‘कलम’ करण्याची ताकद नाही, हे त्यांना माहीत असतं. पण तरीही कोणी उगाचच आपल्याला रस्त्याने जाता-येता थोबाडीत मारेल व त्यासाठी आपण ‘सज्ज’ असावं, ही कल्पना त्यांना फारशी रुचत नाही. मग ते सामूहिक बलसाधनेच्या मार्गाने न जाता पहाटे धावायला जाणं वगैरे निरुपद्रवी प्रकार करून पाहतात. भलत्या वेळी गजर झाल्याने बेरात्री धावायला गेलेल्या पुलंना पोलिसाने पकडणं, सकाळी साहेब येईपर्यंत पोलीस ठाण्यात अडकवून ठेवणं, मग भल्या सकाळी बिनबाह्यंचं बनियन व ढगळ हाफ पँट घातलेल्या पुलंनी मेन रोडने घरी परतणं, चार चार फास्ट ट्रेन सोडून देऊनही ज्यांचं दर्शन दुर्लभ होतं अशा ‘कॉलेज क्वीन्स’नी त्यांना त्या अवतारात पाहणं.. असा बराच मनोरंजक मसाला त्या लेखात होता.
असे अनेक धमाल किस्से सांगून लेखाच्या अखेरीस पुलं पुन्हा समेवर येतात. कोणीतरी आपल्या थोबाडीत मारेल असं भय मनात बाळगून स्वसंरक्षणाच्या नावाखाली आपणही आक्रमक व्हावं, दुसऱ्याच्या मनात भय निर्माण करण्यासाठी बलोपासना करावी, हे आपल्याला जमत नाही. हे पुरेसं खरं नाही, हे त्यांना उमगतं. मुळात दंडात बेटकुळी दिसावी यासाठी पहाटे उठणं हेच त्यांना मंजूर नाही. माझ्या लाडक्या साखरझोपेतून मला उठवण्याची ताकद फक्त मल्लिकार्जुन मन्सूर, बडे गुलाम अली खांसाहेब, बेगम अख्तर अशा भूलोकीच्या गंधर्वानाच आहे; कोणाच्या दहशतीला नाही असं ते ठासून सांगतात. कोणाचंही नाव न घेता मनामनांत ‘आपण विरुद्ध ते’ अशी विभागणी करणाऱ्या, ‘ते’ खुनशी आहेत, केव्हाही आपल्यावर हल्ला करतील म्हणून आपण सज्ज होऊ या आणि आधीच हल्ला करून त्यांना नियंत्रणात ठेवू या,’ असा विचार पसरविणाऱ्या लोकांचं पितळ ते उघडं पाडतात. हृदय जोडणारं प्रेम, तसंच मनाला भेदाभेद व पाíथवता यापलीकडे नेण्याची कलेची शक्ती ही दंडातील बेटकुळीपेक्षा श्रेष्ठ ताकद आहे, असं ते अगदी सहजतेने सांगतात. कोणत्याही चांगल्या कलाकृतीप्रमाणे ते अतिशय अलवारपणे हा संस्कार वाचकाच्या मनावर करतात.
मला स्वत:ला कलेच्या या शक्तीचा प्रत्यय आला आहे. किशोरावस्थेत असताना माझ्यावरही ‘त्याचा हात उठण्यापूर्वीच कलम करून टाकू’ या विचारधारेचा जबरदस्त पगडा होता. आमच्या घरात तेव्हा अंडंही चालत नसे. पण शत्रूच्या शिबिरावरून ‘त्यांच्या’सारखं बलशाली होण्यासाठी आपण मांसाहार केला पाहिजे असं मी ठरवलं होतं. लुटूपुटीच्या लढाईत ‘त्यांच्या’वर तुटून पडताना मला विलक्षण आनंद होत असे. मिशांसोबत मते फुटण्याच्या वयात मात्र मी अलगद त्या विचारांपासून दूर गेलो. सत्तरच्या दशकातील अस्वस्थता, नव्या विचारांचे मित्र, बाबा आमटेंचे शिबीर अशा घटकांसोबत या लेखाचा व अशा साहित्याचा माझ्या मनावर झालेला खोल संस्कार त्याला कारणीभूत होता. याचं भान मला तेव्हा नाही, पण आता नक्कीच आलेलं आहे.
आता तर माझ्याभोवती दंडातल्या बेटकुळ्या दाखवणाऱ्यांची अख्खी फौज उभी आहे. प्रत्येक जण भयग्रस्त आहे. त्यामुळे सारेच दंड फुरफुरत आहेत. मी कधीकाळी कोणत्यातरी युद्धाचं वर्णन वाचलं होतं. युद्धापूर्वी हत्ती, घोडे आक्रमणासाठी इतके आतुर झाले होते की त्यांनी उडवलेल्या धुळीमुळे सारा आसमंत माखून गेला होता. सारं काही धूसर धूसर झालं होतं. कोण आपला, कोण शत्रू हेच समजेनासं झालं होतं. आता समोर येईल त्याच्यावर वार करायला हवा एवढाच भाव प्रत्येक योद्धय़ाच्या मनात जागत होता. मला आता तसंच काहीसं वाटतं आहे. सगळीकडे इतका धुरळा उडतो आहे की मागचं-पुढचं सारं दिसेनासं झालं आहे. फक्त समोरच्यावर तुटून पडायला हवं, एवढंच लोकांना समजतं आहे. ‘जगाचं काहीही होवो.. मी माझ्या, माझ्या कुटुंबाच्या, जातीच्या, धर्माच्या, देशाच्या स्वार्थाचाच फक्त विचार करायला हवा, आणि हीच ‘चाणक्य’नीती आहे, आज टिकून राहायला हाच एक मार्ग आहे..’ असं सर्वत्र बिंबवलं जातंय. मला भीती वाटते की, लवकरच परधर्मातील हिरो-हिरोईनवर प्रेम करण्यावर बंदी घातली जाईल. परजातीतील लेखकांची पुस्तकं कोणी वाचणार नाही. एकेकाळी आपल्याकडे हिंदू जिमखाना, पारशी जिमखाना अशा धर्मवार क्रिकेट टीम्स होत्या व त्यांचे पंचरंगी सामने खेळविले जात. उद्या जात-धर्म-रंग यांच्यानुसार टीम ठरवून त्यांच्यात आयपीएलचे सामने खेळवले जातील. पण प्रत्येक सामन्याच्या वेळी युद्धसमान परिस्थिती निर्माण होईल, त्याचं काय? सभोवतालचा धुरळा खाली बसवून वातावरण स्वच्छ करण्याची शक्ती आहे तरी कशात, या विचाराने मी भांबावून गेलो आहे.
एकेकाळी ही शक्ती ज्यांच्यात होती, त्यांच्या डोळ्यांतही खूपसे धूलिकण गेले आहेत असं दिसतं. त्यातले काहीजण आपल्या जीर्ण गढय़ांच्या मालकी हक्कासाठी परस्परांशी लढताहेत. काहीजण आपले सरदार, सनिक आपल्याशी एकनिष्ठ नाहीत, या संशयाने त्यांना एकदाचे शत्रुपक्षात लोटण्यासाठी आतुर झाले आहेत. काहीजण वैचारिक स्पष्टता येण्यासाठी रणभूमीवरच ध्यान लावून बसले आहेत. त्यांना समजेल अशा भाषेत गीता सांगितली जात नाही तोवर ते हाती शस्त्र धरणार नाहीत असा त्यांचा निश्चय आहे.
युद्ध महाभारताचं असो की किलगाचं- ते संपल्यावर लोक (काही काळ तरी!) शहाणे होतात, त्यांना युद्धाचं वैयथ्र्य जाणवतं, हे खरं. पण अकारण युद्ध किंवा यादवीत आपण आणि आपल्यासारखे लाखो हकनाक बळी जाऊ नयेत यासाठी माझ्यासारख्या सामान्य माणसानं करावं तरी काय? द्वेषाची ही आग विझवू शकेल असं सामर्थ्य दिग्गज लेखकांच्या लेखणीत, किशोरीताई, बेगम अख्तर, लता, रफी, किशोर अशांच्या स्वर्गीय आवाजात आहे. कबीर, तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी यांच्या संतत्वात आहे. परंतु इतरांना त्यासाठी काहीच करता येणार नाही का?
मी मघाशी पुलंच्या लेखाचं पारायण करण्याबद्दल बोलत होतो. आजही या देशात पोथ्यांची पारायणं होतात. चांगल्या सिनेमांना लोक गर्दी करतात. मुलांना गोष्ट सांगणारी अ‍ॅप्स, पुस्तकं, कार्टून नेटवर्क धडाक्यानं खपतात. एकूण काय, की लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना अजूनही गोष्टी ऐकायला आवडतं. मग आपल्याला जमेल त्या प्रकारे, ऐकतील त्यांना गोष्टी सांगायला काय हरकत आहे? गोष्ट- दु:खाचं मूळ शोधण्यासाठी घरदार सोडणाऱ्या सिद्धार्थाची, युद्ध जिंकल्यावर शोक करणाऱ्या अशोकाची, दुसऱ्यांच्या मुक्तीसाठी सुळावर जाणाऱ्या येशू ख्रिस्ताची, प्रेमदिवाण्या मीरेची, मोगल महालात राहून कृष्णाला पुजणाऱ्या जोधेची व तिच्यावरील अकबराच्या प्रेमाची, बायकोवरील प्रेमासाठी डोंगर खोदून रस्ता बनविणाऱ्या दशरथ माझीची, शेजारच्या लेकरांना आपलं मानणाऱ्या आयाबायांची, कोणत्याही बाहुबलाला लाजवणाऱ्या हिरकणीच्या मनोबलाची.. जमेल त्या सूर-तालात, गद्य-पद्यात, चाचरत्या, खडय़ा बोलात प्रेम, आशा, सूर्यप्रकाश यांच्या गोष्टी सांगायला काय हरकत आहे, मी म्हणतो.


समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर…

लेखक: पु.ल. देशपांडे

“घाबरू नका-मारा बुक्की.” मी उगीचच टिचकी मारल्यासारखी बुक्की मारली.

“असे घाबरता काय? हाणा जोरदार बुक्की! अहो एका बुक्कीत आम्ही सुपारीची भुगटी पाडीत होतो.”

“वा हॅ हॅ…” माझी क्षीण हास्य. क्षणापूर्वीच तर हा म्हणाला होता की आपल्याला सुपारीच्या खांडाचेसुद्धा व्यसन नाही म्हणून.

“हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाही बंधो. येत्या नारळी पौर्णिमेला पंचाहत्तर पुरी होताहेत-दात पहा.”

`अहा मज ऎसा दैवहत प्रा आ आ आ आ आणी
खचित जगती या दिसत नसे को ओ ओ ओ ओ ओणी.’

असे आपल्याला वाटत असते असला हा प्रसंग होता. एका लग्नाच्या मांडवात मी एका टणक म्हाताऱ्याच्या तावडीत सापडलो होतो. हल्ली सहसा मी लग्नाचे सगळे अंक पाहायला जात नाही. पानसुपारीच्या अंकाला तेवढा जातो. कारण दिवसभर मांडवात असंख्य अनोळखी लोकांच्यात वेळ काढायचा म्हणजे धर्मसंकट असते. राशिभविश्यापासून संकर पिकापर्यंत कोण कूठला विषय मांडून बसेल काही सांगता येत नाही. त्यातून आपण वधूसारख्या नरम बाजूचे असलो तर मुकाट्य़ाने सारे काही घ्यावे लागते. मी मात्र पूर्वीपासून एक धोरण सांभाळले आहे. लग्नाच्या मांडव्यात आपल्याशी बोलायला येणारा प्रत्येक इसम हा वरपक्षातला गुप्तहेर असावा अशा सावधगिरीने मी बोलतो. त्यामुळे एकाच मांडवात मी कॉंग्रेस, जनसंघ आणि द्रविड मुन्नेत्र कहढळखगम ह्या सगळ्या पक्षांना आळीपाळीने पाठिंबा दिला आहे. द्रविड मुन्नेत्र नंतरच्या त्या शब्दाचा उच्चार जीभ टाळूला नेमक्या कुठल्या ठिकाणी लावून करायचा असतो हे शिक्षण मला एका गृहस्थाने त्या मांडवातच दिले. हे मराठी गृहस्थ मद्रासला कुठेशी टायपिस्ट म्हणून `एक दोन वर्स नव्हे तर नांपीस वर्स सर्विस करून परतले होते.’ बाकी पुण्यातल्या माणसाने मद्रासला टायपिस्टची नोकरी-तीही वट्ट चोवीस वर्स करीत राहणे ही घटना इतीहासात नोंदवण्यासारखी आहे. अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे-म्हणतात ते हेच! असो. हे विषयान्तर झाले. खरे म्हणजे जाणूनबाजून केले. कारण मूळ विषय इतका कडु आहे की त्याकडे वळणॆ नको असे वाटते.

