Search

ekoshapu

Notes to Myself

Category

वाचन आणि विचार

अधिकस्य अधिकं फलं…

आज १६ मे २०१८ पासून  ते १३ जून २०१८ पर्यंत अधिक मास (अधिक महिना) आहे.

जगभर वापरले जाणारे “ग्रेगोरियन” कॅलेंडर हे माणसांच्या सोयीनुसार बनवले आहे. पूर्वी त्यात १० च महिने होते. कालांतरानी “जुलै” हा ज्युलिअस च्या नावावरून आणि “ऑगस्ट” हा “ऑगस्टीन” च्या नावावरून जोडले गेले. Septa (सप्त = ७), Octa (अष्ट = ८), Nona (नवं  = ९) आणि Deca (दश = १०) ह्या अर्थानी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि डिसेंबर हे महिने ७,८,९,१० क्रमांकाचे होते. जुलै आणि ऑगस्ट महिने मध्ये घुसडल्यामुळे ते ९,१०,११,१२ क्रमांकावर गेले.

ग्रेगोरियन कॅलेंडर आपल्या सोयीसाठी असल्यामुळे त्यात ३० किंवा ३१ दिवसांचा महिना असे सोप्पे सूत्र ठेवले आहे. तसेच दिवसाची सुरुवात “००:००:००” पासून होऊन “२३:५९:५९” ला दिवस संपतो. पण याचा निसर्गाशी काही संबंध नाहीये. पुढे दर ४ वर्षांनी १ दिवस लीप दिवस म्हणून वाढवून पृथ्वीच्या गतीशी समतोल साधण्याचा प्रयोग केला जाऊ लागला. हे कॅलेंडर लोकप्रिय आहे कारण ते सुटसुटीत आहे आणि ते आपल्या दैनंदिन कामकाजाला उपयुक्त आहे.

भारतीय (हिंदू) कालगणना ही निसर्गचक्रावर आधारीत आहे. दिवस हा ग्रेगोरियन कॅलेंडर सारखा “काल्पनिक मध्यरात्री – १२ वाजता” सुरु ना होता, सूर्योदयानुसार सुरु होतो. म्हणजे रोजचा सूर्योदय थोडा वेगळा असेल तर रोजच्या दिवसाची सुरुवात वेगळी. महिना हा २८ दिवसांचा असतो (एक पौर्णिमा आणि एक अमावास्या).

हिंदू कालगणनेतील ६ ऋतू देखील निसर्गाशी  निगडीत आहेत. वसंत (चैत्र, वैशाख) हा इंग्रजी “Spring” शी साधर्म्य असलेला ऋतू आहे. तसेच ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ऋतू पुढील २-२ महिन्यात येतात. या प्रत्येक ऋतूत निसर्गचक्राला अनुसरून असे विविध सण साजरे केले जातात.

थोडक्यात, हिंदू कालगणना, पंचांग हे खूप स्वतंत्र आणि पुढारलेले होते/ आहे. पंचांग चा खरा संबंध खगोलशास्त्राशी आहे, “ज्योतिष” या विषयाशी नाही.

असो. आता पुन्हा अधिक मास कडे वळू. सौरवर्ष (ज्यावर ग्रेगोरियन कॅलेंडर आधारलेले आहे) साधारणपणे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४५ सेकंद इतक्या कालावधीचे असते. म्हणूनच ग्रेगोरियन कॅलेंडर हे ३६५ दिवसांचे असते. आणि वरील ” ५ तास ४८ मिनिटे आणि ४५ सेकंद” यांची सोय लावण्यासाठी दर ४ वर्षांनी एक लीप दिवसाची तरतूद केली आहे (खरं तर दर ४ वर्षांनी एक पूर्ण दिवस वाढवणे चुकीचे आहे कारण ३६५ दिवसांवरील कालावधी हा पूर्ण ६ तास नाहीये (तास असता तर दार ४ वर्षांनी २४ तास म्हणजे एक दिवस वाढवता आला असता). पण हा काळ ६ तासांपेक्षा थोडा कमी ( ५ तास ४८ मिनिटे आणि ४५ सेकंद ) असल्यामुळे त्याची तजवीज करण्यासाठी दर १०० वर्षांनी एक दिवस कमी केला जातो आणि दर ४०० वर्षांनी एक दिवस वाढवला जातो. म्हणजे १७००, १८००, १९०० ही वर्ष लीप वर्ष नव्हती (कारण त्यांना ४ ने भाग जातो, पण ४०० ने नाही. पण १६००, आणि २००० ही वर्षे लीप वर्षे होती कारण त्यांना ४०० ने भाग जातो).

हिंदू कालगणनेत सौरवर्षाऐवजी चांद्रवर्ष हे प्रमाण मानले आहे. चांद्रवर्ष हे सरासरी ३५४ दिवस ८ तास, ३८ मिनिटे आणि २४ सेकंद इतक्या कालावधीचे असते. त्यामुळे एका सौरवर्षात आणि चांद्रवर्षात साधारण ११ दिवसांचा फरक पडतो, म्हणजे दर ३ वर्षांनी ३३ दिवसांचा फरक पडतो. हा फरक जर असाच पडत राहिला तर चांद्रमास काही वर्षांनी वेगळ्या ऋतूमध्ये येतील. हे टाळण्यासाठी आणि चांद्रवर्ष आणि सौरवर्ष ह्यातला समतोल राखण्यासाठी “अधिक मास” ची तजवीज केली आहे. म्हणजे साधारणपणे दर ३ वर्षांनी “अधिक मास” येतो. वरच्या ३ दिवसांची सोय (कारण ३ वर्षांनी ३३ दिवसांचा फरक पडतो) करण्यासाठी तिथीचा “क्षय” केला जातो.

