वाचावे असे काही: संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते…!!!

How to communicate without communicating? How do you know that someone you love has not forgotten you and still thinks about you?

अनेकदा असं वाटतं की हे शेअर केलं पाहिजे…ह्यावर खूप गप्पा मारल्या पाहिजेत…अगदी पूर्वीसारख्या. पण मग वाटतं…हे एकतर्फी आहे. आवरा. आणि मग ते पटवण्यासाठी जुन्या जखमा जाग्या होतात…केल्या जातात.

पण कधी कधी एखाद्या बेसावध क्षणी अगदी सहजपणे सगळ्या नकारात्मक विचारांची उत्तरं मिळतात…खूप छान वाटतं! परत जगावसं वाटतं…स्वत:साठी!


संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते...!!!


अमृता प्रीतमचं हे वाक्य मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा खूप तरुण होते मी..
पण तरीही आपण काहीतरी अफलातून वाचलंय हे लक्षात आलं होतं..

सुभाष मला गमतीने म्हणायचा, ‘मला थोडी डायल्युटेड मिथिला मिळाली असती, तर बरं झालं असतं. ही माझ्या नाकातोंडात जाते, झेपत नाही मला..!’ त्याच्या या म्हणण्याचा अर्थ मला तेव्हा नीट कळायचा नाही. आणि त्याला नीट सांगता यायचा नाही. तो अर्थ मला अमृता प्रीतमच्या या वाक्याने सांगितला. हेच वाक्य वाचल्यावर मला ते हळूहळू उमगत गेलं.

आज एका मैत्रिणीने पुन्हा या वाक्याची याद करून दिली.
‘संपूर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते..!!

होय, खरंय हे.. तिच्या सगळ्या स्त्रीसुलभ भावना, तिचे सगळे आवेग, आवेश, तिने धरून ठेवलेले हट्ट, प्रेमात प्रत्येकवेळी उन्मळून कोसळेल की काय असं वाटणारी तिची टोकाची कोमल असोशी, आणि उगवत्या सूर्याबरोबर पुन्हा नव्याने तळपत उभी राहिलेली ती..!!
तिच्यावर कोसळणाऱ्याला, आपल्या कटाक्षांवर तोलून धरण्याची तिची शक्ती.. त्याला ‘थांबवून ठेवण्याची’ युक्ती.. या साऱ्यासह ‘पूर्ण’ असलेली स्त्री फार कमी लोकांना मिळते. तिला ‘धारण’ करणं सोपं नसतं..!! पण आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असा एखादा पुरुष मिळणं हे परम भाग्याचे असते..

हा फक्त शरीर मामला नाहीये..!! स्त्री पूर्ण असते ती तिच्या बुद्धी आणि विचारांसह..!! शरीर संबंधांना बुद्धीचे अस्तर असते तेव्हाच ते संबंध मखमली आणि उबदार होतात, कालातीत होतात..!! पूर्णत्वाने स्वत:ला समर्पित करायला सिद्ध असलेली अशी स्त्री, ऐऱ्यागैऱ्या पुरुषाला झेपत नाही. तो पुरुष फक्त ‘नरोत्तम’ असून चालत नाही, तो ‘पुरुषोत्तम’ही असावा लागतो.

आपल्या स्त्रीच्या डोक्यात जे-जे येतं ते कुठलाही शॉक लावून न घेता, पूर्ण ऐकू शकेल, तिला त्याचे उत्तर देऊ शकेल, तिच्या बुद्धीवर आपल्या बुद्धीची लगाम कसू शकेल.. असा एखादा मिळणंही तेवढंच कठीण असतं. फार कमी स्त्रियांना असा ‘पूर्ण पुरुष’ लाभतो. अशी रत्नं जेव्हा एका कोंदणात येतात तेव्हा ती एकमेकांसाठी काहीही सहन करायला सिद्ध असतात.

जिथे अशी जोडी जमते तिथे त्यांच्या प्रेमात सुगंध आणि शराब यांचं मिश्रण असतं.. आयुष्यभर महकत आणि बहकत राहण्याची मोकळीक असते. त्यांना लौकिक जगाचे नियम लागूच नसतात. त्यांचं प्रेम अलौकिक असतं.. म्हणून अद्भुत असतं..!!

लेखिका माहित नाही परंतु खूप आवडले म्हणून देतोय….

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


हे वाचल्यावर फक्त मलाच ते समजू शकेल असे वाटून ते पाठवलं याचा अर्थ आपण अजूनही एकत्र आहोत!?

पण संपूर्णपणे? आधी इतके? कदाचित तोच विचार करायची तयारी अजून नाहीये…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