भर मांडवात एक पंचाहत्तरी गाठू लागलेला म्हातारा पैरणीची अस्तनी वर करून दंडाच्या बेटकुळीवर दणकून बुक्की मारा असा आग्रह धरून बसला होता. मी एक दोन बुक्क्या माझ्या ताकदीप्रमाणे मारल्या. पण त्याचे समाधान होईना.

“घाबरता काय?” तो कडाडला. ह्या तालीमबाज लोंकाच्या आवाजानदेखील एक प्रकारच्या बसकट दणका असतो. त्याने `हाणा’ हे एवढ्या जोरात म्हटले की कसल्याशा विधीसाठी होमाच्या आसपास जमलेला सगळा घोळका `तमाम दहिने निगाह’ केल्यासारखा एकदम आमच्या दिशेला बघू लागला.

“अय्या बाप्पांचे शक्तीचे प्रयोग सुरू झालेले दिसताहेत.”. असा एक स्त्रीस्वर त्या घोळक्यातून उमटला आणि घोळक्याने पुन्हा होमात लक्ष घातले. मी बाप्पांच्या बेटकुळीवर आणखी एक चापटी मारली.

“चापटी काय मारताय कुल्ल्यावर मारल्यासारखी?” प्रस्तुत वाक्यातील चौथ्या क्रमांकाचा शब्द मी तरी भर मांदवात उचारला नसता. पण बाप्पांनी मात्र तो `हाणा’च्याच एवढ्या मोठ्याने उचारला. घोळक्यावर त्याचा परिणाम नव्हता. त्यानंतरदेखील बाप्पांच्या तोंडून जे काही बलसंवर्धनविषयक शब्द पडत होते ते ऎकल्यावर मला त्या होमात जाऊन उडी मारावी असे वाटत होते. बाप्पांनी माझी मूठ लचकेपर्यंत आपल्या दंडातल्या बेटकुळीवर बुक्क्या मारून घेतल्या. भर मांडवात अंगातली पैरण काढून पोटाला चिमटे काढायला लावले. बाप्पा “काढा चिमटा” म्हणून पोट असे काही टणक करीत्स की, त्यांच्या त्या पोटाला चिमटा काढण्यापेक्षा गोद्रेजच्या तिजोरीला चिमटा काढणे सोपे असावे असे मला वाटले. तो कार्यक्रम संपल्यावर त्यांनी जमिनीवर घट्ट बसकण मारले आणि “इथुन मला धक्के देऊन इंचभर हलवून दाखवा” म्हणून धक्के मारायला लावले.

