आठवणीतली कविता: “हळूच त्यातून सटकायचं”

माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्याकडे पापड, कुरडया करण्याचा कार्यक्रम असायचा. आमच्या वाड्यात आजी, आणि तिच्या मैत्रिणी, आई, काकू, वगैरे अंगणात पापड, कुरडई वगैरे लाटायचे. मग ते वाळत घालणे, वळवाचा पाऊस आला की उचलणे ही कामं आम्हा मुलांची असायची. 

त्यावेळच्या अनेक आठवणींपैकी एक ठळक आठवण म्हणजे, माझ्या आजीची एक मैत्रीण होती, तिला “य” आजी म्हणू… ती कविता, गाणी किंवा ओव्या म्हणायची. बाकीचेही म्हणायचे, पण “य” आजी लक्षात राहिली कारण ती एक विशिष्ट कविता/गाणं म्हणायची ज्याच्या ध्रुवपदामुळे आम्हाला हसू यायचं. 

मोठ्ठ कुंकू लावणाऱ्या, नऊ वारी साडी नेसणाऱ्या आणि ठसठशीत गोल चेहऱ्याच्या “य” आजी अगदी ठसक्यात ती कविता गुणगुणायच्या; आमच्या घरच्या राम मंदिरासमोरच बसून. त्यांचा आवाजही चांगला होता, थोडा अनुनासिक. 

“नाही कशात अडकायचं, हळूच यातून सटकायचं आणि श्रीराम जयराम म्हणायचं” अश्या त्यातल्या ओळी माझ्या लक्षात आहेत. विशेषतः “हळूच यातून सटकायचं” ही ओळ “य” आजी अशा पद्धतीने म्हणायच्या की त्यामुळे आम्ही सगळी लहान मुलं हसायचो. 

त्यानंतर अनेक वर्ष मी ती कविता शोधत होतो. वर सांगितलेल्या २-३ ओळी सोडल्या तर बाकी काहीच आठवत नव्हतं त्यामुळे कुठल्या पुस्तकात वगैरे शोधण्याचा प्रश्नच नव्हता. एकमेव मार्ग म्हणजे internet वर शोधणे. 

आणि गंमत म्हणजे नुकतीच मला ती पूर्ण कविता सापडली…आणि तीच इथे आज post करत आहे. 


स्त्री जीवनात कोणकोणत्या भूमिका करते. सर्वप्रथम मुलगी नंतर पत्नी, सून, आई आणि शेवटी सासू. सासूची भूमिका फारच कठीण असते. 

या भूमिकेच्या प्रवासात स्त्रीच्या मनातील भावना कशाप्रकारे परिवर्तित होत असतात व त्या भावनांना ती किती आनंदाने बदलत असते त्याचबरोबर स्वतःलाही बदलून  घेत असते याचे वर्णन या कवितेत केले आहे. ही १९९८ साली दिवाळी विशेष अंकात छापून आलेली कविता संग्रहित केली आहे. 

