
काल रात्री मी “संदीप, वैभव…आणि कविता” हा कार्यक्रम पाहिला.
लहानपणी शाळेत असताना कविता हा माझ्या आवडीचा विषय अजिबात नव्हता. त्याला कारण, पु.ल. देशपांडे यांनी “बिगरी ते मॅट्रीक” मध्ये सांगितल्याप्रमाणे, आमचे शिक्षक. त्यांना ज्यापद्धतीने “खबरदार जर टाच मारूनी याल पुढे…” ही कविता शिकवली होती त्याहून वाईट पद्धतीने आम्हाला आमच्या शिक्षकांनी कविता शिकवल्या. म्हणजे कवितेबद्दल तिटकारा निर्माण होईल याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली.
आमची माध्यमिक शाळा फक्त मुलांची होती…मुलींची शाळा वेगळी होती. त्यामुळे “कविता” नावाचं “तसं” काही आवडावं ही पण शक्यता नव्हती. नंतर ज्युनिअर कॅालेज मधे आणि मेकॅनिकल इंजिनिअरींग मधे पण आम्ही मुलींपासून लांबच असायचो. त्यातच माझ्या काही प्रेमात वरचेवर पडणाऱ्या मित्रांच्यामुळे कवितेशी जरा संबंध आला, पण तरी कविता म्हणजे प्रेम, चंद्र, तारे, विरह वगैरे एवढंच असतं असा पक्का समज झाला होता. मी एकूणच रूक्ष असल्यामुळे अशा भावनेची उलटी झाल्यासारख्या कवितांचा मला तिटकारा होता.
पण नंतर मला जाणवायला लागले की त्या तिटकाऱ्याचे कारण “कविता हा प्रकार वाईट असतो” हे नव्हते तर “दर्जेदार कवितांची मला ओळख झाली नव्हती” हे होतं. खरंतर हे सगळ्याच बाबतीत लागू होतं…मग तो कुठलाही साहित्य प्रकार असो किंवा कला/क्रिडा प्रकार किंवा कोणतीही व्यक्ती. आपली आवड निवड ही त्यांची ओळख कधी (वयाच्या, व्यक्तीमत्व विकासाच्या कोणत्या टप्प्यात) आणि कुठल्या दर्जाशी होते यावर आपली आवड develop होते. सुरूवात वाईट झाली तर पटकन तिटकारा निर्माण होतो. असो. तर, हळूहळू मला प्रेमकविता सोडून बाकी प्रकारच्या कविता आवडू लागल्या. कालांतरानी (एका व्यक्तीच्या आयुष्यात येण्याने) मला प्रेम कविता पण आवडू लागल्या. अर्थात सरसकट नाही, पण निवडक, दर्जेदार…
विंदा करंदीकर, शांता शेळके आणि बोरकर यांच्या कविता मला खूप जास्त आवडल्या…कुसुमाग्रज, वसंत बापट, ग्रेस यांच्या त्यामानानी कमी…क्वचित.
नव्या पिढीतल्या संदीप खरेच्या कविता आवडतात, आणि गेल्या ३-४ वर्षात वैभव जोशी याच्या. वैभव जोशीची ओळख त्याच्या दारूबद्दलच्या कवितेमुळे (एक पेग म्हणता म्हणता…) झाली. तुम्ही ती ऐकली नसेल तर इथे लिंक देत आहे, नक्की बघा!
लॅाकडाऊनच्या काळात युट्यूबवर “कवितेचं गाणं होताना” आणि “कवितेचं पान” ह्या दोन्ही मालीका पाहिल्या आणि खूप आवडल्या. त्यातच एक एपिसोड संदीप खरे आणि वैभव जोशी या दोघांवर आहे.
