” मी वसंतराव” विषयी…

काल मी (अखेरीस) “मी वसंतराव” हा चित्रपट पाहिला आणि मला तो खूपच आवडला!

मी ह्यापूर्वी एका ब्लॉग मध्ये लिहिले त्याप्रमाणे माझ्या या चित्रपटाकडून माफक अपेक्षा होत्या. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हा एक विचारी आणि तल्लख माणूस आहे. त्याचे याआधीचे २ चित्रपट मी अजून पाहिले नाहीत. पण त्याचे TV आणि सोशल मीडिया यांवरील मुलाखती, skits यावरून तो चांगला वाटला. 

पण एकूणच biopic या प्रकाराचा माझा अनुभव चांगला नाही. पु.ल. देशपांडे यांच्यावरील महेश मांजरेकरचा चित्रपट मी अजून पाहिला नाही. कारण त्याचे ट्रेलर पाहून त्या व्यक्तिरेखा कमी आणि caricatures जास्त वाटले. शिवाय मांजरेकर हा अत्यंत बिनडोक, चढवलेला आणि सुमार कलाकार आहे असं माझं मत आहे – विशेषतः ज्या प्रकारचा चित्रपट त्याने निवडला त्यासाठी.

सुबोध भावेचा बालगंधर्व मी अजून पाहिला नाही. त्याचाच काशिनाथ घाणेकर हा पाहायची इच्छा नाही, कारण ती व्यक्तीच मला आवडत नाही. त्यामुळे मराठी मधले biopic हा एकूणच अवघड विषय आहे. हरिश्चन्द्रची फॅक्टरी मला आवडला होता.

पण तरीही मी वसंतराव पाहायला मी गेलो त्याचं कारण म्हणजे निपुण धर्माधिकारी हे आणि दुसरे म्हणजे माझ्या अपेक्षाच मी माफक ठेवल्या होत्या. त्यापूर्वी “ABP माझा” वरील माझा कट्टा मधील निपुण आणि राहुल देशपांडे यांची मुलाखत ऐकली होती आणि आवडली देखील होती. 

काल अचानकच चित्रपटाला जायचं ठरवलं. आयत्या वेळेस जाऊनही तिकिटे मिळाली कारण तशी विशेष गर्दी नव्हती. तिथेच काल एका मराठी चित्रपाटाचा premier होता – बहुतेक शेर शिवराज असावा. मला असले शिवाजी महाराज विषयक चित्रपट अजिबात आवडत नाहीत, आणि सध्या तसल्या चित्रपटांचे पेव फुटले आहे. तद्दन भिकार दर्जाचे चित्रपट एकापाठोपाठ एक येत आहेत आणि कदाचित यशस्वी देखील होत असावेत. एकूणच आपला दर्जा किती घसरला आहे याचं हे प्रतीक आहे. असो. 

तिथे अजय पूरकर आणि तसल्या छापाचे आडदांड ४-५ लोकं, एक केतकर का कुणी तरी बाई (हे मला बायकोनी सांगितलं) आणि त्यांच्याबरोबर इतर फ्लेक्स बोर्ड मधून खाली उतरलेले असावेत असे वाटणारे टगे सेल्फी घेत होते. त्यातून सुटका व्हावी म्हणून मी ४-५ मिनिटे आधीच सिनेमा हॉल मध्ये जाऊन बसलो. तर तिथे नव्या चित्रपटाचे ट्रेलर म्हणून परं अजून एक शिवाजी महाराज विषयक चित्रपट – हंबीरराव. प्रवीण तरडे हा गटार माणूस त्यात हिरो म्हणून आहे. त्यातले action सीन बघून हसू आवरत नव्हते. नुकताच RRR हा तेलगू चित्रपट पाहिल्यामुळे हंबीरराव मधील action म्हणजे शाळेतल्या गॅदरिंग मधले नाटुकले वाटते. पण अडाणी लोकांना असे चित्रपट आवडतात. 