“पुढच्या नारळी पौर्णीमेला पंचाहत्तरावं सरून शहात्तरावं लागतंय. दात पहा.” बाप्पांनी माझ्यापुढे दात विचकले. मी बुक्के मारली. आणि एक गर्जानात्मक किंकाळी मांडवाचे छत फॊडुन गेली. दात बुक्की मारण्याच्या हेतूने दाखवण्यात आले नव्हते हे मला काय ठाऊक? कारण आतापर्यंत बाप्पांचा जो जो अवयव माझ्यापुढे आला तो बुक्का, गुद्दा चिमता किंवा धक्का मारण्यासाठी आला होता. मला वाटले तोच कार्यक्रम चालू आहे. कुणाचेही दात घशात घालणे, कुणावर दात धरणे वगैरे दातांचे जे खाण्याखेरीज इतर उपयोग आहेत ते करण्याकडे माझी अजोबात प्रवृत्ती नाही. बसकंडक्टरने `जगा नही’ म्हटल्याक्षणी खाली उतरणारे आम्ही. केवळ गाफीलपणाने एका तालीमबाजाचा दात माझ्या हातुन पडला.

ह्या शक्तीचे प्रयोगवाल्य़ांनी मला प्राचीन काळापासून पिडले आहे. माझा आरोग्य सांभाळून जगण्याऱ्यावर राग नाही. धोतराऱ्या निऱ्या काढून व्यवस्थित ठेवावे तसे ते आपले शरीर लख्ख ठेवतात. पण स्नायू फुगवून दाखवणारांचे आणि माझे गोत्रच जमत नाही. पहिलवान होणे हा माझा कधीही आदर्श नव्हता.

…आपण खुल्या ढंगाची कुस्ती खेळतो आहो… कुठल्या तरी भयाकारी पहिलवानाला लाथाबुक्या मारतो आहो… तो आपली गर्दन मुरगाळतो आहे… मग आपण त्याच्या नाकाचा शेंडा चावतो आहो.. मग त्याने आपल्या कानशिलात भडकवली आहे… मग आपण मुंडक्याच्या ढुशीने त्याचे माकडहाड मोडले आहे… मग तो कोसळला आहे…मग त्याचा मोडका हात उचलून दसऱ्याच्या रेड्यासारखे रक्तबंबाळ होऊन आपण उभे आहो आणि मग लाखो लोक आपल्या ह्या कुणाची तरी हाडे मोडल्याच्या आणि लाथाबुक्क्यांचा खुराक खाल्ल्याच्या शतकृत्याबद्दल टाळ्या वाजवता आहेत…हे माझे माझ्या भविष्याबद्दलचे स्वप्न कधीही नव्हते. इंग्रज हा देश सोडून जाईल ही कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वात मोठे स्वप्नचित्र पाहत असे ते एकच : आपल्या ड्राफ्ट्मध्ये यत्किंचितही खाडाखोड न करता तो ऍप्रूव्ह करुन साहेबाने टायपिंगला पाठवला आहे… कधी कधी हसून स्वत: होऊन आमच्या नावाचा उच्चार करून गुडमॉर्निंग केले आहे.

एकदा मी माझ्या ह्या साऱ्या शंका एका गुरूजीना, आधी त्यांच्या बेटकुळ्या, गर्दन, पोटऱ्या, मांड्या वगैरे अवयवांची तुफान तारीफ करून विचारल्या होत्या.

“समजा-” गुरूजी सांगू लागले, “समजा, तुम्ही रस्त्यातुन जाताना एखाद्याने तुमच्या मुस्काटीत मारली-”

वास्तविक चालायला लागल्यापासून मी रस्त्यातून चालतच आलो आहे. पण आजवर कुणीही कारणाशिवाय माझ्या मुस्काटीत मारली नाही. ज्यांनी मारली त्यांना ह्या कामाबद्दल शाळाखाते पगार देत असे. त्यामुळे त्या वेळी माझ्या दंडात जरी बेटकुळ्यांच्या बेचाळीस पिढ्या नांदत असल्या तरी हात वर करणे मला शक्य नव्हते. मी कधी कुणाच्या मुस्काटीत मारली नाही, की कुणी माझ्या मारली नाही. अशा परिस्थितीत बगलेत छत्री आणि हातात मेथीची जुडी घेऊन तुटत आलेला चपलेचा आंगठा-घरी पोहोचेपर्यंत तरी न तुटो’ अशासारखा भाव सदैव चेहऱ्यावर घेऊन जाणाऱ्या मज पामरावर कोणीही केवळ ताकद अजमवण्यासाठी म्हणूनसुद्धा हा मुस्काटीत मारण्याचा प्रयोग करील असे मला कधीही वाटले नव्हते.

