नुकतेच Twitter वर एक tweet वाचले आणि हे लिहायचे ठरवले.
“तुम्ही पाठ केलेली किंवा तुमच्या स्मरणात असलेली सगळ्यात निरर्थक गोष्ट कोणती?” असा प्रश्न होता.
त्यावर एकानी “पठ” चं संस्कृत शब्द रूप (म्हणजे शब्द चालविणे) याचं उदाहरण दिलं आणि त्यावरून माझ्या मनात बरेच विचार आले. कारण त्याबद्दल मीदेखील अनेकदा विचार करतो.

कित्येक गोष्टी माझ्या स्मरणात आहेत ज्या म्हटलं तर निरर्थक आहेत. जर ती मेमरी क्लीन करता येत असती तर किती बरे झाले असते. असं म्हणतात की वयाच्या सुरुवातीच्या काही वर्षात आपले पाठांतर, आठवणी अशा असतात की त्या दीर्घ काळ टिकतात. मग ते चांगल्या दर्जाचे असो की वाईट. गहन असो की उथळ.
ह्या संस्कृत वरूनच मला आठवलं. आम्हाला संस्कृत ८ वी ते १० वी असं ३ वर्षं होतं. मला संस्कृत विषय आवडायचा, पण शिकवणारे केवळ scoring subject म्हणून शिकवायचे आणि आम्ही विद्यार्थी पण मार्क्स मिळवण्यासाठी चांगला विषय अशा हेतूनेच बघायचो. मला १० वी ला संस्कृत मध्ये ९५ मार्क्स मिळाले. त्यामुळे माझी काही तक्रार नाही. पण भाषा शिकायच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग झाला नाही. घोकंपट्टीच जास्त, आणि व्याकरणाचा पाया तयार होणे वगैरे अजिबात नाही. असो.
तरी मी पाठ्येतर हा एक प्रकार असायचा त्याची तयारी म्हणून काय काय वाचायचो. त्याआधीही मला संस्कृत श्लोक, स्तोत्रं वगैरे येत होती, आणि त्याचा अर्थ समजावून घ्यायचा मी प्रयत्न करायचो.
पाठ्येतर ची तयारी म्हणून कालिदासाचे साहित्य याबद्दल थोडे वाचले. ते लक्षात ठेवण्यासाठी, पाठ करण्यासाठी मी mnemonic तयार करायचो, किंवा abbreviation. फक्त संस्कृतच नाही तर बाकी विषयांसाठी पण. अजूनही करतो. बरेचदा त्याचा फायदा होतो. बरेचदा, बाकीचे विसरले जाते पण mnemonic/abbreviation लक्षात राहते आणि त्या शिवाय काहीच आठवत नाही. तेव्हा गंमत वाटते.
उदाहरणार्थ, गांधीजींच्या कुठल्याश्या चळवळीत (बहुतेक १९४२ ची) त्यांनी ११ विचार/ठराव सांगितले. ते mnemonic नी पाठ केले होते, ते असे होते:
“सं – ज – मी – प – गु – के – खु – सै – स – हुं – बं”
म्हणजे संपूर्ण दारूबंदी करा…मिठावरील कर रद्द करा…हुंडाबळी कायदा करा वगैरे २-३ च आठवत आहेत. पण ते ११ अक्षरी mnemonic मात्र लक्षात राहिले.
तसेच कालिदासाचे संपूर्ण साहित्य “कुर – मेऋ – अविमा” म्हणून लक्षात ठेवले होते. म्हणजे, कालिदासाने एकूण २ महाकाव्ये, २ खंड काव्ये आणि ३ नाटके लिहिली.
२ महाकाव्ये – कुमारसंभव आणि रघुवंश
२ खंड काव्ये – मेघदूत आणि ऋतुसंहार
आणि
३ नाटके – अभिज्ञान शाकुन्तलम्, विक्रमोर्वशीयम् और मालविकाग्निमित्रम्
हे मी १० वी मध्ये म्हणजे १९९४-९५ मध्ये पाठ केले होते. जे आज ३० वर्षांनी अजूनही लक्षात आहे. ते कधीच कुठे वापरले नाही. तरीही अजूनही लक्षात आहे. आता त्याला “the most useless thing you have still memorised” म्हणावे का? कदाचित हो, आणि कदाचित नाही.
Useful किंवा Useless म्हणजे फक्त applied किंवा beneficial ह्या अर्थानेच असावे असे नाही. तसं मग असंख्य गोष्टी ज्या कधी काळी useful असतात त्या पुढे useless होतात. पण म्हणून विसराव्या का?
संस्कृत मला खरंच आवडते. व्याकरण पुढे शिकता आलं नाही तरी मी अजूनही संस्कृत श्लोक, स्तोत्र आवडीने आत्मसात करतो, वापरतो. बरेचदा संस्कृत मुळे आपल्या मांडणीला वलय आणि वजनही येते.
There is a saying in Latin: “Quidquid latine dictum sit, altum videtur”, which means “Whatever is said in Latin sounds profound”.
तीच गोष्ट संस्कृत बद्दल किंवा संतांचे अभंग, ओव्या याबद्दल ही खरी आहे. आणि अनेकदा त्यातून खूप कमी शब्दात खूप गहन किंवा अवघड विचार सोपा करून सांगितलेला असतो हे ही खरे.
जुन्या संस्कृत घोकंपट्टीमुळे मला त्या संस्कृत श्लोकांची गोडी, आवड निर्माण झाली… म्हणजे ते अगदीच useless नव्हते.
पण सरतेशेवटी, “the most useless thing you have still memorised” हा विचार मला आवडला. आणि त्यावर विचार केल्यावर खूप कटू-गोड, मजेशीर, अर्थ न लागणाऱ्या आठवणी, गोष्टी समोर आल्या… आणि त्यावर अजून खोलवर विचार केल्यावर स्वतःच्याच स्वभावाचे काही पैलू समजले!
त्याबद्दल पुन्हा केव्हा तरी लिहीन. पण तुमच्या बाबतीत अशा “निरर्थक” गोष्टी ज्या तुमच्या स्मरणात आहेत, अशा कोणत्या आहेत?

Leave a comment