 

ज्या महिन्याला जोडून अधिक मास येईल त्याला त्याचे नाव दिले जाते. उदाहरण चैत्र महिन्याला जोडून “चैत्र अधिक” असे. अधिक महिना हा शुभ मानला जातो. “अधिकस्य अधिकं फलं”. म्हणजे अधिक मास हा अधिक चांगले फळ देतो. ज्या चांद्रमहिन्यात सूर्य राशीबदल करत नाही तो महिना अधिक महिना असतो. त्यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणतात. ह्या वर्षी “ज्येष्ठ अधिक” आहे. माझा जन्म हा “ज्येष्ठ अधिक” महिन्यात झाला होता. दर ३ वर्षांनी अधिक मास असे करत आता ३८ वर्षांनी पुन्हा एकदा “ज्येष्ठ अधिक” आला आहे. खरा तर १२x ३=३६ वर्षांनी पुन्हा तोच अधिक महिना यायला हवा. पण दर “३ वर्षांनी” हे अचूक नाही तर “ढोबळमानाने”. म्हणूनच ज्येष्ठ अधिक ३८ वर्षांनी आला आहे. (चतुर वाचकांना माझ्या वयाचा अंदाज आला असेलच!)
अधिक महिन्यात दानाचे महत्व असते. दान कशाचे तर आपल्या आवडत्या वस्तूचे! आपली आवडती वस्तू दान करायची, देऊन टाकायची किंवा सोडून द्यायची… त्याग करायचा. दान केलेल्या किंवा त्याग केलेल्या गोष्टीतून आपले मन पूर्ण काढून घ्यायचे. अशी एक प्रथा आहे.माझ्याकडे दान देण्यासारखे विशेष काही नाही (अशी माहिती किंवा ज्ञान सोडून…पण ते दान केल्यानी संपत नाही). पण त्याग करण्यासारखे बरेच काही आहे. विशेषतः आठवणी…त्यामुळे काही आठवणी आणि त्यांच्याशी संबंधीत वस्तू त्याग करायच्या किंवा नष्ट करायच्या असा माझा संकल्प आहे. बघू जमतंय का…
अधिकस्य अधिकं फलं!
😆😆😆😎😎😎
Advertisements

मटा संवाद: वाचनीय लेख (उत्तरार्ध)

मागच्या आठवड्यात मी मटा संवाद मधील एक वाचनीय लेख इथे पोस्ट केला होता. त्या लेखाचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला आहे तो इथे शेअर करत आहे…

मटा संवाद: वाचनीय लेख

नुकताच “न्यूड” हा कलात्मक मराठी चित्रपट रिलीज झाला. मी अजून पाहिला नाही. पण परिक्षणं चांगली आहेत आणि विषय ही बोल्ड आहे, पण आक्षेपार्ह असे काही नाही असे ऐकले.

त्याच सुमारास “शिकारी” हा मराठी “बोल्ड, चावट, दादा कोंडके छाप” चित्रपट रिलीज झाला. आणि “न्यूड” सारख्या बोल्ड, कलात्मक चित्रपटाला झाकोळून टाकले. (मी हा चित्रपटही पाहिलेला नाही).

असो. तर नुकताच “मटा संवाद” मधे “न्यूड पोर्ट्रेट” करणाऱ्या एका स्त्री कलाकाराचा संदर लेख वाचला.

मला त्याची आॅनलाईन लिंक मिळाली नाही, म्हणून फोटो शेअर करत आहे. नक्की वाचा…

Good Read: Zen and The Art of Bookselling

There are many booksellers who sell books on pavements, or road-side, but very few do it passionately. I know few such people in Pune and visit their stalls often and also get good books at bargain price.

Recently one such person – Sameer featured in a Marathi newspaper. Sameer has started a WhatsApp group for book lovers and regular visitors of his stall on Lakdi Pool (I am also a member), where he shares info about good, rare books and people instantly book them. At times he conducts auction of rare books and people fiercely bid for them and often raise prices multi-fold. Here is a newspaper clipping about Sameer from Loksatta (Marathi daily).

eb197a9c-6c7c-4c09-ab88-a8fdd5625e4a

The reason I remembered this and decided to write this blog is that I came across this wonderful article recently about a bookseller in Mumbai and thought of sharing it as part of the Good Read series.

Bablu has said some very profound things in his video! Worth watching!

I am reproducing the article from Scroll.in (along with link to original article and video).


 

Bookseller


Source: https://scroll.in/video/864917/watch-this-pavement-bookseller-of-mumbai-could-teach-all-salespeople-a-thing-or-two

Strategy Diamond आणि Arena

मला (दोन) MBA करताना काही concepts, theories, models, frameworks विशेष आवडल्या किंवा relevant वाटल्या. (कदाचित बाकीच्या नीट समजल्या नसतील). त्यातले एक framework म्हणजे The Strategy Diamond.

The Strategy Diamond

कोणतेही मॉडेल/फ्रेमवर्क जर नुसतं theoretical / पुस्तकी राहिलं तर ते तितकंसं अपील होत नाही आणि लक्षात राहात नाही. पण जर आपल्या आजूबाजूच्या उदाहरणातून ते दिसले तर मात्र ते पक्कं लक्षात राहतं. म्हणूनच मला समजलं तसं आणि त्या उदाहरणातून The Strategy Diamond मॉडेल मधल्या “Arena” ह्या component बद्दल हा ब्लॉग लिहितोय.

Arena is – “the field where you / organization want to compete – it could be products, services, channels, market segments, geographies, technologies, value chain stages”. In some cases companies can “choose” the arena – especially when they are launching new product/service, entering new market or just starting up. In many cases you cannot choose arena, but still you have to understand the arena to position yourself vis-a-vis competitors.

Amazon आणि Flipkart यांचं Arena काय आहे? Product/Services ह्या दृष्टीने ते बऱ्यापैकी सेम आहे (खरं तर Amazon चा व्याप खूप मोठा आहे, पण तरी सर्वसामान्य लोकांना माहिती असलेला  Amazon चा व्यवसाय हा फ्लिपकार्ट सारखाच आहे). पण geography च्या दृष्टीने विचार केला तर Amazon चा Arena खूप मोठा आहे. जगभर त्यांचा पसारा आहे. एकाच वेळी ते भारतात Flipkart तर चीन मध्ये अलीबाबा शी स्पर्धा करतात, तसेच वॉल-मार्ट सारख्या brick and mortar retail chain शी पण स्पर्धा करतात.

Arena मोठा असण्याचे काही खास फायदे असतात. You can gain a lot more just by being part of a larger Arena. याची २-३ उदाहरणं मला जाणवली.