आता चित्रपटाविषयी… 

ह्या चित्रपटातल्या मला सगळ्यात आवडलेल्या गोष्टी म्हणजे दिग्दर्शन आणि संगीत. राहुल देशपांडे हा नट नाही. आणि त्यामुळे माझ्या त्याच्याकडून विशेष अपेक्षा देखील नव्हती. पण त्याने दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे काम केले आहे आणि ते जमूनही आले आहे. पुलंच्या भूमिकेत पुष्कराज चिरपुटकरने छान काम केले आहे. हा मुख्य दिग्दर्शनातील फरक आहे. पुलंच्या biopic मधला पुलंची भूमिका करणारा सागर देशमुख हा खरं तर चांगला अभिनेता आहे. त्याचा YZ हा चित्रपट मला आवडला होता. पण दिग्दर्शक मांजरेकर हा सुमार असल्यामुळे आणि त्याची कलात्मकता शून्य असल्यामुळे त्याने पुलंच्या चित्रपटाचे caricature करून ठेवले. 

इथे निपुण ने आणि कास्टिंग डायरेक्टर – चिन्मय केळकर – जो या चित्रपटातील अभिनेत्री अनिता दाते हीच नवरा आहे (असे ,अर्थातच, मला बायकोने सांगितले)) आणि आमच्या शाळेतलादेखील आहे – यांनी पात्रांची निवड अगदी अचूक केली आहे. सारंग साठे (वसंतरावांचे पहिले संगीत शिक्षक सप्रे) आणि अमेय वाघ) मास्तर दीनानाथ मंगेशकर), अनिता दाते (वसंतरावांची आई) यांच्या भूमिका विशेष लक्षात राहण्यासारख्या आहेत. वसंतरावांची पत्नी, कुमार आणि बाल वयातील वसंतराव, त्यांचा मामा (आलोक राजवाडे), दारव्हेकर यांचे काम केलेला अभिनेता, दुर्गा जसराज (बेगम अख्तर) आणि इतर सहाय्यक भूमिकेतले कलाकार देखील चांगले किंवा बरे आहेत. अगदीच वाईट कोणीच नाही. 

संगीत हा या चित्रपटाचा गाभा आहे आणि राहुल देशपांडे यांनी नवीन आणि जुन्या गाण्यांचा सुंदर मिलाफ केला आहे. विशेषतः मला राम राम हे अंगाईगीत, ललना आणि शेवटचे कैवल्यगान हे फारच आवडले.

आमच्या शेजारी एक संगीतातील दर्दी (आहोत असे सतत दाखवणारे) couple बसले होते. अशा लोकांना मी जवळून पाहिले आहे. इतके की मी त्यांचा पिनकोड देखील बरोब्बर सांगू शकलो असतो! त्या सतत कर्तव्य असल्यासारखे कृत्रिम दाद देत होते. आणि ज्याला Computer Engineering मध्ये meta data म्हणतात (म्हणजे data बद्दल अधिक माहिती देणारा data – उदाहरणार्थ – मोबाईल नंबर १० आकडी असतात. त्यामुळे १० हा meta data झाला, कारण तो मोबाईल नंबर बद्दल अधिक माहिती देतो.) तशी माहिती मोठ्या आवाजात सांगत आपले ज्ञान पाजळत होते. अशी लोकं ही इतरांना संगीतक्षेत्रातले मागासवर्गीय समजतात. त्यामुळे मला अशा लोकांचा तिटकारा आहे. पण चित्रपट कोथरूड मध्ये बघत असल्याने अशी लोकं असणारच हे उघड होते. नवश्रीमंतांचं आणि अर्धवट प्रगत आणि बऱ्याचश्या मागास (वैचारिकदृष्ट्या) लोकांची ती जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. बाहेर फ्लेक्स बोर्ड छाप आडदांड गॅंग (जे पावनखिंड, हंबीरराव इत्यादी छाप चित्रपटात रमतात) आणि आतले स्वघोषित संगीततज्ज्ञ यांचा मला तितकाच तिटकारा आहे. पण अगदीच निवडायचे झाल्यास मला स्वघोषित स्वयंघोषित नमुने सुसह्य वाटतात. असो. परत चित्रपटाकडे वळू.    

