आज माझ्या दहावीतील इंग्रजीच्या खाजगी क्लासचे शिक्षक यांची निधनवार्ता वृत्तपत्रात वाचली (वय ९२ वर्षे). मी त्यांचे नाव सांगत नाही, पण ह्या लेखासाठी त्यांना जोशी सर म्हणू.

मी मराठी माध्यमातला असल्यामुळे इयत्ता ५ वी पासून इंग्रजी विषय सुरु झाला. ५ वी ते ८ वी मला माझे  इंग्रजी शिकवायचे. पण मी ८ वी मध्ये असताना त्यांचे निधन झाले. १० वी ची बोर्डाची परीक्षा (त्या काळी) महत्वाची असल्यामुळे मी जोशी सरांकडे जायचे ठरवले. माझा लहान भाऊ, चुलत भावंडं, अजून काही मित्र त्यांच्याकडे आधीपासूनच क्लास ला जायचे.

जोशी सर त्या वेळेस ७०-७१ वर्षांचे होते. माझ्या आजोबांपेक्षा ७-८ वर्षांनी लहान. गंमत म्हणजे माझा भाऊ किंवा चुलत भावंडं त्यांना “जोशी आजोबा” म्हणायचे. मला मात्र तसं कधीच जमलं नाही. हा माझ्या स्वभावातला अवगुण असेल (माझे मित्र माझ्या आई-वडिलांना “काका- काकू” म्हणायचे. मी मात्र शक्यतो तसं म्हणायचं टाळायचो…खूप उशीरा हळूहळू त्यात बदल झाला) किंवा मी आजोबांच्या खूपच जवळ असल्यामुळे दुसऱ्या कोणाला आजोबा म्हणणे मला जमले नसेल. थोडक्यात… मी त्यांना जोशीसर म्हणायचो.

आमच्या घरा शेजारीच त्यांचं घर होतं. दुय्यम निबंधक (sub-registrar) या पदावरून ते निवृत्त झाले होते…अतिशय कर्मठ आणि शिस्तशीर (पण भीती वाटावे असे नाही).

मला अगदी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की फक्त क्रमिक अभ्यास किंवा गुण मिळवण्यासाठी मी शिकवणार नाही. तसेच अजून एक गोष्ट त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केली: “I may not teach you good English. But I can certainly teach you correct English. Because concept of Good will change from time to time.” त्यांचे हे शब्द अगदी १००% टक्के खरे ठरले. आता WhatsApp किंवा इंटरनेट च्या जमान्यात इंग्रजी चे ही अवमूल्यन झाले आहे. पी. जी. वुडहाऊस पेक्षा चेतन भगत जास्त लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यांनी त्यावेळेसच त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

१ तासाच्या क्लास मध्ये १० वी चा मी एकटाच विद्यार्थी होतो. म्हणजे त्यांच्या घरी ते आराम खुर्ची वर बसलेले असायचे. आणि मी त्यांच्या समोरच्याच पलंगावर बसायचो. वेळ सकाळी ८ ते ९. त्याकाळी महिना रु. ५० फी होती. आधी गेल्या गेल्या जोशीसर स्वतः हातानी लिहिलेला एक उतारा भाषांतरासाठी द्यायचे. तोपर्यंत पाणी भरणे किंवा पूजा करणे इ. कामं करायचे (त्यांच्या पत्नीला ते “मंडळी” म्हणायचे…त्याची सुरुवातीला गंमत वाटली होती). नंतर काही महिन्यांनी समजले की तो उतारा हा गांधीजींच्या “My Experiments with Truth” मधला असायचा.

त्यानंतर साधारण ४०-४५ मिनिटे ते पाठपुस्तकातला अभ्यास घ्यायचे. आणि शेवटची ५-१० मिनिटे पुन्हा एक पाठ्येतर उतारा द्यायचे – तो नेहेमी इंग्रजी वृत्तपत्रातला असे. पण त्याचा विषय नेहेमी वेगवेगळा निवडायचे – कधी राजकारण, कधी क्रीडा, कधी संपादकीय इ.

मी त्यांचा लाडका विद्यार्थी होतो (१० वी ला फक्त मी एकटाच होतो म्हणून नाही, तर इतर सर्व वर्षाचे विद्यार्थी जमेस धरून)…माझ्या आईला घरी बोलवून त्यांनी तसे सांगितले देखील होते.

विशेष म्हणजे फक्त माझ्या बाबतीतच ते पाठपुस्तकाबाहेरचा अभ्यास करून घ्यायचे. तसेच इतर विषयांबद्दल देखील बोलायचे. एकदा गेल्या गेल्या त्यांनी एक गणितातला प्रश्न देऊ का असे विचारले आणि पुढील प्रश्न दिला…

————————————————

Sum of present ages of A and B is 63. A says to B: “I am twice as old as you were; when I was as old as you are”

Find present ages of A and B.

————————————————-

म्हटलं तर हा गणितातला प्रश्न होता आणि म्हटलं तर इंग्रजी वाक्यरचनेचा…

मी तिथेच बसून तो प्रश्न सोडवला आणि त्यांना दाखवला. माझे उत्तर बरोबर होते, पण क्लिष्ट होती. त्यानंतर त्यांनी मला तो प्रश्न सोडवण्याची अजून एक पद्धत दाखवली. त्यादिवशी “इंग्रजी” चा क्लास झालाच नाही!

 

 

तर अशा प्रकारे ते विविध विषयांबद्दल मार्गदर्शन करायचे. त्यांना माझे अक्षर खूप आवडायचे. त्यामुळे “माझ्या नातवाला दाखवायला तुझी वही ठेऊन घेऊ का आज” असं म्हणून माझी वही एक मागून घेतली होती.

सरांमुळे मला इंग्रजीची भाषा म्हणून आवड निर्माण झाली, पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे मला शिस्त, वक्तशीरपणा, झोकून देऊन शिकवण्याची वृत्ती इ. गुण प्रत्यक्ष पाहायला मिळाले. पहाटे ४ वाजता उठून, आंघोळ, व सोवळ्याने पूजा करून ६ वाजता ते क्लास ला सुरुवात करायचे. त्यांच्यामुळे कधी क्लास ला सुट्टी मिळाल्याचे किंवा उशीर खाल्याचे मला एकदाही आठवत नाही…आणि माझ्या आठवणीप्रमाणे १-२ दिवस वगळता मी देखील क्लास बुडवला नाही.

दहावीत मला इंग्रजीत शाळेत सगळ्यात जास्त आणि बोर्डात दुसऱ्या क्रमांकाचे गुण मिळाले (प्रथम क्रमांकापेक्षा १ गुण कमी). तसेच माझ्या आजोबांच्या नावाने वडिलांनी “१० वी ला इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला” ठेवलेले पारितोषिक ही मला मिळाले.

जोशीसरांना १० वी चे पेढे दिल्यावर त्यांना झालेला आनंद मला आजही आठवतो आहे. त्यानंतर इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर आणि नंतर नोकरी निमित्ताने परदेशी गेल्यावर आईने त्यांना सांगितले होते. गेल्या काही वर्षात त्यांच्या मुलीकडे राहायला गेले होते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबद्दल काहीच माहिती नव्हती. आणि आज अचानक त्यांच्या निधनाचे दुःखद बातमी वाचली…

त्यांच्या सारखे शिक्षक मिळणे – विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात – ही आज खूप मोठी गरज आहे. नंतर आय.आय.एम मध्ये किंवा U.K. ला काही मोजकेच शिक्षक जोशीसरांच्या सारखे जीव ओतून शिकवणारे सापडले.

आय.आय.एम.मधल्या एका प्रोफेसरनी एकदा “Teachable Moment” बद्दल सांगितले होते. तेव्हा मला जोशीसरांची आठवण झाली होती. मुलांना शिकवण्याच्या उपक्रमात ते स्वतः अशा क्षणांच्या शोधात असायचे असे वाटले.

शिक्षक म्हणून काम करणे हे माझे एक स्वप्न आहे. आणि कोणासारखे शिकवण्याचा प्रयत्न करायचा हे पण माझ्या मनात स्पष्ट आहे!

 

 

Advertisements