ए. आर. रेहमान, खान मंडळी आणि वाढते वय

आज ६ जानेवारी – ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रेहमान चा वाढदिवस. हा हा म्हणता ५८ वर्षांचा झाला!

ट्विटरवर कोण्या एका रेहमान विषयक थ्रेड मध्ये त्याची सुप्रसिद्ध गाणी एकाने दिली होती. सगळी २००९ नंतरची. नंतर उलगडा झाला की त्याचा जन्मच २००० चा होता. त्यामुळे त्याच्या लहानपणी म्हणजे २००८-०९ ला तो रेहमान ला follow करायला लागला आणि तेव्हाचीच गाणी त्याला जास्त आवडत होती. बाकी सर्व लोकांप्रमाणे मीही रेहमानची अगदी सुरुवाती पासूनची म्हणजे १९९२ पासूनची गाण्यांची यादी दिली आणि अचानक मला माझ्या वाढत्या (किंवा already वाढलेल्या) वयाची जाणीव झाली. 

२-३ च दिवसांपूर्वी असेच एका तरुण मुलाशी खान मंडळी (म्हणजे आमिर, सलमान आणि शाहरुख) यांच्या बद्दल बोलत होतो. आमिर (१९८८), सलमान (१९८९) आणि शाहरुख (१९९२) यांचा उदय मी लहान असताना म्हणजे ८-९ वर्षाचा असताना झाला. त्यामुळे मी त्यांच्या बरोबरच आणि त्यांची प्रगती, अधोगती पाहताच मोठा झालो, त्यामुळे तो काळ, म्हणजे १९८८ ते १९९५ माझ्या विशेष जवळचा आहे. कुणीतरी त्या काळातल्या हिंदी चित्रपट संगीताबद्दल बोलत होतं आणि मी लगेच त्यांना प्रत्येक वर्षाप्रमाणे सुंदर हिंदी फिल्म अल्बम्स ची यादीच दिली. म्हणजे:

१९८८ – कयामत से कयामत तक आणि तेजाब 

१९८९ – मैने प्यार किया 

१९९० – आशिकी आणि लेकिन 

१९९१ – साजन आणि फूल और कांटे 

१९९२ – दिवाना, जो जिता वोही सिकंदर आणि रोजा 

१९९३ – हम है राही प्यार के, बाजीगर, खलनायक, डर 

१९९४ – हम आपके हैं कौन आणि “१९४२ – अ लव्ह स्टोरी”

१९९५ – दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, बॉम्बे आणि रंगीला

त्यानंतरच्या वर्षांतील म्हणजे २०१० पर्यंत देखील सर्व हिंदी चित्रपट संगीत किंवा इतर प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीत याची मला इत्यंभूत माहिती होती, आहे. माझ्या एका music पॉडकास्ट मुळे मी अनेक नवीन व्यक्तींना ओळखू लागलो. गाणे हा मुख्य धागा धरून तर एका व्यक्तीशी अतिशय घनिष्ट संबंध निर्माण झाले! पण पुढे कधीतरी हिंदी चित्रपट संगीतातली रुची कमी होत गेली. कदाचित संगीत बदलले आणि मला ते आवडेनासे झाले. अरिजित सिंग मला विशेष आवडत नाही. चांगला आहे पण एकसुरी. आणि हल्लीची हाय पीच आणि कॉर्ड बेस्ड गाणी मला विशेष आवडत नाहीत. तरीही नवीन चांगली गाणी मी follow करतोच. पण ज्यांच्याशी ती गाणी शेअर करायची, discuss करायची ती लोकं आता आयुष्यात राहिली नाहीत त्यामुळे असेल,पण आता तितकंसं follow करत नाही. 

हेच कदाचित वय झाल्याचे लक्षण असेल; किंवा संगीताचा दर्जा खरोखरीच खालावला असेल. नक्की काय ते सांगता येत नाही. कदाचित दोन्हीही. 

ह्याचं चांगलं उदाहरण म्हणजे ए आर रेहमान. 

१९९२ चा किंवा २००३-४ पर्यंतचा ए आर रेहमान मला प्रचंड आवडतो. पण हल्ली त्याचे संगीतही तेवढे भावत नाही. पुन्हा तेच कारण असेल. माझे वाढते वय किंवा रेहमानचे संगीत जास्त techno आणि orchestration-oriented झालंय आणि मेलडी कमी झाली आहे असं वाटतं. हा बदल पण हळू-हळू होत होता. पण साधारण २०१० नंतर (Slumdog Millionaire च्या अलीकडे पलीकडे) ते पूर्ण बदललं असं वाटतं. असो. 

पण ए आर रेहमान आणि खान मंडळी – तसेच ९० च्या दशकातील चित्रपट आणि चित्रपट संगीत माझ्यासाठी नेहेमीच special असतील. 

माझ्या बाबांना RD बर्मन हा अतिशय प्रिय आहे. नौशाद, मदन मोहन, शंकर-जयकिशन, SD बर्मन  आणि असे अनेक दिग्गज संगीतकार त्यांच्या लहानपणी किंवा त्याआधी होते. पण RD बर्मन चा उदय आणि त्यांची सुरुवातीची वर्षे (formative years) एकत्रच असल्यामुळे त्यांना तो अतिशय प्रिय आहे. 

त्याबद्दलची एक गंमतीदार आठवण आहे. बहुतेक २००३ च्या सुमारास असेल.

मला चित्रपटांचे संगीतकार, गायक, प्रदर्शनाची वर्षे, दिग्दर्शक वगैरे बऱ्यापैकी माहिती असतात आणि लक्षात राहतात. अगदी जुन्या देखील. कारण ह्या विषयावरची असंख्य पुस्तके, लेख मी वाचत आलोय. तर एकदा बाबांशी जुन्या चित्रपट संगीताबद्दल माझा वाद चालू होता. SD बर्मनचा गाईड आधी आला की RD बर्मनचा तिसरी मंझिल. एक १९६५ साली आणि एक १९६६ साली. 

मी म्हणत होतो तिसरी मंझिल आधी आला. १९६५ मध्ये. आणि गाईड १९६७ मध्ये. बाबा म्हणाले गाईड १९६५ मध्ये आणि तिसरी मंझिल १९६६. इतकंच नाही तर त्यांनी तिसरी मंझिल ऑक्टोबर १९६६ मध्ये तर तिसरी कसम मार्च १९६६ मध्ये आला असे सांगितले. आणि ते बरोबरही होते. 

आणि नंतर ते जे म्हणाले ते मला आता अगदी समर्पक वाटते. ते म्हणाले: तू वाचलेल्या, लक्षात ठेवलेल्या माहितीच्या आधारे सांगत होतास. मी त्या काळात जगलेल्या आठवणी, milestones याच्या आधारे सांगत होतो. माझ्या आत्तेभावाच्या मुंजीच्या वेळेस आम्ही गाईड पाहिला होता आणि XYZ च्या लग्नाच्या वेळेस तिसरी मंझिल. आता हे इतकं direct connection आहे की ते चुकीचे असूच शकत नाही.

असच असतं. आपण जे जगलेलं, अनुभवलेलं असतं ते जास्त जवळचं, प्रिय असतं. Nostalgia आणि memory मध्ये हाच फरक आहे. 

माझ्या १९८८ ते २००१ मधल्या चित्रपटांबद्दल किंवा संगीताबद्दल तशाच आठवणी आहेत. त्या ऐकीव आणि वाचिव (असा शब्द आहे का?) माहितीवर नाहीत तर जगलेल्या काळाशी आणि त्यातल्या घटनांशी, माणसांशी निगडीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्या आठवणी आहेत तोवर ती गाणी, ते चित्रपट हे “माहिती” म्हणून नसतात तर आपल्या स्मृती असतात. अर्थात वाढत्या वयानुसार जेव्हा सगळ्याच स्मृती अंधुक होतात आणि मग उरते ती फक्त माहिती. काळाच्या ओघात स्मृती नष्ट होतात आणि माहिती खूप जास्त तिकडे. पण माणूस असेपर्यंत स्मृतीच जास्त महत्वाच्या असतील कारण त्या भावना, अनुभव आणि व्यक्ती यांच्याशी संबंधित असतात. असो. खूप जास्त भावनिक आणि वैचारिक झाले. 

तर ए आर रेहमान यांना हैप्पी बर्डे!

ए आर रेहमान च्या सांगीतिक प्रवासाबद्दल अतिशय सुंदर पॉडकास्ट Spotify नुकताच सुरु झाला आहे. स्वरूप आणि शरण हे बंधू रेहमानच्या प्रत्येक वर्षाचा सांगीतिक आढावा घेणार आहेत. आत्ता १९९२ आणि १९९३ चे एपिसोड झाले आहेत. रहमान प्रेमींनी आवर्जून ऐकावा असा पॉडकास्ट आहे हा. नक्की बघा. 

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