शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?

शब्द-तुकडे: खातंय कोण – तोंड की मन?

भेळ खाऊ का खाऊ पाणी-पुरी
सुरुवात कुठे करु…अं, आधी पाव-भाजीच बरी

एकच पोट, एकच तोंड
भूक कमी खा-खा प्रचंड

भेळच बरी पाव-भाजी ला वेळच फार
इतका वेळ खाल्ल्याशिवाय नाही थांबवणार

आ..आ..आली भेळ…पहिला घास – वा वा…!!!
दुसऱ्या घासापूर्वीच… मला पिझ्झा वाटतोय खावा

असं का झालं, असं का होतं
जे खातोय ते सोडून, दुसऱ्याचीच चटक लागते…हल्ली

खातंय कोण – तोंड की मन?
बहुतेक मनच
कारण

खाण्यात नाही सगळ्यातच असं होतं…हल्ली

—————————————————————————————————

ह्याला आम्ही कायकू अस नाव दिल आहे…हायकू च्या धर्तीवर…

हे गद्य किंवा पद्य दोन्ही प्रकारात मोडत नाही (वाकतही नाहीच…कारण आमचा बाणा – ’मोडेन पण वाकणार नाही’)
गद्य किंवा पद्य दोन्ही नसलेले लेखन बरेचदा ’मद्य’ ह्य प्रकरात मोडते…कारण मद्याचा त्या लेखक (किंवा कवी किंवा तत्सम) प्राण्यावर प्रभाव असतो. इथे ती शक्यताही नाही, कारण आम्ही दारु पीतच काय उडवत पण नाही.

आमचे हे शब्द-तुकडे ’कालातीत’ आहे असे आम्हला वाटते, त्यामुळे त्याला ’सद्य’ म्हणणे ही बरोबर नाही.
खाण्याशी संबंधीत असल्याने आणि जरी मन या शब्दाचा पुसटसा उल्लेख आला असला तरी हे शब्द-तुकडे ’ह्रुद्य’ ही नाहीत.

अशा प्रकारे हे गद्य, पद्य, मद्य, सद्य किन्वा ह्रुद्य काहीच नाही…आणि अजून ’द्य’-कारान्त शब्द आत्ता सुचत नाहीत. असो.

तर थोडक्यात यावर जास्त चर्चा न करता आम्ही हे इथेच संपवून पुन्हा नवीन ’कायकू’ चे शब्द-तुकडे जुळवायच्या मागे लागतो!

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