नुकताच मी फोर्ब्स इंडिया मॅगझीनचा “सेलिब्रिटी स्पेशल” अंक वाचला. गेली ५-६ वर्षे मी तसा अंक वाचतो आहे,ट्रॅक करतो आहे त्यातूनच मला ही २ उदाहरणे जाणवली.

पहिले उदाहरण – “द कपिल शर्मा शो” आणि त्याचा “poor Marathi cousin” “चला हवा येऊ द्या” यांचे.

हिंदी चॅनेल वरचा गेल्या काही वर्षातला लोकप्रिय कॉमेडी शो “द कपिल शर्मा शो” हा काही ओरिजिनल किंवा युनिक शो नाही. अमेरिकेतल्या तशाच फॉरमॅट च्या अनेक शोवरून तो कॉपी केला आहे. हिंदी मध्ये ही शेखर सुमन चे काही शो त्या फॉरमॅट वर आधारित होते आणि लोकप्रिय ही होते. पण आता मुख्य बदल काय घडला असेल तर तो म्हणजे “Arena” खूप बदललाय – हिंदी टीव्ही चा कॅनव्हास खूप मोठा आणि श्रीमंत झालाय. शेखर सुमन वगैरे लोकं जेव्हा शो करायचे तेव्हा फिल्म स्टार टीव्ही कडे वळले नव्हते. टीव्ही लोकप्रिय असला तरी “श्रीमंत” नव्हता. आता तसं राहिलं नाहीये. आणि त्यामुळे कपिल शर्मा ला तसाच शो करून अफाट पैसा मिळाला. अफाट म्हणजे किती? तर गेली पाच वर्षे तो फोर्ब्स इंडिया च्या सेलिब्रिटी १०० लिस्ट मध्ये आहे (#96 in 2012, #93 in 2013, #33 in 2014, #27 in 2015, #11 in 2016, #18 in 2017). फोर्ब्स इंडिया नुसार त्याचे नेट वर्थ १४५ कोटी रुपये आहे! मागच्या वर्षीची कमाई रू. ४०-५० कोटी!

मराठीत टीव्ही वर त्याच धर्तीवर “चला हवा येऊ द्या” हा शो होतो. जे लोकं दोन्ही शो बघायचे त्यांना जाणवले असेल की दर्जाच्या बाबतीत (creativity, quality of humor decency etc) मराठी शो खूपच चांगला होता, “द कपिल शर्मा शो पेक्षा”. त्या शो ची लोकप्रियता इतकी होती की शाहरुख, आमीर, अक्षय सारखे अनेक हिंदी स्टार त्यांच्या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशन करता “चला हवा येऊ द्या” ला येऊन गेले.

पण तसे असूनही त्या शो च्या कलाकारांना आणि मुख्यतः “डॉ निलेश साबळे” यांना (शो चे अँकर – “कपिल शर्मा” चे equivalent) त्यांना इतका मोठा आर्थिक फायदा नक्कीच मिळाला नाही.  ह्याचं मुख्य कारण म्हणजे मराठी टीव्ही माध्यम अजूनही हिंदी च्या तुलनेत फार छोटं आहे. एकूण उलाढाल आणि प्रेक्षकसंख्या इ. हिंदी टीव्ही च्या जवळपासही नाहीये. त्यामुळे मराठीतला “तुफान लोकप्रिय” सुद्धा कमाईच्या बाबतीत किंवा बजेटच्या बाबतीत हिंदीशी बरोबरी करू शकत नाही.

तीच गोष्ट बॉलिवूड आणि हॉलिवूड च्या बाबतीत. ह्या वर्षीची फोर्ब्स इंडिया ची लिस्ट बघा.

img_6903

अक्षयकुमार, विराट कोहली यांची कमाई साधारण रु. १०० कोटी च्या आसपास आहे.

त्याच मॅगझीन मध्ये काही इंटरनॅशनल यंग सेलिब्रिटी बद्दल पण माहिती आहे. त्यातलेच एक नाव “प्लेबॉय कार्टी”, वय २१ 🙂

img_6902

त्या “कार्टी” ची (किंवा कार्ट्याची!) मागच्या वर्षीची कमाई होती $14.5 million, म्हणजे सुमारे रु. ९६ कोटी! आणि तो Top 200 सेलिब्रिटी लिस्ट मध्ये पण नाहीये. म्हणजेच हॉलिवूड चा “Arena” हिंदी/भारतीय “Arena” च्या कित्येक पट आहे, त्यामुळे तिथल्या दुय्यम/ तिय्यम दर्जाच्या कलाकाराची कमाईदेखील हिंदीमधल्या टॉप कलाकारांच्या तोडीची किंवा जास्तच असते.

So just by being part of a huge “Arena” you can possibly make far more money, create far bigger impact.

ह्याचं दुसरं आणि खूप बोलकं उदाहरण म्हणजे आमीर खानच्या “दंगल” ह्या चित्रपटाचं. हिंदी मधील प्रचंड गाजलेल्या आणि यशस्वी चित्रपटांची झेप तोवर रु. २००-३०० कोटी इतकीच होती (आणि ते सगळे आमीर किंवा सलमान खान यांचेच चित्रपट होते). रु. २००-३०० ही भारतातली कमाई. परदेशातली साधारण रु. १००-१२५ कोटी. कारण परदेशात भारतीय चित्रपटांचं मार्केट कमी आहे… किंवा तसा समज होता…

दंगलनी ह्या पलीकडे झेप घेऊन भारतात रु. ५११ कोटी आणि परदेशात रु. २०५ कोटी इतकी कमाई केली! पण खरी गंमत (“Arena” ची) पुढेच आहे. आजपर्यंत परदेशातले भारतीय चित्रपटांचे मार्केट म्हणजे “परदेशी स्थायिक असलेले भारतीय” असाच समज होता. भारतीय sensibility चे चित्रपट संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात आवडू शकतील असं कोणालाही वाटत नव्हतं. थोड्या फार प्रमाणात परदेशी लोकांना काही प्रकारचे भारतीय चित्रपट आवडायचे (आवरा रशिया मध्ये प्रचंड लोकप्रिय होता. मिथुन चा डान्स डान्स आणि भप्पी लाहिरीची गाणी सोव्हिएट रशिया प्रांतात प्रचंड लोकप्रिय होती. माझा MBA चा एक क्लासमेट Georgia मधला होता आणि एक Azerbaijan मधला. दोघांनाही “कोई यहा नाचे नाचे” आणि “I am a Disco Dancer” छाप गाणी पाठ होती!). पण परदेशात मोठ्या प्रमाणावर भारतीय चित्रपट अजूनही पाहिले जात नाहीत.