“बोला की…” गुरूजींच्या घनगर्जनेने मी दचकुन भानावर आलो. “समजा, तुमच्या थोबाडीत एखाद्दाने हाणली…” शब्द बदलून गुरूजींनी पुन्हा तोच सवाल केला “काय? समजा. थोबाड फोडलं तुमचं तर काय नुसता गाल चोळीत बसाल?”

आपण रस्त्यातुन चालताना केव्हातरी कोणीतरी माझ्या मुस्काटीत षोकाखातर एक हाणून जाईल या भितीने त्या दिवसावर नजर ठेवून चालू आयुष्य पहाटे उठून तालमीत जाऊन, ऱ्हां, ऱ्हीं, ऱ्हॅं, ऱ्हं करण्यात घालवावे हा सिद्धान्त मला तरी पटेना. पुन्हा गर्जना झाली…

“किंवा समजा, एखाद्दाने तुमच्या पेकाटात लाथ हाणली…” गुरूजींनी हाणण्याचे स्थळ आणि हाणणाऱ्या अवयव फक्त बदलला.

“अहो, पण असं उगीचच कोण कशाला हाणील?” मी गुरुजींच्या लाथेच्या कक्षेबाहेर माझा देह नेऊन हा सवाल केला.

“समजा हाणली तर?”

“समजा हाणलीच नाही तर?”

मी आयुष्यात प्रतीपश्र्न करायचे एवढे धैर्य कधीही दाखवले नव्हते. पण आजचा प्रसंग, स्थळ, पात्रयोजना सर्व काही निराळे होते. गुरुजी माझ्या पेकाटात लाथ सोडा, पण कानाच्या पाळीला करंगळीदेखील लावू शकले नसते. आपल्या पुतणीसाठी माझ्या चुलतभावाच्या स्थळाविषयी बोलणी करायला आले होते. त्यांच्या पुतणीला दांडपट्टा, फरीगदगा आणि वेताचा मल्लखांब उत्तम येत असून ती खोखॊच्या टीमची कॅप्टन होती. असल्या भांडवल्यावर माझ्या चुलतभावाने ती जोखीम स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होती. संसारात दांडपट्टापेक्षा जिभेच्या पट्ट्याला आणि खो-खोपेक्षा लपंडावाला आधिक महत्व आहे, हे त्या आजन्म शक्तीचे सेव्हिंग्ज अकौंट सांभाळीत राहिलेल्या बजरबट्ट बेटकुळीवाल्याला ठाऊक नसावे. वधूपक्षाकडून हे गुरूजीच काय, पण साक्षात एकादा हिंदकेसरी जरी आला तरी बापजन्मी आखाड्यात ने गेलेल्या मुलाचा बाप त्याला क्षणात लोळवू शकतो. त्यामुळे माझ्या `समजा हाणलीच नाही तर?’ ह्या सवालाला हिंदुविवाहपद्धतीच तारांबळ आणि चंद्रबळ होते. त्या बळावर मी गुरुजींना नुसत्या तोंडाने धोबीपछाड घातली होती. एवढ्या गडगंज ताकदीचा तो भीमरूपी महारुद्र माझ्या एका सवालाने गडबडला. ह्या जरत्कारुला असला उलटा सवाल विचारण्याचे धैर्य केवळ वरपक्षाचा प्रतिनिधी ह्या भुमिकेमुळे आले हे त्यांच्या ध्यानात आले असावे. कारण त्यानंतर “त्याचं असं आहे…” अशी मवाळ वाक्याची सुतळी जोडून त्यांनी पवित्रा बदलला. “बरं का… वेळ काय सांगून येते? त्यासाठी लाठी, बोथाटी, दांडपट्टा वगैरे शिकून ठेवावे-”

“अहो, पण हापिसात काय पोळीभाजीच्या डब्याबरोबर दांडपट्टा घेऊन जायचे की काय?”

