थप्पड – एक वादग्रस्त विषय आणि काही “अनुभव”

नुकतेच तापसी पन्नू अभिनित आणि अनुभव सिन्हा दिग्दर्शित थप्पड या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. एका अतिशय संवेदनशील आणि वादग्रस्त विषयावर तो आधारीत आहे. मला ह्या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता आहे.

अनुभव सिन्हाला गेले काही महिने मी खूप फॉलो करतोय… ट्विटर वर, इतर मुलाखती वगैरे… 
मोदी आणि भाजप यांचा  प्रचंड तिखट टीकाकार हा आमच्यातला समान दुवा. पण त्याआधी मला तो आवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुल्क आणि विशेषतः “आर्टिकल १५” हे चित्रपट. 

मुल्क मी थिएटर मध्ये पहिला नाही… बऱ्याच उशिरा प्राइम वर पहिला. आर्टिकल १५ चे ट्रेलर पाहूनच तो विषय आवडला. आणि पहिल्याच दिवशी थिएटर मध्ये पहिला. मला तो इतका आवडला कि लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांना (त्यांना चित्रपट प्रचंड आवडतात…) दाखवण्यासाठी परत पहिला. त्यावेळेसच अनुभव सिन्हा या नावाबद्दल कुतूहल निर्माण झालं. 


कारण मला अनुभव सिन्हा म्हणजे शाहरुख खान चा रा.वन, किंवा तुम बिन हे यशस्वी पण तद्दन व्यावसायिक चित्रपट  किंवा कॅश, दस, तथास्तु सारखे अत्यंत भंगार चित्रपट बनवणारा दिग्दर्शक असे माहिती होते…(हो, मी सुद्धा प्रचंड जास्त चित्रपट बघतो, त्यामुळे बरेचसे चित्रपट, त्याचे दिग्दर्शक, निर्माते वगैरे मला साधारण पणे माहिती असतात). 


पण त्या चित्रपटांचा दिग्दर्शक तोच मुल्क, आर्टिकल १५ सारख्या संवेदनशील आणि सुंदर चित्रपटांचा दिग्दर्शक हे पटत नव्हते. इतका बदल कसा? म्हणून मग त्याच्या काही मुलाखती पहिल्या आणि जाणवले की त्याचा मूळ पिंड हा अशाच संवेदनशील आणि सामाजिक विषयांबद्दल जागरूक असलेल्या व्यक्तीचाच आहे. तद्दन व्यावसायिक चित्रपट ही तडजोड, गरज होती. आणि ट्विटर वगैरे वरून त्याने केलेल्या CAA , Art ३७०, आणि इतर विषयांवरच्या टिकेवरून खात्री पटली की त्याचा मूळ पिंड तो म्हणतो तसाच आहे. 

त्यामुळे जेव्हा थप्पड चे ट्रेलर प्रदर्शित झाले तेव्हा त्याबद्दल खूप उत्सुकता होती ती २ कारणांसाठी
पहिले कारण – अनुभव सिन्हा याने या चित्रपटाची कल्पना एका मुलाखतीत सांगितली होती. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला कबीर सिंग हा चित्रपट अचानकपणे प्रचंड यशस्वी झाला – तब्बल रु. ३००-३५० कोटी कमावले. पण हा अनेक कारणांनी वादग्रस्तही ठरला. मूळच्या दाक्षिणात्य चित्रपटावरून बनवलेला हा चित्रपट हिंसा, विशेषतः domestic violence याचे उद्दात्तीकरण करणारा होता. त्यात नायक (शाहिद कपूर) हा प्रचंड दारू पितो आणि त्याच्या प्रेयसीला सतत मारतो…मानसिक अत्याचार करतो असे दाखवले आहे. प्रेमात असलेल्या नात्यांमध्ये असे होतच असते… अशा प्रकारे दिग्दर्शकाने याचे समर्थन केले. हे खूप कॉमन आहे आणि तुमचे खरे प्रेम असेल तर तुम्हाला मारहाण करण्याची आणि ते सहन करण्याची तयारी पाहिजे… किंवा असतेच… अशा प्रकारे त्याचे उदात्तीकरण केले गेले. आणि म्हणूनच की काय, चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. 

ह्या चित्रपटावर अनुभव सिन्हा याने ठिकठिकाणी मतप्रदर्शन केले. पण नंतर त्याला असे वाटले की आपल्याला जर त्या मताचे खंडन करायचे असेल तर आपल्याकडे असलेल्या माध्यमातून म्हणजे चित्रपटातूनच ते केले पाहिजे… आणि त्यातूनच “थप्पड” चित्रपटाचा जन्म झाला. 

थप्पड चे ट्रेलर खूप छान आहे, प्रत्ययकारी आहे. फक्त एकच शंका म्हणजे कथेचा गाभा, जीव अगदी छोटा आहे…कदाचित शॉर्ट फिल्म साठी जास्त योग्य. तरीपण अनुभव सिन्हा ने हा विषय कसा हाताळला आहे ह्याबद्दल उत्सुकता आहे. 

