The Rahul Deshpande Collective: तू जहाँ जहाँ चलेगा आणि “नंद” राग

राहुल देशपांडे चा Youtube चॅनेल मी नियमितपणे बघतो. आधी त्यांनी त्याच्या रियाझाचे, सहज गातानाचे व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली. त्यानंतर काही कलाकारांबरोबर collaboration करत काही गाणी record केली. आता त्याने The Rahul Deshpande Collective नावाने एक उपक्रम सुरु केला आहे ज्यात तो एखादे गाणे सादर करतो, आणि मग त्या गाण्याबद्दलची माहिती सांगतो आणि मग त्याच्या पद्धतीने ते गाणे खुलवतो, प्रयोग करत खुलवतो. क्वचित कधी तरी हा प्रयोग तितकासा जमून येत नाही, पण बरेचदा हा प्रयोग खूप रंगतो!

त्यातून त्या गाण्याबद्दल, गाण्याच्या मूळ कलाकारांबद्दल आणि स्वतः राहुल देशपांडे बद्दल ही अनेक गोष्टी नव्याने समजतात/जाणवतात. 

हे लिहायचे कारण म्हणजे, नुकतेच मी त्याचे “मेरा साया” मधील “तू जहाँ जहाँ चलेगा” हे गाणं ऐकलं.

हा चित्रपट मराठीमधील “पाठलाग” चित्रपटावर बेतलेला आहे हे मला माहिती होते. पण चॅनेल वरील comment मधून एक नवीन गोष्ट समजली – ती म्हणजे ह्या गाण्याचे कवी/गीतकार राजा मेहदी अली खान यांच्याबद्दल. त्यांची अनेक प्रसिद्ध गाणी मी ऐकलेली आहेत, विशेषतः मदन मोहन यांच्याबरोबरची त्यांची गीते. पण एक नवीन वैशिष्ट्य या गाण्याचे समजले ते म्हणजे – राजा मेहदी अली खान हे अत्यंत अदबशीर लिहिणारे उर्दू कवी होते. ते नेहेमी “आप” लिहायचे, तू किंवा तुम नाही. मराठी लोकांना हा फरक तितकासा लक्षात येत नाही, कारण आपल्या हिंदी मध्ये आप, तुम, तू वगैरे सगळं एकच असल्यासारखे वापरतात. पण उत्तरेकडील “तेंहजीब” वाले लोक “आप” म्हणतात. तू किंवा तुम हे अपमानास्पद समजले जाते. 

तर राजा मेहदी अली खान हे नेहेमी “आप” वापरायचे; उदाहरणार्थ “आप की नजरोने समझा” किंवा “आप के पेहेलू में आकर” वगैरे. पण ह्या गाण्यात मात्र त्यांनी “तू जहाँ” अशी शब्दरचना केली आहे हे विशेष. 

का बरं असेल? चालीला अनुरूप म्हणून? कथेला अनुसरून? का अजून काही? माहिती नाही. काही तरी backstory असेल किंवा नसेलही. 

पण मला हा फरक एका दर्दी श्रोत्यानी दाखवला हे खूप आवडले. अशाच देवाण घेवाणीमुळे कलेचे रसग्रहण दर्जेदार होते.

दुसरा नवीन पैलू मला समाजला तो म्हणजे – हे गाणं “नंद” रागावर बेतलेलं आहे. नंतर राहुल देशपांडेंनी कुमार गंधर्वांची नंद रागातील “राजन अब तो आ” ही बंदिश ऐकवली. ती मी असंख्य वेळा ऐकली आहे. पण राहुल कडून ऐकताना ती बंदिश आणि “तू जहाँ जहाँ चलेगा” या दोन्ही नंद रागावरील आधारित गाण्यांमधील साम्य ठळकपणे जाणवले. 

तीच ती ठराविक साच्यातली गाणी ऐकण्यापेक्षा मला अशा प्रकारचे exploratory attempt जास्त आवडतात. अर्थात, जर तो प्रयोग फसला तर फार रागही येतो. पण तरीही असे प्रयोग करणे नक्कीच स्वागतार्ह आहे! फार कमी कलाकारांना ते जमू शकतं…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