पुस्तक परीक्षण – “मोठी तिची सावली” – मीना खडीकर

हे पुस्तक म्हणजे रूढार्थानी चरित्र नाही. तर स्मृतिचित्र आहे.

चरित्र आणि स्मृतिचित्र मध्ये मोठा फरक म्हणजे स्मृतिचित्र लिहिणाऱ्याला काही मोजक्याच किंवा निवडक घटना, व्यक्ती, मते, विचार याबद्दल लिहिता येते. पण चरित्र लिहिणाऱ्याला तसे करता येन नाही. म्हणूनच कदाचित मीना खडीकर, लता मंगेशकर यांच्या सख्ख्या भगिनी (ज्या केवळ २ वर्षे लहान आहेत आणि ज्यांनी लता मंगेशकर यांचे संपूर्ण आयुष्य जवळून पहिले आहे), यांनी हे पुस्तक चरित्र स्वरूपात ना लिहिता स्मृतिचित्र पद्धतीने लिहिले आहे.

एक खटकणारी गोष्ट म्हणजे ह्यात काळ-वेळ, सनावळी अजिबात दिलेली नाही. काही ठिकाणी साल किंवा वयाचा उल्लेख आहे पण अगदी त्रोटक आणि ओझरता. गाण्यांची लांबलचक यादी नाही. त्याचे कारण हेच, की ते चरित्र नाही… पण चांगली गोष्ट अशी की मीना खडीकर यांचे अनुभव आणि आठवणी खूप वेगळ्या भूमिकेतून आहेत. म्हणजे “लता मंगेशकर” यांचे व्यक्तिपूजन करायचा उद्देश नाही (तसे ते थोडे फार आहे, पण ते समजण्यासारखे आहे. पुस्तकाच्या नावातच आदर आणि प्रेम स्पष्ट केलं आहे…). तर लता मंगेशकर घडतानाचे सगळ्यात जवळचे अनुभव जिने पाहिले आहेत, त्यात भाग घेतला आहे, त्या सख्ख्या बहिणीच्या आठवणींची गोष्ट आहे. 

तसेच कुठलेही वादग्रस्त प्रसंग, भूमिका याबद्दल सविस्तर लिहिणे टाळले आहे. त्या अर्थाने politically correct लिहायचा प्रयत्न केला आहे… जसे सर्व मंगेशकर कुटुंबियांचे वागणे, बोलणे शक्यतो असते तसे. 

काही परिच्छेद, काही वाक्ये मला विशेष आवडली. उदाहरणार्थ हा परिच्छेद:

“आता आम्ही पाचही भावांनी ऎशींचा उंबरठा ओलांडला आहे. वयाच्या या टप्प्यावर एवढं नक्की उमगतंय की, आठवणाऱ्या घटनांपेक्षा विस्मरणात गेलेल्या घटनांची संख्या जास्त असते. घटना कितीही मोलाची असली तरी काळ तिला विस्मरणाचा शाप देतोच. आठवणी खऱ्या आहेत की भास अशी स्वतःलाच शंका यावी इतपत तपशील पुसट होत जातात. मग उरतात ते केवळ घटनांमधून विलग झालेल्या भावनांचे अंधुकसे ठसे. 

पक्षी उडून गेल्यावर फांदी थटथटत रहावी तसे.

त्यालाच मग इतिहास म्हणायचं, चरित्र म्हणायचं. फुलांची ओंजळ वाहिल्यावर रित्या हातांना सुगंध येत राहावा तशा या आठवणी आहेत. यात चूक बरोबर शोधायचा अट्टाहास मी करणार नाही. कुणीच करू नये.”

मला हे आवडले कारण हल्ली बरेचदा माझ्या आयुष्यातील अशा आठवणी किंवा प्रसंग, जे विस्मरणात गेलेले होते, आठवून मला पण राग येतो, किंवा दुःख होते, किंवा त्रास होतो… किंवा क्वचित प्रसंगी आनंद होतो. पण ते प्रसंग अंधुक होत आहेत आणि आता केवळ त्यांचे lasting impression (ठसे) तेवढे राहिले आहेत, तपशील नीटसे आठवत नाहीत असे जाणवू लागले आहेत. चाळीशीच्या आधीच ही अवस्था. तर वयाच्या साठी, ऐशीं पर्यंत तर काय होईल… 

तसेच  अजून एक वाक्य…जे नेहेमीच्या पठडीतले आहे, पण “लता मंगेशकर” यांच्या संदर्भात वाचताना त्याला वेगळे महत्व आणि कंगोरे जाणवतात:

“कोणत्याही क्षेत्रात उंचीवर जाताना माणूस हळूहळू एकटा पडत जातो हेच खरं.”