आणि याच पार्श्वभूमीवर “दंगल” चीन मध्ये प्रदर्शित झाला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. इतका की फक्त चीनमधील कमाई रु. १००० कोटी पेक्षा जास्त झाली (काही रिपोर्टनुसार रु. १४०० कोटी) !

dangal-chinese-images-photos-poster.jpg

याला म्हणतात “Arena” चा impact. The same film could barely cross Rs. 500 Crore in Indian market (at home). And it managed twice that in a completely new and unexplored market, mainly because of currency difference and equally big market (population).

दंगल ची कथा, त्याची सेन्सिबिलिटी युनिव्हर्सल (वैश्विक) आहे हे मुख्य कारण आहेच, पण तशा प्रकारचे चित्रपट आधीही होते. किंवा भारतात ना चाललेला चित्रपट कदाचित चीन किंवा इतर unexplored मार्केटमध्ये खूप चालला असता. पण तसा कोणी प्रयत्नच केला नव्हता. सर्व भारतीय फिल्ममेकर हे आपल्याच छोट्या “Arena” मध्ये खेळत होते.

दंगल च्या चीनमधील यशाचा परिणाम किती होता याचा अंदाज यासंदर्भातली एक बातमी नुकतीच वाचली तेव्हा आला.

“दंगल”वाल्या आमीर खानचा “सिक्रेट सुपरस्टार” हा चित्रपट चीनमध्ये नुकताच प्रदर्शित झाला. भारतात यथातथाच चाललेला हा चित्रपट (म्हणजे साधारण रु. ५०-७० कोटी), चीन मध्ये पहिल्या क्रमांकावर गेला. पहिल्या तीन दिवसातली त्याची कमाई रु. १७५ कोटी झाली!

1516371632-Secret_Superstar_China_BO

ह्या यशानंतर आमीर खान त्याचे पूर्वीचे काही चित्रपट “लगान” आणि “तारे जमीन पर” हे चीनमध्ये प्रदर्शित करणार असे वाचले. चीनच्या लोकांना आवडतील असे जुने चित्रपट तिथे पोचले तर अजूनही ते प्रचंड कमाई करू शकतात.

म्हणजे ह्या यशामुळे भारतीय चित्रपटांना एक नवीन (आणि प्रचंड) मार्केट मिळाले आहे. Arena has just got bigger and richer!

मला strategy या विषयाच्या दृष्टीकोनातून हा धडा खूप महत्वाचा वाटतो. बर्गर हे आपल्या वाडा-पाव सारखं फास्ट-फूड. पण ते त्यांनी World Arena मध्ये नेलं. आणि तो इतका मोठा व्यवसाय झाला की एकट्या McDonald’s ची जगभरात ३६,००० outlets आहेत आणि तिथे रोज ७ कोटी लोकं जातात. एकट्या McDonald’s चा वर्षाचा रेव्हेन्यू $२५ बिलियन (सुमारे रु. १,६५,००० कोटी , किंवा इन्फोसिस च्या २-२.२५ पट आहे). बाकी बर्गर किंग वगैरे वेगळेच.

मग आपण वाडा-पाव किंवा पुणेरी मिसळ World Arena मध्ये नेऊ शकतो का? कुणी सांगावं एखाद्या चीन, रशिया, आफ्रिका सारख्या देशात मिसळ इतकी लोकप्रिय होईल की मराठी मिसळवाले अब्जाधीश होतील!

नम्र सूचना वजा आदेश: हा ब्लॉग वाचून कोणी तसे अब्जाधीश झालेच तर निदान मला कल्पना सुचवल्याबद्दल रु. ११ दक्षिणा (आणि जन्मभर मिसळीचा रतीब) द्या!

 

 

 

 

बोधकथा…

मला आयुष्यात मिळालेले वक्त्रुत्व स्पर्धेतले एकमेव बक्षीस ह्या गोष्टीमुळे मिळाले. (इयत्ता ६ वी मधे. तेही ३ रे बक्षीस). तेही वक्त्रुत्व गुणांपेक्षा ह्या गोष्तीतील भाबडेपणाला मिळाले असावे.

६ वी चे वर्ष माझ्यासाठी विशेष संस्मरणीय होते कारण मला हस्ताक्षर स्पर्धेत पहिले, चित्रकलेत दुसरे तर कथाकथनात तिसरे बक्षीस मिळाले होते.

असो. स्वतःचे कौतुक पुष्कळ झाले. आता गोष्ट सांगतो…
————————————————————————————————————
आटपाट नगर होते. तिथे एक राजा राज्य करत होता. त्याने आजूबाजूची लहान मोठी राज्ये जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला होता.

राज्याच्या तिजोरीत भरपूर खजिना आणि धान्यकोठारात भरपूर धान्य होते. एकूणच राज्यकारभार चांगला चालला होता. पण तरीही राजाला मन:स्वास्थ्य नव्हते.

आपण कुठे तरी अपुरे पडत आहोत असे त्याला वाटायचे.

एके रात्री तो असाच वेष बदलून राज्यात फेरफटका मारायला निघाला. जाता जाता त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीतून त्याला गाणे गुणगुणण्याचा आणि काम करत असल्याचा आवाज ऐकु आला. इतक्या रात्री कोणी तरी तरी काम करत आहे हे पाहून राजाची उत्सुकता चाळवली गेली. तो झोपडीपाशी गेला आणि आत डोकावून पाहू लागला.

आत एक लोहार आपले काम करत होता. राजाला बघताच तो काम करायचे थांबला. त्याने राजाला ओळखले नाही पण तरीही कोणी एक वाटसरु आपल्या दाराशी आला हे पाहून त्याने राजाला बसायला पाट पुढे केला आणि प्यायला पाणी दिले. तो काम करुन दमल्याचे त्याचा चेहरा स्पष्टपणे दाखवत होता पण तरीही तो आनंदी आणि समाधानी वाटत होता.

