Search

ekoshapu

Notes to Myself

Category

सर्व…एकत्र

एका नवीन नाटकाची जाहिरात…

आजच्या म.टा. मध्ये प्रसिद्ध झालेली एका नवीन नाटकाची जाहिरात…

Advertisements

सादर करीत आहे (५० डेसिबलचा) छोटा फटाका…

……


आजोबा, मला पॊकेटमनी पुरत नाही. बाबा म्हणाले ’आजोबांकडे जा, मला पण तेच देतात.’

हं, बोल किती पाहिजेत?

नाही, मला आता माझा धंदा सुरू करायचाय, स्वतःच दुकान…!

आजोबा (सदगदीत होऊन): बाळा, किती लवकर हाताशी आलास रे…आजच तुला तुझं स्वतःच दुकान उघडून देतो…नाव काय ठेवणार आहेस?

’युवा सेना!!’ …….कसं वाटलं???

मराठी मोजमापे…

धान्य मोजण्याची मापं :


दोन नेळवी = एक कोळवे

दोन कोळवी = एक चिपटे

दोन चिपटी = एक मापटे

दोन मापटी = एक शेर

दोन शेर = एक अडशिरी

दोन अडशिर्‍या = एक पायली

सोळा पायल्या = एक मण

वीस मण = एक खंडी

चार शेर= एक पायली

आठ पायली= एक कुडव

आठ कुडव= एक गिध

वीस कुडव= एक खंडी.

एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली म्हणजे ४.५ कीलोला थोडे कमी भरते.

सोने-चांदी-औषध मोजण्याची मापं :

गुंज तुम्हाला माहीतच असेल. नसेल तर इथे पहा : गुंज

आठ गुंजा = एक मासा

बारा मासे = एक तोळा

अंक :

१ – एक

१० – दहा

१०० – शंभर

१००० – हजार

१०००० – दहा हजार

१००००० – लक्ष

१०००००० – दशलक्ष

१००००००० – कोटी

१०००००००० – दशकोटी

१००००००००० – अब्ज

१०००००००००० – खर्व

१००००००००००० – निखर्व

१०००००००००००० – महापद्म

१००००००००००००० – शंकू

१०००००००००००००० – जलधी

१००००००००००००००० – अन्त्य

१०००००००००००००००० – मध्य

१००००००००००००००००० – परार्ध

चलन :

तीन पै = एक पैसा

दोन पैसे = एक ढब्बू पैसा

दोन ढब्बू पैसे = एक आणा

दोन आणे = एक चवली

दोन चवल्या = एक पावली

दोन पावल्या = एक अधेली

दोन अधेल्या = एक रुपया

अंतर :

तीन फूट = एक यार्ड

१७६० यार्ड = एक मैल

दोन मैल = एक कोस

आरसा:

आरसा:
ते पत्र आल्यापासून श्रीनिवासच्या मनाची शांतता पार ढळली होती. गीता गेल्यापासून तो आधी अस्वस्थ होताच. आपल्याला दुःख झाले आहे, की नुसताच मनाला बधिर करून टाकणारा आघात आपल्यावर झाला आहे हे त्याला कळत नव्हते. गीताच्या निधनाने तो हादरला होता. जीवनात एक पोकळी निर्माण झाल्यासारखे त्याला वाटत होते. आज जवळ जवळ वीस वर्षे त्याने आणि गीताने एकत्र काढली होती. जनरुढीच्या विरुद्ध जाऊन ती दोघे एकत्र राहात होती. लग्नाशिवाय. पण नाते लग्नाचे असो की बिनलग्नाचे, तो संसारच होता. संसाराचे सारे बरेवाईट संदर्भ, जबाबदाऱ्या, अडचणी तिथेही होत्याच. तीच गीता अवचित घर सोडून गेल्यावर श्रीनिवासचे घर रिते होणे स्वाभाविकच होते. घर रिते झाले होते, पण मन रिते झाले होते का? श्रीनिवासला ते अजून नीटसे उमगले नव्हते. मन रिते व्हायला आधी ते भरावे लागते. गीताने त्याचे मन तसे व्यापून टाकले होते का? या प्रश्नाचे उत्तर स्वतः श्रीनिवासही देऊ शकत नव्हता. गीता त्याची इतक्या वर्षांची सहचारिणी होती; ती गेल्यावर तिच्याविषयी कोणताही अनुदार विचार मनात आणणे क्रुतघ्नपणाचे होईल असे त्याला वाटत होते. आणि तरीही तसेच विचार त्यच्या मनात येत होते. याच सुमाराला ते पत्र श्रीनिवासला आले होते आणि त्या पत्राने त्याचे मनःस्वास्थ्य नाहीसे करून टाकले होते.

एव्हाना श्रीनिवासला ते पत्र तोंडपाठ होऊन गेले होते. पत्रातला मजकूर मोजका आणि मुद्देसूद होता. पत्रातल्या ओळी श्रीनिवासला लखलखून आठवत होत्या ’…माझे पत्र तुम्हाला ढोंगीपणाचे वाटेल. असभ्यपणाचे वाटेल. तरीही गीताच्या निधनाची वार्ता कळल्यापासून तुम्हाला भेटायला यावेवे फार वाटत आहे. तुमहा माझा परिचय कधीच झाला नाही. तसा कधी योगही आला नाही. मी आणि गीता विभक्त झाल्यावर मग तुम्ही तिच्या जीवनात आलात. माझा तुमच्यावर मुळीच राग नाही. उलट गीताच्या जीवनाचे तारू कुठल्या कुठे भडकले असते, तिला तुमचा आधार लाभला याबद्दल मला बरेच वाटत होते. हे मी मनापासून लिहीत आहे. आज माझ्या मनात गीताबद्दलही रोष नाही. मी माझ्या साध्या सरळ संसारात सुखी आहे…तुम्हाला भेटावेसे मात्र फार फार वाटते…मी तुमच्या भेटीला येऊ का? तुम्ही नकार दिला तरीही मला नवल वाटणार नाही. तुमचा होकार कळला, तर मात्र फार समाधान वाटेल येवढेच सांगतो…अनुकूल उत्तराची वाट बघत आहे. आपला, वामन वालावरकर.’

