दैनिक सकाळ मधील रविवारचे राशी भविष्य मी आवर्जून वाचतो. माझा ज्योतिषावर अजिबात विश्वास नसूनसुद्धा!
त्याचं कारण म्हणजे श्रीराम भट यांची अगम्य भाषा!
भविष्याच्या आधी ते एक छोटासा लेख त्या आठवड्याला अनुसरून लिहीतात…त्यातली भाषा मला फार आवडते. इतके क्लिष्ट, दुर्बोध आणि निरर्थक कसे सुचू शकते याचं नवल वाटतं.
उदाहरणार्थः आजचा लेख.
“माणूस हा एक देहाहंकाराचा वाराच आहे” (???)
आणि त्यानंतर पुढे त्याच लेखातः “माणूस हा प्रारब्धाचा एक शिंतोडा आहे” (!!!)
आपण स्वतःच शिंतोडा असल्यावर चारित्र्यहनन केले, चारित्र्यावर शिंतोडे उडवले या भाषेला काही अर्थ उरत नाही. माणसाच्या अहंकाराला मारून त्याला जमीनीवर आणण्यासाठी ही उपमा चांगली आहे! असो.
प्रत्येक आठवड्यात ह्याच प्रकारचे अगम्य, सुरस आणि चमत्कारीक (आणि तरीही नवनवीन) लिहीणं सोप्पं नाही! तुम्ही पण नक्की वाचत जा…

सध्या दिवाळीचं वातावरण आहे. फराळाच्या जाहीरातींचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या आज आलेल्या एका जाहीरातीने माझं लक्ष वेधून घेतले. बघा, तुमच्या लक्षात येतंय का!

मालवणातल्या खाजं या पदार्थाचं त्यांनी “खाज” असं नामकरण केलंय. 😂🤣
इंग्लिश मध्ये मराठी शिकल्याचे परिणाम… हल्ली जागोजागी दिसतात 😱 समाज माध्यमातली (म्हणजे ज्याला मराठीत social media म्हणतात), टीव्ही न्यूज, मालिका, वृत्तपत्रे यातील अशुद्ध भाषा वाचली/ऐकली की अंगाची लाही लाही होते. हिंदीवरून बेतलेल्या मराठीचा सुळसुळाट झाला आहें पण लोकांचाच दर्जा कमालीचा खालवतोय, तिथे भाषेचं काय?
माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात किंवा सापडतात…हा साधा नियम (ब्राह्मण सोडून) कधीच कालबाह्य झाला आहे. त्यामुळे “१०० पैकी ४८ मार्क भेटले” (अशा व्यक्तीचा विचार करून ४८ आकडा निवडला आहे, ९० बरोबर वाटला नसता), “अॅानलाईन डील भेटलं” वगैरे ऐकलं की पूर्वी जेवढ्या यातना व्हायच्या तेवढ्या अजूनही होतात, पण आता ते सहन करायची शक्ती थोडी वाढली आहे. भिती ही आहे की कालांतरानी शुद्ध आणि शुभ्र भाषा ज्यांच्याशी बोलता येईल अशी लोकं पुरेशी शिल्लक राहतील की नाही. असो.
तर, मालवणी खाजं…हा एक विकार नसून एक पदार्थ आहे. मालवणी खाज हे राजकारणातल्या एका कुटुंब त्रयीला उद्देशून लिहीता येईल, पण खाजं आणि खाज यात गफलत करू नये हीच माफक अपेक्षा!
Leave a Reply