प्रमुख पाहुणे म्हणून न केलेले मनोगत…

————————————————————–

मागच्या आठवड्यात मला माझ्या प्राथमिक शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते त्याबद्दलचा हा वृत्तांत आणि व्यक्त न केलेले मनोगत.

————————————————————–

माझी प्राथमिक शाळा म्हणजे पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची “नवीन मराठी शाळा” जिची स्थापना विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी ४ जानेवारी १८९९ रोजी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे संस्थेचे पहिले अध्यक्ष. १२७ वर्षांची परंपरा लाभलेल्या या शाळेत माझे आजोबा, वडील आणि मी व माझी भावंडे अश्या तीन पिढ्या शिकल्या.

माझ्या वडिलांना १९६३ साली तर मला १९८९ साली चौथीमध्ये (प्राथमिक) शिष्यवृत्ती मिळाली आणि आमच्या दोघांचीही नावे शाळेतल्या फलकावर लिहिली गेली. ती अजूनही आहेत हे विशेष. त्यामुळे ही शाळा माझ्या विशेष जिव्हाळ्याची आहे. जुनी दगडी इमारत, भरपूर मोठा परिसर आणि प्राथमिक शाळा असूनही स्वतःचे मोठे मैदान याची महती मला नंतर engineering कॉलेजला गेल्यावर समजली.

मी पहिल्यांदा engineering कॉलेज ला गेलो तेव्हा थोडा निराश झालो. कारण त्या कॉलेजला मैदानच नव्हते. कॉलेजचे बांधकाम, रंगकाम चालू होते. एखाद्या भिंतीला रंग लावल्यावर आम्ही गंमतीने म्हणायचो, “ते रंगकाम मी स्पॉन्सर केले आहे. माझ्या फी मधून तो रंग लावला आहे”. तोपर्यंत मी ज्या शाळेत किंवा ज्युनिअर कॉलेज मध्ये होतो त्यांना मोठे कॅम्पस, मोठे मैदान, १०० हून अधिक वर्षांची परंपरा होती. त्यामुळे असे सगळीकडेच असते असा माझा समज होता. पण engineering कॉलेज पाहिल्यावर असे सगळीकडे नसते, आणि आपण ह्या बाबतीत किती भाग्यवान होतो याची जाणीव झाली.

२ वर्षांपूर्वी शाळेचा १२५ वा वर्धापन दिन झाला त्यात आमच्या बॅचचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची, देणगी गोळा करण्याची संधी मला मिळाली. तेव्हा शाळेतल्या सध्याच्या अडचणी समजल्या आणि तरीही बरेच आधुनिकीकरण झाले आहे हेही जाणवले.

मागच्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये माझ्या वडिलांचे अकस्मात दुःखद निधन झाले. त्यातून सावरणे फार अवघड होते, अजूनही आहे. पण ऑक्टोबर २०२५ मध्ये १ वर्ष झाले तेव्हा बाबांच्या नावाने शाळेत देणगी द्यावी असे मला वाटले. त्यातही शिक्षकांसाठी बक्षीस किंवा कृतज्ञता म्हणून ती रक्कम वापरली जावी असे मला वाटले.

शिक्षकांच्या बाबतीत आपण “विद्यार्थ्यांना घडवले” किंवा शिक्षक हे मूर्तिकार किंवा कुंभार यांच्यासारखे विद्यार्थ्यांना आकार देतात असे म्हणतो. पण मला वाटते की ते वर्णन थोड्या मोठ्या – म्हणजे माध्यमिक शाळेत लागू पडते. आमच्या माध्यमिक शाळेत आमचे शिक्षक मुलांना ठोकून, फटके देऊन “घडवायचे”. माझ्यासकट असे अनेक “माठ” तिथे घडले, काही बिघडले. काहींना कायमचे पोचे आले…

पण प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत मला मूर्तिकार किंवा कुंभार यांपेक्षा “बागकाम करणारे माळी” ही उपमा जास्त योग्य वाटते.

एका माळ्याला एका माणसाने विचारले की तुम्ही ही रोपे, फुले कशी वाढवता? माळी म्हणाला, “मी वाढवत नाही. रोपे, फुले आपोआप वाढतात, उमलतात. मी फक्त त्यांच्या वाटेतले अडथळे दूर करतो. त्यांना सूर्यप्रकाश, पाणी मिळेल याकडे लक्ष देतो, बागेतले तण काढून टाकतो.”

प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांची भूमिका अशीच असते. त्या वयातल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागेल असे वातावरण निर्माण करणे, अगदीच नाही जमले तर किमान शिक्षणाचा तिटकारा निर्माण होणार नाही ना, भीती बसणार नाही ना याची काळजी घेणे, त्यांचे कुतूहल आणि जिज्ञासा जोपासणे हे जास्त महत्वाचे असते.

आणि त्यासाठी प्राथमिक शिक्षकांना प्रोत्साहन मिळणे, त्यांचे कौतुक होणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे महत्वाचे आहे असे मला कायम वाटत होते.

ह्याच भावनेतून शिक्षकांसाठी बक्षीस असावे अशी इच्छा मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना बोलून दाखवली. आणि त्यांना ही कल्पना आवडली. अशा प्रकारे कोणी विचार केलेला नाही किंवा बक्षीस ठेवलेले नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दर वर्षी एका शिक्षकाला माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ बक्षीस दिले जावे यासाठी मी शाळेला ऑक्टोबर मध्ये देणगी दिली.

डिसेंबरच्या च्या सुरुवातीला शाळेतून फोन आला की ह्या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून येऊन वडिलांच्या नावाचे पहिले पारितोषिक मीच द्यावे.

आमच्या शाळेत जायला मी कायम उत्सुक असतो. मग ते माजी विद्यार्थी मेळावा म्हणून असेल किंवा निवडणुकीच्यावेळी मतदान करण्यासाठी…(ह्या दोन्ही साठी पुढच्या १०-१५ दिवसातच जायला मिळणार आहे!). पण अशा प्रकारे प्रमुख पाहुणे म्हणून जायला मला संकोच वाटत होता. मी नुसता एक प्रेक्षक म्हणून नक्की येईन असे मी सांगितले. पण मुख्याध्यापिकांनी आग्रहवजा आदेश दिल्यामुळे नाईलाजाने हो म्हणालो.

पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर २ मिनिटे बोला असे त्यांनी सांगितले. मला वाटते त्यातला मतितार्थ “बोला” यापेक्षा “२ मिनिटेच बोला” असा असावा, कारण प्रमुख पाहुणे एकदा भाषण करायची संधी मिळाली की लवकर थांबत नाहीत असा माझा विद्यार्थी म्हणून अनुभव होता.

पण माझ्या बाबतीत तो धोका नव्हता. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सगळ्यात प्रभावी भाषण कोणते, तर जे लवकर संपेल ते…याची मला पूर्ण जाणीव होती. शिवाय बक्षिसं देऊन झाल्यावर प्रत्येक मिनिट हे असह्य असते… विद्यार्थ्यांना आणि जास्त करून त्यांच्या पालकांना – याचा मला एक पालक म्हणूनदेखील अनुभव आहे. त्यामुळे मी २ मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेणार नाही हे नक्की केले होते.

यापूर्वी मी शाळेतले भाषण १९८९ मध्ये स्कॉलरशिप च्या सत्कारप्रसंगी केले होते. माझ्या आजोबांनी मला एक छोटेसे भाषण लिहून दिले होते. ते मी घोकून पाठ केले होते आणि लिहून खिशातही ठेवले होते. पण प्रत्यक्ष भाषण करताना तारांबळ उडाली. माझ्या यशात कोणाकोणाचा वाटा आहे याची एक यादीच आजोबांनी लिहून दिली होती. पालकांचा, शिक्षकांचा…अजून कोणाकोणाचा. पण नेमके कोण कोण ते विसरलो. पाठ केलेल्या भाषणाचा प्रॉब्लेम म्हणजे एकदा अडखळले की संपले. (त्या काळी टेलिप्रॉम्प्टर ची सोय ही नव्हती). त्यामुळे मी पटकन खिशातून चिठ्ठी काढून बघितले. तर नेमकी ती चुकीची चिट्ठी होती (किंवा खिसा चुकला होता). ती किराणा मालाची यादी होती. त्यामुळे माझ्या यशात “पालकांचा, शिक्षकांचा, २ किलो साखरेचा, ५ किलो गव्हाचा, ५ किलो तांदळाचा” वाटा आहे असे काही तरी झाले. वेळीच प्रसंगावधान राखून मी थांबलो आणि तडकाफडकी “धन्यवाद” असे म्हणून स्टेजवरून खाली उतरलो! सगळेजण खूप हसत होते हे मला नंतर समजले. अजूनही माझ्या त्या भाषणाची आठवण काढून घरचे त्यांची करमणूक करून घेतात.

पण ह्या वेळच्या २ मिनिटांच्या भाषणाचा तो प्रॉब्लेम नव्हता, तर त्या वयाच्या मुलांना काय सांगायचे हा होता. शिक्षकांना पुरस्कार देण्यामागची माझी भावना, भूमिका १ मिनिटात सांगितली. आणि नंतर स्पष्ट केले की माझी मुलगी तुमच्याच वयाची आहे, आणि तीदेखील माझं काही ऐकत नाही. त्यामुळे तुम्हाला उपदेश वगैरे मी करणार नाही. आणि आजचा दिवस बक्षिसं देण्याचा, कौतुक करण्याचा आहे त्यामुळे बाकी सल्ला वगैरे नको. भरपूर खेळा (मोबाईल नाही तर मैदानी खेळ), अभ्यास करा असे म्हणून १-२ मिनिटांत माझे भाषण संपवले.

मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले हे समजल्यावर एका वर्गमित्राने अभिनंदन करून “भाषणाचे मुद्दे काय होते, विषय काय होता” याची उत्सुकता आहे” असा शेरा मारला. मी वर सांगितलेल्या चौथीतल्या भाषणाचा संदर्भ आणि मित्राचा (माझ्याइतकाच) कुजकट स्वभाव यावरून ती तिरकस, खोचक प्रतिक्रिया आहे असे मला वाटले (किंवा कदाचित तसे नसेलही). म्हणून मी पण उत्तर दिले, “Trump Tariff चा जागतिक पर्यावरणावर होणारा दुरगामी परिणाम आणि कापसाचे हमीभाव यांचा अध्यात्मिक पातळीवरून तौलनिक अभ्यास”

असो. गंमतीचा भाग सोडा. पण २०२४ आणि २०२५ ही वर्षं माझ्यासाठी खूप कलाटणी देणारी, खूप काही शिकवणारी होती. २०२६ मध्ये सगळे काही सुरळीत होईल अशी अपेक्षा नाही. पण आता काय करायचे आहे, काय करायचे नाहीये आणि कशाप्रकारच्या कामांत, लोकांच्यात मला राहायचे आहे याची स्पष्टता आली आहे याचे जास्त समाधान आहे. त्यातले काय काय येत्या नवीन वर्षात जमते बघूया…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