दिवाळीच्या दिवसात शुभच्छांच्या मेसेजेसचा भडीमार असतो. बरं मेसेजही स्वतः कष्ट घेऊन लिहीलेले असतील तरी ठीक आहे. पण बहुतेक वेळेस मेसेजेस forward केलेले असतात. म्हणजे माझ्या आईच्या भाषेत पुढे ढकललेले असतात.
म्हणून मी परवा एका मित्राला आधीच सल्ला वजा इशारा दिलाः “साधं सरळ “शुभ दीपावली” म्हणून wish करा…
उगाच,
दिवा तुमच्या दारी, माती-नाती, पणती वगैरे कविता लिहीत बसू नका कुणीही वाचत नाही.”
पण मित्र माझ्याइतकाच चिवट आणि कुजकट. त्यानी मुद्दामून अत्यंत निरस दिवाळीचे मेसेजेस मला “गड्ड्या झब्बू” दिल्यासारखे पाठवले. उदाहरणार्थ,
“उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!”
“🪔✨असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
दिवाळीच्या तुम्हा
सर्वांना खूप खूप शुभेच्छा🪔✨”
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे….
जाग यावी सृष्टीला की
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी…
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही दिवाळी रोज यावी
माणसाचा देव व्हावा”
मग मी मित्राला म्हणालोः मागच्या वर्षी असंच काही तरी म्हणाला होतास…त्याचा अर्थ अजून लावायचा प्रयत्न करतोय…त्यात आता हे…असो!
तर मित्र म्हणाला, थांब अजून ढकलतो, म्हणजे सावकाश चघळत बस…असं म्हणून अजून काही मेसेजेस फेकून मारले.
“संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे….
जाग यावी सृष्टीला की
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी…
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
माणसाचा देव व्हावा…
दिवाळीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!!
🪔🪔🪔✨⭐”
“लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी
उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी
लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा
धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा
शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी
टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी
होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी
तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी
बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी
रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी
रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा
शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा
चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा
वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा
काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे
मानवाच्या संगतीने, देवसुद्धा वाट पाहे
जे भुकेले भोवताली, पोरके असती किती
वाटुया आनंद त्यांना, एवढी तुम्हा विनंती”
“दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
. . . . वसुबारसेला ।।१।।
दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
. . . . धनत्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
. . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
. . . . अश्विन आमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
. . . . बळीप्रतिपदेला
(पाडव्याला) ।।५।।
दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
. . . . यमद्वितियेला
(भाऊबीजेला) ।।६।।
*सहा दिवसांची ही दिवाळी*
*आपणा सर्वांना*
*सुखासमाधानाची आणि* *समृद्धीची जावो*.
🪔🪔🪔🪔🪔🪔
आता हे थांबवणे, थोपवणे गरजेचे होते. मग मीपण त्याला माझा एक मेसेज पाठवला…
“गुंता कुठलाही असो, तो सोडवता येतोच!
करायचं काय तर पेशन्स वाढवायचा.
सापडलेले एक टोक एका खुंटीला टांगून ठेवायचे.
दुसरे विक्रमादित्यसारखे आपल्या हातात ठेवायचे. मग आपल्याला वाटतं, की गुंता आता सुटणार…पण तसं नसतं. आपल्याला अजून एक खुंटी लागते दोन टोकांच्या मध्ये असलेली भेंडोळी तात्पुरती टांगायला.
मग दोन्ही टोके आलटून पालटून गुंता सोडवत न्यावा लागतो, आपोआप नाही सुटत…गुंता जरी आपण केलेला असला, तरी भोगा आपल्या कर्माची फळं काटेरी काटेरी असे म्हणून तो सुटत नाही. अनेकदा टीम लागते, गुंता सोडवायला.
हे सगळं आयुष्याचे तत्वज्ञान वगैरे काही नाहीये. मागच्या वर्षी गुंडाळून ठेवलेल्या लाईट्सच्या माळा सोडवताना, सुचलेले विचार आहेत एवढंच!”
आणि मग त्याच्या मेसेज forward करण्याच्या सवयीवर एक कुजकट पोस्ट पाठवून विषय संपवला…


Leave a comment