तसेच अजून एक आवडलेले वाक्य म्हणजे:

“वैऱ्याबरोबर गाणं एकवेळ अवघड असेल. पण मनात रुसवा धरलेल्या स्नेह्याबरोबर गाणं अशक्य असतं.”

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्यात काही काळ अबोला, दुरावा झाला होता…जवळ जवळ ५-६ वर्षं किंवा जास्तच. त्यावेळेस professionalism म्हणून एक सहगायक या नात्याने गाणी का गायली नाहीत ह्या टिकेबद्दल उद्देशून हे वाक्य लिहिले आहे. 

ह्याच वाक्यात थोडा बदल करून मला हीच भावना कायम वाटत आलीये… 

“वैऱ्याबरोबर राहणं/ बोलणं एकवेळ अवघड असेल. पण मनात रुसवा धरलेल्या स्नेह्याबरोबर राहणं/बोलणं अशक्य असतं.”

आजवर काही मोजक्याच पण अत्यंत जवळच्या लोकांशी माझे वाद, अबोला झाल्यावर मला परत त्यांच्याशी बोलणं फारच कठीण गेलंय…परत पूर्वीसारखं नातं (माझ्या बाजूने) कधीच होऊ शकलेले नाही. त्याचं कारण हीच भावना असावी असं वाटतं. 

ह्या पुस्तकात त्रुटी आहेत का? तर नक्कीच. किंबहुना असंख्य. पण मुळातच हे रूढ अर्थानी चरित्र नसल्याने पुस्तकात सगळ्या पैलूंना न्याय देण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. 

तरीही लता मंगेशकर या अविवाहित का राहिल्या किंवा त्यांच्या कथित प्रेमसंबंधांबद्दल काही तरी लिहिले जावे असे वाटले होते… खास करून लता मंगेशकर यांच्यापेक्षा केवळ २ वर्षांनी लहान असलेल्या बहिणीने हे पुस्तक लिहिले असल्यामुळे. कारण त्याबद्दल “अफवा” आणि “तर्क” या स्वरूपात लिहिणारे अनेक असले तरी “मंगेशकर” कुटुंबांचे आतले/अधिकृत मत द्यायची संधी मीना खडीकर यांना होती. कदाचित तेच त्यांना टाळायचे असेल. 

असो… 

हे जाणवण्याचे कारण म्हणजे मी Youtube वर नुकताच प्रसिद्ध संगीतकार आणि गायक सी. रामचंद्र यांचा एक जुना इंटरव्ह्यू बघितला. 

सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर यांना सुरुवातीच्या काळात अतिशय चांगली संधी आणि अप्रतिम गाणी दिली. तसेच सी. रामचंद्र यांचे लता मंगेशकर यांच्यावर (एकतर्फी ?) प्रेम होते हेही आता जगजाहीर आहे. त्याबद्दल मी अनेक पुस्तकांतून वाचलेले आहे. पण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून कधीच ह्याची वाच्यता झालेली नव्हती. ह्या मुलाखतीमध्ये सी. रामचंद्र “त्या” व्यक्तीबद्दल बोलत आहेत का? तुम्हीच ठरवा…

पण लता मंगेशकर यांनी त्यांना श्रीमुखात मारली होती, आणि त्यांचा अपमान केला होता… तसेच त्यांची शेवटची वर्षे हालाखीत जाण्यासाठीदेखील त्याच कारणीभूत होत्या (म्हणजे त्यांच्या नावाचा, वलयाचा वापर करून एकटे पाडणे इ.) असेही अनेकदा वाचले आहे/ ऐकले आहे. 

हे आणि ह्या स्वरूपाचे किस्से आणि “मोठी तिची सावली” या image चा कुठेच मेळ बसत नाही. पण दोन्ही पैकी एकच खरे असे मानायची गरज नाही. कदाचित दोन्हीही खरे असेल…शेवटी माणूस म्हटले (तेही “फिल्मी” दुनियेतील) की ह्या सर्व गोष्टी शक्य आहेत… अगदी लता मंगेशकर यांच्या बाबतीतदेखील… 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: