पंडित भीमसेन जोशी @ १००

आज भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची जन्म शताब्दी. (जन्मः ४ फेब्रुवारी १९२२).

भारतीय शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक भीमसेन यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग मला लहानपणी अनेकदा आला. त्याकाळी (म्हणजे १९०-१९९५) आमच्या शाळेच्या मैदानावर सवाई गंधर्व महोत्सव होत असे. २ वर्ष माझ्या बाबांबरोबर मी गेल्याचं आठवतं. इतर वेळेस शाळेतल्या आतल्या बाजूला थांबून त्या मैफीली अगदी व्यवस्थित ऐकू यायच्या.

मला त्यांची भजनं, अभंग अतिशय आवडायचे. त्यांच्यावर लिहीलेले अनेक लेख (पुलं पासून सुधीर गाडगीळ पर्यंत), त्यांच्या मुलाखती यातून ते आधीच परिचित होते. पण अलिकडच्या काळात त्यांच्या ज्येष्ठ मुलाने, म्हणजे राघवेंद्र जोशी यांनी लिहीलेले “गवयाचे पोर” वाचल्यावर त्यांच्या अपरिचित (आणि काहीश्या नकारात्मक?) व्यक्तिमत्वाशी ओळख झाली.

मागच्या वर्षी लोकसत्ताने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरूवातीच्या निमित्ताने एक विशेषांक प्रकाशित केला तोही मी आवर्जून घेतला होता. जुन्याच लेखांचे संकलन असले तरी ते सर्व एकत्रित स्वरूपात मिळाले हा त्यातला चांगला भाग.

पण अशा विशेषांकाचा उद्देशच त्या व्यक्तीचा उदोउदो करणे, गौरव करणे हा असतो, मूल्यमापन करणे नव्हे. त्यामुळे “गवयाचे पोर” सारख्या लिखाणाला त्यात स्थान नसते.

पण ह्या सगळ्यातून एक गोष्ट परत ठळकपणे जाणवली. माणूस हा चांगला-वाईट असणारच. तो गेल्यानंतर काही काळ (मग तो काळ काही दिवस/महिने असेल किंवा काही वर्षे/दशके) त्याच्या गुण-अवगुणांची चर्चा होते. पण नंतर लक्षात राहते ते त्याचे कार्य. भीमसेन जोशी यांचे गाणे अजून अनेक दशके, शतके लक्षात राहील; त्यांनी पहिले लग्न झाले असताना दुसरे लग्न केले आणि काही व्यक्तींना वाईट वागवले इ. विसरले जाईल. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून त्यांचे (किंवा कोणाचेही) मूल्यमापन कसे करावे हा खूप वैयक्तिक प्रश्न असतो. अनेक थोर व्यक्तींच्या जवळच्या माणसांना, कुटुंबियांना त्यांचे अनेक वाईट अनूभव येतात, बराच विक्षिप्तपणा सहन करावा लागतो. त्यामानाने सर्वसामान्य माणसांचा अनुभव जास्त चांगला असतो, कारण त्यांना फक्त त्या कलाकारांचा performance, output यांचा आनंद, आस्वाद घेता येतो. त्यामुळे त्यांनी उगाच वैयक्तिक गोष्टीत शिरून त्या व्यक्तीला कलाकार म्हणून judge करू नये.

मला स्वतःला भीमसेन जोशी यांचे गाणे खूप आवडते. त्यामुळे “गवयाचे पोर” वाचल्यावर देखील मला ते कलाकार म्हणून तितकेच मोठे वाटतात. अर्थातच जे व्यक्ती म्हणूनही तेवढेच चांगले असतात ते अधिक आवडतात…

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