दुसरे कारण – जे जास्त महत्वाचे आहे आणि ज्यासाठी मला हा ब्लॉग लिहावासा वाटला ते म्हणजे, माझे स्वतःचे ह्या विषयावरचे मत काय आहे, किंवा काय होते…याविषयी. 
आपल्या प्रिय व्यक्तीला अशाप्रकारे थप्पड मारणे – पब्लिक मध्ये किंवा प्रायव्हेट मध्ये – अतिशय चूकच आहे असे माझे ठाम मत आहे. पण… 

आणि त्या “पण” शी खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत…

तुमच्या अत्यंत प्रिय व्यक्तीला मारणे चुकीचे आहे हे माझे ठाम मत. पण दुसऱ्या व्यक्तीने (जी तुमची जिवलग आहे, soulmate आहे), तिने भावनेच्या भरात…अत्यंत असह्य झाल्यावर…नाइलाजाने तुमच्यावर हात उचलला तर? तेही पब्लिक प्लेस मध्ये?

तर ती खूप त्रासदायक परिस्थिती असते, विशेषतः तुम्ही जर अत्यंत स्वाभिमानी असाल तर… आणि तुमची काही चूक नाही (इतकी मोठी) अशी भावना असेल तर. अशा वेळेस काय केले पाहिजे? समजा soulmate नी लगेचच त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली… आणि तुम्हालाही तिची माफी खरी आहे, प्रामाणिक आहे हे जाणवत असेल, माहिती असेल तर? तुम्ही ते मोठ्या मनाने विसरून गेले पाहिजे? एक अत्यंत कटू अनुभव आणि अपघात असे समजून सोडून दिले पाहिजे? की आपल्याच प्रिय व्यक्तीला धडा, अद्दल घडवण्यासाठी किंवा चूक समजावून देण्यासाठी काही कठोर पाऊल उचलले पाहिजे? 

आता एक पाऊल पुढे जाऊ. जर त्याच प्रिय व्यक्तीने परत काही काळानंतर तुम्हाला थप्पड मारली, किंवा हात उचलला तर? म्हणजे आधीच्या “अत्यंत नाईलाज” ह्या परिस्थिती सारखी परिस्थिती तुम्ही परत आणलीत आणि म्हणून तिला मारहाण करावी लागली, असे मानायचे की काहीही झालं तरी परत तीच चूक तिने पुन्हा केली म्हणून तिला दोष द्यायचा? 

आता अजून एक पाऊल पुढे जाऊ… असे ४-५ प्रसंग तुमच्या ५-६ वर्षाच्या एकत्र कालावधीत घडले तर? काही वेळेस पब्लिक प्लेस मध्ये, काही वेळेस चार भिंतींच्या आत… तर?

किती वेळानंतर तुमचा संयम संपेल आणि तुम्ही कायमचे जखमी व्हाल? आणि त्यानंतर त्याबद्दल बोलणे, त्याची आठवण काढणे, मनात ठेवणे, हे चूक असेल की बरोबर? तसेच… तुम्हाला खरंच ते तुमच्या नात्यात येऊ द्यायचे नसेल किंवा ते विसरून पूर्वीसारखेच एकजीव राहायचे असेल तर ते शक्य आहे का? 

थप्पड चित्रपटात ह्याच प्रश्नांची उत्तरे असावीत असे वाटते. त्यातली नायिका (तापसी पन्नू) ही  नवऱ्याने भर पार्टीमध्ये थप्पड मारली ह्या “किरकोळ” कारणासाठी विभक्त होण्याचा निर्णय घेते. आणि मग आजूबाजूचे किंवा स्वतः नवरा कसे रिऍक्ट करतात त्याचे सुंदर चित्रण आहे. 

शेवटी जाता-जाता ह्या सगळ्यामध्ये अजून २ complications ऍड करतो म्हणजे मग तुमचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल का ते ठरावा. १. पुरुषाने स्त्री ला ना मारता स्त्रीने पुरुषाला असे वारंवार मारले असेल तर?२. ते स्त्री-पुरुष जर पती-पत्नी सारख्या फॉर्मल नात्यातले नसतील…किंबहुना लिव्ह-इन रिलेशनमधले असतील, किंवा नुसतेच घनिष्ट मित्र-मैत्रीण (जिथे कोणतेच कायदेशीर बंधन नसते) तर? चित्रपटातल्या नायिकेसारखे वेगळे होण्यासाठी केस लढवण्याचीही गरज नाही…किंवा आजूबाजूच्या लोकांनी सल्ला देण्याचाही प्रश्नच नाही… तेव्हा ते नाते कसे सावरणार? कोण पुढाकार घेणार? आणि का? 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: