“दुर्दैवी” मुकुंद फणसळकर, श्रद्धांजली आणि Good Will Hunting

परवा मी सुप्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर याच्या श्रद्धांजली निमित्त आयोजित कार्यक्रम “मुकुंद…एक नॅास्टॅल्जिया” या कार्यक्रमाला गेलो होतो. त्याबद्दल काही लिहावेसे वाटले.

मी १९९५ मध्ये दहावी/अकरावी मध्ये असताना झी टीव्हीवर सारेगामा पहायचो. सोनू निगम ॲंकर होता आणि अनेक दिग्गज judges होते. स्पर्धकही दर्जेदार होते. श्रेया घोषाल, सुनिधी चौहान ह्या अशाच reality shows मधून पुढे आल्या. त्यातलाच एक गुणवान स्पर्धक म्हणून मुकुंद फणसळकरला पाहिल्याचं, ऐकल्याचं आठवतंय. तलत मेहमूद सारखा नाजूक, तरल आवाज आणि सर्व प्रकारच्या संगीताचा अभ्यास असलेला मृदू व्यक्तिमत्वाचा गायक म्हणून तो इतरांपेक्षा वेगळा होता. त्या पर्वाचा तो विजेता झाला होता. पण त्यानंतर पार्श्वगायनात किंवा इतर माध्यामातून फार भरीव, ठळक असे काही जाणवले नाही.

नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात अचानक त्याच्या निधनाची बातमी कळली. कोणतातरी दुर्धर आजार होता. कदाचित व्यसनामुळे असेल. पण जास्तं काही माहिती झाले नाही.

सोमवारी (१६ डिसेंबरला) श्रद्धांजली कार्यक्रमाची जाहिरात पाहिली आणि सहज, वेळ होता म्हणून गेलो. एक चांगला, सभ्य व्यक्ती, गायक एवढीच ओळख होती.

पण बरेचदा एखाद्या व्यक्तीचे वेगळे पैलू समजले की आपल्याला अनेक गोष्टींची नव्याने ओळख, जाणीव होते. तसे काहीसे झाल्यामुळेच हा ब्लॅाग लिहावासा वाटला. असो. नमनालाच घडाभर तेल गेले, त्यामुळे आता मुख्य विषयाकडे वळतो.

पहिली गोष्ट समजली ती म्हणजे मुकुंद चा जन्म १९६४ चा होता आणि ह्यावर्षी मार्च मध्येच ६० वर्षे पूर्ण झाली होती. तो इतका वयस्कर असेल असे मला वाटले नव्हते. सुदेश भोसले त्याच्यापेक्षा ४ वर्षं मोठा आहे. तर सोनू निगम, मिलिंद इंगळे, सलील कुलक्रणी, स्वप्नील बांदोडकर, शान, वगैरे अनेक गायक मुकुंदपेक्षा बरेच लहान. सांगायचा मुद्दा हा की मुकुंदला स्वतःची अशी गाणी, ओळख मिळालीच नाहीत.

नंतर पुढचा खूप मोठा पैलू समजला तो म्हणजे मुकुंद बहुरंगी, हरहुन्नरी होता. तो पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयाचा विद्यार्थी होता (माझे वडील देखील तिथलेच माजी विद्यार्थी होते) आणि नंतर JJ School of Arts चा विद्यार्थी!

संगीता भिडे या त्याच्या मैत्रीणीने, सहगायिकेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्यांनी फार छान निवेदन केले. मुकुंदची चित्रकला फारच सुंदर होती. त्याने काढलेली अनेक pencil sketches तिथे slide show च्या माध्यमातून दाखवली. ग्रेस, ह्रदयनाथ, मदन मोहन इ. ची अप्रतिम pencil sketches आणि इतर काही कलाकृती तिथे पहायला मिळाली. तसेच तो एक उत्क्रृष्ट मूर्तिकार होता असेही समजले. अजून एक वैशिष्ट्य म्हणे हस्ताक्षर अत्यंत सुंदर होते. त्याचीही झलक slide show मधून बघायला मिळाली.

ते पाहून, ऐकूनच मला मुकुंद ह्या व्यक्तीबद्दल प्रचंड उत्सुकता, जिव्हाळा वाटला. मला बहुपेडी, ambidextrous, हरहुन्नरी लोकांचं खूप आकर्षण वाटतं. एखादी व्यक्ती एकाच बाबतीत प्रचंड थोर असेल आणि दुसरी व्यक्ती अनेक बाबतीत बऱ्यापैकी पारंगत असेल तर मला दुसरी व्यक्ती जास्त प्रिय, जवळची वाटते. मुकुंद हा तसाच वाटला, आणि म्हणून खूप आवडला.

नंतर मुकुंदच्या बहिणीने लिहून पाठवलेले मनोगत वाचून दाखवले. त्यात शेवटी त्यांनी आवाहन केले होते की १ वर्षभर समाजमाध्यमांवर फक्तं चांगलंच बोला. ते का हे थोड्यावेळातच काही आठवणींमुळे समजलं.

संगीता आणि इतर १-२ वक्त्यांच्या आठवणी ह्या संपूर्णपणे चांगल्या, ह्रृद्य होत्या. मधेमधे मुकुंदच्या गाण्याच्या काही पाहिलेल्या, प्रसिद्ध तर काही अप्रसिद्ध, दुर्मिळ, खासगी मैफीलीतले व्हिडीओ दाखवले. तो भाग चांगला वाटला. त्याची गाण्याची समज, कवितेची/साहित्याची समज, मराठीबरोबरच उर्दू/हिंदी भाषांचे ज्ञान आणि गाणं, त्याचा अर्थ समजावून सांगण्याची तळमळ काही video मधून आणि आठवणींमधून जाणवली.

नंतर काही असे वक्ते होते ज्यांचं भाषण, आठवणी ऐकून पुलंच्या “सखारामसुनू” ह्या लेखाची आठवण झाली. अगदी तंतोतंत तसेच श्रद्धांजलीचे भाषण, खोटा उमाळा, स्वतःची टिमकी वाजवणे इ. विशेषतः त्यागराज खाडिलकर बद्दल माझे मत चांगले नव्हतेच, पण तो अगदीच उथळ आहे असे जाणवले. आणि त्यानी “जिवलगा…” गाण्याच्या ज्या चिंधड्या उडवल्या त्या पाहून अंगाची लाही लाही झाली. त्याच सुमारास बरेच जण निघून गेले.

ह्याठिकाणी प्रेक्षकांबद्दल थोडेसे…

कार्यक्रम फुकट असल्यामुळे किंवा मुकुंदच्या गाण्यामुळे किंवा अकाली निधनामुळे म्हणा किंवा या सगळ्याच्या एकत्रित परिणामामुळे म्हणा पण कार्यक्रमाला तुडूंब गर्दी होती. इतकी की मधल्या पायऱ्यांवरही लोकं बसली होती. कोकणस्थ लोकांचे संयोजन असल्यामुळे कार्यक्रम बरोबर ठरल्यावेळी म्हणजे ६ वाजता सुरू झाला. मी ५ः४५ लाच पोचलो होतो आणि चांगल्या ठिकाणी बसलो होतो. माझ्या पुढच्या ३-४ रांगांमध्ये मिळून ३८ टक्कल पडलेले पुरूष होते, आणि ३० पांढरे केसवाल्या बायका. म्हणजे average age ६०+ असेल. त्यागराज खाडिलकरची निरर्थक बडबड आणि गाण्याचा कचरा करून झाल्यावर माझ्या शेजारच्या आजींनी ३ रांगा पुढे बसलेल्या तिच्या सुनेला किंवा मुलीला फोन केला आणि “काही विशेष नाही, मी घरी जाते, तू येताना ब्रेड आण आणि वेळेत ये. ह्यांचं चालूच राहणार” वगैरे बडबड करून walkout केले. इतर लोकांचीी वळवळ सुरू झाली.

त्याच वेळेस चंद्राकांत काळे यांचं मंचावर आगमन झालं. उगाचच आगाऊपणे वागणारा हा अजून एक माणूस. मुकुंदच्या विषयाच्या निमित्ताने स्वतःचा उदोउदो, आपल्या कार्यक्रमाचे गुणगान आणि उजळणी केली. एकदा थोडी खिल्ली उडवणारी मुकुंदची आठवण सांगितली. आणि शेवटी एक थोडासा औचित्य सोडून पण महत्वाचा मुद्दा मांडला ज्यामुळे मला Good Will Hunting ची आठवण झाली.

काळे यांनी ओझरत्या स्वरूपात सांगितले की मुकुंद व्यसनी, वैफल्यग्रस्त झाला होता. आणि इतक्या प्रतिभावान, गुणी माणसाला आपल्या आयुष्याचे असे वाटोळे करून घ्यायची परवानगी असता कामा नये. “हे काय जाण्याचे वय आहे? माफ करा, पण माझी चिडचिड होते” असे ते म्हणाले.

Good Will Hunting चित्रपटाची theme अशीच आहे. एक प्रचंड प्रतिभावान मुलगा जर वाईट वातावरणात, संगतीत असेल आणि त्यांच्यात राहिलेयामुळे त्याचे स्वतःचे वाटोळे करत असेल आणि त्यामुळे मानवजातीचे नुकसान होत असेल तर त्याला थांबवायचे आणि मार्गावर आणायचे की त्याचे जीवन त्याला त्याच्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे हे मान्य करून हस्तक्षेप करायचा नाही…या दोन पर्यायांची रस्सीखेच म्हणजे Good Will Hunting. When you are extremely talented, gifted in something, especially when that thing happens to be a blessing for the mankind, you have a moral obligation to do justice to your potential…to serve the mankind with the gift you have got. Or is it really a sound argument? That’s the core question. हे थोडे मोठे विषयांतर झाले, पण माझा अतिशय आवडता चित्रपट असल्यामुळे हे लिहीले. असो.

सुमारे ३ तास चाललेल्या कार्यक्रमात साधारण २ः१५ तासांनी पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे आगमन झाले. आधी ते माझ्या पुढच्याच रांगेत बसले होते. त्यावेळी चालू असलेली १-२ गाणी आणि आठवणी झाल्यावर ते स्टेजवर गेले.

त्यांनी अगदी छोटे पण समर्पक आणि थोडेसे candid भाषण केले. सुरूवातीलाच त्यांनी मुकुंद हा “दुर्दैवी” कलाकार होता असे सांगितले. दिसायला देखणा, उत्तम गायक, कलाकार असूनही कायम उदास, निराश असलेला, स्वतःची ओळख निर्माण करू न शकलेला, त्यामुळे व्यसनी, भ्रमिष्ट झालेला म्हणून “दुर्दैवी”. त्याच्यापेक्षा खूप कमी क्षमतेच्या, प्रतिभेच्या कलावंतांना खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. शेवटचे दिवस मंगेशकर रूग्णालयात गेले. अशी काहीशी नकारात्मक आठवण सांगितली. पण ती अवहेलना करण्याच्या हेतूने केलेली वाटली नाही. तर खरोखरच वाईट वाटल्याने आणि त्याच्याबदद्ल बऱ्याच अपेक्षा, आशा असलेयाने आणि त्या अजिबात पूर्ण झाल्याने वाटणारे शल्य जाणवत होते.

एकूणच मुकुंद फणसळकरचे अनेक नवीन आणि चांगले पैलू समजले, त्याचे दुर्दैवी आयुष्य , अपूर्ण कारकीर्द यांबद्दल समजले. काही लोकं किती उथळ असतात आणि अशा प्रसंगी कसे वागतात, बोलतात ह्याचा पुनरानुभव आला. आणि अजून एक जुनी आठवण जागी झाली. हृदयनाथ यांचीच. साधारण १९९५-९६ ची गोष्ट असेल. तेव्हा केसरीवाडा गणेशोत्सवात “भावसरगम” चा कार्यक्म होत असे जो आम्ही नियमितपणे बघायचो. अशाच एका कार्यक्रमात हृदयनाथ म्हणाले होते की हल्लीचे (१९९५) मराठी गायक कमनशिबी आहेत. त्यांच्यासाठी नवीन चांगली गाणी हल्ली बनतच नाहीत. त्यामुळे त्यांना आमचीच जुनी गाणी गाऊन कार्यक्रम करावे लागतात. ते अगदी समर्पक वक्तव्य होते. सलील कुलकर्णी, संदीप खरे, अजय-अतुल, अवधूत गुप्ते, मिलिंद इंगळे यांचा उदय व्हायचा तो काळ. खरोखरच नवीन मराठी गाणी कमी प्रमाणात येत होती आणि त्या काळच्या नवोदीत मराठी गायकांना जुनी भावगीतं ॲार्केस्ट्रा, गणपती उत्सव वगैरे मध्ये गाऊन आपले career करावे लागत होते.

मुकुंद हा त्या काळाचाच प्रतिनिधी, product होता…आणि म्हणूनच कदाचित तो “दुर्दैवी” होता.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