होळी ह्या सणाबद्दल महाराष्ट्रातील संत महात्मे काय म्हणत होते या उत्सुकतेने थोडा शोध घेतला आणि हे सापडले 👇
देह चतुट्याची रचोनि होळी ।
ज्ञानाग्नी घालुनी समुळ जाळी ।।
अजुनि का उगलासी।
बोंब पडो दे नामाची ।।
मांदियाळी मिळवा संतांची।
तुम्हा साची सोडविण्या ।।
धावण्या धावती संत अंतरंग ।
संसार शिमगा सांग निरसती ।।
एका जनार्दनी मारली बोंब।
जन वन स्वयंभ एक जाले ।।
— संत एकनाथ
स्थुल, सुक्ष्म, कारण व महाकारण हे चार देह आहेत. या चारही देहांची होळी रचून, त्याला सदगुरू कृपेने प्रगट होणारा ज्ञानाग्नी लावून, ती होळी समुळ जाळून टाकली पाहिजे, आपण सदगुरूंनी दिलेल्या नामाची, त्यांनी शिकविलेल्या युक्तीने मनापासून बोंब मारावी व या संसार चक्रातून सोडवणूक होण्यासाठी, संताच्या मांदियाळीला शरण जावे व यथार्थपणे सुटका होईल
दैंय दु:ख आम्हा न येती जवळी ।
दहन हे होळी होती दोष।।
— संत तुकाराम
तुकोबा म्हणतात — ‘मी होळीत माझ्यातले दोष जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की, दारिद्र्य आणि दु:ख माझ्या जवळ सुद्धा येत नाही. दोष नाही तर दारिद्र्य नाही, आणि त्यामुळे दारिद्र्यातून निर्माण होणारे दु:ख नाही
वंदू चरणरज सेवू उष्टावळी ।
पूर्वकर्म होळी सांडू ।।
अमुप हे गाठी बांधू भांडवल ।
अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ।।
— संत तुकाराम
तुकोबा या अभंगात म्हणतात — आम्ही पांडुरंगाची चरणवंदना करून, त्यांचे उष्टे सेवन करू, त्यामुळे माझ्या पूर्व कर्माची होळी होईल.

Leave a comment