बाकी कधीतरी दांडपट्टा शिकुन हवेतले उडते लिंबू सपकन कापतात तशी आमच्या हेडक्लार्कची टोपी उडवून कापावी असा एक सुखद विचार माझ्या मनाला शिवून गेला. आणि नुसत्या विचाराने सुद्धा माफक घाम फुटला. खरे म्हणजे उद्या ताकद कमावलीच तर ती कोणाविरुद्ध चालवावी हा मला प्रश्र्न्च आहे. त्यापेक्षा भल्या पहाटे कुशी बदलून साखर स्वस्त झाली आहे, दुधाच्या बाटल्या आपोआप घरात येताहेत, ही अति मंजुळ स्वरात `चहा घेता ना~~’ म्हणते आहे, हेडक्लार्क कामावर खुष आहे… वगैरे वगैरे स्वप्ने पाहायची सोडुन केवळ कल्पनेने उगीचच मुस्काटात मारणारे शत्रू निर्माण करून पहाटे तालमीत जाऊन बुभु:कार कशासाठी करायचे?

जोरदार शत्रु लाभायलादेखील आपल्यात कुवत पाहिजे. आमच्या मुस्काटावर शकतीचा अंदाज घेणाराने शक्तीचे प्रयोग धर्मार्थ लावले तरच ते शक्य आहे. टिचकीच्या कामाला उगीचच कोणी पाची बोटांचा प्ण्जा कशाल वापरील?

अंग कमवण्यापेक्षा अंग चोरण्याचे धोरण अधिक चांगले. नवाची गाडी गाठायला साडेआठापासून फलाटावर बसणारे आम्ही. गाडीत शिरायला आपण होऊन आजवर धक्काबुक्की करावी लागली नाही. मारली टणक माणसे ऎशा जोरात रेटत असतात की डब्याच्या दरवाजापुढे आपण नुसते उभे राहिलो की मागल्या रेट्याच्या बळावर आत शिरायला होते. `जगाचे याज्य दुबळे करतील’ असे येशु ख्रिस्त उगीचच नाही म्हणाला. तो बिचारा आमच्यासारखा. त्याच्या दंडात बेटकुळी-विटकुळी काही नव्हती. पण मग एवढे बलदंड बेटकुळीवाले त्याला एवढे का भ्याले?

जगातले बरेचसे तापत्रय ह्या असल्या कारणाशिवाय बळ साठवणाऱ्या लोकांनीच निर्माण केले आहे. मग ते बळ कुणी सोन्यानाण्यांतून साठवतात, कुणी दंडांतून, तर कुणी बेटकुळीसारख्या टराटर फुगवलेल्या शब्दांतून! खिशात पैसा खुळखुळायला लागला की तो खर्च केल्याशिवाय चैन पडत नाही-खर्च करायला लागले की अधिक वाढवल्याशिवाय चैन पडत नाही. ह्या दंडमांड्यातली ताकदही वाजवीपेक्षा जास्त वाढली, की तीही खर्च करायची खुमखुमी सुरू होते. मग डोळे नसलेले शत्रू शोधले जातात. डॉन किशॉटला पवनचक्क्यात राक्षक दिसू लागले तसे ह्यांच्याही कल्पनेत राक्षक दिसू लागतात. आपल्या मानेची गर्दन झाली की दुसऱ्यांच्या माना मुरगळण्यासाठीच आहेत असे वाटू लागते. मग जो तो आपापल्या मानेची गर्दन करायला लागतो. मग हाताचे बळ अपुरे वाटायला लागते. “एखाद्याने मुस्काटीत मारली तर?” ह्याऎवजी `लाठी मारली तर?’ असल्या कल्पनांची भुते उभी राहतात. मग लाठी अपुरी पडते. तलवारी येतात. तलवारीतून तीरकमठा येतो. बंदुका येतात. तोफा येतात. मग चतुर लोक पैसे खूळखुळावीत त्या तोफा तोफवाल्यासकट विकत घेतात आणि हां हां म्हणता दंडातल्या बेटकुळ्यांचे बॉंब होतात. मग शब्दांच्या बेटकुळ्या फुगवणारे काल्पनिक सवाल उठवतात, “समजा, एखाद्याने तुमच्यावर बॉंब टाकला तर?”