पत्र आले आणि श्रीनिवास चक्राऊन गेला. वामन वालावरकर. ते नावही आता त्याच्या स्मरणातून पुसून गेले होते. गीताने कधी तरी आपल्या या पहिल्या पतीचे नाव त्याला सांगितलेले असणारच. पण तो ते खरेच विसरून गेला होता. आता ते नाव पत्रात वाचताना त्याला विचित्र वाटले. किती गद्य, व्यवहारी नाव वाटत होते ते. एखाद्या कापडाच्या, नाहीतर किराणा मालाच्या दुकानदाराचे नाव असावे तसे ते नाव होते.  गीता आपल्या ह्या पतीबद्दल क्वचितच काही बोले. कसा असेल हा माणूस? त्याचे रंगरुप, त्याचा स्वभाव त्याची जीवनसरणी कशी असेल? आज त्याची मनःस्थिती काय असेल? गीताच्या निधनाच्या वार्तेने तो दुखीः झाला असेल का? गीताबद्दलच्या त्याच्या भावना तरी काय होत्या?

एकाएकी या वामन वालावरकरला भेटण्याची विलक्षण उत्सुकता श्रीनिवासला वाटू लागली? तसे अपराधी वाटन्यासारखे श्रेनिवासने कुठे काय केले होते? गीता आपल्या वैवाहीक जीवनात रमून गेली असताना श्रीनिवासने जर तिला आपल्या मोहात गुंतवले असते, तर त्याला अपराध्यागत वाटण्याचा संभव होता. पण तसे काहीच त्याने केले नव्हते. गीता आणि तो एकत्र आली तेव्हा, या पहिल्या नात्याचे सारे बंध तिच्या लेखी तुटूनच गेले होते. त्या धगधगत्या अंगाराची नुसती राखसुद्धा तिच्या मनात उरली नव्हती. मग आता या वामन वालावरकरला भेटायला काय हरकत होती? वालावरकराने जे लिहीले ते मनापासून लिहीले होते. अगदी प्रामाणिकपणे सौजन्यपूर्ण रीतीने तो श्रीनिवासला भेटू इच्छित होता. त्याला कदाचित श्रीनिवासचे सांत्वन करावयाचे असेल, कदाचित गीताबद्दल बोलण्याची त्याला अनावर इच्छा झाली असेल. कदाचित…कदाचित…

श्रीनिवासला पुढे विचारच करता येईना. एकदा त्याला वाटले, या अनोळखी परक्या माणसाला सरळ नकार द्यावा. गीता गेली. सारे संपले. आता तिच्या पहिल्या पतीला इतक्या वर्षांनंतर भेटण्यात अर्थ तरी काय होता? आणि या भेटीतून निष्पन्न तरी काय होणार होते? तरीही वामन वालावरकरच्या पत्रातून ओसंडणारी मनाची सरलता, रुजुता त्याला कुठे तरी आतून खरेपणाने जाणवत होती. एकाएकी त्याने आपल्या मनाशी निर्णय घेऊन टाकला आणि आपली चलबिचल, संशय वाढण्याच्या आतच त्याने वालावरकरला आपल्या भेटीला यावयाची संमती दिली. संमतीचे पत्र धाडले आणि श्रीनिवास एकदम निश्चिंत झाला. त्याची चलबिचल संपली आणि वालावरकराच्या भेटीची तो शांत मनाने वाट बघु लागला.

भेटीचा दिवस ठरला. श्रीनिवास एका बड्या, श्रीमंती थाटाच्या फर्ममध्ये भारी पगारावर नोकरी करीत होता. भेटीचा दिवस ठरला, तेव्हा त्याने त्या दिवसापुरती रजा घेतली. नोकरालाअ आवश्यक त्या सूचना देऊन ठेवल्या. वालावरकरला जेवायला बोलवावे असेही त्याला वाटले. पण नाही म्हटले तरी, वालावरकर हा सांत्वनाच्या भूमिकेवरून भेटायला येणार होता. अशा वेळी जेवायची सूचना त्याला करणे फारच वाईट दिसले असते. श्रीनिवासने कॊफी, बिस्किटे आणि फळे एवढाच बेत ठरवला. वालावरकराच्या भेटीच्या कल्पनेने तो अस्वस्थ झाला होता. खरे म्हणजे श्रीनिवास बुद्धीमान होता. चतुर होता. व्यवसायाच्या निमित्ताने तो देशभर हिंडला होता. एतकेच नाही तर, परदेशातही एकदा-दोनदा जाऊन आला होता. वालावरकरचा व्यवसाय काय होता याची त्याला कल्पना नव्हती. पण श्रीनिवासच्या तुलनेने तो खूपच सामान्य परिस्थितीत दिवस कंठीत असला पाहीजे याबद्दल श्रीनिवासला शंका नव्हती. त्याच्या भेटीच्या कल्पनेने गोंधळण्याचे, अस्वस्थ होण्याचे श्रीनिवासला कारण नव्हती. तरीही या भेटीच्या बाबतीत त्याला विचित्र वाटत होते एवढे मात्र खरे. व्यवसायाच्या निमित्ताने कितीतरी परक्या, अनोळखी माणसांना भेटण्याचा श्रीनिवासवर अनेकदा प्रसंग येई. पण वालावरकरची भेट ही तशा प्रकारच्या भेटींत बसणारी नव्हती. तो अनोळखी होता. तरीही ओळखीचा होता. म्हटले तर त्याच्याशी कसलेही नाते नव्हते. आणि म्हटले तर एका विलक्षण, अनाकलनीय नात्याने ते दोघेजण जोडलेले होते. जग सोडून गेलेल्या गीतापासून या नात्याचा उगम  होता. आणि त्या एका स्त्रीच्या नात्यानं परस्परांशी निगडीत झालेले हे दोन पुरूष तिच्या म्रुत्युनंतर आता अचानक एकमेकांना भेटणार होते.