निपुण धर्माधिकारीचे मला दिग्दर्शक म्हणून कौतुक अशा साठी वाटते की त्याने प्रसंगांची निवड आणि पटकथा अतिशय चांगली केली आहे. ह्या चित्रपटाचा Jukebox Youtube वर आहे, त्यात २२ गाणी आहेत. अर्थातच चित्रपटात ही सगळी गाणी नाहीत. प्रियंका बर्वे चे “बिंदिया ले गई” हे एक सुंदर गाणं चित्रपटात नाहीये. इतरही काही गाणी अर्धवट आहेत. त्यामुळे त्यातल्या कुठल्या गोष्टी, कुठले प्रसंग चित्रपटात दाखवायचे हे एक आव्हान होते. चित्रपटाची लांबी ३ तास आहे, जी जराशी जास्तच वाटते. त्यामुळेच निपुणची तारेवरची कसरत झाली असणार हे नक्की. पण तरी एकूणच त्याने सर्व मुख्य व्यक्तिरेखांना योग्य तो न्याय दिला आहे.

अर्थात काही त्रुटी देखील आहेत. तंत्राच्या बाबतीत बोलायचे तर लाहोर मधली दंगल हे दृश्य अगदीच पाचकळ झाले आहे. काही वेळेस मेकअप किंवा संवाद हे कृत्रिम वाटतात. विशेषतः सुरुवातीला वसंतरावांची आई, मामा आणि ते स्वतः अर्धवट नागपुरी बोली मध्ये बोलतात…उगाचच. त्यात consistency नाहीये आणि ते जमलेलंही नाही. दुसरा मुख्य खटकलेला भाग म्हणजे पुलांची व्यक्तिरेखा आणि त्यांचे वसंतरावांच्या जीवनातले स्थान उगाचच मोठे आणि घनिष्ट दाखवले आहे. अर्थात ते मित्र होतेच. त्यांच्या काही मुलाखती आणि आठवणी Youtube वर उपलब्ध देखील आहेत. पण त्यावर अति भर दिल्यामुळे इतर काही पैलूंना स्थानच देता आलेले नाही. उदाहरणार्थ, त्यांच्या काही गाजलेल्या गाण्यांचा (नाट्यगीते सोडून – उदाहरणार्थ “बगळ्यांची माळ फुले”) साधा ओझरता उल्लेखही नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी “अष्टविनायक” या चित्रपटात अभिनय केला आणि त्यातले त्यांचे “दाटून कंठ येतो” हे गाणं प्रचंड गाजले, जे प्रत्येक मराठी लग्नाच्या DVD / CD मध्ये वापरले जातेच. त्याचाही उल्लेख नाही.

पण ह्या त्रुटी म्हणजे उणिवा नाहीत. त्या असूनही चित्रपट खूपच सुंदर झाला आहे! 

ह्यानंतर मला निपुण धर्माधिकारीचे आधीचे दोन चित्रपट पाहावेसे वाटत आहेत. तसेच त्याचे आगामी चित्रपट पाहायची देखील उत्सुकता आहे. 

One thought on “” मी वसंतराव” विषयी…

Add yours

  1. Are व्वा ! आपला ब्लॉग वाचून आपली चित्रपट सृष्टीत बरीच मोठी कारकीर्द घडली असावी. तसेच आपल्याला चित्रपट निर्मितीचे बरेच ज्ञान असावे असा माझा समज झाला आहे. तरी सुध्दा आपल्याला कोणाचे तरी कौतुक आहे हे वाचून जीव भांड्यात पडला. धन्यवाद !

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: