नुकतेच मी माझ्या ब्लॉगमध्ये मराठी पॉडकास्ट बद्दल लिहिले…की मराठी पॉडकास्ट मुळातच कमी आहेत त्यामुळे त्यातल्या त्यात बरे पॉडकास्ट सुद्धा चांगले वाटतात. तसेच, अँकर कितीही सुमार असला तरी जर गेस्ट चांगले असतील तर मुलाखत पाहण्यासारखी/ऐकण्यासारखी होते.
असाच अजून एक मराठी पॉडकास्ट माझ्या पाहण्यात आला. त्यात वेगवेगळे segment आहेत. त्यातला एक segment बिझनेस/व्यवसाय याविषयीचा आहे. त्यातच २ नुकतेच प्रसारीत झालेल्या मुलाखती बघितल्या आणि हा ब्लॉग लिहावासा वाटला
पहिली मुलाखत ही पुण्यातील “चितळे बंधू” यांच्या चौथ्या पिढीतील इंद्रजीत चितळे यांची पाहिली. इंद्रजीत चितळे हा तरुण, सुशिक्षित आणि नव्या/आधुनिक विचारांचा आहे असं वाटलं. पण त्याचबरोबर सगळ्या धनदांडग्या कुटुंबातील नव्या पिढीबद्दल माझा जो आक्षेप असतो तोच ह्याच्या बाबतीत पण जाणवला. तो म्हणजे हे लोक privileged असतात…struggle असा नसतोच आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या खुर्चीत air-drop केलेले असते. बऱ्याचदा हे लोक तो struggle त्यांनीही केला असे खोटेच सांगतात. काही जण…त्यांचा struggle वेगळ्या प्रकारचा होता, वगैरे दिखावा करतात.
खरी गोष्ट ही आहे की त्यांना सगळ्या गोष्टी सहज मिळालेल्या असतात आणि त्यामुळे मग लोकांना अक्कल शिकवणे, management चे धडे देणे वगैरे करायला वेळ आणि धाडस मिळते. वॉरेन बफे अशा लोकांना Lucky Sperm Club म्हणतो. म्हणजे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक.
चितळे त्याच पंथातला.
त्याचं बोलणं वरकरणी प्रभावी वाटू शकतं…आणि काही प्रमाणात आहेही. पण ते original नाही, आणि कमावलेले तर अजिबात नाही. ज्याने थोडे जरी management चे धडे घेतले असतील किंवा वाचन चांगलं असेल तर लगेच समजेल कि चितळे हा management jargon आणि ठराविक साच्यातले शब्द, विचार फेकतो आहे. त्याचे ५-६ राज्यांबद्दलचे विचार आणि मेक-इन-इंडिया बद्दलचे विचार हे किती उथळ आणि तकलादू आहेत हे लगेच समजते.
आपल्या privileges ची जाणीव नसणे आणि नम्रपणा नसणे हा ह्या लोकांचा रोग आहे/असतो.
पण तरीही, मराठीत अशा प्रकारचे विषय, चर्चाच होत नाहीत त्यामुळे ही मुलाखत त्यातल्या त्यात उपयुक्त आहे.
दुसरी मुलाखत ह्याच मालिकेतली – सायली मराठे हिची. हिचे किंवा तिच्या कंपनीचे (आज्ञा क्रिएशन्स) नाव मी यापूर्वी कधी ऐकले नव्हते. दागिने, सोने-चांदी यांचा आणि माझा अजिबात संबंध नाही. संत तुकारामांची “सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ।।” हे वचन मी पूर्ण आत्मसात केले आहे! त्यामुळेच मला हिच्याबद्दल अजिबात माहिती नव्हती. चितळे सारखी ही Lucky Sperm Club ची मेंबर नाही. पण अगदीच unlucky पण नाही. आणि हे तिला माहिती आहे, हे तिने बोलून दाखवले, ही चांगली गोष्ट वाटली. पण एकूणच “मी आणि माझे” जास्त वाटले. तसेच समस्त महिला/मुली बद्दलचे मत पण अगदीच उथळ आणि टाळ्या मिळवण्यासाठीचे वाटले.
दोन्ही मध्ये (चितळे आणि मराठे) समान धागा म्हणजे दोघेही आत्मकेंद्री (self-centric) आणि जणू काही त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे बऱ्याच गोष्टी घडल्या, किंवा पुढे घडणार आहे अशा भ्रमात असलेले वाटले. नशीब, बाकीच्यांची पुण्याई, मेहनत, वारसा (चितळेच्या बाबतीत) इत्यादी गोष्टी ते मुद्दाम downplay करतात.
विंदा करंदीकरांच्या ओळी अशा वेळेस मला कायम आठवतात आणि त्या चपखल बसतात.
तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये
लघवी केली.
आणि आपले उर्वरित आयुष्य
त्यामुळे
दर्याची उंची किती वाढली
हे मोजण्यात खर्ची घातले.
(विरूपिका)
असो.
पण चितळेप्रमाणेच ही मुलाखत देखील बघण्यासारखी आहे.

Leave a comment