भेटीचा दिवस ठरलेला होताच. त्या दिवशी संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला दारावरची बेल वाजली. श्रीनिवासने गड्याला बाहेर पाठवून दिले होते. या भेटीच्या वेळी तिसरे कुणीही जवळ असू नये असे त्याला – का कोण जाणे – मनातून वाटत होते. बेल वाजताच त्याने जऊन स्वतः दार उघडले. दाराबाहेर एक मध्यमवयीन, प्रौढतेकडे झुकणारा, चेहेऱ्यावर अवघडलेपण धारण केलेला पुरूष होता. श्रीनिवासने त्याला पाहून ओळखीचे हास्य केले आणि दार पुरते उघडीत, स्वतः बाजूला होऊन तो त्याला म्हणाला,
’या, आत या ना.’
वालावरकर आत आला. तरिही संकोचाने तो काही वेळ उभाच राहिला. अस्वस्थ नजरेनं श्रीनिवास सुसज्ज, सुंदर दिवाणखान्याकडे पाहू लागला. अशा ठिकाणी जाण्याचा त्याला फार क्वचित प्रसंग येत असावा, हे त्याच्या एकूण हालचालींवरून, आविर्भावांवरून सहजच ध्यानी येत होते. श्रीनिवासचे मन करुणतेने, सहानभुतीने भरुन गेले. त्याने त्याला हाताशी धरून कोचावर आणून बसवले आणि सौम्य हसून तो त्याला म्हणाला,
’बसा असे आरामशीर. घर ंइलायला त्रास नाही ना पडला फारसा?’
’छे!’ वालावरकरही जरासा हसला ’तुम्ही पत्त व्यवस्थित कळवला होता. शिवाय फोनवरून आधी बोलणही झालं होतं. त्यामुळे तशी काही अडचण जाणवली नाही.’ तो म्हणाला.
’मग ठीक आहे.’ श्रीनिवास बोलला.

पुनः काही वेळ दिवाणखान्यात विचित्र शांतता पसरली. त्या शांततेचे दडपण त्या दोघांही पुरुषांच्या मनावर आल्या सारखे झाले. पण त्या निःशब्द वातावरणात दोघेही एकमेकांना प्रथमच नीट न्याआळून बघत होते. स्वतःशी दुसऱ्याचा वेध घेत होते. त्याच्याविषयी मनातल्या मनात अंदाज बांधत होते.
श्रीनिवासने वालावलकरह्च्या ध्यानी येणार नाही अशा पद्धतीने, पण सराईतपणे त्याच्याकडे बघून घेतले. दहा माणसांत सहज विसरायला होईल इतका साधा, सामान्य , व्यक्तीत्वहीन चेहरा. डोक्याला पडू लागलेले टक्कल आणि कानशीलांवरून मागे हटत चाललेले करडे केस. थकलेले श्रांत डोळे. चेहऱ्यावर ओढग्रस्त जीवनाने ठळक ओढलेल्या रेषा. वालावरकरच्या साऱ्या मुद्रेत आकर्षक होते ते त्याचे हसू. त्या हसण्यात एक निर्मळ स्वाभाविकता होती. दुसऱ्याच्या मनात स्वतःबद्दल जवळीक, विश्वास निर्माण करण्याची शक्ती होती.

एकीकडे श्रीनिवास वालावलकरचे असे निरीक्षण करीत असता, वालावरकरही श्रीनिवासला जाणवणार नाही अशा बेताने त्याच्या मुद्रेचा, व्यक्तित्वाचा वेध घेत होताच. श्रीनिवासचे व्यक्तीमत्व आक्रमक, प्रभावी होते. चेहेरा देखणा नसला तरी, प्रथमदर्शनी दुसऱ्यावर ठसा उमटवणारा होता. हालचालीत यशस्वी धंदेवाल्या माणसाचा ठाम आत्मविश्वास होता. आणि या साऱ्यांतून पुनः एक हळवे, संवेदनशील असे मन डोकावत होते. वालावरकरला वाटले, गीतासारख्या मनस्वी स्त्रीला आपण पुरे पडलो नसतो. तिने श्रीनिवासला आपला जीवनसहचर बनवले हेच योग्य आहे. साऱ्या घटनेत त्याला एक न्याय वाटला. सुसंगती जाणवली. गीताबद्दल आता त्याच्या मनात काहीच अढी उरली नव्हती. श्रीनिवासबद्दल मनाच्या तळाशी चुकुन कुठे काही कडवट भाव रेंगाळत असेल तर, तोही श्रीनिवासला प्रत्यक्ष बघताना पार ओसरुन गेला. थोडक्यात सांगायचे तर, श्रीनिवासविषयी त्याचे फारच अनुकूल मत झाले.
दिवाणखान्यातली शांतता आता असह्य होऊ लागली दोघांनाही एकमेकांशी बोलावेसे वाटले. पण सुरुवात कुणी करायची, कशी करायची हा प्रश्नच होता. शेवटी वालावरकरच म्हणाला,
’गीताला काय झालं होतं?’ प्रश्न विचारताच आपण फार औपचारीक प्रारंभ केला आहे असे त्याला जाणवले. पण यापेक्षा वेगळे काय बोलावे, कसे बोलावे ते त्यालाही कळेना.
’तसं नीट काही कळलंच नाही अखेरपर्यंत.’ श्रीनिवास सांगू लागला, ’गेली २ वर्षं तिच्या तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी चालूच होत्या. मग तिला अन्नच जाईनासं झाल, वजन उतरलं. खंगत गेली ती आणि शेवटी पंधरावीस दिवसांच्या तापाचं नुसतं निमित्त झालं…गेली. काहीशी अचानकच गेली म्हटलं तरी चालेल.’
श्रीनिवासलाही बोलताना विचित्र वाटत होते. वीस वर्षे आपल्याशी संसार केलेल्या गीताबद्दल बोलताना अगदी त्रयस्थ, अपरिचित व्यक्तीबद्दल बोलावे तशा कोरडेपणाने, वस्तुनिष्ठ द्रुष्टीकोनातून आपण बोलत आहोत असे त्याला वाटले. पण जो जिव्हाळा पोटातूनच जाणवत नव्हता तो ओंठात कसा आणायचा हेच त्याला कळेना. कदचित वालावरकरसमोर याहून अधीक भावनावश होण्याचा त्याला खोल कुठे तरी संकोचही वाटत असावा. काही असो. एकूण बोलणे फारच वरवरच्या पातळीवर, उथळपणे चालले आहे असे त्याला वाटले. आणि तरीही याहून वेगळे कसे बोलावे हे त्याला उमगत नव्हते.
’मी गीताला बरीच वर्षं बघितलीच नाही.’ वालावरकर बोलू लागला.  ’एकदा आमच्या मुलींच्या शाळेत कसलंसं भाषण द्यायला आली होती ती. माझ्या मुलींपासून तिचं-माझं नातं मी अन माझ्या बायकोनंही लपवून ठेवलंय कटाक्षानं. पण मुलींना ती आवडली असावी. तिच्याबद्दल बरेच चांगलं बोलत होत्या त्या.’

वालावलकर क्षणभर थबकला. म्ग पुनः जरा अवघडून तो म्हणाला, ’तशी कुठल्या तरी एका महिला मंडळात, माझ्या पत्नीची अन तिचीही भेट झाली होती. त्यावेळी तिनं आवर्जून माझ्या घरची, माझी, मुलांची चौकशी केली होती. आम्ही दोघं भांडून वेगळे झालो, त्यावेळी दोघांचीही मने एकमेकांबद्दल कडवट होती. असावीत…आता इतकं जुनं काही आठवतदेखील नाही. पण निदान नंतर तरी गीताच्या मनात वैषम्य राहिलं नसावं माझ्याविषयी. माझ्या मनातही फारसा वाकुडपणा नसावा. आता तर ते सारच फार पुसून गेलय. म्हणूनच तुम्हाला भेटताना अगदी निःशंक, निर्मळ मनानं मी आलो आहे. खरंच सांगतो, तुम्ही भेटायचं कबूल केलंत हा मोठेपणा आहे तुमच्या मनाचा. दुसऱ्या एखाद्यानं सरळ ’नाही’ म्हटलं असत. खरं तर, आपला संबंध तरी काय? तुमचे मी खरेच आभार मानले पाहिजेत.’
श्रीनिवासला फार अवघडल्यागत झाले. तो चटकन म्हणाला, ’अहो भलतंच काय? आभाराची कसली भाषा बोलता? आभारच मानायचे झाले तर, मी ते तुमचे मानायला हवेत. तुम्ही आवर्जून माझ्या दुःखात मला भेटायला आलात. काही नातं मनानं मानलंत, गीताचे आठवण ठेवलीत, तुमचाच मोठेपणा आहे हा.’
’मोठेपणाची गोष्ट सोडा हो’ वालावरकर म्हणाला, ’खरं सांगू का? गीता गेली आणि वाटलं, आत्ताच तुम्हाला भेटायला हवं. एकमेकांची काही खरी ओळख पटली तर ती आत्ताच पटेल. ती ओळख पटवून घ्यायची उत्कट इच्छा झाली येवढं मात्र सांगतो. कारण ते अगदी खरं आहे.’

-संभाषण गती घेत होते. स्वतःच्याही नकळत, ते दोघे अनोळखी पुरुश एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. परस्परांच्या अंतरंगाचा ठाव घेत होते. काही दुवे जुळत होते. श्रीनिवासला अचानक आठवण झाली. आल्यापासून या पाहुण्याला आपण चहापाणी विचारले नाही. तो म्हणाला,
’तुम्ही कॊफी घ्याल ना?’
बोलता बोलता त्याला शंका आली, या माणसाने आपल्याकडे काहीच घ्यायला नकार दिला तर? गीताच्या निधनाच्या निमित्ताने तो घरी आला होता हे एक कारण होतेच. पण कदचित त्याहूनही एखाद्या वेगळ्या अंतःप्रेरणेने, काही अनामिक गूढ जाणिवेने त्याला आपल्या घरी काही खावे-प्यावेसे वाटणार नाही. तसे झाले तर? आपल्याला राग येईल? वाईट वाटेल? समाधान वाटेल?
पण हे सारे विचार श्रीनिवासच्या मनात आले असतील तोच, वालावलकर हसून म्हणाला,
’खरं तर, आज मी कॊफी वगैरे घ्यायला नकार द्यायला हवा. पण ऒफीसातून सरळ इकडंच आलोय मी. कॊफीची फार गरज आहे बुवा. खायला देखील चालेल सोबत काहीतरी.’
श्रीनिवासच्या मनावरचे दडपण एकदम दूर झाले. वालावलकरच्या सरळ, मुग्धपणाने त्याचा ठावच घेतला. तो भरकन स्वैंपाकघरात गेला आणि कॊफी तयार करून घेऊन बाहेर घेऊन आला. बरोबर बिस्किटे होती, फळे होती. इतकेच नव्हे तर, घरातल्या डब्यांतून मिळालेले आणखी काही खाण्याचे पदार्थंही त्याने बशा भरून आणले होते. टीपॊयवर ते सारे पदार्थ ठेवीत तो मनःपूर्वक म्हणाला,
’या वालावलकरसाहेब, मलाही भूक लागली आहे. अगदी संकोच न करता घ्या बघू सारं काही’
वालावलकरने एक-दोन पदार्थ तोंडात टाकले आणि गरम कॊफीचा घोट घेऊन त्याने समाधानाचा, त्रुप्तीचा निःश्वास सोडला. मग अचानक त्याने श्रीनिवासकडे सरळ रोखून पाहिले आणि तो म्हणाला,
’एक विचित्र प्रश्न विचारु?’
श्रीनिवास दचकला. कॊफीचा कप दूर करून प्रश्नार्थक नजरेने तो वालावलकरकडे बघत राहिला.
’माफ करा, खासगी प्रश्न विचारतो आहे. पण गीता आणि तुम्ही सुखात होता का? विशेषतः गीता सुखी झाली का?’
श्रीनिवासला वालावरकरच्या प्रश्नाचा राग आला. पण रागावता रागावताच तो एकदम अंतर्मूख झाला. वालावलकरच्या प्रश्नात, आपणाला अपमानकारक असे काही नाही, हे कसे कोण जाणे-त्याच्या ध्यानात आले. त्याने भुवया आकुंचित केल्या. काहीसे आठवण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला,
’गीता सुखी होती की नाही सांगणं अवघड आहे. तशी ती समाधानी दिसायची. पण, खरं सांगू? तशी गीता मला फारशी कधी समजलीच नाही. थांग नाही लागला तिचा मला कधी.’
’एकूण, गीता कधी बदललीच नाही म्हणायची’ वालावलकर स्वतःशीच पुटपुटावे तसा बोलला.
’म्हणजे काय? ती बदलली नाही असं कोणत्या अर्थानं म्हणता तुम्ही?’ श्रीनिवासने कुतूहलाने विचारले.
’तुम्ही विचारताच आहात तर सांगतो सारं काही’ वालावलकर म्हणाला. त्याने भुवया आकुंचित केल्या. जुने काही आठवण्याचा तो प्रयत्न करीत असावा.

क्षणभराने कपाळावरुन हात चोळीत तो म्हणाला,
’कसं सांगू? सांगणं अवघड आहे मोठं. गीताचं नि माझं लग्न झालं ते घरच्या माणसांच्या संमतीनं. तेव्हा ती लहान होती. मीही पोरसवदा होतो. भातुकलीचा खेळ असावा, तसा संसार होता आमचा. आम्ही घर मांडलं. मला पैसे कमी मिळत. गीता नीटशी कधी उमलली नाही. फुलली नाही. ती अस्वस्थ दिसे. तिला सतत काही तरी निराळेच हवे असायचे. काय ते मला कळलं नाही. तिलाही कळलं नाही, ती शिकू लागली. बी.ए. झाली. आमचा पैसा वाढला. एक मूल झालं. गेलं. पुढे पुढे आमचं बोलणंच संपलं. तसं भांडण नव्हतं, तंटा नव्हता, काही नव्हतं. मला वाट्तं, ती एकूण माझ्या घरालाच कंटाळली. एक दिवस सरळ माहेरी निघून गेली. मीही भांडणतंटा केला नाही. तिला मोकळीक हवी होती. ती मी तिला दिली. मी माझ्या वेगळ्या मार्गाला लागलो. संपलं!’
वालावरकर बोलायचा थांबला. किती निर्विकारपणे बोलत होता तो. पण त्यातून श्रीनिवासला गीताची एक नवी ओळख पटत गेली. कशी होती गीता? खरे म्हणजे, त्यालाही ते नीटसे उमगले नव्हते. गीताने पुढे शाळेत नोकरी धरली होती. कुठल्याशा एका लग्नसमारंभात त्याची व गीताची ओळख झाली. प्रथमदर्शनी ती त्याला आवडली. मग भेटी, फिरणे, चारदोन सिनेमे. त्याने तिला मागणी घातली. तिने आपला पूर्वव्रुत्तांत त्याला सांगितला होता. काहीच लपवून ठेवले नव्हते. गीताचे पूर्वी एक लग्न झाले होती यात श्रीनिवासला काही आक्षेपार्ह वाटले नाही. त्याने तिच्याशी लग्न केले. आपल्या व्यवसायात तो वर वर चढत गेला. घरात पैसा आला. अनेक सुखसोयी आल्या. संसार झाला. पण-संसार झाला इतकेच. यापेक्षा जास्त त्याला गीता खरोखरच उमगली नव्हती…

– दिवाणखान्यातल्या शांततेची आता कुठे त्याला जाणीव झाली. वालावरकरचे बोलून संपले होते. आता श्रीनिवासने काही बोलावे असे त्याला वाटत असणार. त्याच अपेक्षेने तो श्रीनिवासकडे बघत होता. पण काय बोलावे ते श्रीनिवासला उमगत नव्हते. तो हताशपणे किंचित हसला आणि वालावरकरला म्हणाला,
’तुमचा हेवा वाटतो मला. किती थोडक्यात तुम्ही तुमच्या संसाराचा आढावा घेतला. पण मला तसं काहीच सांगता येत नाही. येवढंच सांगतो की, मलाही गीता कधी कळली नाही. ती तशी हसे-खेळे. आनंदानं वागे. निदान आनंदात असल्यासारखी दिसे. पण आम्हा दोघांत अलिप्ततेचा एक पडदा कायम राहिला. गीताला मूल हवं होतं का? तेही मला कळलं नाही, तशी तिनं कधी असोशीही दाखवली नाही. ती त्रुप्तही नव्हती. तिनं जीव टाकून कधी माझ्यावर प्रेमही केलं नाही. तिनं माझ्याकडे कधी काही मागितलंही नाही. जीव भरून मला कधी काही दिलंही नाही. आता ती गेली. सारं संपलं. घर रितं झालं पण मन रितं झालं का? कळत नाही मला. कारण गीतानं माझं मन कधी भरूनही टाकलं नाही. या प्रकाराचा उलगडाच होत नाही मला. माफ करा. मी फार बोलतो आहे. कदाचित अप्रस्तुतही बोलत असेन. पण मला वाटतं, मी जे बोलतो आहे त्याचा अर्थं तुम्हीच जाणू शकाल.’
वालावरकर क्षणभर स्तब्ध राहीला. मग तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता स्वयंपूर्ण होती. स्वतःच ती संतुष्ट होती. तिला कधी कुणाची गरजच भासली नसावी. तिनं दोन लग्नं केली. दोन संसार थाटले. पण मला वाटतं, तिला त्याची आवशकताच नसेल. अशा स्त्रीया असतात का? कुणास ठाऊक! निदान गीता तशी होती. असावी.’
’तिला नेमकं काय हवं होतं, मला कधीच कळलं नाही.’ श्रीनिवास स्वतःशीच बोलावा तसे बोलला.
’मलाही समजलं नाही ते.’ वालावलकर म्हणाला. मग अचानक काहीसे आठवल्यासारखे करून तो बोलला,
’गीताचा एखादा फोटो आहे? मला….मला तिला बघावसं वाटत. तुमची हरकत नसेल तर-’
’हरकत कसली त्यात?’ श्रीनिवास चटकन उठून म्हणाला, ’थांबा. बेडरूममध्ये फोटो आहे तिचा. घेऊन येतो.’
तो आत जाऊन गीताचा फोटो घेऊन आला. वालावरकरने फोटो घेतला. तो त्याकडे बघू लागला. गीतात फारसा फरक पडला नव्हता. तेच आत्ममग्न डोळे. तेच घटट मिटलेले ओठ. चेहऱ्यावर तोच परका, दूरस्थ, स्वतःत रमलेला भाव. फोटोकडे टक लावून बघून वालावरकरने एक हलका निःश्वास सोडला. मग त्याने तो फोटो दूर ठेऊन दिला.

’तुम्हाला…तुम्हाला या फोटोची एखादी प्रत हवी आहे का?’ श्रीनिवास संकोचाने म्हणाल, ’हवी असेल तर देतो.’
’छेः मला काय करायचा आहे फोटो!’ वालावलकर चटकन म्हणाला. मग अचानक एक गूढ वाक्य तो बोलला. तो म्हणाला, ’मला वाटतं, गीता हा एक आरसा होता. आरशाला स्वतःचं रंगरूप नसतं. भावना नसतात. गीता तशीच होती. त्या आरशात एकदा माझं प्रतिबिंब उमटलं. एकदा तुमचं. पण आरशाला ना त्याचं सुख, ना दुखः. आज आरसा फुटलाय. पण त्याच्या फुटलेल्या कांचात आज आपली दोघांची प्रतिबिंब एकत्र उमटली. आपण दोघे एकमेकांच्या जरा अधिक जवळ आलो…’

श्रीनिवास विस्मयाने थक्क झाला. हा सामान्य, व्यक्तीत्वहीन दिसणारा माणूस असे काही बोलेल याची त्याला कल्पनाही नव्हती. आरसा. तो गीताच्या व्यक्तीत्याच्या या नव्या अर्थाची स्वतःशी ओळख पटवून घेऊ लागला.
संध्याकाळ दाटत चालली होती. दिवाणखान्यात काळोख भरत होता. गीताचा फोटो अस्पष्ट होत होता. आणि ते दोन अनोळखी, परके पुरूष एकमेकांसमोर बसून आपणांमध्ये जडलेल्या या नव्या नात्याचा विचार करीत होते. अर्थ लावीत होते. फुटक्या आरशात उमटलेली एकमेकांची प्रतिबिंबे बघत होते.

(शांता शेळके लिखित ’अनुबंध’ ह्या कथासंग्रहातील ’आरसा’ ही कथा)

सुवर्णमुद्रा

सुवर्णमुद्रा:

नुकतंच मी पुणे मराठी ग्रंथालयामधून शांता शेळके यांचं ’सुवर्णमुद्रा’ नावचे पुस्तक आणलं. त्यात छोट्या-छोट्या कविता, विचार, उतारे यांचे संकलन आहे. त्यातलेच काही वेचक इथे देत आहे!
———————————————————————————

इशारा:

तुम्ही जेव्हा उत्कट आनंदाच्या ऐन भरात असाल तेव्हा कुणालाही, काहीही वचन, आश्वासन देऊ नका आणि तुम्ही जेव्हा अत्यंत संतापलेले असाल तेव्हा कुणाच्या कसल्याही पत्राचे उत्तर देऊ नका

– चिनी म्हण
———————————————————————————

सुख:
कुणी तरी आपल्यावर उत्कटपणे प्रेम करणारे आहे या जाणीवेइतके सुख दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत नसते
व्हिक्टर ह्युगो
———————————————————————————

एकरुपता:
लवण मेळविता जळे । काय उरले निराळे ॥
तैसा समरस झालो । तुजमाजी हरपलो ॥
अग्निकर्पुराच्या मेळी । काय उरली काजळी ॥
तुका म्हणे आता । तुझी माझी एक ज्योती ॥

~ संत तुकाराम
———————————————————————————

जुनी पत्रे:
जुनी पत्रे वाचताना खूप गंमत वाटते. आनंदही होतो. आणि सर्वात आनंदाची गोष्ट ही की त्या पत्रांना उत्तरे लिहिण्याची जबाबदारी आपल्यावर नसते!
———————————————————————————

स्त्री:
एक पर्शियन कवी म्हणतो: जागाच्या प्रारंभकाळी अल्लाने एक गुलाब, एक कमळ, एक कबूतर, एक सर्प, थोडासा मध, एक सफरचंद आणि मूठभर चिखल घेतला. या साऱ्यांचे जेव्हा त्याने मिश्रण केले तेव्हा त्यातून स्त्री निर्माण झाली!
———————————————————————————

परपुरषाचे सुख:
परपुरषाचे सुख भोगे तरी ।
उतरोनि करी घ्यावे शीस ॥
संवसारा आगी आपुलेनि हाते ।
लावुनी मागुते पाहू नये ॥
तुका म्हणे व्हावे तयापरी धीट ।
पतंग हा नीट दीपावरी ॥
———————————————————————————

कळपाचे नियम:
कळपात राहून कळपाचे नियम मोडणाराला माणसे निष्ठूर शासन करतात. समाज त्याचे प्रत्यक्ष वाभाडे काढत नसेल पण तो त्याला समाजात वावरणे अशक्य करून सोडतो. वेगळ्या वाटेने जाणाऱ्या माणसांची हलकेहलके पण अगदी पद्धतशीर रीतीने हकालपटटी केली जाते. तो माणूस फारच ताकदवान असेल तर इतर लोक त्याचे काही वाकडे करु शकत नाहीत. मग नाइलाजाने ते त्याला आपल्यात सामावून घेतात. वेळप्रसंगी त्याच्यापुढे लोचटपणा करतात. लाचारीही पत्करतात. पण या साऱ्यामागे एक स्वच्छ नकार, झिडकार दडलेला असतो. माणसाच्या या दुटप्पी वर्तनापेक्षा कळपाचे नियम न पाळणाऱ्या पशूंचा किंवा पक्ष्यांचा सजातियांनी केलेला क्रूर वध अधिक दयाळूपणाचा आहे अस वाटत नाही का?
———————————————————————————

विनवणीः
दूर लाजुन पळतेस कशाला?
का म्हणतेस तू ’नका-नका’?
घडेल तेव्हा संग घडो पण
तूर्त एक घेऊ दे मुका !

– पारंपारिक लावणी
———————————————————————————

अविद्या:
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले

– महात्मा ज्योतिबा फुले
———————————————————————————

प्रीतिसंगम:
दोघेही एकमेकांवर रुसली होती. अन्तःप्रेरणेने त्यांनी एकमेकांकडे चोरुन कटाक्ष टाकले! त्यांच्या द्रुष्टीचे मीलन झाले तेव्हा दोघेही एकदम हसली!

– गाथासप्तशती
———————————————————————————

कुणासाठी कोण:
कुणासाठी कोण देही जपतसे प्राण
कुणासाठी कोण जीव टाकते गहाण !
———————————————————————————

उच्छादी वारा:
कसा उच्छादी हा वारा
केळ झोडपून गेला
किती झाकशील मांडी?
नाही मर्यादा ग ह्याला !

– पु. शि. रेगे
———————————————————————————

आयुष्य:
हे आयुष्य म्हणजे हुंदके, स्फुंदणे, उसासे आणि हसणे या साऱ्यांचे मिळून एक विचित्र मिश्रण आहे. पण त्यात स्फुंदण्याचे प्रमाण जरा जास्त असते.
– ओ. हेन्र्री
———————————————————————————

मला नाही:
तुला बाबा मला बाबा
तुला दादा मला दादा
तुला ताई मला ताई
तुला आई मला नाही
———————————————————————————

एक क्षण:
एक क्षण असतो मुक्त बोलण्याचा
एक क्षण असतो मौन पाळण्याचा !
———————————————————————————

घातक:
भलत्या वेळी सांगितलेले सत्य असत्याइतकेच घातक असते.
———————————————————————————

जुने ठवणे मीपण आकळेना
जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ।
देहे बुद्धिचे कर्म खोटे टळेना
जुने ठेवणे मीपण आकळेना ॥
———————————————————————————

काळ्या निळ्या ढगातः
काळ्या निळ्या ढगात कडाडते वीज
डोळ्यांतून कुठे तरी उडून जाते नीज
गहन रात्रीच्या पदरात स्वप्नांचा संभार
मनात जाग्या होतात आशा अपरंपार !
———————————————————————————

संपर्क माध्यमेः
प्रेम, लहान मुले आणि आपण करत असलेले काम – माणसाच्या भोवतालच्या जगाशी उत्कट संपर्क साधणारी ही तीन संदर माध्यमे आहेत
– बर्ट्रान्ड रसेल
———————————————————————————

मित्र ओळखाः
मित्र तयार करता येत नाहीत. ते जीवनात येतच असतात. पण आपण त्यांची ओळख पटवुन घ्यावी लागते. आणि एकाकी, स्नेहशून्य माणसांचे हेच मोठे दुखः असते. त्यांच्याभोवती माणसे वावरत असतात. पण एकाकी माणसांना त्यांच्यातला स्नेहभाव ओळखता येत नाही.
———————————————————————————

टीकाखोरः
मला टीका करण्याची फार खोड आहे. माझी मते उकलून दाखवताना मी नेहेमी दुसऱ्यांच्या मनांतील वैगुण्ये दाखवीत असतो, आणि माझ्या लेखनात जर माझी ही खोड एकपट दिसत असली तर माझ्या बोलण्यानं ती दुप्पट दिसून येते. दोष काय आहेत हे पाहण्याची प्रव्रुत्ती माझ्यात अगदी प्रखर आहे, नसावी इतकी प्रखर आहे. भोवतालच्या लोकांच्या बोलण्यातील, विचारांतील चुका दाखवणे ही माझी जित्याची खोड आहे ती काही केल्या जात नाही. माझे मलाच त्याचे वाईट वाटते पण स्वभावाला औषध नाही !

– हर्बर्ट स्पेन्सर
———————————————————————————

चुकलेच!
येवढे प्रदीर्घ आयुष्य माझ्या वाट्याला येणार आहे हे जर मला थोडे आधी कळले असते तर मी माझ्या प्रक्रुतीची जरा अधीक काळजी घेतली असती !
———————————————————————————

प्राण की पैसा?
गुंडोपंत रानातून एकटेच प्रवास करत होते. वाटेत चोरट्यांनी त्यांना अकस्मात गाठले. ’चल, काय पैसे जवळ असतील ते काढ’ चोरट्यांचा नायक दरडावून त्यांना म्हणाला, ’नाही तर तुझा जीवच घेतो बघ. बोल. पैसा की प्राण?’ ’तर मग तुम्ही माझे प्राणच घ्या’ गुंडोपंत म्हणाले, ’मजजवळच्या पैशाला मात्र हात लावू नका. कारण तो मी आपल्या म्हातारपणासाठी जमवत आलो आहे !’
———————————————————————————

एकटेपणाचे मह्त्व:
एकटे राहण्याची सवय करुन घ्या. एकटेपणाचे फार फायदे आहेत. ते गमावू नका. स्वतःचा सहवास स्वतः अनुभवणे, त्यात रमणे ही फार आनंददायक गोष्ट आहे. ती साध्य झाली तर तुम्हाला इतरांच्या संगतीशिवायही सुखासमाधानाने राहाता येईल. एकदा अनुभव तर घेऊन पाहा !
———————————————————————————

थोडे तुझे, थोडे माझे
थोडे तुझे, थोडे माझे । सारे आपुल्या दोघांचे
कुठे शुभ्र, कुठे अभ्र । रंग अनोखे नभाचे
काही प्राप्त, काही लुप्त । काही फक्त क्षितिजाचे
नाही खंती – जे जे हाती । ते ते आनंदघनाचे !
———————————————————————————

काळ:
माणूस जगतो काही काळ
आणि जातो मरून
काळ आपला शांतपणे
बघत असतो दुरून !
———————————————————————————

शिकण्यासारखे काही:
आम्ही दूध पितो
मांजरही दूध पिते…
पण मांजराच्या ते अंगी लागते.
आम्ही मरेस्तोवर जगतो
मांजरही मरेस्तोवर जगते…
पण मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे नसते !
आम्हाला तेही कळत नाही…
पण त्याचा आत्मा भटकत राहिल्याचे कोणी ऐकले नाही !
प्रुथ्वीवरचा सर्वांत हुषार प्राणी
माणूस असेलही…
पण त्यान्ही कधी तरी निवांतपणे
म्यॊंव करायला हरकत नाही !

– एक ग्रीटींग कार्ड (खास ’माऊ’ साठी!)
———————————————————————————

नको:
नको शब्दांची आरास, नको सुरांचे कौतुक
तुझ्या माझ्या मनातले तुला मलाच ठाऊक !
———————————————————————————

सागर पोहत बाहुबळाने:
सागर पोहत बाहुबळाने नाव तयासि मिळो न मिळो रे
स्वयेच तेजोनिधे जो भास्कर तदग्रुहि दीप जळो न जळो रे
जो करि कर्म अहेतु निरंतर देव तयासि वळो न वळो रे
झाली ओळख ज्यास स्वतःची वेद तयासि कळो न कळो रे

– श्री. रा. बोबडे
———————————————————————————

शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?

शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?

भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरी
सुरुवात कुठे करु…अं, आधी पाव-भाजीच बरी

एकच पोट, एकच तोंड
भूक कमी खा-खा प्रचंड

भेळच बरी पाव-भाजी ला वेळच फार
इतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार

आ..आ..आली भेळ…पहिला घास – वा वा…!!!
दुसऱ्या घासापूर्वीच… मला पिझ्झा वाटतोय खावा

असं का झालं, असं का होतं
जे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते…हल्ली

खातंय कोण – तोंड की मन?
बहुतेक मनच
कारण

खाण्यात नाही सगळ्यातच असं होतं…हल्ली

—————————————————————————————————

ह्याला आम्ही कायकू अस नाव दिल आहे…हायकू च्या धर्तीवर…

हे गद्य किंवा पद्य दोन्ही प्रकारात मोडत नाही (वाकतही नाहीच…कारण आमचा बाणा – ’मोडेन पण वाकणार नाही’)
गद्य किंवा पद्य दोन्ही नसलेले लेखन बरेचदा ’मद्य’ ह्य प्रकरात मोडते…कारण मद्याचा त्या लेखक (किंवा कवी किंवा तत्सम) प्राण्यावर प्रभाव असतो. इथे ती शक्यताही नाही, कारण आम्ही दारु पीतच काय उडवत पण नाही.

आमचे हे शब्द-तुकडे ’कालातीत’ आहे असे आम्हला वाटते, त्यामुळे त्याला ’सद्य’ म्हणणे ही बरोबर नाही.
खाण्याशी संबंधीत असल्याने आणि जरी मन या शब्दाचा पुसटसा उल्लेख आला असला तरी हे शब्द-तुकडे ’ह्रुद्य’ ही नाहीत.

अशा प्रकारे हे गद्य, पद्य, मद्य, सद्य किन्वा ह्रुद्य काहीच नाही…आणि अजून ’द्य’-कारान्त शब्द आत्ता सुचत नाहीत. असो.

तर थोडक्यात यावर जास्त चर्चा न करता आम्ही हे इथेच संपवून पुन्हा नवीन ’कायकू’ चे शब्द-तुकडे जुळवायच्या मागे लागतो!

ग.दि.माडगूळकर यांचे लेखन

ग.दि.माडगूळकर यांचे लेखन – मला आवडलेले दोन लेख

अरे दिवा लावा कोणी तरी

हॆलो, मिस्टर डेथ

~ कौस्तुभ

कूट-प्रश्न

नुकतंच एक मराठी कोडं/कूट-प्रश्न वाचण्यात आला…ते इथं देत आहे…

मराठीत एकच अक्षर चार वेळा आलेले चार अक्षरी चारच शब्द आहेत.(मामा-मामी,काका-काकी असे जोड शब्द नव्हेत) ते कोणते .

याचं उत्तर मलाही माहिती नव्हतं, पण तेही वाचण्यात आलं…त्यामुळे मला चारही शब्द माहिती आहेत (आणि ते थोडे विवादास्पद उत्तर आहे असेही वाटतंय)

~ कौस्तुभ

नासाचे अंतराळयान आणि मराठी भाषा

नुकताच मी युनेस्को च्या अहवालानुसार जगातील विविध भाषांची क्रमवारी वाचत होतो…मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठीचा क्रमांक १६-१७ वा आहे, इटालियन, कोरीअन, पोलीश, डच, स्वीडीश अशा अनेक प्रादेशिक भाषांपेक्षाही वर.

अजून एक interesting गोष्ट मला कळली, ती म्हणजे नासा नी व्हॊएजर नावचं एक यान अंतराळात सोडलं होतं. त्या यानाबरोबर विविध गोष्टी पाठवल्या होत्या – म्हणजे समजा कोणी परग्रहावर माणूस किंवा सजीव प्राणी असलाच तर त्याला आपल्याइथल्या वस्तु, संस्क्रुती, समाज यांची माहिती किंवा तोंडओळख व्हावी यासाठी एक ध्वनीमुद्रिका पाठवली होती. त्यात जगातल्या ५५ प्रमुख भाषांमध्ये एक संदेश होता. ज्यात मराठीचाही समावेश होता. (मराठी संदेश तुम्ही इथे ऐकू शकता)

’नमस्कार, या प्रुथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात. आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी धन्य हो’

तो संदेश ऐकून माझा अंगाचा तिळपापड झाला, लाही लाही झाली, चिडचिड, जळजळ, उद्रेक, विस्फोट इ. इ. जे जे शक्य आहे ते सगळं झालं. किती बिनडोक संदेश आहे, काही अर्थच नाही…अशक्य आचरटपणा!

इतके अशुद्ध मराठी उच्चार, भाषा आणि इतका सुमार संदेश. आणि तोही इतक्या ऐतिहासिक आणि खगोलिक (भौगोलिक च्या धर्तीवर हा शब्द मी आत्ताच तयार केला आहे!) अंतराळ यात्रेसाठी. म्हणजे उद्या समजा खरच परग्रहावर कोणी सजीव प्राणी असलाच आणि त्यानी हा मराठी संदेश ऐकला तर त्याचा मराठी भाषेबद्दल किती गैरसमज होईल…पार लाज जाईल आपली. समजा त्यातला एखादा (ह्रितिक रोशनच्या कोई मिल गया मधल्या ’जादू’ सारखा) पुण्यात आला चुकून…आणि ’हीच का तुमची मराठी भाषा’ असं मला विचारलं…तर? तोंड दाखवायला जागा राहणार नाही मला…

अजून एक गंमत म्हणजे, याच संदेशांबरोबर ’Music from Earth’ या शीर्षकाखाली प्रुथ्वीवरचं विविध देशातील संगीताचा समावेश होता (उदा. अमेरिका, मेक्सिको, अझरबैजान, पेरु, ऒस्ट्रेलिया इ.). त्यात भारतीय शास्त्रीय संगीताचा नमूना म्हणून सूरश्री केसरबाई केरकर यांची ’जात कहा हो’ ही साडेतीन मिनिटाची बंदिश ही होती.

ते वाचून मला इतकं नवल वाटलं…की सगळं सोडून त्यांना ’केसरबाई केरकर’ च का सुचाव्यात? म्हणजे माझं केरकर बाईंशी तसं काही वैयक्तिक वाकडं नाही. पण भारतातच ते किती जणांनी ऐकलं असेल काय माहिती, आणि मग परग्रहावरच्या सजीवांना आपल्या संगीताचा हा असा नमूना कशाला? कदाचित ’जात कहा हो’ वगैरे बंदीश त्या सजीवाला अर्थपूर्ण वाटेल असा काहीतरी विचार असावा.

ज्यांनी कोणी हा मराठी संदेश आणि हे भारतीय संगीत निवडले असेल त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना त्यांचे मौलिक विचार स्पष्ट करायला लावले पाहिजेत!

पण त्यांची तरी काय चूक? हे यान अंतराळात जाऊन तिथे पोचायलाच २५-३० वर्षे लागतात. व्होएजर-१ १९७७ च्या आसपास पाठवले आणि त्याचा प्रवास २०१५ मध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजे इतके वर्ष जूना संदेश आणि संगीत असलं तर ते आत्ता आऊटडेटेडच वाटणार…विशेषतः मराठी भाषेतला संदेश.

आफ्टरऒल मराठी बरं का, हॆज चेंजड सो म्हणजे सो मच…इन लास्ट २५ ईअर्स…की काही विच्चारू नका!!

~ कौस्तुभ

Blog at WordPress.com.

Up ↑