इकडचे तिकडचे प्रश्न न विचारता राजाने त्याला थेट प्रश्न विचारला, “तुम्ही खूप आनंदी दिसता. ह्याचे कारण काय?” लोहार म्हणाला, “असेलही कदाचीत. ह्याच्याबद्दल विचार करायला मला कधी वेळच मिळाला नाही.” त्याच्या इतक्या बेफ़िकिर आणि निर्विकार पणाचे राजाला खूप वैषम्य वाटले. तो म्हणाला, “नक्कीच तुम्ही खूप पैसे मिळवत असणार, खूप नावलौकीक कमावत असणार. अगदीच काही नाही तर निदान देवपूजा आणि दानधर्म तरी भरपूर करत असणार.” लोहार उत्तरला, “भल्या माणसा, तू आत्ता जाणीव करून दिलीस तेव्हा मला जाणवले की मी ह्यातले काहीच करत नाही. खर सांगायचे तर हे सगळे करण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. पूर्ण दिवस मी राब-राब राबतो आणि मिळेल तो सगळा पैसा खर्च करतो. मग मी हे सर्व कधी आणि कुठल्या पैशानी करणार?”

राजा चक्रावला. त्याने विचारले, “म्हणजे. तू मिळवतोस किती आणि त्या पैशाचे तू करतोस तरी काय?”

लोहार म्हणाला, “मी जे काही मिळवतो त्याचे ४ भाग करतो. एक भाग स्वत: खातो, एक भाग कर्ज फेडतो, एक भाग उधार देतो आणि एक भाग नदीत फेकतो. बस्स.”

राजा उतावळे पणाने म्हणला, “अरे बाबा असे कोड्यात बोलू नकोस. नीट स्पष्टपणे सांग याचा अर्थ.”

लोहार म्हणला, “मी एक भाग खातो म्हणजे एक भाग स्वत: वर, माझ्या पत्नीवर खर्च करतो.

एक भाग कर्ज फेडतो म्हणजे तो भाग माझ्या आई-वडिलांवर खर्च करतो आणि त्यांचे उपकार माझ्या परीने फेडण्याचा प्रयत्न करतो.

एक भाग उधार देतो म्हणजे माझ्या मुलावर खर्च करतो. म्हातारपणी तो माझी काळजी घेईल हीच त्या मागची स्वार्थी भावना आहे.

आणि राहिलेला शेवटचा भाग मी नदीत फेकतो. म्हणजे माझ्या मुलीवर खर्च करतो. आज ना उद्या ती सासरी जाणार. तोवर तिला सांभाळणे हे माझे कर्तव्य आहे. त्यानंतर माझ्या तिच्याकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. हे सगळे करता करता आपण म्हणालात त्या गोष्टींचा विचार करायला मला वेळच मिळत नाही”

राजा काय समजायचे ते समजला. तो तिथून उठला आणि निमूटपणे निघून गेला.

मन:शांती मिळावी म्हणून काय करावे असा प्रश्न आता त्याला पडला नव्हता.

Currency आणि Cryptocurrency

सध्या बिटकॉइन खूप गाजत आहे. त्यावरून बिटकॉइन सारख्या Cryptocurrency बद्दल माझी अनेकांशी बरेचदा चर्चा होते. काही लोकांनी त्यात थोडे फार पैसे कमावले आहेत, किंवा कमवायची इच्छा आहे. तर काहींना ती खूप दूरगामी परिणाम करणारी गोष्ट वाटते. उदा: २०४० पर्यंत सगळे व्यवहार फक्त बिटकॉइन नी च होणार, नाही झाले तर नाव बदलेन… (स्वतःचे का बिटकॉइन चे ते सांगायचं सोयीस्करपणे टाळतात)

माझं अगदी स्पष्ट आणि थोडक्यात सांगायचं तर बिटकॉइन (or any cryptocurrency) हा at best एक bubble (फुगा) आहे, आणि at worst खूप मोठी फसवणूक (like a Ponzi scheme) आहे.

का ते सांगतो. पण त्याआधी Currency आणि Cryptocurrency याबद्दल थोडंसं…

प्रथम पैसा या संकल्पनेबद्दल.

There are three basic functions of money. Money serves as a medium of exchange, as a store of value, and as a unit of account.

Medium of exchange: Money can be used for buying and selling goods and services.

पैशाचा उपयोग खरेदी-विक्री साठी केला जातो. पूर्वी barter system होती तेव्हा (उदाहरणार्थ) काही लोकं एक डझन चिक्कू देऊन त्याबदल्यात एक किलो तांदूळ घेत असतील, तेच काही लोक त्याबदल्यात ३ किलो तांदूळ मागत असतील. म्हणून common base/denominator या अर्थानी पैशाचा वापर उपयुक्त ठरला. “Price” of everything could be expressed in a common base called Money.

Unit of account: Money is the common standard for measuring relative worth of goods and service.

पैसा ही कल्पना वस्तू आणि सेवांचे “मूल्य” मोजायला उपयोगी पडते. Unit of account म्हणजे जसे किलोग्रॅम, किंवा लिटर, डिग्री सेल्सिअस हे वस्तूंचे  भौतिक गुणधर्म “मोजायला” वापरतात, तसं पैसा हे मूल्य “मोजायला” वापरतात.

Store of value: Money’s value can be retained over time. It is a convenient way to store wealth.

१९७५ मधील रु. १०० याची “किंमत” आज किती आहे? तर रु. १००. त्या अर्थाने पैसा हा किंमत साठवतो. आता आज त्या १०० रुपयात काय विकत घेता येईल आणि १९७५ मध्ये काय विकत घेता येत होते यात जमीन-अस्मानाचा फरक आहे! पण याचा अर्थ बाकीच्या वस्तूंच्या किंमतीत फरक पडला आहे (त्यांचे “मूल्य” बदलले आहे), पण १०० रु. हे आजही १०० रु. च आहेत (जर का ती currency note चलनात असेल तर).

ह्यात एक गमतीदार मुद्दा समजावून घेतला पाहिजे. कोणत्याही नोटेवर “मै धारक को XXX रुपये अदा करने का वचन देता हूं” असं लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ काय?

