
परेश मोकाशीचा “हरिश्चंद्राची फ़ॅक्टरी” हा चित्रपट मला आवडला होता. नेहेमीच्या मराठी सुमार विनोदपटांच्या कचऱ्यात मोकाशीचा विनोदाचा sense आणि treatment खूपच दर्जेदार वाटली. पण तरी तो विशेष लक्षात राहावा असे वाटले नाही. पण ह्या वर्षाच्या सुरुवातीला आलेला “वाळवी” ह्या चित्रपटाने परत एकदा परेश मोकाशीच्या दर्जाची जाणीव झाली. Black Comedy प्रकारचा चित्रपट मराठीत बनतच नाही…त्यामुळे वाळवी विशेष आवडला.
त्यानंतर अगदी नुकताच “आत्मपॅम्फ्लेट” असे विचित्र पण लक्षवेधी नाव असलेला चित्रपट ६ ऑक्टोबर ला अजिबात गाजावाजा न करता प्रदर्शित झाला. आशिष बेंडे या नवोदित दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला आणि परेश मोकाशी याने लिहिलेला. आशिष हा गेली काही वर्षे परेशचा सहाय्यक दिग्दर्शक आहे. आत्मपॅम्फ्लेट हे आशिषच्या आयुष्यातील घटनांवर आधारीत कथानक आहे. थोरांची चरित्र असतात. सामान्यांचं आयुष्य एका पानावर, म्हणजे pamphlet वर लिहिता येईल इतकं नगण्य असतं – म्हणून आत्मचरित्र न म्हणता “आत्मपॅम्फ्लेट”! ही कल्पनाच मला आवडली!
चित्रपट theatre मध्ये फार काळ टिकला नाही…टिकणार नव्हताच. पण एक वेगळा, इंटरेस्टिंग चित्रपट असणार हे नक्की वाटत होते. त्यातच आशिष आणि परेश यांची चित्रपटाविषयीची एक मुलाखत थिंक बँक मध्ये पाहिली आणि चित्रपटाबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली.
म्हणून नुकताच मी हा चित्रपट download करून पाहिला. आणि मला प्रचंड आवडला, म्हणून हा ब्लॉग लिहायला घेतला.
चित्रपटातील मुख्य पात्राचे (नायकाचे) नावही आशिष बेंडे हेच आहे. म्हणजे दिग्दर्शकाचीच कथा आहे हे स्पष्ट होतं. त्याचा जन्म १९७९ चा. म्हणजे मला समांतर (मी १९८० चा). त्यामुळे त्या कथेशी लगेच कनेक्ट झालो. “आत्मपॅम्फ्लेट” नाव आणि विषय असल्यामुळे संपूर्ण चित्रपटात एक निवेदक (म्हणजेच नायक) सूत्रधाराच्या भूमिकेत गोष्टं सांगत राहतो. त्याचा आवाज, त्याची बोलण्याची पद्धत,शैली अफलातून आहे!
त्या शैलीमुळेच चित्रपटाचा टोन, त्याचा पोत ठरतो आणि तो एकदम साजेसा जमला आहे.
१९७९ पासून ते साधारण १७-१८ वर्षं म्हणजे १९९६-९७ पर्यंतचा नायकाचा प्रवास ह्यात दाखवला आहे. चित्रपट जातीभेद, सामाजिक विषमता यावरील एक विडंबनात्मक भाष्य आहे. A socio-political satire on discrimination असं याचं वर्णन करता येईल. चित्रपटात इतके सूक्ष्म बारकावे आहेत जे त्या काळात मोठे होत असलेल्या माझ्यासारख्या लोकांना लगेच नजरेस येतात. टोकदार आणि तल्लख संवाद आणि crisp editing हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. आशिष बेंडे आणि परेश मोकाशी या दोघांचेही या चित्रपटाबद्दल प्रचंड कौतुक व्हायला हवे!
सुदैवाने टी -सिरीज सारख्या मोठ्या production house चे निर्माते त्यांच्या मागे उभे राहिले त्यामुळे असा दर्जेदार चित्रपट बनू शकला.
चित्रपटातील बाकी बारकावे मी मुद्दामच इथे सांगत बसणार नाही, पण एवढंच सांगतो की हा चित्रपट मराठी सिनेमा मध्ये milestone आहे. इतका तो महत्वाचा, वेगळा आणि उल्लेखनीय आहे.
OTT वर आल्यास नक्की बघा.
चित्रपटातील एकमेव खटकलेली गोष्ट म्हणजे अगदी शेवटी “global” करण्याच्या नादात थोडा वाहावत जातो पण तेवढा एक सीन सोडला तर बाकी चित्रपट अप्रतिम आहे.
IMDb वर याचे रेटिंग ८.२/१० आहे (वाळवी चे ८.३/१० आहे).

Leave a comment