परवा मी कारखानिसांची वारी हा मराठी चित्रपट बघितला. गेले अनेक महिने मला हा चित्रपट बघायचा होता, शेवटी परवा योग आला. मला हा साधा, कलात्मक चित्रपट खूप आवडला म्हणून त्याबद्दल लिहावेसे वाटले.

चित्रपटाची कल्पना तशी unique नाहीये. एका एकत्रित कुटुंबातील सगळ्यात ज्येष्ठ भावाचे निधन होते. त्याच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे त्याच्या अस्थी पंढरपूर ला विसर्जित करण्यासाठी त्यांचे ३ धाकटे भाऊ, एक बहीण आणि मुलगा गाडीने पंढरपूर ला जातात. प्रवासात अनेक गोष्टींचे हळू हळू खुलासे होतात आणि जाणवते की हे कुटुंब “एकत्रित” नाही. त्यातल्या प्रत्येकाची काहीतरी पार्श्वभूमी आहे. सगळे जण तुटलेले/विखुरलेले आहेत. तसेच त्यांच्यात हेवेदावे आणि असूया देखील आहे.
अजून एक उपकथानक म्हणजे मरण पावलेल्या ज्येष्ठ भावाची एक अनैतिक बायको आणि मुलगी असते आणि त्यांना भेटायला त्या मृत भावाची बायको जाते आणि त्यांच्यात शाब्दिक झटापट होते.
मृत व्यक्तीच्या एका भावाच्या भूमिकेत डॉ. मोहन आगाशे आहेत, जे माझे अत्यंत आवडते अभिनेते आहेत. ह्या चित्रपटातली त्यांची भूमिका देखील संस्मरणीय झाली आहे. अजून एका भावाच्या भूमिकेत कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर आहेत. मला वाटतं हा त्यांचा पहिला (आणि एकमेव) चित्रपट असावा. मुलाच्या भूमिकेत अमेय वाघ ने सुंदर काम केले आहे. पूर्वी मला अमेय वाघ हा थिल्लर किंवा उथळ विनोदवीर वाटायचं. पण जस जसे त्याच्या इतर भूमिका पाहात गेलो तास तसे माझे त्यांच्याबद्दलचे मत बदलले आहे. तो भरत जाधव, अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, भाऊ कदम, बद्रिके वगैरे छाप नाही. आणि फक्त भाडीपा छाप पण नाही. त्याची अभिनयक्षमता बरीच विविधांगी आहे. चित्रपटात मृत व्यक्तीच्या मुलीचा समलैंगिक असल्याचा पण एक ट्रॅक आहे. पण तो अतिशय तरल पद्धतीने आणि नुसत्या फोनवरील संभाषणातून दाखवला आहे. कदाचित मराठी प्रेक्षकांना पचणार नाही या भावनेतून असेल. पण अतिशय चांगल्या पद्धतीने तो जमून आला आहे.
सुरुवातीला मी या चित्रपटाची कथा unique नाही असे म्हणालो, त्याचे कारण म्हणजे चित्रपट पाहताना पहिल्या १५-२० मिनिटांतच मला “लिटिल मिस सनशाईन” या २००६ सालच्या tragicomedy road film ची आठवण झाली.

त्या चित्रपटात असेच एक विखुरलेले कुटुंब आपल्या छोट्या मुलीला छोट्यांच्या सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यासाठी एका मिनी-बस मधून रोड ट्रिप वर जातात आणि त्यात त्यांना अनेक अडचणी येतात आणि अनेक तुटलेली नाती आणि व्यक्ती या समोर येतात… आणि शेवटी त्यांच्या रागाचा, तुटलेल्या मनांचा निचरा होतो आणि पुन्हा सगळे जोडले जातात. Tragic Comedy या स्वरूपाचा तो चित्रपट होता. कारखानिसांची वारी हे त्याचेच मराठी रूप आहे असे वाटते. तेच तुटलेले कुटुंब, तीच रोड ट्रिप…मिनी-बस च्या ऐवजी व्हॅन. सौंदर्यस्पर्धेच्या ऐवजी अस्थिविसर्जन. म्हणून त्या अर्थाने चित्रपटाची कथा unique नाही.
पण तरीही ज्याप्रकारे ही कथा मराठी साच्यात बसवली आहे ते खूपच कौतुकास्पद आहे. डॉ. मोहन आगाशे यांचा तिसरटपणा आणि बोचरे टोमणे अगदी उत्तम जमून आले आहेत. तसेच इतर भावंडातील धुसफुसी पण अगदी खऱ्या वाटतात. मृत व्यक्तीची पहिली पत्नी (वंदना गुप्ते) आणि दुसरी पत्नी (शुभांगी गोखले) यांच्यातील शाब्दिक चकमकी पण मस्त जमल्या आहेत. अमेय वाघ च्या प्रेयसीच्या भूमिकेचा ट्रॅक थोडा अर्धवट आणि बिनबुडाचा वाटतो. तो थोडा अजून फुलवायला पाहिजे होता.
पण एकूण चित्रपट छान आहे. मला मराठीतील अलीकडच्या काळातील सुमार विनोदपट किंवा अतिसुमार ऐतिहासिक चित्रपट अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे कारखानिसांची वारी, The Disciple (हो, २-३ दा बघितल्यावर हा चित्रपट मला अतिशय आवडला. त्याबद्दल लवकरच लिहीन), गांभ्रिचा पाऊस, कोर्ट, अस्तु, किल्ला यासारखे वास्तववादी, विचार करायला लावणारे चित्रपट अधिक आवडतात. तसेच कट्यार काळजात घुसली किंवा सैराट सारखे व्यावसायिक चित्रपट केवळ संगीतासाठी आवडतात.
आता मला “कासव” हा अनेक वर्षांपासून राहून गेलेला चित्रपट बघायचा आहे. तसेच “मी…वसंतराव” हा देखील (जास्त अपेक्षा न ठेवता) बघणार आहे, ते केवळ निपुण धर्माधिकारी याच्या दिग्दर्शनासाठी. नुकतीच निपुण आणि राहुल देशपांडे यांची ABP माझा वरील “माझा कट्टा” मधली मुलाखत बघितली आणि हा चित्रपट पहावा असे वाटले. आता बघेन लवकरच…
Leave a Reply