त्याचा अर्थ इतकाच आहे, की तुम्हाला ती नोट बदलून त्याच किमतीची दूसरी नोट दिली  जाईल (उदा: १०० च्या एका नोटेऐवजी १०० ची दुसरी नोट), किंवा त्याच “मूल्याच्या” रकमेइतक्या दुसऱ्या नोटा दिल्या जातील. (उदा: १०० च्या एका नोटेऐवजी १० च्या १० नोटा, किंवा २० च्या ५ नोटा). जर तुम्ही म्हणालात की मला १०० च्या नोटेऐवजी २ किलो बटाटे पाहिजेत किंवा १ किलो तांदूळ पाहिजे तर ते रिझर्व्ह बँक करणार नाही. इतकंच काय तर १०० रु. च्या नोटेऐवजी १ अमेरिकन डॉलर द्यायचे “वचन” ही रिझर्व्ह बँक देत नाही. म्हणजे रिझर्व्ह बँक फक्त इतकेच “वचन” देते की ह्या नोटा बाजारात खेळत राहतील (Currency in circulation).

आणि ही साधी गोष्ट नाही कारण त्यामागे रिझर्व्ह बँक आणि त्या प्रदेशाचे सरकार यांच्यावरील बाजाराची निष्ठा असते, म्हणून तो कागदाचा तुकडा “चलन” म्हणून वापरला जातो. पूर्वी हि “निष्ठा” खऱ्या सोन्याच्या साठ्यांच्या स्वरूपात असायची. (म्हणजे जेवढे सोने त्या प्रमाणातच चलन). आता सगळ्यांनीच “Gold standard” सोडून दिले आहे त्यामुळे खरोखरीच “नोटा छापणारे सरकार” यांच्या निष्ठेवर हा खेळ चालू असतो.

खेळ अशासाठी म्हणालो की “व्यापार” या खेळाचे किंवा माझ्या आवडत्या बुद्धिबळाचे आणि कॅरॅमचे उदाहरण देऊन तो मुद्दा सांगता येईल.

व्यापार ह्या खेळात खोट्या नोटा आणि नाणी असतात, आणि खेळणारे सगळे जण ती खरी आहेत असं मानून खेळतात. समजा त्यातली एखादी नोट फाटली, तर काय करता येईल? एका कागदाच्या तुकड्यावर नोटेची किंमत लिहून ती खेळात “खरी” नोट म्हणून वापरायची. हे केंव्हा जमून जाईल? जेव्हा खेळातल्या सगळ्यांनी ती “खोटी” नोट स्वीकारली तर… पण एखाद्याने ती स्वीकारायला नकार दिला तर? म्हणजे त्याची “paper currency” वरची निष्ठा संपली तर? तर ती नोट चलनातून बाद होईल, कवडीमोलाची ठरेल.

अजून एक उदाहरण, बुद्धिबळाचे. बुद्धिबळातील एखादा पीस (सोंगटी म्हणणे अगदीच जीवावर येते), समजा हत्ती हरवला, तर आम्ही त्या जागी एखादे खोडरबर किंवा तशी वस्तू ठेवायचो. जोपर्यंत खेळणाऱ्या दोघांना ती वस्तू हत्ती आहे, आणि हत्ती सारखी चालेल हे मान्य असेल (Rules of the game are acceptable to both players), तोपर्यंत खोडरबर वापरूनही खेळ पुढे चालू शकेल. तसंच Currency चं आहे. ती वापरणाऱ्या बाजारातल्या घटकांची (market participants) नोटा छापणाऱ्या संस्थेवर (Central Bank backed by Sovereign Government) विश्वास पाहिजे.

Currency ही त्या अर्थाने “fungible” आहे असं म्हणतात. म्हणजे mutually interchangeable.

आता असा विचार करा. की कॅरॅम खेळताना एखादी सोंगटी हरवली. तर आपण त्या जागी एखादे खोडरबर घेऊन – “ह्यालाच सोंगटी मानू” असा म्हणून खेळ पुढे चालू करू शकतो का? तर नाही. फक्त खेळणाऱ्या लोकांची चलनावर “निष्ठा” असून उपयोग नाही तर खेळासाठी त्या गोष्टीची उपयुक्तता पण असली पाहिजे. बुद्धिबळात खोडरबर चा हत्ती वापरून खेळ पुढे चालू करता येईल, पण कॅरॅम मध्ये ते शक्य नाही.

आता Cryptocurrency कडे वळूया. उदाहरणार्थ – बिटकॉइन. Cryptocurrency ही कोणाच्या “निष्ठे”वर आधारीत आहे? (जसे रुपया ही रिझर्व्ह बँक / भारत सरकार यांच्या निष्ठेवर अवलंबून आहे) तर माहिती नाही. Cryptocurrency ही बाजारातल्या सगळ्या लोकांना खरेदी विक्री साठी मान्य आहे का? तर अजिबात नाही. एकाही देशाच्या सरकारनी ती पूर्णपणे मान्य केलेली नाही.

अजून एक मुद्दा speculative asset चा. समजा मी भारतीय आहे आणि मी कधीही जपान मध्ये जाणार नाही किंवा जापनीज येन या त्यांच्या चलनात काही खरेदी करणार नाही, तर मला रुपये देऊन जापनीज येन घ्यायची गरज आहे का? तर नाही. पण तरीही मी ते speculation म्हणून करू शकतो. का? कारण कोणी तरी इतर लोकं जापनीज येन हे प्रत्यक्ष वापरत आहेत.

बिटकॉइन हे त्या अर्थाने प्रत्यक्ष चलन म्हणून तेवढ्या सर्रास वापरले जात नाही. आणि ते पुरवणारी व्यक्ती, संस्था याबद्दल ही कोणाला फारशी माहिती नाही.

थोडक्यात, सध्याच्या परिस्थितीत बिटकॉइन हा एक सट्टा आहे, जुगार…

त्यातला technology हा भाग काढून टाकला तर ते “Sodexo coupon” किंवा “Travelers’ cheques” किंवा इतर अनेक खाद्यपदार्थांच्या जागी वापरले जाणारे “टोकन” असेच त्याचे स्वरूप आहे. आणि तीच त्याची उपयुक्तता (utility) पण आहे. मग किती जण “Sodexocoupon” मध्ये trading करतात? किती जण १०० रु. चे “sodexo coupon” ३०० रु. ला घेतील आणि म्हणतील की कोणीतरी हेच कूपन माझ्याकडून ६०० रु. ला घेईल.