…आणि भोवतालचे सुंदर युवतीचे मोहक विभ्रम, नुकतीच पावले टाकायला लागलेल्या बाळाचे एक पाय नाचिव रे गोविंदा… जयजयंतीतील तो लाडिवाळ फरक… हे सगळे सोडून यारी दिशांहून एकच सवाल उठतो, `समजा, तुमच्या कोणी मुस्काटीत मारली तर?’, `समजा. कोणी तुमच्यावर कोणी बॉंब टाकला तर?’

ह्या लोकांना, `समजा, तुम्हांला कोणी जेवायला बोलावले तर! श्रीखंड हवे म्हणाल की बिर्याणी?” . “समजा, तुम्हांला कुणी नाच पाहायला बोलावले तर, कथ्थक हवा म्हणाल की मणिपुरी?” . “समजा, एखादी तरुणी तुम्हांला म्हणाली की, सांग तु माझा होशिल का?” असले सवाल सुचतच नाहीत. कारण ह्या तऱ्हेऱ्हेच्या बेटकुळ्या आपण कशासाठी फुगवतो आहोत ह्या प्रश्र्नाला त्यांच्या कल्पनेतल्या मुस्काटीत मारणाऱ्या इसमापलीकडे त्यांना दुसरे उत्तरच नसते. मग मुस्काटीत मारणारा तो कल्पनेतला इसम असतो, धार्मीक गट असतो, वांशिक गट असतो, तर कधी देश असतो. मग शेख महंमदाने मारलेल्या लाथेप्रमाणे कल्पनेतल्या भांडणात खरी लाथ मारून माणसे काचेच्या सुंदर रंगीबेरंगी भाड्यांसारखी ज्यांना ही कल्पनेतली भुते छळत नाहीत अशा लोकांनी उभारलेली रंगीबेरंगी संस्कृतीची सूंदर पात्रे खळाळाकन फोडून टाकतात. त्या विध्वंसानंतर भानावर आल्यावर कळते की कूणी कुणाशी भांडत नव्हते. कारण ज्या घरातून आपल्यावर हल्ला होईल अशा भितीने आधीच बॉंब टाकून ते घर उदध्वस्त केलेले अस्ते- त्या घरात ते बॉंब पडण्याचा क्षणी एक आई मुलाला दुध पाजीत होती, एक कवी कविता रचत होता, एक शिल्पकार मुर्ती घडवीत होता, एक गवई तंबोरे जुळवीत होता आणि एका तरुणीचे ओठ तिच्या प्रियकराच्या चुंबनासाठी आतुर होते.

फक्त कूणीतरी आपल्याला मारील या भीतीच्या भुताने पछाडले होते, वेळीअवेळी आपले दंड फुगवीत बसलेले आणि दुसऱ्याला ते सामर्थ्य दाखवण्यासाठी आसुसलेले दंडशक्तीचे उपासक, त्यांची पहाट गवतावरचे दवबिंदु पाहण्यासाठी नव्हती.

हल्ली मांडवात मला कुणी दंडातली बेटकुळी वगैरे दाखवायला लागला, की मी विचारतो, “सनईवर चाललाय तो सारंग का हो?” उगीचच वर्तमानपत्री अधारावर कोणी कुठल्या दंग्यात हिंदू अधिक मेले की मुसलमान ह्याची चर्चा सुरू केली, की चक्क अब्दुल करीमखॉं साहेबांची रेकॉर्ड लावतो, `गोपाला मेरी करुणा क्यो नही आये’ किंवा हरीभाऊ सवाई गंधर्वाच्या `तूं है मोहमदसा दरबार निजामुद्दीन सुजानी…’ च्या तानांनी खोली भरून टाकतो.

मला पहाटे उठवायची ताकद आहे ती फक्त ललत, भैरव, तोडी ह्या अशरीरिणी शुरांगना. `समजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर’च्या कल्पनेतल्या भुतांनी पछाडलेल्यांना नव्हे!

(सुगंध, दिवाळी १९६९)


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: