
आज १६ मे २०१८ पासून ते १३ जून २०१८ पर्यंत अधिक मास (अधिक महिना) आहे.
जगभर वापरले जाणारे “ग्रेगोरियन” कॅलेंडर हे माणसांच्या सोयीनुसार बनवले आहे. पूर्वी त्यात १० च महिने होते. कालांतरानी “जुलै” हा ज्युलिअस च्या नावावरून आणि “ऑगस्ट” हा “ऑगस्टीन” च्या नावावरून जोडले गेले. Septa (सप्त = ७), Octa (अष्ट = ८), Nona (नवं = ९) आणि Deca (दश = १०) ह्या अर्थानी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि डिसेंबर हे महिने ७,८,९,१० क्रमांकाचे होते. जुलै आणि ऑगस्ट महिने मध्ये घुसडल्यामुळे ते ९,१०,११,१२ क्रमांकावर गेले.
ग्रेगोरियन कॅलेंडर आपल्या सोयीसाठी असल्यामुळे त्यात ३० किंवा ३१ दिवसांचा महिना असे सोप्पे सूत्र ठेवले आहे. तसेच दिवसाची सुरुवात “००:००:००” पासून होऊन “२३:५९:५९” ला दिवस संपतो. पण याचा निसर्गाशी काही संबंध नाहीये. पुढे दर ४ वर्षांनी १ दिवस लीप दिवस म्हणून वाढवून पृथ्वीच्या गतीशी समतोल साधण्याचा प्रयोग केला जाऊ लागला. हे कॅलेंडर लोकप्रिय आहे कारण ते सुटसुटीत आहे आणि ते आपल्या दैनंदिन कामकाजाला उपयुक्त आहे.
भारतीय (हिंदू) कालगणना ही निसर्गचक्रावर आधारीत आहे. दिवस हा ग्रेगोरियन कॅलेंडर सारखा “काल्पनिक मध्यरात्री – १२ वाजता” सुरु ना होता, सूर्योदयानुसार सुरु होतो. म्हणजे रोजचा सूर्योदय थोडा वेगळा असेल तर रोजच्या दिवसाची सुरुवात वेगळी. महिना हा २८ दिवसांचा असतो (एक पौर्णिमा आणि एक अमावास्या).
हिंदू कालगणनेतील ६ ऋतू देखील निसर्गाशी निगडीत आहेत. वसंत (चैत्र, वैशाख) हा इंग्रजी “Spring” शी साधर्म्य असलेला ऋतू आहे. तसेच ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे ऋतू पुढील २-२ महिन्यात येतात. या प्रत्येक ऋतूत निसर्गचक्राला अनुसरून असे विविध सण साजरे केले जातात.
थोडक्यात, हिंदू कालगणना, पंचांग हे खूप स्वतंत्र आणि पुढारलेले होते/ आहे. पंचांग चा खरा संबंध खगोलशास्त्राशी आहे, “ज्योतिष” या विषयाशी नाही.
असो. आता पुन्हा अधिक मास कडे वळू. सौरवर्ष (ज्यावर ग्रेगोरियन कॅलेंडर आधारलेले आहे) साधारणपणे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४५ सेकंद इतक्या कालावधीचे असते. म्हणूनच ग्रेगोरियन कॅलेंडर हे ३६५ दिवसांचे असते. आणि वरील ” ५ तास ४८ मिनिटे आणि ४५ सेकंद” यांची सोय लावण्यासाठी दर ४ वर्षांनी एक लीप दिवसाची तरतूद केली आहे (खरं तर दर ४ वर्षांनी एक पूर्ण दिवस वाढवणे चुकीचे आहे कारण ३६५ दिवसांवरील कालावधी हा पूर्ण ६ तास नाहीये (तास असता तर दार ४ वर्षांनी २४ तास म्हणजे एक दिवस वाढवता आला असता). पण हा काळ ६ तासांपेक्षा थोडा कमी ( ५ तास ४८ मिनिटे आणि ४५ सेकंद ) असल्यामुळे त्याची तजवीज करण्यासाठी दर १०० वर्षांनी एक दिवस कमी केला जातो आणि दर ४०० वर्षांनी एक दिवस वाढवला जातो. म्हणजे १७००, १८००, १९०० ही वर्ष लीप वर्ष नव्हती (कारण त्यांना ४ ने भाग जातो, पण ४०० ने नाही. पण १६००, आणि २००० ही वर्षे लीप वर्षे होती कारण त्यांना ४०० ने भाग जातो).
हिंदू कालगणनेत सौरवर्षाऐवजी चांद्रवर्ष हे प्रमाण मानले आहे. चांद्रवर्ष हे सरासरी ३५४ दिवस ८ तास, ३८ मिनिटे आणि २४ सेकंद इतक्या कालावधीचे असते. त्यामुळे एका सौरवर्षात आणि चांद्रवर्षात साधारण ११ दिवसांचा फरक पडतो, म्हणजे दर ३ वर्षांनी ३३ दिवसांचा फरक पडतो. हा फरक जर असाच पडत राहिला तर चांद्रमास काही वर्षांनी वेगळ्या ऋतूमध्ये येतील. हे टाळण्यासाठी आणि चांद्रवर्ष आणि सौरवर्ष ह्यातला समतोल राखण्यासाठी “अधिक मास” ची तजवीज केली आहे. म्हणजे साधारणपणे दर ३ वर्षांनी “अधिक मास” येतो. वरच्या ३ दिवसांची सोय (कारण ३ वर्षांनी ३३ दिवसांचा फरक पडतो) करण्यासाठी तिथीचा “क्षय” केला जातो.


Leave a comment