शेवटचा मुद्दा (मघाशी काढून टाकलेल्या) Technology या भागाचा. बिटकॉइन Blockchain या technology वर आधारीत आहे. त्या technology चे बरेच फायदे, उपयोग असू शकतात. आहेतच. अगदी finance मध्ये सुद्धा खूप ठिकाणी वापरता येईल. कदाचित त्या दिशेने याचा प्रवास होईल. पण बिटकॉइन हे “sophisticated Sodexo coupon” या अर्थाने जसे आत्ता आहे त्या अर्थाने निरुपयोगी आहे. सध्या बिटकॉइन किंवा इतर क्रिप्टो-करन्सी जोरात आहेत त्याचं कारण तेच – जे financial market history मधल्या बहुतेक scams आणि bubble चे कारण होते/असते – Greed and Stupidity.

जीडीपी, विकासदर आणि “विकास-निर्देशांक”

भारताचे जीडीपी (Gross domestic product or GDP) वाढीचा चा अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला. आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी तो कमी करून ६.५% इतका असेल. हा आकडा नवीन मोजणीपद्धती प्रमाणे  आहे, जी २०११-१२ च्या सुमारास लागू झाली. जुन्या पद्धतीप्रमाणे हाच आकडा अजून कमी असता – कदाचित ४.५-५%.
जीडीपी बद्दल एक सुंदर लेख नुकताच वाचनात आला. जीडीपी हा निकष बदलण्याची का गरज आहे याबद्दलचा हा लेख फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्रात ५-जानेवारी-२०१८ ला प्रसिद्ध झाला, जो आपण  इथे वाचू शकता. (“Why it is time to change the way we measure the wealth of nations”)
GDP is a measure of activity. जीडीपी हा कृतिशीलता मोजतो. GDP doesn’t focus on utility/effectiveness of what is being produced. जे उत्पादन झाले आहे त्याची उपयुक्तता विचारात घेतली जात नाही. तर फक्त ते उत्पादन करण्यात जे श्रम खर्च झाले, त्याच्या किमतीनुसार जीडीपी मोजले जाते.
पण १९३० मध्ये जेव्हा जीडीपी हे प्रमाण म्हणून वापरले जाऊ लागले तेव्हा त्याचा उद्देश हा महामंदीच्या काळात प्रत्यक्ष मोजता येण्यासारख्या गोष्टींची उलाढाल किती कमी झाली आहे हे मोजणे हा होता. म्हणजेच जीडीपी हे “उत्पादन” (Manufacturing) केंद्रीत होते. “सेवा” (Services) हा त्या काळी अर्थव्यवस्थेचा महत्वाचा  घटक नसल्याने त्याला फारसे महत्व दिले गेले नव्हते. आणि त्यानंतरही जीडीपी मध्ये “सेवा” घटक योग्य प्रकारे मोजण्याची शास्त्रीय पद्धती आली नाही.
भारतासारखे आज असे अनेक देश आहेत की ज्यांच्या अर्थव्यवस्थेत “सेवा” हा “उत्पादन” पेक्षा मोठा घटक आहे. त्यामुळे जीडीपी मोजणी पद्धतीत सुधार करून “सेवा” योग्य प्रकारे मोजता याव्यात याबद्दल अनेक वर्षे चर्चा चालू आहे.
परंतु यात एक  महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे –  तो म्हणजे “पायाभूत” सुविधा निर्माण करण्याचा. जीडीपी फक्त activity मोजत असल्यामुळे त्याचा उपयोग “पायाभूत” सुविधा निर्माण होण्यात केला जातोय का याकडे दुर्लक्ष होते. आणि त्याचे दूरगामी परिणाम फार भयानक असू शकतात.
म्हणजे एक अतिशयोक्तीपूर्ण उदाहरण द्यायचे तर…
समजा एक प्रांत आहे जिथे दोनच माणसे आहेत. एक जण पूजापाठ सांगणे (सत्यनारायण वगैरे), कीर्तन-प्रवचन करणे असे काम करतो. आणि दुसरा माणूस तेलमालीश करणे, पाय/अंग चेपून देणे वगैरे करतो. थोडक्यात दोघेही फक्त “सेवा” पुरवतात, “उत्पादन” काही नाही. त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय निसर्गांत असलेल्या साधनसंपत्ती मध्ये होते असे समजा.
आता त्या दोघांनी एकमेकांना आपापल्या सेवा पुरवल्या आणि त्याला काही तरी मूल्य लावले तर त्यातून जीडीपी निर्माण होईल. समाज एकाने एका दिवशी रु. २०० चे प्रवचन केले. आणि दुसर्याने रु. २०० ची मालिश केली तर जीडीपी मोजण्याच्या पद्धतीप्रमाणे त्या प्रांताचे जीडीपी रस. ४०० इतके झाले. पण यात पायाभूत असे काय निर्माण झाले? उदाहरणार्थ घर, पूल, शाळा, धरणे असे काही बांधले गेले का? तर नाही. सेवा या “गिळंकृत” होतात. हे “Services are consumed” चे शब्दशः भाषांतर वाटेल पण खरोखरीच सेवा या पुरवल्या की संपतात. नवनिर्मिती होत नाही.
जीडीपी मधून लांबपल्ल्याचं आणि देश उभारणी करणारं काहीतरी हवं असेल तर फक्त सेवा पुरवून उपयोग नाही.
आता याच प्रांतात अजून दोन लोकं  आली. एक शेती करणारा, आणि एक वास्तू-निर्मिती करणारा. आणि त्या चौघात आपापल्या सेवा आणि उत्पादन यांचे देवाणघेवाण होऊन जे होईल त्यामुळे जीडीपी तर वाढेलच पण त्याबरोबर दूरगामी अश्या पायाभूत सुविधा देखील निर्माण होतील.
त्या अर्थाने जीडीपी हे “सेवा” प्रकारांना तेवढे महत्व देत नाही हे एका अर्थी बरोबर आहे.
भारताचा विचार केला तर आपली अर्थव्यवस्था “सेवा”केंद्रीत आहे हे खरंय. पण उत्पादनाच्या बाबतीतही आपण केवळ जोडणी (Assembly) किंवा दुसऱ्या देशांसाठी उत्पादन पुरवठा (Manufacturing Export) किती करतो आणि आपल्या देशात पायाभूत सुविधा निर्माण करायला (Public or Private Infrastructure development) किती करतो हे महत्वाचं आहे.
परंतु लोकं जीडीपी किंवा तत्सम अर्थकारणातल्या कल्पना समजावून ना घेता केवळ विकासदर ५% चा ८%-१०% झाला किंवा ८-१०% चा ६.५% झाला यावरच भर देतात आणि वायफळ टीका, राजकारण करत बसतात.
अजून एक महत्वाचा फरक हा “विकासदर” आणि “विकास-निर्देशांक” हा आहे. विकास-निर्देशांक म्हणजे साधारणपणे तुम्ही “विकसित” (Developed) आहात, का “विकसनशील” (“Developing” आहात का “अविकसित” (“Underdeveloped” – पण आजकाल असा शब्द कोणी वापरात नाही. “Emerging” किंवा “resource rich” वगैरे गोंडस नाव देतात).
“विकासदर” आणि “विकास-निर्देशांक” यातला फरक साध्या उदाहरणातून द्यायचा तर एक वडील (५२-५५ वर्षांचे) आणि मुलगा (२३-२५ वर्षांचा) यांचे उदाहरण घेऊ. समजा दोघंही सध्या नोकरी करतात –
वडिलांचा पगार मुलांपेक्षा बराच जास्त असणार, पण मुलाची पगारवाढ (% मध्ये) वडिलांपेक्षा खूप जास्त असणार. त्याचे कारण मुलाचा कमी पगार (Low base effect) आणि त्याचा Growth Period. वडिलांचा पगार stagnant असेल परंतु केवळ मूल्याचा विचार केला तर मुलापेक्षा खूप जास्त असेल.
हा एक भाग झाला. पण “संपत्ती” या दृष्टीने विचार केला तर? वडिलांकडे असलेली २५-३० वर्षे नोकरी करून साठवलेली संपत्ती ही मुलाच्या २-३ वर्षे नोकरी करून साठवलेल्या संपत्तीपेक्षा खूप जास्त असणार, किंवा असली पाहिजे.
जीडीपी चे पण असेच आहे. इथे वडील हे अमेरिका आहे, आणि मुलगा हा भारत आहे असे समजा. मुलाचा विकासदर जास्त असेल (८-९%), आणि वडिलांचा विकासदर कमी (१-२%). पण मुळात वडिलांचा पगार (Absolute value of US GDP = $15-16 Trillion) ही मुलाच्या पगारापेक्षा (Absolute value of India GDP = $2 Trillion) खूप जास्त आहे. हा एक भाग.
पण त्याहून महत्वाचे म्हणजे वडिलांनी जी पायाभूत गुंतवणूक गेल्या २००-२५० वर्षात करून ठेवली आहे – रस्ते, धरणे, लोहमार्ग, विमानमार्ग, हॉस्पिटल्स, शाळा, विद्यापीठे इत्यादी. चे विस्तृत जाळे – ते (आणि त्या दर्जाचे) तयार करणे ह्या बाबतीत मुलगा फारच मागे आहे याची जाणीव हवी.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलगा फक्त मागे आहे (कारण त्याची सुरुवातच खूप उशिरा झाली) परंतु आता त्या वाटेवर भरधाव वेगाने  (High growth rate) जातोय अशी परिस्थिती आहे, का मुलगा भरधाव वेगाने धावतोय (Growth rate is high) पण तो पायाभूत क्षेत्रात नाही तर केवळ “गिळंकृत” करायच्या सेवा क्षेत्रात ते समजले पाहिजे. म्हणजे वेग आहे, पण दिशा चुकली आहे?
आणि म्हणूनच “मेक इन इंडिया”, किंवा इतर Public Infrastructure initiatives राबवणे ही खूप चांगली गोष्ट आहे.
पण शेवटचा प्रश्न हा आहे, की आपली शिक्षण पद्धती त्याप्रकारचे शिक्षण देते आहे का? का अजूनही आपले शिक्षण क्षेत्र हे “सेवा” पुरवणारे कळप निर्माण करतंय?

मीठ आणि अश्रू

lr14

कालच्या लोकसत्ता मध्ये “मीठ आणि अश्रू” नावाचा एक वाचनीय लेख प्रसिद्ध झाला. पोलंडमधील तेराव्या शतकात शोध लागलेली मिठाची प्रचंड खाण.. या खाणीची सफर करताना आलेले अनुभव, जाणवलेल्या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत.

अजून एक रंजक बाब म्हणजे इंग्रजीमधील Salary (वेतन) या शब्दाचे मूळ ह्या पोलंडमधील खाणीत आहे.

आज जरी मीठ सहजी उपलब्ध असलं तरी त्याकाळी मीठ हा एक मौल्यवान पदार्थ होता. सबंध युरोपला मांस टिकवण्यासाठी मिठाची अत्यंत गरज होती. रोमन शिपायांना मिठाच्या स्वरूपात पगार दिला जात असे. ‘सॅलरी’ हा शब्द लॅटिन ‘salarium- सॉल्टी वेजेस’ अशा अर्थाने उपयोगात आणत.

ह्यातूनच सॅलरी हा शब्द रूढ झाला.

मराठी आणि भारतीय संस्कृती मध्ये मिठाला फार महत्व आहे. कृष्ण आपल्या पत्नीला “तू मला मिठाइतकी प्रिय आहेस” असं म्हणाला होता, अशी एक कथा माझी आजी सांगायची. त्याचा मतितार्थ हा होता की मीठ जसे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तशीच तू आहेस.

महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची सुरवात करताना देखील मिठाची निवड केली आणि “दांडीयात्रा” घडली. कारण मीठ हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

पोलंड मधील मिठाच्या खाणींवरचा लेख वाचताना जाणवले की मीठ फक्त भारतीयच नाही तर जागतिक स्तरावर सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग आहे.

P.S: पोलिश भाषेतील चित्रपटात सुद्धा “मैने तुम्हारा नमक खाया है…” छाप संवाद असतील का?

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