मी ह्रृदयनाथ मंगेशकर यांचा “भावसरगम” हा कार्यक्रम गेल्या २५-३० वर्षांत अनेकदा पाहिला आहे – रामनवमी उत्सवात फुकटात (केसरीवाडा किंवा दगडूशेठ च्या कार्यक्रमात दरवर्षी) किंवा नंतर नाट्यगृहात तिकीट काढून. तसेच “आयुष्यावर बोलू काही” हा संदीप खरे आणि डॅा. सलील कुलकर्णी यांचा कार्यक्रम पण अनेकदा पाहिला. त्यातून मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे कवितेचा प्रभाव हा सादरीकरणार जास्त अवलंबून असतो. निदान माझ्या बाबतीत तरी हे खरे आहे. पुस्तकातली जी कविता वाचून मला विशेष आवडत नाही ती कदाचित कवीकडून ऐकताना आवडते, जास्त भावते. अर्थात काही कविता इतक्या चांगल्या असतात की त्या वाचूनही खूप आवडतात. पण मी इतर, सर्वसाधारण कवितांबद्दल बोलतोय…
त्यामुळे जेव्हा ह्या कार्यक्रमाची जाहिरात पाहिली तेव्हा लगेच बुकिंग केले. त्याआधी माझ्या दोन मित्रांना मोठ्या मुष्किलीने तयार केले.
कार्यक्रम छान होता! विविध प्रकारच्या, मूडच्या कविता त्या दोघाकडून थेट ऐकताना, मध्ये त्यांचे विवेचन, एकमेकांना आणि प्रेक्षकांना काढलेले चिमटे आणि कोपरखळ्या यामुळे २ः३० तास कार्यक्रम खिळवून ठेवतो. कुठेही ते दोघे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत माहीत. संदीपने एका ठिकाणी “दोन मख्ख चेहऱ्याच्या, निर्विकार प्रेक्षकांचा” उल्लेख केला…त्यातला एक नक्कीच मी होतो!
संदीपने आणि वैभवने त्यांच्या एकेक नवीन कविता सादर केल्या (संदीपची “सांगत होतो” आणि वैभवची WhatsApp बद्दलची कविता अप्रतिम!)
रू. ४००/३००/२०० असे कवितावाचनाच्या कार्यक्रमाचे तिकीट ठेऊनही लोकं गर्दी करतात हे चांगले लक्षण आहे. यूट्यूबर यांच्या, किंवा अशा अनेक कविता उपलब्ध असूनही लोकं Live show ला येतात याचा अर्थ लोकांना प्रत्यक्ष अनुभव आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग जास्त आवडतो. त्यामुळेच chatGPT वगैरे आले तरी कविता सादरीकरणाला त्याचा (सध्यातरी) धोका नाही.
माझे असे मत आहे की चित्रपटातल्या गाण्याचे live shows (concerts) हे रेकॅार्डेड गाण्या इतके प्रभावी कधीच होत नाहीत (उदाः ए. आर. रहमान चे शो). तिथे गर्दी होते ती त्या कलाकारांना प्रत्यक्ष पहायला आणि गर्दीच्या एकत्रित परीणामामुळे, मानसिकतेमुळे (तीच गोष्ट क्रिकेट, फूटबंाल, टेनिस लाही लागू होते). पण शास्त्रीय गायन, वादन आणि कवितावाचनाच्या बाबतीत ते उलट आहे…तिथे recorded किवा online पेक्षा live बघायला, ऐकायला जास्त मजा येते! कारण दरवेळचा performance, experience वेगळा असतो. संदीप खरे याबद्दल नेमकेपणानी कालच्या कार्यक्रमात नदीचे उदाहरण देऊन बोलला. त्यात त्याने ज्या quote/thought चा आषय सांगितला, पण तो quote सांगितला नाही, तो असा आहेः
You cannot cross the same river twice; because it’s not the same river and it’s not the same you!
अशा कार्यक्रमांचंही तसंच आहे. संदीपने सांगितल्याप्रमाणे दोघे कवी आणि प्रेक्षक मिळून त्या दिवशीच्या कार्यक्रमाला आकार देतात (scripted, साचेबद्ध असा नसतो) आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रमाचा अनुभव वेगळा, कमी-अधिक परिणामकारक होतो. माझ्यासाठीतरी कालचा कार्यक्रम खूपच enjoyable, memorable होता!
Leave a Reply