‘स्त्री जन्माची जीवनगाथा’ – “वैभवी” दीपावली महिला विशेषांक’ १९९८

माता पित्याची सोनकळी 

बाल्यामधली भातुकली 

आजी नातीची लाडीगोडी 

कौमार्यातली फुलवेडी 

मधूनच स्मरायची थोडी थोडी 

पण नाही कशात गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।१।।

मिळता बक्षिसे विद्यार्जनी 

कौतुक केले आप्तजनी 

जग जिंकण्याची ईर्षा मनी 

पण नशिबाने टोला देताक्षणी 

निराशेतूनही आशेला जगवायचं 

पण नाही कशात गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।२।।

यौवनातली आकांक्षा 

पती प्राप्तीची अभिलाषा 

समान हक्काची अपेक्षा 

पदरी पडती उपेक्षा 

मनीच खंतावणं झाकायचं 

नाही कशात गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।३।।

गृहस्थाश्रमी पदार्पण 

सर्वस्वाचे समर्पण 

मग विवाह बंधनात शिरायचं 

नशिबावर सर्वस्व सोपवायचं 

मिळेल त्यात समाधान मानायचं 

आनंदात जीवन फुलवायचं 

अन कर्तव्य कर्म निभवायचं 

मग श्रीराम जयराम म्हणायचं ।।४।।

आता वंशवृद्धीची  वेळ आली 

जीवघेणी यातना अनुभवली 

स्त्री जन्माची कसोटी दिली 

अन बाळाच्या दर्शना आसुसली 

आता त्यागाचं जीवन जगायचं 

त्यातच सार्थक मानायचं 

पण नाही कशात गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।५।।

आता गृहिणी धर्माचे पालन 

करी अतिथ्यांचं अवलंबन 

आबाल वृद्धांचं समाधान करीत 

शेगडी पासून देवडी पर्यंत धावायचं 

पण ‘केलं’ असं नाही म्हणायचं 

मुकाट्याने सर्व सोसायचं 

तटस्थ जीवन जगायचं 

पण नाही कशात गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।६।।

आता प्रौढत्वाची जोखीम 

अन मुलाबाळांचे संवर्धन 

त्यांना मायेच्या शब्दांनी गोंजारायचं 

शिस्तीच्या शब्दांनी बोलवायचं 

सर्वस्व ओतून करायचं 

करता करता झिजायचं 

अन चीज झालं म्हणायचं 

पण कशात नाही गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।७।।

आता आयुष्याची माध्यान्ही 

व्याही विहिणीची देणीघेणी 

किती केलं तरी पडतील उणी 

दुर्लक्षून योग्य तेच करायचं 

बोलून श्रेय नाही घालवायचं 

गोड बोलून सर्वांना जिंकायचं 

पण नाही कशात अडकायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।८।।

संसाराच्या सारीपाटावर खेळायचं 

फक्त दान कसबान टाकायचं 

काडीपासून हळूहळू जोडायचं 

गाडीभरून दानधर्म खर्चायचं 

भोग सोडून त्यागी बनायचं 

मग परमार्थाकडे वळायचं 

अन अलिप्त जीवन जगायचं 

पण कशात नाही गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं 

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।९।।

आता बघता बघता साठी आली 

मुलांची राज्ये सुरु झाली 

सारी जीवनमूल्ये बदलली 

आता दुसऱ्या स्थानावर सरकायचं 

डोळे उघडे ठेऊन सारं पाहायचं 

खटकल्या बाबींना टाळायचं 

आणि गुणांचं कौतुक करायचं 

कुणी विचारलं तरच सांगायचं 

अन निवृत्त जीवन जगायचं 

अन हळूच त्यातून सटकायचं 

श्रीराम जयराम म्हणायचं ।।१०।।

आता दिसू लागला पैलतीर 

मनी वाटे हुरहूर 

आसवांचा वाहे महापूर 

कारण मायेचा गुंता अनावर 

तरी विवेकाने भावनांना आवरायचं 

पण नाही कशात गुंतायचं 

हळूच त्यातून सटकायचं

अन श्रीराम जयराम म्हणायचं ।।११।।

आता ठरलेलं विधिलिखित ओळखायचं 

झालं गेलं विसरायचं 

क्षमस्व म्हणायचं 

अन सर्वांना सांभाळा सांगायचं 

सुकृताचं गाठोडं बांधायचं 

अन परतीच्या प्रवासाला लागायचं 

कृतार्थ जीवन संपवायचं 

आणि आनंदात अनंतात विसावायचं 

मग इतरांनी श्रीराम जयराम म्हणायचं ।।१२।।

— सौ. स्मिता टेकाळे (प्रतिभा राऊतमारे)

3 thoughts on “आठवणीतली कविता: “हळूच त्यातून सटकायचं”

Add yours

  1. खूप खूप धन्यवाद हि कविता इथे share केल्याबद्दल. अगदी तुमच्यासारखाच माझा हि या कवितेचा शोध त्याच्या धृपदाने सुरू झाला आणि इथे येऊन थांबला… I can’t express in words how happy I was finding this one on internet.Also, काही दिवस मी english madhun शोधत होते आणि त्यामुळे काहीच सापडत नव्हतं.. आज कुठून असं वाटल की मराठीतली कविता आहे तर मातृभाषेत शोधलं पाहिजे and it got me here … Thank you again for documenting it !!!

    Liked by 1 person

    1. धन्यवाद! ह्या blog चे शीर्षक “Notes to myself” आहे. स्वांन्तःसुखाय आणि माझ्याच म्हातारपणाची सोय म्हणून लिहीतो. आणि marketing, SEO वगैरे करायच्या भानगडीत पडत नाही. म्हणूनच खूप कमी जणांपर्यंत पोचतो हा blog. तुमच्या सारख्या प्रतिक्रिया आल्या की तात्पुरतं छान वाटतं!

      आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!

      Like

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